Archive for फेब्रुवारी, 2010

तळव्यावर मेंदीचा (भाग १)

तळव्यावर मेंदीचा -संपदा म्हाळगी-आडकर २/२७/१०
 
रात्रीचे २ वाजलेत. इंटरनेटवर तो इमेल चेक करतोय. डोळे फक्त एका इमेलच्या प्रतीक्षेत.
“ती रोज न चुकता येते खेळायला. आज कशी नाही आली?”, “एक इमेल तरी करायची ना?”, “मला का करेल ती इमेल? मी कोण तिचा? ती तरी कोण माझी?” असे अनेक विचार त्याच्या मनात चाललेत. तेवढ्यात स्वयंपाकघरात काहीतरी वाजलं म्हणून घड्याळाकडे लक्ष गेलं. “अरे बाप रे! दोन?? झोपायला हवं. उद्या खूप काम आहे. लवकर जायचंय”, म्हणून त्याने दिवा बंद केला.

 
ती झोपलीय शांत. उद्या तिचाही महत्वाचा दिवस आहे. “आज राहिलाच गेम खेळायचा”, “तो पण वाट पाहून गेला असेल” “वाट? वाट का पाहिल तो माझी?” हे आलेले विचार झटकून झोपलीय कारण उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. 
 
***
 
चार महिन्यांपूर्वी, अश्याच एका उत्तररात्री, एका ऑनलाईन गेमिंग साईटवर, गेम खेळायला ‘Caveman’ ला ‘SaberCat’ नी आव्हान दिलं. तसं आधीही त्याला बरेच जणांनी आव्हान दिलेलं होतं. गेम खेळणं हा त्याच्या रिसर्चचा एक भाग होता. त्याच्या धंद्यासाठी लागणारा रिसर्च! गेम खूप रंगला. मजा आली दोघांना!
गेमिंग साईटवर तुम्हाला सगळे तुमच्या टोपणनावांनी ओळखतात. फायदा एक कि समोरच्याला तुमची खरी ओळख कधीही कळत नाही. आणि तो हरला तरी तुमचं काही बिघडवू शकत नाही.
गेम संपला. ‘Caveman’ जिंकला. त्याला चांगला सराव होता. त्याने आणखी एका गेमसाठी विचारलं. समोरून “हो” आलं. परत एक खेळ झाला. ‘Caveman’ परत जिंकला. त्याने न राहवून instant मेसेज पाठवला. “You play like a girl!” असं करून laptop बंद करणार एवढ्यात त्याला उलटा instant मेसेज आला. “No I don’t! And even if I do that is b’coz I am a girl”.
उत्तराने तो चक्रावला. “अरे मुलगी आणि गेम? सॉलिड?”
गेले चार महिने हेच चालू आहे. ‘Caveman’ आणि ‘Sabercat’ रोज गेम खेळताहेत. रोज कोणीतरी जिंकतो, कोणीतरी दुसऱ्याला जिंकून देतो. मग दोघांपैकी कोणीतरी instant मेसेज करतं. मग खेळ बाजूला राहतो फक्त instant मेसेजेसच होतात .
 
***
 
सकाळचा चहा घेत असताना, बाबांना काहीसं आठवलं. हातातला सकाळ खाली ठेवत, आपल्या आधीच नाकावर आलेल्या चष्म्याला, अजून खाली करत, त्यांनी विचारलं, “मनु आज कुठे इंटरव्यू?”
“एक स्टार्ट-अप आहे. ‘ओपल सिस्टिम्स’. कॉम्पुटर गेम्स कंपनी आहे.” -मनु.
“बेस्ट ऑफ लक बेटा! डू गुड!” -बाबा.
“थेंक यू बाबा! आय एम वेरी एक्सायटेड! मला गेम्स कंपनीत काम करायचं होतं केंव्हापासून. यू नो हाऊ मच आय लाईक गेम्स!” -मनु.
“येस आय नो! तयारी झाली का?” -बाबा.
“हो बाबा!” -मनु.
“आई काही बोलली का ग तुझ्याशी?” -बाबा.
“कश्याविषयी?” -मनु.
“नाही काही नाही. तू पळ तुला उशीर होतोय ना!” -बाबा.
“येस मी जाते. आवरून येते मग बोलू.” -मनु.
“नको काही घाई नाही. संध्याकाळी बोलू.” -बाबा.
“ओकीमिडीज” -मनु.
“आता हे काय नवीन?” -बाबा.
“आर्किमिडीज तसं ओकीमिडीज. म्हणजे ओके हो!” -मनु. हसत ती आपल्या खोलीकडे मार्गस्थ झाली.
 
***
 
“आई, आज गजर झाला नाही का ग?” खोलीतून बाहेर येत, उत्पल डोळे चोळत आईला म्हणाला.
“अरे झाला की. खूप वेळ वाजत होता. शेवटी मीच येऊन बंद केला. तुला हाक मारली, हलवलं पण” -आई.
“पण उठवायचं ना!” -उत्पल.
“हाक मारली, हलवलं? आता अजून काय करायचं? तू अजिबात उठत नव्हतास. काल रात्री गेम खेळत बसला असशील. मी दोन वाजता उठले तेंव्हा तुझ्या खोलीतला दिवा चालू होता.” बोलता बोलता, आईने चहाचा कप समोर ठेवला. आईला काही उत्तर न देता तो जवळ ओढून उत्पलने तोंडाला लावला. आईलाही उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
“उत्पल, बाबा विचारात होते, फोटोचं काय झालं म्हणून. मी काय सांगू त्यांना?” -आई.
“बर मला आता उशीर झालाय. मी आवरून येतो पटकन. आपण नंतर बोलू.” -उत्पल.
“का आज इतकी घाई काय आहे? तू तर लेट जातोस ना?” -आई.
“आज नवीन कॅन्डीडेट्स येणार आहेत” -उत्पल.
 
