Archive for जानेवारी, 2010

गुलकंद

गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०
 
आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची एक वेगळीच excitement असते. तशी ती मधुश्रीलाही होती. मधुश्री अरविंद आपटे, दिसायला गोरीपान आणि अतिशय देखणी. दहावीत ८५% मिळवून, नावाजलेल्या डी. एम. कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला होता. खूप चांगला अभ्यास करून तिला बाबांसारखं इंजिनिअर व्हायचं होतं.
  
अकरावीच्या वर्गात, काही शाळेतल्या मैत्रिणीही बरोबर होत्या. मधुश्री, आश्लेषा आणि मिताली, तिघी शाळेत तश्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या पण कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप झाला. तिघीही सुस्वरूप. कॉलेजमध्ये त्यांना बार्बी ग्रुप म्हणून नाव पडलं होतं. तिघी मिळून रोज सायकलवरून कॉलेजला जात. कॉलेजमध्ये मुलींसाठीचा पार्किंग लॉट वेगळा होता.   
 
कॉलेज सुरु होऊन ६ महिने लोटले. आजचा कॉलेजचा दिवस इतर दिवसांसारखाच. आज फिजिक्सचं practical होतं. Practical झाल्यावर तिघी सायकल stand कडे चालत चालल्या. आज सायकल शोधायला फार कष्ट पडणार नव्हते. बराचसा कॉलेज लेक्चर्स संपवून घरी गेलं होतं. काही मोजक्याच सायकली पार्किंग लॉटमध्ये उरल्या होत्या. मधू, आशू आणि मितू तिघींना आज पार्किंग ला जवळ जवळच जागा मिळाली होती.  तिघी आपापल्या सायकलींपाशी पोहोचल्या. सायकलच्या पुढच्या बास्केटमध्ये sac ठेवताना मधूला काहीतरी दिसलं. तिच्या बास्केटमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं. अरे बापरे गुलाबाची फुलं? खाली चिठ्ठीही होती. तिने आशू आणि मितूला हाक मारली, “हे बघा ना काय आहे?”
“आं??” -आशू
“कोणी ठेवलं?” -मितू.
“आता मला काय माहित?.. काय करू मी?” -मधू.
“चिठ्ठीत काय आहे?” -आशू. मधूने चिठ्ठी उघडली.
“कविता आहे.” -मधू.
“नाव आहे का?” -मितू.
“अनामी प्रेमिक म्हणून लिहिलंय. काय करू इथेच टाकून देऊ का?” – मधू.
“नको इथे नको.” -आशू.
“अग घरी कशी नेऊ? आईला काय सांगू?” -मधू.
“चिठ्ठी आत्ता पुरती लपवून ठेव.” -मितू.
“आणि फुलं?” -मधू.
“माझ्या बागेतली आहेत म्हणून सांग.” -आशू. आशूचा मोठा बंगला होता. बंगल्याभोवती मोठी बाग होती. तिच्या नावावर हे खोटं बिनदिक्कत खपलं असतं.
“ओके”. मधूला तेवढ्यापुरता तोडगा मिळाला होता.
“ए पण माझ्या बास्केट मध्ये का ठेवलं???.. तुमच्या दोघींपैकी कुणासाठी तर नसेल ठेवलेलं, चुकून माझ्या बास्केटमध्ये??…” मधूची उगाच शंका.
“परत ठेवलं तर बघू कुणाच्या बास्केट मध्ये आहे ते…” – आशू.
घरी आल्यावर आईने मधूला विचारलंच फुलांबद्दल. “आशूच्या बागेत खूप फुलं आली होती. तिने दिली आहेत” असं मधूनं सांगितलं. आईशी खोटं बोलणं मधूला आवडलं नाही.
दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. सुदैवाने आज आईने काही विचारलं नाही. फुलं आशूच्या बागेतलीच असावीत असा समज तिने करून घेतला असावा. मधूला खोटं बोलायला लागलं नाही, ह्याचं समाधान होतं. 
पुढं हे वारंवार घडायला लागलं. दोनदा तीनदा आई म्हणलीही, “आशूच्या बागेत केवढी फुलं येतात ना?” एवढ्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्नही आईने परस्पर सोडवला होता. काही फुलं देवासाठी ठेऊन, उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा ती गुलकंद करत होती. गुलकंद फारच चांगला होत होता.
अकरावीचं उरलेलं वर्ष आणि बारावीचं आख्खं वर्ष, आशूच्या बागेतल्या फुलांचा मधूच्या घरी गुलकंद बनत होता. मधूच्या कपाटातही अनामी प्रेमिकाच्या कवितांची मोठी चवड लागली होती.
 
बारावी झाल्यावर, मधूच्या बारावीसाठी थांबवलेली, बाबांची बदली अखेर नागपूरला झाली. मधूने नागपूरच्या इन्जिनिअरिन्ग कॉलेजात प्रवेश घेतला. बारावीत चांगले मार्क्स मिळाले होते. आशू आणि मितू अजून पुण्यातच होत्या, इन्जिनिअरिन्ग करत. तिघीही एकमेकींच्या संपर्कात होत्या. नागपूरला शिफ्ट झाल्याने आईचा गुलकंद मात्र बंद झाला होता. मधूचं इन्जिनिअरिन्ग झाल्यावर, तिच्या बाबांनी एक चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. ती आता नवरयाबरोबर यु. एस. मध्ये राहत होती. 
 