(क्रमश:)
Advertisements

गुप्तधन

गुप्तधन -संपदा म्हाळगी-आडकर
 
झुंजारवाडीच्या सरपंचपदी धुरंदर पाटीलाची निवड झाल्यापासून तो चांगलाच हवेत होता. तसं धुरंदर म्हणण्यासारखा त्याने अजून काहीही केलं नव्हतं. आपल्या वडिलांना, झुंजारराव पाटीलांना, अभिमान वाटावा असं एकच काम त्याने केलं होतं. वडिलांसाठी गावाचं नाव हुन्नरवाडीचं झुंजारवाडी केलं होतं. ठाकरेंकडून त्याने प्रेरणा घेतली असावी कदाचित.
 
धुरंदरला वाड-वडिलार्जित बराच पैसा-अडका आणि जमीन-जुमला मिळाला पण त्याची अतीची हाव काही कमी होत नव्हती. ह्या ना त्या मार्गाने पैसा कसा मिळेल ह्याचा तो सारखा विचार करीत असे. गुप्त धनापायी त्याने बरेच यज्ञ याग केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. तसा तो व्हायचा नव्हताच. धुरंदर स्वत: काहीही काम करत नसे. वंशपरंपरेने मिळालेला पैसा वाढवण्यासाठीही तो काहीही करत नव्हता. घर चालत होतं, कुठे काही थांबत नव्हतं.
 
धुरांदरची बायको पण त्याच्यासारखीच. आयत्या मिळालेल्या संपत्तीवर ती बसून होती. दाग-दागिन्यांनी मढलेली होती. नवऱ्याच्या गुप्त धनाच्या वेडात तीही सहभागी होती. पैसा आल्यावर “मी हे करीन, ते करीन” ह्या विचारात ती रात्रंदिवस गढलेली असायची.
 
गावाच्या भटजींचा मात्र धुरांदरच्या वेडामुळे खूप फायदा झाला होता. दर महिन्याला धुरंदर पाटलाकडे यज्ञ-याग, पूजा-अर्चा, अभिषेक न चुकता चालू असल्याने भटजींना भरपूर दक्षिणा मिळत असे. पूजेमुळे भटजींना तरी गुप्त नाही पण सुप्त धनाचा लाभ होत होता.

 

धुरांदरच्या बायकोला, शेवंताला, अधून मधून गुप्तधनाची, श्रीमंत झाल्याची स्वप्न पडायची. स्वप्न पाहताना ती झोपेत बोलायचीही. त्यांचा मुलगा चक्रधर तिला झोपेतून उठवायचा. आज तिला परत स्वप्न पडलं. स्वप्नात कोल्हापूरची महालक्ष्मी माता आली. महालक्ष्मी तिचा माहेरची कुलदेवी होती. देवी म्हणाली, “शेवंते, झोपलीस काय उठ.”. शेवंताचा डोळ्यांवर विश्वास बसेना.
“देवी तू आलीस” असं म्हणून शेवंता झोपेतल्या झोपेत चार वेळा देवीच्या पाया पडली. तिच्या चुळबुळीने, शेजारी झोपलेला चक्रधर जागा झाला.
“आये तुझी स्वप्नं बास कर आता, मी पडीन कि बाजेवरून खाली. स्वप्नं तुला आणि ढुशी मला” चक्रधर झोपेतच बोलला. त्याच्या बोलण्याने शेवंता थोडीशी जागी झाली पण कूस बदलून परत झोपी गेली. स्वप्न सुरूच राहिलं.
“माये मला माफ कर, तो आमचा चक्या जरा मधे मधे करत व्हता.”-शेवंता.
“मी तुला वर द्यायला आली आहे” -देवी.
“वर आता ते काय असतं?” -शेवंता.
“तू लवकरच खूप श्रीमंत होशील.” -देवी.
“ओह त्याला वर म्हणत्यात होय?… श्रीमंत म्या??” -शेवंताची ट्यूब पेटायला जरा वेळ लागला.
“हो तूच, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल.” -देवी.
“काय करायचं? पूजा घालायची का जेवण द्यायचं?” -शेवंता.
“त्यातलं काही नाही. तुझ्या गळ्यातल्या चपलाहारात २० लक्ष्मीच्या चकत्या आहेत.”-देवी.
“व्हय की. ४ तोळ्याचा हाय.” -शेवंता. देवीच्या विधानात आपण सारखं मधे बोलतोय ह्याची जाणीव झाल्यावर, तिने जीभ चावली. “माये, एक डाव माफी कर”
“ऊठ आणि त्यातल्या ५-५ चकत्या, गावातल्या ४ विहिरींमध्ये टाक. स्वतःच्या विहिरीत टाकायच्या नाहीत.” -देवी.
“बर” -शेवंता. शेवन्ताने नकळत गळ्यातल्या चपलाहाराला हात लावला.
“असं करशील तर तुला मोठं धन प्राप्त होईल” -देवी.
“करीन मी देवी, नक्की करीन” -शेवंता.
 
शेवंता जागी झाली. उठून बसल्यावर तिला जाणवलं की हे स्वप्न होतं. माहेरची देवी स्वप्नात आल्याने ती आनंदून गेली. पण चपलाहार मोडावा लागणार ह्या विचाराने कष्टी झाली.  “ह्यास्नी सांगावं का? त्ये कधी सोनं पाण्यात सोडू द्यायचे न्हाईत. त्यांच्यापायी गुप्तधन जायचं की. गुप्तधन मिळालं की सांगीन त्यांना स्वप्नाचं, देवीच्या वराचं.”, शेवन्ताने विचार केला.
परत झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप येत नव्हती. तिने चक्रधरला उठवलं.
“काय ग आये, झोपू दे की” -चक्रधर.
“ए चक्या ऊठ की, चल जायचय” -शेवंता.
“एवढ्या रातचीला कुठे नेतीस आता?”-चक्या.
“आधी ऊठ तर मग सांगती” -शेवंता. शेवंता चक्याला घेऊन घराबाहेर आली. तिचं सगळं स्वप्न त्याला सांगितलं.
“आये तू काय करणार आता? टाकणार व्हय सोनं पाण्यात?” -चक्या.
“व्हय तर देवीचा कौल हाय त्यो!” -शेवंता.
“बा खवळल की! परवा पतंग आनायला दिलेलं ५ रुपै हरवलं तर रट्टा हानला त्यानं माह्या पाठीत” -चक्या.
“त्यास्नी सांगतंय कोण? आपण दोघंच जायचं. डायरेस गुप्तधन मिळालं की सांगू त्यास्नी.” -शेवंता.
शेवन्ताचा प्रस्ताव, चक्याने मान्य केला. ते दोघं घराबाहेर पडले.
“चार व्हिरी कोनत्या घ्याव्या रं?” -शेवंता.
“सोनावान्यांची जवळच हाय ती घेऊ. एक भटजींची, एक काने वकिलांची, एक किसन वाण्याची!” -चक्या.
“वाण्याची नको. त्याचं आणि तुझ्या बाचं पटत न्हाई” -शेवंता.
“आता ऱ्हाईल्याच किती व्हिरी? एक भिम्याची पण ती माळावर हाय, गावात न्हाई. तिथं जाऊन परत येईस्तोवर उजडतय की” -चक्या.
“देवी म्हणाली गावातलीच व्हीर पाहिजे. बर मग राहिलं. वाण्याचीच व्हीर खरी” -शेवंता.
दोघं जाऊन हळूच ४ विहिरीत ५-५ बिल्ले टाकून आले. परत येऊन चक्या झोपी गेला. पण शेवंताला झोप येत नव्हती. “गुप्तधन भेटल का?.. नक्की भेटल… न्हाई भेटलं तर? ह्यास्नी काय सांगू? ह्ये काय म्हनतील?” हे विचार तिच्या मनात चालले होते.
 
दुसऱ्या दिवशी शेवंता काहीशी उशिरा उठली. घाईघाईनं कामाला लागली. पूजेला भटजी यायचे होते. आज त्यांना पण उशीर झाला होता. धुरंदर आत येऊन शेवंताला म्हणाला, “भटजी कसं न्हाई आलं?” गळ्यात चपलाहार नाही हे नवऱ्याला कळू नये म्हणून सोवळ्यात असल्यासारखी, दोन्ही खांद्यांवर पदर घेऊन शेवंता चुलीशी बसली होती.
“चक्या कुठं हाय?” -धुरंदर
“झोपला असंल” -शेवंता.
“त्याला धाडतो भटजींना आनायला” -धुरंदर.
धुरंदरने चक्याला झोपेतून उठवून भटजींकडे पिटाळले. थोड्याच वेळात तो परतही आला.
“बाss ते आज यायचे न्हाईत” -चक्या.
“काय झालं? काय येईनात झाले त्ये? त्यांनीच न्हाई सांगितलं व्हय, पूजा महत्वाची हाय म्हणून?” -धुरंदर.
“मला त्ये माहित न्हाई? भटीणबाईंनी सांगितलं त्ये आज येणार न्हाईत.” असं बोलून चक्या निघून गेला.
“जरा जाऊन येतो”, असं शेवंताला सांगून धुरंदर निघून गेला. थेट जाऊन भटजींच्या घरी धडकला. भटीणबाईंनी सगळा वृत्तांत कथन केला. भटजींना तर सकाळी सकाळी अंघोळ करताना महालक्ष्मीमाता बिल्ल्याच्या रुपात भेटली. असेच काहीसे चमत्कार, गावात घडत होते. भटजी, सोनावणे, काणे आणि किसन वाणी सगळ्यांना विहिरीत आज सकाळी महालक्ष्मीच्या प्रतिमा असलेले बिल्ले सापडले होते.
 