बारावी नंतर जवळ जवळ सहा एक वर्षांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा होता. मितू आणि आशूने जायचं ठरवलं. आशूबरोबर तिचा होणारा नवराही होता. त्याचे ऑफिस मधले काही सहकारी मेळाव्याला जाणार असल्याने तोही आला होता. त्याच्या सहकाऱ्यांना आशूला भेटण्याची इच्छा होती. त्याने सगळ्यांशी आशू आणि मितालीची ओळख करून दिली. सहकाऱ्यांमध्ये तुषारही होता. त्याने आशू आणि मितूला ओळखलं. “अरे आपण एकाच batch मध्ये होतो. सायन्स बी डिविजन. तुमच्याबरोबर अजून एक असायची ना?”, तो  म्हणाला.
“हो मधू, मधुश्री.” -आशू म्हाणाली.
“ती कुठे आहे? आली नाही का?” -तुषार.
“नाही ती यु.एस. ला असते. मागच्या वर्षी आली होती. यावर्षी परत यायची आहे.” -मितू.
“ओह बर!” -तुषार.
“तिच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे पुढच्या महिन्यात.” -मितू. न विचारता ज्यादाची माहिती द्यायची तिला सवयच होती.
“पुस्तक??” -तुषार.
“हो कवितांचा.. कवितासंग्रह… मागच्या वर्षी एक भाग तिने प्रकाशित केला आहे. ह्यावर्षी दुसरा.” -आशू.
“ओह बर! काय नाव पुस्तकाचं?” -तुषार.
“गुलकंद!”
“बरं…”
  
दुसऱ्या दिवशी तुषार आप्पा बळवंत चौकात गेला. त्याने ‘गुलकंद’ शोधून काढलं. त्यावर लेखिकेचं नाव नव्हतं. पण प्रकाशक म्हणून नाव होतं, ‘मधुश्री साने, अभय साने’. “अरेच्च्या, हिचं नाव मधुश्री आपटे होतं ना?… लग्न झालेलं दिसतंय!”, तो मनात हळहळला. त्याने ते पुस्तक विकत घेतलं. दुकानाबाहेर येऊन, साईड stand वर लावलेल्या, आपल्या तिरक्या बाईकवर रेलून उभा राहिला. पिशवीतून पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये, लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी “गुलकंद” असं लिहिलं होतं. त्याला मुखपृष्ठ आवडलं. पुस्तक उघडून तो चाळू लागला. पुस्तकाच्या पाचव्या पानावर ऋणनिर्देश होता…
“माझ्या अनामी प्रेमिकास, तू दिलेल्या गुलाबांचा गुलकंद मी तुला देऊ शकले नाही, पण ह्या तुझ्या मुरलेल्या कवितांचा गुलकंद तुझ्यापर्यंत पोहोचावा ही इच्छा! तुझी ओळख पटल्यास, पुढच्या आवृत्तीचे योग्य श्रेय (मोबदला)  तुला देण्यात येईल -मधुश्री अभय साने.”
 
Advertisements

Identity Crisis

Identity Crisis -संपदा म्हाळगी-आडकर १/१९/१०
 
काल रात्री चंद्र माझ्या खिडकीपाशी आला
चोर पावलांनी आत येऊन म्हणाला
 
चार क्षण बस असा माझ्या संगतीला
आज किती दिवसांनी मिळाला वेळ भेटायाला
 
रोज कामातून मिळते कुठे सवड मला
महत्वाचं सांगायचं राहून जातंय तुला
 
पाहतोय गेले दीड वर्ष जातोस तू कॉलेजला
बोअर लेक्चरला तुझा जीव असतो कंटाळलेला
 
मात्र असतोस जोशात उभा बायो प्रक्टिकलला 
कारण पार्टनर म्हणून ती उभी सोबतीला
 
भाव खात मागतोस तिची वही अभ्यासाला
परतण्याआधी डोळ्यामध्ये साठवून घेतोस तिला
 
मग रात्री झुरत बसतोस घेऊन फोटो उशाला
आईला सापडण्याचं नसतं टेन्शन कशाला?
 
पलंगावर पडून न्याहाळत बसतोस माझ्या कला
माझ्यामध्ये तिचाच चेहरा दिसतो ना रे तुला
 
मला माहितेय तू हो म्हणणार नाहीस कधी
पण माझा प्रॉब्लेम तू ऐकून घे आधी
 
आता एकदाचं मनातलं सारं सांगून टाक तिला
रोज रोजचा identity crisis सहन होत नाही मला
 
 

अध्वर्यू

अध्वर्यू  -संपदा म्हाळगी-आडकर  १/२०/१०  
 
जयहिंद मिलचा सगळ्यात जुना कामगार म्हणून एकनाथ वेसणे प्रसिद्ध होता. खरंतर मिल मालकापुढे आत्तापर्यंत तोच तग धरून उभा होता. चार एक वर्षांपूर्वी तो युनिअनचा लीडरही झाला. कडक शिस्तीचा पण कर्तव्यकठोर म्हणून प्रसिद्ध होता. कामगारांबद्दल त्याला कळवळा होता. मिलमध्ये त्याला मान होता.
 
घरी वारकरी पंथाचं प्रस्थ होतं. एकनाथही दरवर्षी न चुकता वारीला जात असे. रोज विठोबासारखं, आपल्या सावळ्या कपाळावर उभं गंध लावून तो कामाला जायचा. मिलच्या निळ्या युनिफोर्ममध्ये, कमरेवर हात ठेऊन उभा राहिला की सावळ्या विठोबाचा अवतारच दिसायचा. वारीचे प्रसंग रंगवून सांगणं त्याला फार आवडायचं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कोणी पिन मारली की लगेच अभंग गाऊन दाखवायचा.
 
एकनाथच्या घरी म्हातारी आई, बायको, मुलगा विश्वनाथ आणि मुलगी राधा होते. विश्वनाथ कॉलेजात तिसऱ्या वर्षात आणि राधा शाळेत नववीत शिकत होते. विश्वनाथ हुशार आणि तल्लख बुद्धीचा होतं. वडिलांच्या कामात, राजकारणात त्याला रस होता. मिलमध्ये चाललेल्या घडामोडींबद्दल वडिलांशी चर्चा करायला त्याला आवडत असे.
 
गेल्या काही वर्षात मिलमध्ये नवी भरती झाली नव्हती. पण कुणाकुणा कामगारांचे मुलगे त्यांच्या जागी चिकटले होते. गेल्या वर्षी अशीच काही नवी मुले दाखल झाली होती. मिलमध्ये तरुणांची संख्या जाणवण्या इतपत वाढली होती. नवं रक्त जुन्या जाणत्यांना कधी डोईजड होईल ह्याचा नेम नव्हता. 
 
नवं वर्ष उजाडलं पण मिल मालकाने पगारवाढीचं नाव काढलं नव्हतं. नवीन पोरांमध्ये चुळबुळ सुरु झाली होती. त्यांची काही चूक नव्हती त्यात. शिकाऊ कामगार म्हणून त्यांना पगारही कमी मिळत होता. महागाई रोज नवे उच्चांक गाठत होती. तुटपुंज्या पगारात घरचं भागवणार तरी कसं? नवीन असल्याने उघड उघड बंद पुकारणं त्यांना मानावाण्यासारखं नव्हतं. पण कुठतरी ठिणगी पेटल्याची जाणीव एकनाथला होती.
 
एक दिवस सकाळीच काही कामगार त्याला घरी भेटायला आले. “दादा पगारवाढीबद्दल  मालकाशी बोला” म्हणून सांगू लागले. पगारवाढ दिली नाही तर संप करू म्हणू लागले. एकनाथने त्यांना समजावलं, “काही दिवस धीर धरा. मी पुजारीशी बोलतो. त्याने मालकाला सांगितलं की मालक बोलवेल आपल्याला बोलणी करायला”. काही दिवस वाट पाहायचं ठरलं. विश्वनाथ त्यांचं बोलणं ऐकत होता. 
 
गंगाधर पुजारी, मालकाचा उजवा हात होता. अतिशय बेरकी होता. तो एकनाथला चांगला ओळखत होता पण एकनाथ त्याला चांगला ओळखत होता का? पुजारीच्या मनाचा ठाव आत्तापर्यंत कोणाला लागला नव्हता. एकनाथ जाऊन, पुजारीला भेटला. बोलता बोलता संपाचं सूतोवाच केलं. पुजारी मालकाशी बोलतो म्हणाला. 
 
महिना लोटला तरी मालकाकडून बोलावणं आलं नाही. कामगारांचा धीर सुटत चालला होता. एकनाथही त्यांना फार दिवस थोपवू शकणार नव्हता. युनिअनच्या मीटिंगमध्ये मालकाशी बोलायचं ठरलं. ह्यावेळी ते पुजारी थ्रू जाणार नव्हते. १०% पगारवाढ मागायची असं ठरलं. मालक एवढं देणार नाही हे एकनाथला माहित होतं. पण कामगारांनी ते ऐकून घेतलं नाही. २ दिवसांनी संप सुरु होऊन, मिलला टाळा लागला.
 
मालकाला ह्या सगळ्याची आगाऊ सूचना पुजारीनी दिली होती. कामगार पगारवाढ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे स्पष्ट होतं. बोलाचाली यशस्वी करून कमीत कमी पगारवाढ कशी देता येईल हे लक्ष होतं. मिलला टाळा लागून १० दिवस झाले होते. प्रोडक्शन पूर्ण थांबलं होतं. इथून पुढचा प्रवास तोट्याचा होता. एकनाथला बोलणी करायला बोलावलं. मालक, पुजारी, एकनाथ आणि काही युनिअनची माणसं सगळे समोरासमोर बसले. मालकाच्या वतीनं पुजारीच बोलत होता. “एकनाथ भाई, जरा कामगारांशी बोला”
“मालक महागाई फार वाढली आहे. पगारवाढ करणं गरजेचं आहे” एकनाथ मालकाकडे बघत म्हणाला.
“अरे इकॉनॉमी डाऊन आहे. कशी देणार पगारवाढ?”-पुजारी
“साहेब ओर्डरीवर ऑर्डरी मिळताहेत कपड्यांच्या. जेवढ्या ऑर्डरी तेवढंच आमचं रक्त जळतं”-एकनाथ
“तुमच्या मागण्या तर सांगा?”-मालक
“पगारवाढ….१०%”-एकनाथ
“१०%??????”-पुजारी. मालक चमकला. “एवढं नाही जमायचं. ३-४ जमेल”
“परवडत नाही साहेब”-एकनाथचा सहकारी.
मालक पुजारीच्या कानात काहीसं कुजबुजला.
“तुम्ही बोलून घ्या कामगारांशी.. वाटलं तर अनुभवानुसार १% जास्त देऊ.”
एकनाथला पटलं जाऊन कामगारांशी बोलायचं ठरलं. युनिअनच्या बैठकीत त्याने मालकाचा प्रस्ताव सांगितला. 
 