घरी आला तसा धुरंदर तडक स्वतःच्या विहिरीवर गेला. मोटेच्या सहाय्याने वेगाने पाणी काढू लागला. काढलेले पाणी शेतात सोडू लागला. मोटेचा आणि पाण्याचा आवाज ऐकून शेवंता बाहेर आली.
“अव काय करतायसा?” -शेवंता.
“अग सोनं शोधातोया. गावात सगळ्या व्हीरीत सोनं सापडतंय. त्या किसन्यालाही गावलंय. त्याला गावलं तर आपल्यालाही गावल.” -धुरंदर जोमानं पाणी काढत होता. शेवंता काही न बोलता आत गेली. काय बोलावं तिला सुचतच नव्हतं. गावातल्या विहिरीत सापडणार सोनं तिचंच होतं. नवऱ्याला सांगितलं तर तो बोलेल हे उघड होतं.
 
म्हणता म्हणता रात्र झाली. धुरंदरचं पाणी काढणं चालूच होतं. तो दमल्याने, वेग थोडा कमी झाला होता. आज तो जेवण-खाण्यासाठी ही थांबला नव्हता. शेवंताला त्याची कीव आली. बाहेर जाऊन धुरंदरला थांबवून तिनं सगळं सांगून टाकलं. धुरंदरला तिचा राग आला. पण तिला बोलून काही उपयोग नव्हता. आजवर त्याने स्वत:ने  गुप्तधनापायी खूप पैसा खर्च केला होता.
 
३-४ महिन्यात धुरंदरकडून भटजींना पूजेसाठी बोलावणं आलं नव्हतं. आज अचानक ते आल्याने, भटजींना आश्चर्य वाटलं. पिक चांगलं आल्याने धुरंदरने सत्य-नारायणाची पूजा घालायचं ठरवलं होतं. धुरंदरने वेळेवर घातलेल्या पाण्याने, पिक जोमात वाढलं होतं. काळ्या धरणीमातेनं, उदरात दडवलेलं गुप्तधन स्वत:हून बाहेर काढून दिलं होतं.
 
 

कहाणी

कहाणी -संपदा म्हाळगी-आडकर २/२४/१०
 
काळामागे धावत जाते पुलाखालाचे पाणी
भविष्याचे वर्तमान अन वर्तमानाची कहाणी
 
प्रारंभाला होती भरली, घटिका पाणीग्रहणी
नायक राजा आणि नायिका एक दिसाची राणी
 
घरट्यासाठी झटतो राजा, शोधी दाणा-पाणी
राणीसुद्धा पावकी निमकी, हिशोबाची दिवाणी
 
कहाणीतला हरेक पन्ना, ना नुसती देणी-घेणी
रुसवे-फुगवे, प्रेम जिव्हाळा, कधी रक्ताचे पाणी
 
रक्तातून मग कळी उमलते, सिंचून तिला पाणी
फुल कळीचे होताना, सुरु नवीन कहाणी
 
कधी लाभल्या पायघड्या, पण कधी सफर अनवाणी
कधी सूरत रडवेली, तर कधी गायली सुरात गाणी 
 
कहाणीत ह्या चुका अनेक किती करावी गिनती
पण सावरण्या, पांघरण्या सबळ सोबत नाती
 
ताटातूट अन दुराव्याची, भीती अंत:करणी
कहाणी संपूर्ण होताना, जाई जीवन सुफळ करुनी

देवकीनंदन

देवकीनंदन -संपदा म्हाळगी-आडकर २/२०/१०
 
थोडक्यात पार्श्वभूमी: कृष्णजन्मानंतर येऊ घातलेल्या पुत्रविरहाचा शोक देवकी करत आहे. तेंव्हा बाळकृष्णाने तिला कसे समजावले. काहीशी काल्पनिक अशी ही कविता!
 
मम सजल नेत्रांत तुझे रूप साठवून
पळभर ना सरला, कसे करू रे त्यजन?
 
मामा असे लडिवाळ हीच जगताची खूण
कंस ठरला अपवाद, तुझे माझे हे प्राक्तन
 
तव अग्रज दुर्दैवी कुणी केले ना रक्षण
गोकुळीच्या नंदाघरी तुझे होईल जतन
 
कान्हा यशोदेचा प्रिय, सर्वां लाडका होईल
पान्हा देवकीच्या ऊरी होई दगड सुकून 
 
माते, वियोगाचे दु:ख नाही शब्दांत वर्णन
तुज वाचून जीवन हेच भविष्य कथन
 
तुझे आरक्त नयन आणि संतत रुदन
माय यमुना सरिता करी भावना दर्शन
 
मी येईन स्वप्नात आज देतो हे वचन
बाललीला माझ्या तुझे करतील रंजन
 
करी मामा अधर्म, स्वकीयांच्या हत्या घृण
त्याचे करीन मर्दन अन धर्माचे उत्थान
 
जरी लाडका सर्वांचा आणि यशोदेला कान्हा प्रिय
वसुदेवाच्या वासुदेवा म्हणतील देवकीनंदन
 

माय नेम इज अर्ल

माय नेम इज अर्ल -संपदा म्हाळगी-आडकर २/१८/१०
 
अमेरिकेत फक्त विनोदी मालिका, चित्रपट आणि जाहिराती येणारी एक स्वतंत्र वाहिनी आहे. तिचं नाव TBS. ह्या वाहिनीवर काही अप्रतिम मालिका आणि चित्रपट पाहायला मिळतात. त्यातली एक मालिका म्हणजे “माय नेम इज अर्ल”.

भरत जाधव किंवा मकरंद अनासपुरे ह्यांच्या चित्रपटांइतके, डोके बाजूला ठेऊन पहायची ही मालिका नव्हे. मालिकेचा मूळ संकल्पना भारतीय विचारशैलीतून निर्माण झाल्याने ही मालिका खूप जवळची वाटते.