नव्या कामगारांना प्रस्ताव रुचला नाही. त्यांना फार वर्षांचा अनुभव नव्हता. त्यांच्या वाट्याला ३% च यायचे होते. अननुभवी कामगारांची संख्या जास्त असल्याने मालकाला खर्चही कमी येणार होता. मालकाने बरोबर खेळी खेळली होती. एकनाथने खूप समजावलं. “तू मालकाला जाऊन मिळाला आहेस. तुला वरून १% आणि खालून १०% मिळणार असतील” असं ऐकून घ्यावं लागलं. एकनाथचे न ऐकता, त्यांनी स्वतः मालकाला भेटायचं ठरवलं. ते गेले पण मालकाशी भांडून परत आले. बैठकीत बाचाबाची ही झाली. प्रकरण हातघाईवर येणार एवढ्यात एकनाथ मधे पडला.
 
संपाचा पेच वाढत चालला होता. मिल बंद होऊन १ महिना झाला होता. उधार-उसनवारीवर कामगारांच्या चुली तग धरून होत्या. कामगारांच्या संतापला वाचा फुटून मिलवर तुरळक दगडफेकही झाली होती. एकनाथला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याने युनिअनच्या बैठकीत “बोलणी करून, पगारवाढ स्वीकारू” म्हणून सांगितलं. सहकाऱ्यांचा विरोधी सूर पाहून त्याने पद सोडायचं ठरवलं.
 
२-३ दिवसांनी मालकाचं बोलावणं आलं. ह्यावेळेला एकनाथला एकट्यालाच बोलावलं होतं. ६% पगारवाढ देण्याची बोलणी झाली. एकनाथ खूष झाला. मालकाने पेढ्यांचा बॉक्स हातात ठेवला. कागदपत्रांवर सह्या झाल्या. बाहेर तिष्ठत उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना ही बातमी देण्यासाठी गेला. तेवढ्यात कुठूनसा आलेला एक मोठा दगड त्याच्या डोक्यावर आदळला. घाव वर्मी बसला होता. तो तिथेच कोसळला. समोर उभ्या असलेल्या त्या कामगारांच्या क्रुद्ध जमावाने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
एकनाथने मालकाशी हातमिळवणी केल्याची पुडी यशस्वीरीत्या सुटली होती. त्याचे पडसाद उमटले. एकनाथ मात्र हॉस्पिटलात पडून मृत्यूशी झुंज देत होता.
 
कामगारान्मधल्या असंतोषाचा फायदा घेत मालकाने, एकनाथला लक्ष बनवले आणि ४-५% पगारवाढ देऊन तात्पुरते शांत केले. पुजारीला मात्र भरघोस बोनस मिळाला होता.
 
***
 
एकनाथ गेल्यावर त्याच्या बायकोने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथचे ही कॉलेजचे शिक्षण संपले होते. त्याने शहरातच राहून नोकरी करण्याचे ठरवले. एकनाथ गेल्यावर, त्याच्या जागी विश्वनाथला मिलमध्ये नोकरी मिळणार होती पण तो तेंव्हा शिकत होता. शिक्षण अर्धवट टाकून नोकरी करण्यास आईचा नकार होता की मिलमध्ये नोकरी करण्यास?
 
आपल्या तल्लखपणामुळे विश्वनाथने लवकरच नोकरी मिळवली. तोही एका मिलमध्ये काम करत होता. मिल मालकाच्या, मुनिमाच्या ऑफिसमध्ये मदतनिसाचं काम. त्याने ते आईला सांगितलं नव्हतं. आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि वेगवान कामाने त्याने लवकरच मिल मालकाची मर्जी संपादन केली. कामातल्या खाचाखोचा समजून घेतल्या. मिलच्या राजकारणाचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं होतं.
 
पुढे मिलमध्ये कामगारांचा संप झाला. विश्वनाथला वडिलांची आठवण झाली. संपामुळे वातावरण तापलं होतं. राजकीय हस्तक्षेपाची चिन्हं दिसत होती. तसा तो झाला असता तर मिल मालकाला आर्थिक फटका बसणार होता. कामगारांच्या पिळवणुकीचं राजकीय भांडवल झालं असतं. मिल मालक आणि मुनीम कामगारांशी बोलणी करत होते. दोनदा झालेली बोलणी फिसकटली होती. मुनीम चिवट होता. त्याला त्याचे खिसे भरण्यात जास्त रस होता.
 
संप होऊन १५-२० दिवस लोटले. एक दिवस कामगारांच्या रागाचं पर्यावसन जाळपोळ आणि दगडफेकीत झालं. मुनिमाच्या ऑफिसवरही दगडफेक झाली. त्यात किरकोळ नुकसान सोडलं तर फार काही झालं नाही. ऑफिसच्या दरवाजावरील पाटीला कामगारांनी काळ फासलं. विश्वनाथ ती पाटी रंगवण्यासाठी पेंटरकडे घेऊन गेला.
 
मिलचा कामगार नेता तरुण होता. सळसळतं रक्त होतं. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तो मागे हटणार नव्हता. विश्वनाथची त्याच्याशी चांगली दोस्ती होती. मुनिमाशी बोलून काहीही होणार नव्हतं. विश्वनाथने तडक मिल मालकाशी बोलायचं ठरवलं. कामगारांचा संप मोडून काढण्याची गरज होती. ती कामगारांची गरज होती आणि मिल मालकाचीही. विश्वनाथ विजेच्या गतीने काम करत होता.
 
४-५ दिवसांनी मुनिमाचा राहत्या घरात खून झाल्याची बातमी आली. कामगारांशी हातमिळवणी केल्याबद्दल मिल मालकाने त्याचा काटा काढल्याची चर्चा सगळीकडे पसरली होती. पण ह्या खुनाचं बालंट कामगारांवर येणार होतं. निम्मं काम झालं होतं.
 