भारतीय भाषांनी इंग्रजीला बहाल केलेल्या अनेक शब्दांपैकी एक म्हणजे ‘कर्मा’ (Karma) ज्याला आपण ‘कर्म’ म्हणतो. कर्म ह्या संकल्पनेवर आधारित ही मालिका आहे. माणसाला चांगली कर्मे केल्यानेच चांगल्या गोष्टी मिळतात. किंवा “What goes around, comes around!” हा ह्या मालिकेचा गाभा आहे. 

मालिकेचा नायक अर्ल हिकी हा अमेरिकन तरुण. तो भुरटा चोर आहे.  त्यासाठी तो तुरुंगाची हवा ही खाऊन आला आहे.  परिस्थितीने त्याच्यावर चोरी करण्याची वेळ आणली असे नाही उलट चोरी करण्यात काही पाप आहे ह्याचीच त्याला जाणीव नाही.
अर्लचा लहान भाऊ रॅन्डी, कायम त्याची साथ देणारा. डोक्यात जरा कमी.  अर्लची पूर्वीची बायको जॉय. एक मित्र ज्याचं नाव आधी कोणालाच माहित नसतं आणि तो ही कुणाला ते सांगत नाही. हा मित्र एक खेकडे (crab) विकणाऱ्या बारमध्ये काम करत असल्याने सगळे त्याला crabman म्हणत असतात. त्याने नाव न सांगण्याचा मुख्य कारण हे कि ‘अमेरिकेत चालत असलेल्या साक्षीदार सुरक्षितता कार्यक्रमानुसार (विटनेस प्रोटेक्शन प्रोग्रॅम) कोणालाही नाव सांगण्याची त्याला परवानगी नसते.’ नंतर त्याचे नाव  डार्नेल असल्याचं उघड होतं. जॉय आता डार्नेलची बायको आहे. कॅटलायना हि अजून एक मैत्रीण. अर्ल आणि रॅन्डी राहत असलेल्या मोटेलमध्ये मेड आहे. ती अर्लला यादीतील नावे खोडण्यात मदत करते. रॅन्डीला ती आवडत असते. हा थोडक्यात पात्रपरिचय!
 Right click and choose Set as Wallpaper to change your desktop.
डावीकडून कॅटलायना, अर्ल, रॅन्डी, जॉय, डार्नेल
 
मालिकेची सुरुवात अशी- अर्ल हा चोऱ्या करून नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो एका निर्जन पेट्रोल पंपावर जाऊन लॉटरीचे तिकीट विकत घेतो. बाहेर येता येता त्यावरील आकडे scratch करतो. आकडे जुळवल्यावर त्याला १ लाख अमेरिकन डॉलर्सची लॉटरी लागल्याचं लक्षात येतं. त्याचा आनंद साजरा करत, नाचत तो रस्त्यावर जातो. ह्या आनंदाच्या भरात त्याला एका मोटारगाडीची धडक बसते आणि तो तितेच बेशुद्ध पडतो. त्याचा लॉटरीचं तिकीटही कुठेतरी उडून पडतं. 

दवाखान्याच्या बिछान्यावर पडलेला असताना, अतिशय जहाल औषधांच्या प्रभावाखाली त्याला तिकीटाची आठवण येते. पण ते सापडत नाही. हे सगळं आपल्या ‘Karma’ मुळे झालं अशी त्याला जाणीव होते. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या दुष्कार्मांची तो ‘यादी’ बनवतो. ज्या ज्या लोकांना त्याच्यामुळे थोडासाही त्रास झाला आहे, त्या सगळ्यांची नावे त्या यादीत आहेत. त्या सर्व लोकांचे नुकसान भरून द्यायचे आणि आपल्या पापांचे क्षालन करायचे तो ठरवतो. ही भरपाई करताना तो कितीतरी हाल सोसतो, गमती-जमती करतो, युक्त्या-क्लुप्त्या वापरतो. भरपाई केल्यावर तो त्या माणसाचं नाव यादीतून खोडून टाकतो. यादीवरून नाव हटेपर्यंत तो त्याचा पाठपुरावा करतो. ह्या नादात, कधी कधी यादीवर अजून काही लोक जमा होतात.

त्याची ही यादीची संकल्पना मला खूपच भावली. ही यादी करून ती खोडून काढण्याची कल्पना किती छान आहे. वरकरणी साधी वाटली तरी खूप काही शिकवणारी. अश्या याद्या करण्याची गरज खरंतर सगळ्यांना आहे. कुणी त्या मनात करतात, कुणी कागदावर! मनातलं कुणाला दिसत नाही. तशी यादी कुणाला दाखवायची गरजही नाही. 
 
अर्ल सोडून वरती सांगितलेली सर्व पात्रं मालिकेची रंगत वाढवतात. रॅन्डी अर्लला यादीमध्ये आणि ती संपवण्यात मदत करतो. भावासाठी पडेल ते काम करतो. आपल्या भोळसट आणि वेडेपणामुळे विनोदाची पखरण करतो. जॉयचा हातभार यादी संपवण्यापेक्षा तीत भर घालण्यात जास्त. पण तिच्या स्त्रीसुलभ कारास्थानांमुळे मजा येते. 