मिल मालकाला बरोबर घेऊन विश्वनाथने कामगारांशी बोलणी केली. सुवर्णमध्य गाठला. संप संपला. विश्वनाथ आता मिलचा नवा मुनीम झाला होता. मुनिमाच्या ऑफिसच्या दारावरची पाटी आधीच रंगवायला गेली होती. काय नाव घालायचं हे विश्वनाथने आधीच सांगितलं होतं. “श्री. विश्वनाथ ए. वेसणे -मुनीम”. पेंटरच्या दुकानात पाटीवर नाव घातलं जात होतं. आधीचं “श्री. गंगाधर पुजारी -मुनीम” हे नाव कधीच पुसलं गेलं होतं. पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी होती. वडिलांसारखं कपाळाला गंध लावून विश्वनाथ वारीला जाणार होता.

कबड्डी

कबड्डी संपदा म्हाळगी-आडकर ०१/१९/२०१०
 
माझ्या माणूस म्हणून झालेल्या जडण घडणीत कबड्डी ह्या खेळाचा फार मोठा वाटा आहे. तसा कबड्डी हा मराठी मातीतला खेळ पण लोकमान्यता असूनही राजमान्यतेसाठी तडफडणारा. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला असला तरी घरच्यांनी दुर्लक्षिलेला. रांगडा असल्याने लोकांनी मुलींसाठी तसा निषिद्ध मानलेला.
 
कबड्डीकडे मी ओढली गेले तशी अनिच्छेनेच. माझी मोठी बहिण सहावीत असताना, मैत्रिणींच्या नादाने कबड्डी खेळायला जाऊ लागली. माझी धष्टपुष्ट शरीरयष्टी थोडी उतरवण्यासाठी माझ्या बाबांनी मलाही कबड्डीला घातलं. घरात खेळासाठी खूप पोषक वातावरण होतं. मी चौथीत होते. सगळ्यात लिंबू-टिंबू त्यामुळे माझे तिकडे फार लाड व्हायचे. हि एक जमेची बाजू असली तरी सकाळी लवकर उठून ६:३० च्या सरावाला जायचं जीवावर यायचं. पुढे पुढे त्याचं वेड लागलं. चौथीपासून बारावीपर्यंत, शालेय, महाविद्यालयीन, राज्यस्तरीय, राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या थरात मी कबड्डी खेळले. 
 
शालेय कबड्डीची मजा काही वेगळीच. शाळेत खेळामधल्या मुलींना एक वेगळाच मान असायचा. स्पोर्ट्स डेच्या दिवशी खेळाच्या विद्यार्थिनींचा गौरव व्हायचा. त्याची वेगळीच झिंग असते. शाळेत भैय्याजी रोलर फिरवून अधून मधून सगळं पटांगण एक समान करत. पण रोज कबड्डीच्या ग्राउंडवर झारीने पाणी मारायला, दोरीने चुन्याची फक्की मारायला मजा यायची.
 
शालेय कबड्डीमध्ये वयाप्रमाणे, वजनाचेही गट असत. प्रसंगी शाळेच्या टीममधून  खेळण्यासाठी वजन उतरवावे लागे. शाळेच्या टीममध्ये खेळून, स्पर्धा जिंकून परत शाळेत आल्यावर, ध्वनिक्षेपकावरून विजय जाहीर केला जायचा. तो जाहीर झाल्यावर शाळेच्या मध्यभागी असलेल्या पटांगणावर कबड्डीच्या मुली मोठ्याने शाळेची आरोळी देत. आरोळी देताना सगळी शाळा कठड्यापाशी येऊन उभी रहायची.  फार अभिमान वाटायचा. सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखा वाटायचं. शाळेसाठी खेळत असताना, शाळेसाठी समर्पणाची भावना जास्त असायची. शाळेला सर्व खेळांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्यावर आपला हि त्यात खारीचा वाटा असल्याचं समाधान असायचं.
 
शालेय सरावादरम्यान खेळाडूंना व्यावसाईक कबड्डीसाठीही ग्रूम केलं जायचं. हे महत्वाचं काम राणाप्रताप संघाच्या सदस्य ताया आणि सर करत. त्यामुळे शाळा चालू असतानाच आणि त्या नंतर मी ‘राणाप्रताप संघ’ संस्थेकडून व्यावसाईक कबड्डी खेळले. ‘राणाप्रताप संघ’ ही कबड्डीतली एक pioneer संस्था आहे. श्रीमती शकुंतला खटावकर, श्री फिदा कुरेशी ह्यांचे मौल्यवान मार्गदर्शन त्या काळात मला मिळाले. फिदाभाई सरांकडून खेळ कौशल्याबरोबरच संघभावनेचे ही धडे मिळाले.
 
कबड्डीच्या निमित्ताने आम्ही खूप फिरलो, खूप टूर्स केल्या. बाबांनीही मुली म्हणून “इतक्या लांब कसं पाठवू?” असं कधी म्हटलं नाही.
टूरला जायला मला फार आवडायचं. पण शाळा कॉलेज बुडायचं. तो अभ्यास नंतर भरून काढावा लागे. त्यात मैत्रिणींची खूप मदत व्हायची. टूरला जायचं म्हणजे घरी लगीनघाई असायची. माझी ताई आमच्या दोघींच्या bags भरायची. तो एक सोहळा असायचा. टूरला १२ जणींचा संघ १ व्यवस्थापक आणि १ कोच जात. १२ जणी एकत्र फार धमाल यायची. टूर साधारण २-५ दिवस चालायची. त्या दिवसात सर्व गोष्टी आपापल्या कराव्या लागत. टूरद्वारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंडणे झाले.
संघ हे एक कुटुंबच बनून गेलं. खूप मैत्रिणी मिळाल्या.
 
कबड्डी हा सांघिक खेळ. चढाओढ, इर्षा हे सांघिक खेळाचे एक भाग आहेत. पण राजकारण आणि दुखापतीही तितक्याच प्रमाणात असतात. त्यामुळे दुर्दैवाने खूप चांगल्या खेळाडूंनी कबड्डी सोडल्याचे पहिले आहे.  
 
झी मराठीवर “लक्ष्मणरेषा” ही मालिका बघताना, जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला म्हणून लिहायला घेतलं. मागे वळून पाहताना “अभ्यासाबरोबरच आपण कबड्डी ही खेळू शकलो” ह्याचं बरं वाटतं. कबड्डीमुळे मला मिळालेल्या Patience (धीर), Performance (सादरीकरण), excellence (गुणवत्ता) आणि perseverance (झपाटलेपणा) ह्या गोष्टी आयुष्यभर माझ्या बरोबर राहतील.
 
 

खंत

खंत -संपदा म्हाळगी-आडकर १/१७/१०
 
कर्दनाचा दिवस आणि कत्तलीची रात्र होती
मुंबई इतिहासातली मर्दनाची अवस होती
 
कत्तली करीत सुटती विदेशीचे दश खल
परी त्यांना ठेचण्या खाकी ठरली दुर्बल
 
व्यवस्थेची लक्तरे अन शासनाची दुरुत्तरे
होरपळली त्यात देशवासीयांची अंतरे
 
खलांना संहारण्या पत्करली ज्यांनी वीरगती
आज त्यांच्या जाकीटांची होत आहे राजनीती
 
जनता प्रक्षुब्ध अन सरकारे निर्बुद्ध जेथे
रक्त आसवांनी धरित्री शुब्ध आणि क्रुद्ध येथे
 
दहापैकी नऊ मेले, एक खल जिवंत आहे
मात्र आमच्या देशाची न्यायक्रिया संथ आहे
लोकशाहीतल्या “लोक” चा हा खरा अंत आहे
हीच मोठी खंत आहे

नटरंगच्या प्रेरणेतून लावणी

खरंतर लावणी हा माझा प्रांत नव्हे, पण नटरंग चित्रपटात काही अप्रतिम लावण्या आहेत. त्यामुळे मी एवढी झपाटली गेले कि म्हटलं “आपण एक लावणी लिहून बघू, जमते का?”

नटरंगच्या प्रेरणेतून  लावणी -संपदा म्हाळगी-आडकर १/१३/१०

रंगमहाली परतुनी येता देईन अत्तर विडा
राया आणा सातारी कंदी पेढा ||धृ||
 
जाता सातारला वरचे-वरी,
यावेळी मी येते बरोबरी
एकाला दुसरा असलेला बरा,
मला दाखवा अजिंक्यतारा
नका घेऊ कोणता आढा-वेढा ||१|| राया आणा सातारी कंदी पेढा
 
जाता सातारला शुक्कुरवारी,
धरू पहिली येसटीची गाडी
अन जाऊन कोल्हापुरी,
साज आणि शालू भरजरी
आंबाबाईस जाऊन सोडा ||२|| राया आणा सातारी कंदी पेढा
 
कुणातरी महाबळेश्वरी धाडा,
तिथला मध हाय नामचीन बडा
सगळं करायला वेळ हाय थोडा,
पाचगणी जमायचं नाही मला
आता तुम्हीच सोडवा हा तिढा ||३|| राया आणा सातारी कंदी पेढा
  
 

भिंग

भिंग  -संपदा म्हाळगी-आडकर १/१६/१०
 
रविवार, सुट्टीचा दिवस. सकाळी सगळं स्लो घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मस्त वाफाळलेला चहा आणि सिगारेट घेऊन तो खिडकीपाशी बसला होता. मुझिक सिस्टीमवर संजीव अभ्यंकरांचा मंत्रमुग्ध करणारा भटियार चालू होता. चहाची वाफ आणि सिगारेटची धुम्रवलये ह्यांची कुस्ती बघण्यात तो गुंग होता. मधेच संजीवच्या  गायकीला दाद देत होता. शेवटी चहा संपला आणि सिगारेटचा विजय झाला. तसा तो व्हायचाच होता. कारण एक संपली तर दुसरी पेटवायला त्याला मनाई करणारं कोणी नव्हतं. खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाल्याने पेपर वाचवा आणि क्रॉसवर्ड मध्ये जाऊन यावं असं त्याने ठरवलं होतं. नवीन पिक्चरचा मुहूर्त होऊन, तो २ आठवड्यात फ्लोअरवर जाणार होता. ह्या दोन आठवड्यात खूप काम असणार होतं. त्या येणाऱ्या कामासाठी तो स्वतःला फ्लशआउट करत होता. स्टान्स घेत होता.  
 