विवाहबाह्य संबंध झाकून (कारण ते मालिकेचा केंद्रबिंदू नाहीत. अमेरिकन विनोदशैलीचा तो मसाला आहे.) एकूणच सशक्त विनोद पाहायचा असल्यास ही मालिका नक्कीच प्रेक्षणीय आहे.

मूनरूफ

मूनरूफ -संपदा म्हाळगी-आडकर २/१६/१०
 
माझ्या गोष्टीचा इंग्रजी अनुवाद:
अनुवाद सौजन्य: वेगा
अनुवाद येथे वाचता येईल: http://vegapoint.blogspot.com/2010/03/moonroof.html
 
“मानसी अग झालं कि नाही तुझं? किती वेळ?” मिलिंद ची रोज सकाळ सारखी आजही अखंड बडबड चालू होती.
“आले आले.. डबे भरतेय.” मानसी ही ठरलेली उत्तर देत होती. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजूनही उष्ट्या हळदीचा वास तसाच होता.

 मिलिंद आणि मानसी आय टी पार्क मध्ये प्रेमात पडलेल्या असंख्य जोडप्यांपैकीच एक. एकमेकांना साजेसे. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कारित. लव्ह मरेज. थोडसं घाई-गडबडीत झालेलं. नाही पळून-बिळून नाही केलं. मिलिंदच्या बाबांना पाच महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न गडबडीत उरकावं लागलं.
“मानसी आवर ना! गाडी जाईल.” -मिलिंद परत.

मिलिंदचे बाबा सेवानिवृत्त होते. ते आज घरी नव्हते. मिलिंदच्या बहिणीकडे नाशिकला ते हवाबदलासाठी गेले होते. ते घरी असले कि त्यांची सकाळी छान करमणूक होत असे. मिलिंद आणि मानसीची धावपळ आणि त्यातूनही त्यांची शाब्दिक झोम्बाझोम्बी बाबांना दिवसभर फ्रेश ठेवायची. मानसीला ते शक्य तेवढी मदत करत. पण त्यांच्या तब्येतीला जपण्यासाठी मानसी त्यांना काही करून देत नसे. मिलिंदची आई त्याच्या लहानपणीच म्हणजे तो आठवीत असतानाच देवाघरी गेली. मोठ्या बहिणीने आणि बाबांनीच त्याचा सांभाळ केला होता.
 
मिलिंद-मानसीचं घर एका जुन्या वाड्यात होता. ते वाड्याच्या मालकाचे भाडेकरू होते. कधीतरी वाड्याचं बांधकाम होऊन स्वत:ची हक्काची जागा होईल अश्या अपेक्षेनी मिलिंदच्या बाबांनी दुसरं घर घेतलं नव्हतं.  मिलिंदला ते नवा flat घे म्हणून मागे लागले होते. तसा त्याने घेतला ही असता पण बाबांच्या बायपासमध्ये झालेल्या खर्चामुळे flat चं त्याने लांबणीवर टाकलं होतं. परत आयत्या वेळेस वाड्याच्या मालकाने बांधकाम काढलं तर पैसे तयार हवे म्हणून तो इतरत्र पैसे गुंतवण्यास तयार नव्हता. मानसीनेही समजूतदारपणे सगळं कलाकलानं घेतलं.

 
 ***
 
संध्याकाळी एका डिनर पार्टीला जाऊन दोघं उशिरा परत आली. खूप दिवसांनी मिलिंदने बाईक बाहेर काढली होती. ऑफिसला जाताना ऑफिसची बस असल्याने बाईक काढायची वेळ येत नसे. तसाही बाईकवरून ऑफिसला जायला मानसीचा नकार होता. ट्राफिक आणि अपघात ह्याला घाबरून!
 
बाबा ताईकडे गेल्याने मिलिंद मानसीला एकांत मिळाला होता. दोघं एकमेकांना लग्नाआधी आठेक महिने ओळखत होती. पण नव्या भूमिकेतून समोरच्या माणसाला नव्याने जाणून घेत होते. मिलिंद डोळे मिटून, बेडवर पडून, मानसीची वाट पाहत होता. “वर्क डेला कशाला पार्ट्या ठेवतात हे लोक? त्यातून मानसीच्या मैत्रिणीची पार्टी म्हणजे, असून अडचण न जाऊन खोळंबा!”, पडल्या पडल्या त्याचा मनात विचार चालू होता, “पण गाडी छान होती.”
मानसी आवाराआवर आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून बेडवर येऊन बसली. “मिलिंद! तुला संध्या आणि आनंद कसे वाटले?” -मानसी.
“चांगले आहेत… बोलायला, वागायला”, डोळे न उघडता मिलिंद म्हणाला.
“सॅंडी माझी खूप जुनी फ्रेंड आहे” मिलिंदच्या केसात हात फिरवत मानसी म्हणाली. तिच्या हात फिरवण्याने मिलिंदला अजूनच झोप यायला लागली.
“काय रे ऐकतोयेस ना?”, त्याला मधेच हलवून उठवत मानसी म्हणाली, “त्यांची गाडी पण छान आहे नाही”
“हं”- मिलिंद. डोळे मिटलेलेच.
“ए आपण पण घ्यायची गाडी?” -मानसी.
“हं”-मिलिंद.
“हं नाही. ए खरं सांग ना. कधी घेऊयात आपण गाडी? घर नाहीतर गाडी तरी”-मानसी.
“उद्या”, असं म्हणत मिलिंदने मानसीला डोळा मारला. हाताने तिला स्वत:कडे खेचलं.
“उं शहाणा आहेस मला माहितेय उद्या कधी येत नाही…” -मानसी. पुढचं तिला काही बोलताच आलं नाही. कारण तिचे ओठ…
 