दरवाजाची बेल वाजली. नोकराने दरवाजा उघडला. त्याने हसत गौतमचं स्वागत केलं.  गौतम सोफ्यावर बसला, “मला माझी सीडी हवीय” म्हणाला.
“कोणती सीडी?” -तो
“शशी साल्या, बैजू बावरा. तुला देऊन २ महिने झाले. बायकोने निक्षून सांगितलं होतं तुला देऊ नको म्हणून; तरी मी दिली.”
“बैजू बावरा?? बघायला लागेल”
“अरे कालपासून तिला ऐकायची होती. मी काहीबाही कारणं देऊन टाळतोय.. तिला कळलं तर आकाशपाताळ एक करेल रे..”
“बघतोsssssss”
ती सीडी ऐकून त्याला नक्कीच बरेच दिवस झाले होते, आता ती कोणत्या ढिगाऱ्याखाली असेल हे त्याला सांगता येणार नव्हतं. सीडीच्या कपाटाचा एक एक कप्पा रिकामा करून, सगळ्या सीडीज मधोमध, जमिनीवरच तो ठाण मांडून बसला. गौतमने डोक्याला हात मारला. आता २ तासांची निश्चिंती होती. बायकोला फोन करून तासाभरात येतो असं सांगून तो सोफ्यावरच मांडी घालून बसला. समोरच्या बुककेसमधून त्याने एक पुस्तक आधीच काढलं होतं. नोकराने गौतमसाठी चहाही आणला होता.
 
गौतमशी बोलता बोलता, सीडी, कॅसेट्स चाळताना, मधूनच एखादी सीडी लावून पाहण्याचा मोह त्याला होत होता. पण संजीवचा राग फारच रंगत आला होता. त्याला आवडणारा त्रिताल चालू होता. गौतमही घाई करत होता. त्याला बायकोबरोबर लंचला जायचं होतं. शेवटी एकदाची गौतमची सीडी सापडली. ती नेताना, गौतम भटियारची सीडी आणि अर्धवट वाचलेलं पुस्तकही घेऊन गेला. २ महिन्यांचा करमणूक कर!
 
क्रॉसवर्डमध्ये जाऊन नवीन पुस्तक घेऊन येण्याचा प्लान, गौतमच्या येण्याने धुळीला मिळाला होता. आता ह्या सीडीज तरी आवराव्या म्हणून तो कामाला लागला. मधेच नोकराला आवाज देऊन, दुपारी जेवायला घरीच असल्याचा सांगितलं. तो परत त्या सीडी सागरात बुडून गेला. भटियार गौतमने नेल्याने, रिकामी जागा भरण्यासाठी तो काहीतरी शोधात होता. मनासारखं, त्याहीपेक्षा मूडसारखं काही सापडत नव्हतं. एवढ्यात जुन्या कॅसेटच्या ढिगाऱ्यात एक “विसरशील खास मला” लिहिलेली कॅसेट नजरेस पडली. अक्षर ओळखीचं होतं. तिचं होतं. सिनेमाची रिळे फिरून फिल्म उलगडावी तश्या स्मृती उलगडू लागल्या. “स्मृती” च्या स्मृती उलगडू लागल्या. दिग्दर्शक म्हणून मानाने मिरवणारा स्वतःचा जीवनपट डोळ्यासमोर पाहून गोंधळून गेला. त्यातला त्याला काहीही एडीट करता येणार नव्हतं.. दुर्दैवाने.
 
 ***
 
चित्रकलेच्या वेडापायी त्याने जेजे मध्ये प्रवेश घेतला. तिथे असताना प्रो. दयालांनी तयार केलेल्या स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचा तो अविभाज्य भाग होता. हा ग्रुप प्रो. दयालांच्या आर्ट क्लास मध्ये जमायचा.  ग्रुप दर महिन्याला एक नवं challenge स्वीकारत असे. वेगवेगळे प्रवाह निवडून, विचारांची अभिव्यक्ती करायला शिकवणं हा त्या मागचा उद्देश होता. ह्या ग्रुपने त्याला पुरतं झपाटलं होतं.
 
शेवटचं वर्ष होतं. “हे challenge पार केलंत तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल”, प्रो. दयालांनी सांगितलं. Challenge च्या दिवशी प्रो. दयाल आले पण एकटे नाहीत. ती त्यांच्या बरोबर होती. सुंदर होती. रंगकर्मी विद्यार्थ्यांची उत्कंठामिश्रित भीती शिगेला पोहोचली. “आज तुम्हाला न्यूड पेंटिंग करायचं आहे” असं अनाउन्स केलं. पण एक अट होती, “सबजेक्ट शरीराने न्यूड असेल पण मन कव्हर्ड आहे. त्या मनाचे रंग दिसू द्या. तिच्या अंत:रंगाचे रंग दिसू द्या.” कॅनवास, पेन्सिल्स, रंग बाहेर आले. विद्यार्थी कामाला लागले. “अंतरंगाचे रंग कसे दाखवायचे?” मोठं challenge होतं.
ती कपडे उतरवून समोर बसली. तिला त्याचा सराव असावा. ती सुंदर होती. तिचा गव्हाळ सोनेरी रंग, पठडीतल्या सुंदरतेच्या परीमाणांना छेद देणारा. कमरेपर्यंत रुळणारे लांबसडक रेशमी केस. कमनीय शरीरात सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली. आखीव चेहऱ्याला किंचित न शोभणारी भेदक नजर… डायरेक्ट काळजाला हात घालणारी. ह्या सौंदर्याच्या पार कसं पाहायचं.. सगळ्यांना प्रश्न पडला होता…त्यालाही पडला. हातात पेन्सिल घेऊन तो कागदावर रेघोट्या ओढू लागला.
 
 ***
 
जेजे मधून पास झाल्यावर त्याने NSD मध्ये प्रवेश केला. सर्जनशीलतेमधले सगळे प्रयोग करून पहायचं त्याने ठरवलं होतं. त्यात जे सगळ्यात जास्त आवडेल, त्याचा व्यवसाय करायचं त्याने ठरवलं होतं. पेंटींग्ज विकून पैसेही मिळत होते त्याने फी भरली जात होती. NSD त खूप मित्र मिळाले. मैत्रिणीही.. ती परत भेटली.. त्याला सिनिअर होती.. NSD त फेमस होती हुशार आणि तीक्ष्ण म्हणून. त्याने तिला ओळखलं.. तिला जेजे मध्ये न्यूड केल्याची आठवण केली. 
“न्यूड करायला कशी तयार झालीस?” असं विचारल्यावर म्हणाली,
“मी अभिनयाचं शिक्षण घेतेय. पहिल्याच वर्गात आम्हाला शिकवलं होतं की ‘Don’t be afraid of your body’, म्हणून केलं. आणि फुकट नाही काही, प्रो. दयालांनी मला मोबदला दिला. एक सुंदर पेंटिंग!… पण तुझं काय झालं? तू झालास का पास?”
“हं”
त्यांची मैत्री घट्ट होती.. नजरेत भरण्याइतकी. तो दिग्दर्शनात होता, ती अभिनयात. दोघा एकमेकांना सर्वार्थी पूरक होते..
 
ती त्याच्याआधी पासआउट झाली.. काम शोधत होती. वेगवेगळ्या निर्मात्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. तो तिला समजावयाचा, तू कोणाकडे जाऊ नकोस.. माझ्या चित्रपटात काम कर.
त्याच्या डोक्यात कथा होती.. पटकथा पण लिहून संपत आली होती. त्याला parallel सिनेमा बनवायचा होता. तो निर्माते आणि प्रयोजाकांकडे चकरा मारत होता. एक निर्माता तयार झाला, सगळं फाईनल झालं. शोषितांच्या बंडावर चित्रपट निघणार होता “विषम” नावाचा. ती मुख्य अभिनेत्री होती. ती खूष होती… अभिनय करायला मिळणार म्हणून.
कास्टिंग झालं, मुहूर्त झाला, प्री-प्रोडक्शन मार्केटिंगसाठी फोटो-शूट चालू होतं. पुर्णांग झाकणारी साडी नेसूनही ती मादक कशी दिसेल ह्याची काळजी निर्मात्यांनी घेतली. ती खूष होती. त्याला ते पटत नव्हतं. त्याच्या चित्रपटात ते महत्वाचं नव्हतं. त्याच्या कथेची ती गरज नव्हती. त्याने विरोध केला. निर्मात्याला नवशिक्या दिग्दर्शकावर विश्वास नव्हताच. असंच चाललं तर पिक्चर चालण्याची खात्री कमीच होती. कथा, पटकथेचा मोबदला देऊन निर्मात्याने त्याची बोळवण केली.
 
ती पण सगळं सोडून येईल, त्याच्यासाठी तरी तसं करेल असं वाटलं. पण तिने नकार दिला. तिला ब्रेक हवा होता आणि तो मिळाला होता. महत्वाकांक्षा मैत्रीपुढे मोठी झाली होती.. प्रेमापुढे मोठी झाली होती… नंतर पिक्चर हिट झाल्याची बातमी आली पण आधी तो कोसळला होता.
 
 ***
 

त्याला सगळं आठवलं. ती कॅसेट तिची होती. तिने ध्वनीमुद्रित केलेली. तिची आवडती गाणी होती त्यात. “विसरशील खास मला” पण होत त्यात. पण तो तिला विसरला नव्हताच. सिनेमाचं रीळ जसं उलगडतं पण गुंता होऊ नये म्हणून लगेच फिल्म दुसऱ्या रिळाला गुंडाळतात, तसं त्याने ती कॅसेट तळाशी ठेऊन सगळ्या सीडीज कप्प्यात कोंबल्या… परत वेळ काढून आवरायचं ठरवलं. उठून सिगारेट शिलगावली.

***

त्याचा “सबकुछ बिकाऊ है” नावाचा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्याने घरी आज मेजवानी आयोजित केली होती. ह्या निर्मात्याने त्याच्या बरोबर काम करायची एक संधी दवडली होती. “सबकुछ बिकाऊ है”  च्या निमित्ताने ते पहिल्यांदाच एकत्र आले होते. पण हा चित्रपट शेवटचा असू नये म्हणून निर्माता प्रयत्न करत होता. कसाही असला तरी शशी दर्जेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक होता.
तो फार पार्ट्यांना जात नाही हे निर्मात्याला माहित होतं म्हणून फक्त जवळच्या आणि चित्रपटाशी निगडीत लोकांना निर्मात्याने बोलावलं होतं.
 
निर्मात्याने जातीने फिरून त्याला सगळं घर दाखवलं. घर मोठं अलिशान होतं… उंची फर्नीचर आणि अप्रतिम कलाकृतींनी टेस्टफुली सजवलं होतं. निर्मात्याने आपल्या पेंटींग्जचं कलेक्शन दाखवलं. एक पेंटिंग पाहताना तो बुचकळ्यात पडला. “हे कुठून आलं?”
“माझ्या एका मैत्रिणीचं आहे, स्मृती दर्शनचं. तिने गिफ्ट दिलंय, मी तिला ब्रेक दिला म्हणून”, निर्माता म्हणाला.
त्याला शब्द सुचेनात.. ते त्याचं होतं. पण स्वाक्षरी त्याची नव्हती… त्याचं पेंटिंग… स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचं.. न्यूड पेंटिंग.. ‘एक भिंग’ नावाचं… सुंदर कमनिय शरीरातून आरपार पाहणारं भिंग. बाह्य सौंदर्याच्या अंत:रंगातला दाहक अंगार दाखवणारं भिंग. त्याने साहलेला अंगार दाखवणारं भिंग… त्याच्या कॅमेऱ्याला ही नसलेलं… भिंग!