 ***
 
“मिलिंद! सॅंडी आज गाडी घेऊन आली होती ऑफिसला. तिने लायसन्स काढलं. आम्हाला चक्कर पण मारली अरे तिने”. मानसीचं बोलणं प्रोसेस न करता मिलिंद ऐकून स्टोअर करत होता.
“ऐकतोयेस ना रे!” -मानसीने खात्री केली.
“हो बोल.”, बँकेची स्टेटमेंटस चेक करण्याचं महत्वाचं काम करत मिलिंद टेबलापाशी बसला होता.
“अरे त्यांच्या गाडीला मूनरूफ आहे” -मानसी.
“ओह बर” -मिलिंद.
“काय मस्त वाटतं मूनरूफ!” -मानसी.
“ए आपणही गाडी घेतली की मूनरूफ सांगू हं! पैसे जास्त पडतात पण I think we can afford that much!”, जीभ चावून हसत मानसी म्हणाली.
“बर” -मिलिंद.
“कधी घेऊयात गाडी?”, मानसी परत मुळपदावर.
“घेऊयात” -मिलिंद. गाडी घेणं अशक्य नव्हतं पण ती घेतली आणि घराचं निघालं तर पैसा कुठून उभा करायचा? हा त्याचा प्रश्न होता.
“घेऊयात पण कधी?” -मानसी टेबलापाशी येऊन उभी राहिली. बोलताना थोडी अधीर वाटली, म्हणून मिलिंदने वर पाहिलं. आत्तापर्यंत RAM मध्ये स्टोअर केलेलं सगळा कॅशेत आणलं.
“घेऊयात ना घाई काय आहे?”, तिला शांत करण्याच्या उद्देशाने मिलिंद म्हणाला.
“घर नाहीतर गाडी तरी घे मला”, मानसी नाराजीच्या स्वरात म्हाणाली. ज्या घरात मिलिंदचं बालपण गेलं, त्याच्या आईच्या आठवणी आहेत ती जागा त्याला सोडून द्यायला सांगणं तिच्या मनाला पटणार नव्हतं म्हणून घराच्या बाबतीत तिनं स्वतःला समजावला होतं. त्याची जाणीव मिलिंदलाही होती.
“हे बघ मानसी, तुला माहितेय बाबांच्या बायपासचा मोठा खर्च आत्ताच झालाय. माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पण चालू आहेत. आपल्या लग्नाच्या वेळी झालेला खर्च वेगळाच.” -मिलिंद. मानसी तोंड फुगवून ऐकत होती. “आपण घेऊयात न गाडी. पण गाडी घेतली आणि वाड्याचं काम निघालं तर मग त्याचे पैसे कुठून आणायचे? मग अजून एक हप्ता मागे लावून घ्यायचा का? तुला माहितेय घराच्या पैशासाठी आपल्याला तयार असायला हवं. मालक कधीही काम सुरु करेल. “, मिलिंद पोटतिडकीने बोलत होता.
“काही महिने थांब. थोडे पैसे गोळा झाले की घेऊ.” तो तिला समजावत म्हणाला.
“माझ्या बँक अकौंटमध्ये आहेत ना ते वापर.” -मानसी.
“मानसी त्यात तुझे लग्नाआधीचे काही पैसे आहेत. ते मी घेणार नाही. आणि उरलेली रक्कम आपत्कालीन म्हणून ठेवायचं ठरलंय ना आपलं?” -मिलिंद. आपला अहंकार मधे न आणता मिलिंदने तिला स्पष्ट सांगितलं.
“पण मी सांगतेय ना तुला ते पैसे वापरायला मग तुला काय प्रोब्लेम आहे?” -मानसी आततायीपणे म्हणाली.
“मानसी तुला कळत नाहीये.” -मिलिंद.
“मग सांग ना मला.” -मानसी.
“आत्ता नको. तुझं डोकं शांत झाल्यावर.” -मिलिंद. मानसी धुसफुसत स्वयंपाकघरात गेली. दोन-तीन भांडी आपटल्याचा आवाज आला. मिलिंद परत क्रेडीटकार्ड्सचे चार्जेस पाहण्यात गुंग झाला.
 
दोन दिवस मानसीच्या रागात आणि मिलिंदने तिचा राग काढण्यात गेले. “बाबा ताईकडे आहेत, चांगला वेळ मिळालाय तर ही भांडत काय बसलीय?” मिलिंद विचार करत होता. “She is wasting time!”, असा विचार करून हळहळत होता. “काहीतरी करायला हवं!”
“१०-१५ दिवसात बाबा परत येतील. एवढा रुसवा पुरे झाला का? का continue करावा? बाबांसमोर नको राग वगैरे…” अशी मानसीचीही मनात तारेवरची कसरत चालू होती.
 
 ***
 
आज मानसीला ऑफिसमध्ये उशीर होणार होता. तिच्या प्रोजेक्टचा रिलीज होता. मिलिंद नेहमीच्या बसने घरी आला. नेहमीचे व्यवहार सुरळीत चालले असले तरी मानसीच्या मनात अजून गाडीचा विषय होताच. “काय करावं हिच्या रागाला? आज काय वार.. बाबांना यायला किती दिवस?” असं म्हणून मिलिंदने कालनिर्णय पाहिलं. आणि एकदम काहीतरी दिव्य सापडल्यासारखं “येस” म्हणून ओरडला. “कसं अगदी जुळून आलंय”, मनातलं अलगद ओठांवर आलं. घाईघाईत बाईक काढून तो चौकाच्या दिशेने निघाला.
 
रीलीझमुळे मानसीला उशीर झाला म्हणून तो तिला बाईकवरून stop वर आणायला गेला. दमली होती बिचारी. घरी आली तशी पर्स टाकून म्हणाली,
“आईचा फोन आला होता. चंद्राला औक्षण कर म्हणून. आज कोजागिरी आहे वाटतं. मी कॅलेंडर पाहिलंच नाही रे! मसाल्याचं दुध पण केलं नाही!”
“हो का कोजागिरी? ओह बर”-मिलिंद.
हातपाय धुवून मानसी स्वयंपाकघरात गेली. gas वर पातेल्यात मसाला दुध ठेवलं होतं.
“हे कोणी केलं? तू केलंस?” -मानसी.
“येस ma’m! गरम आहे म्हणून झाकलं नाहीये” -मिलिंद.
“तुला माहित होतं आज कोजागिरी आहे ते?” -मानसी.
“हो मी मघाशी कॅलेंडर पाहिलं.” -मिलिंद- “आता ते शेजारी झाकलेलं पातेलं बघ”
तिने पाहिलं तर त्यात सुकी भेळ होती आणि शेजारी ओल्या भेळेची तयारी पण. तिला एकदम मस्त वाटलं. एकदम सही!
“तू हे सगळं केलंस? सॉलिड आहेस.” -मानसी.
“हं”- मिलिंद – “बर तू औक्षणाची तयारी कर आणि गच्चीत ये.”
“गच्चीत कशाला? चंद्र इथे खिडकीतून पण दिसतोय की!” -मानसी.
“अग कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एका कवडातून पाहणार तू? त्याची बेज्जती आहे ही.”, मिलिंद डोळा मारत म्हणाला “ये मी भेळ आणि दुध घेऊन पुढे जातोय” -मिलिंद.

मानसी ऑफिसचा पश्चिमी पेहराव बदलून, छान पंजाबी ड्रेस घालून, औक्षणाचं ताट घेऊन गच्चीत आली. मिलिंदने गच्चीचा चेहराच बदलला होता. त्याने स्वत: झाडून, पाणी टाकून गच्ची साफ केलेली होती. मधोमध सतरंजी टाकली होती. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या.
“हे पण तू?” -मानसी.
“मग आमचा चंद्र दमून भागून यायचा होता ना?” मिलिंदच्या ह्या बोलण्याने, अंगावरून मोरपीस फिरावं तसं वाटलं मानसीला. किंचित लाजलीही ती.

औक्षण झाल्यावर दोघांनी चंद्राला नमस्कार केला. दुधाचा नैवैद्य दाखवला. मग एक एक दुधाचा पेला स्वत:साठी घेऊन दोघे सतरंजीवर बसले. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रभेनी आसमंत भरून गेला होता. आकाशाच्या काळ्या मखमलीवर कोणीतरी चांदण्यांचं भरतकाम केल्याचा भास होत होता. हवा पण छान होती आणि सहवासही हवाहवासा.
“मानसी तुला मूनरूफ हवं होतं ना? हे बघ मूनरूफच आहे. आवडलं?”
“मिलिंद यू आर ग्रेट! Thank you!”, मानसी म्हणाली.
“ग्रेट वगैरे काही नाही ग! कालान्वये गाडी घेऊच आपण, तुला हवी तशी, मूनरूफवाली, पण तोपर्यंत मून पाहायचा नाही का?” -मिलिंद.
“हं” -मानसी.
“आणि मानसी आपली तर हनिमून फेज चालू आहे. आता मी तुला मून दिला तू मला हनी नको द्यायला?” – असं लाडाने म्हणत मिलिंद मानसीकडे झुकला.
त्याला दूर ढकलून, मानसी उठून, धावत गच्चीचा जिना उतरू लागली. जाताना हसत मागे वळून म्हणाली, “देईन ना ढगांच्या दुलईआड!”
 

मोगरा

मोगरा -संपदा म्हाळगी-आडकर २/८/१०
 
माझ्या मनातला हा मोगरा फुलावा
वाऱ्यासवे विमुक्त तो दूर दरवळावा
 
पाहील शोधू कोणी जर स्त्रोत सुगंधाचा
दिसेल ना कुणाही हा मोगरा मनीचा
 
मम साजणास सुद्धा, हा कूटप्रश्न पडावा
मग रात्रभर तोही विचारात तळमळावा
 
तो विचारेल मजला, येई गंध मोगऱ्याचा
वास हा तुझा का, का नव्या अत्तराचा?
 
पाही घरात शोधू तो कळ्या मोगऱ्याच्या
मी सांगणार नाही, ‘हा वास अंतरीचा’
 
धुंडेल दिशा दाही, पण गावणार नाही
हा मोगरा मनीचा, असेल त्याच्या पायी.