Posts tagged ‘kavita’

अशाच एका कातरवेळी

अशाच एका कातरवेळी -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०
 
आज सोडून काम-धंदा, बसलो निवांत घरी
निरव असुनी परसदार पण, आवाज येई कुठून तरी.. अशाच एका कातरवेळी
 
मी दिशेत जातो आवाजाच्या, तो माझ्या मागे फिरी
घरभर फिरलो शोधण्यास, अन रित्या हाती माघारी.. अशाच एका कातरवेळी
 
शोधून दमलो, थकून बसलो, आवाज येत राहीला परी
जुनाच कुठसा बोल आठवून, हळूच डोकाविले अंतरी.. अशाच एका कातरवेळी
 
रव तिथलासा होता म्हणुनी, पहिले चोरट्या नजरी
आठवांचा पसाऱ्यातली, वाट गुंतलेली नागमोडी.. अशाच एका कातरवेळी
 
तिला न माहित तिच्या कितीतरी, गहाण स्मृती त्या किती मज उरी
दिला मोलसा ऐवज माझा, जीव ओवाळला तिजवरी.. अशाच एका कातरवेळी
 
स्मृतींचे ह्या रेशीम धागे, कधी तलम कधी पीळ गाठीचे
गुरफटलो मी कसा परतुनी, त्या आठवणींच्या पुरी.. अशाच एका कातरवेळी
 
कागद कुठसा चुरगळलेला, आसवांनी थबथबलेला
वळणदार अक्षरांतून जाती, दु:खाच्या लकेरी.. अशाच एका कातरवेळी
 
 
 
Advertisements

माझे स्मारक नको मुळीच

माझे स्मारक नको मुळीच -संपदा म्हाळगी-आडकर ५/१/१० 
 
फुकाची स्मारके उभी अनेक
विस्मृतीत आणि कित्येक
कशाला माझे अजून एक
माझे स्मारक नको मुळीच
 
तिष्ठत धुळी-धुरात पुतळे,
गुदमरती मेल्यावर आत्मे
त्यांना मोक्ष नाही कधीच
माझे स्मारक नको मुळीच 
 
स्वत:चा साधून स्वार्थ
अन जनतेचा दवडून अर्थ
कशास करता हा खर्च व्यर्थ
माझे स्मारक नको मुळीच
 
उदासवाणी अशी स्मारके
राजनिती ती स्मारक कसले
तुमड्या भरतील लोक
माझे स्मारक नको मुळीच
 
श्रेय लाटण्या करतील भांडण
दहादा जंगी होईल उद्घाटन
साहित्याला लांच्छन हेच
माझे स्मारक नको मुळीच
 
उभारले तर एकच करा
प्रवेशाला दर नको, माझी कविता सांगा म्हणायला.
येणार नाही सर्वांना, हे माहित आहे मला.
म्हणून म्हणतोय स्मारक नकोय मला.

गुढी

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष सुख-समृद्धी, आनंद, आरोग्य घेऊन येवो.
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्याशिवाय राहवलं नाही.
 
गुढी -संपदा म्हाळगी-आडकर ३/१६/१०
 
आयुष्याची करून वाटी
गहू जिद्दीचे वजन पेलती
ताकद नवी लाभू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे
 
आशा आकांक्षेची करून काठी
गडू आनंदाचा घालून माथी
ओसंडून वाहू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे
 
अनुभवांचे वस्त्र भोवती
सुख-समाधानाची झालर मोठी
चमकत राहू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे
 
गोड स्वप्नांच्या करून गाठी
अन कडूनिंबाची दु:खे थोटी
जीवनी नवरस भरू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे
 
हार फुलांचा गंध सुखाचा
ज्योत जीवाची वास प्रभूचा
उजळूनी जाऊ दे, गुढी ही गगनाला जाऊ दे
 

ओढ माहेराची

ओढ माहेराची -संपदा म्हाळगी-आडकर ३/४/१० 
 
आज कुठसे गाठोडे, मिळाले बांधता सामान
आठवणी माहेराच्या, त्यांचे गवसले कण
 
घट्ट बांधले कापड, थोडे जीर्ण थोडे जून
माहेरच्या आठवणी मी ठेविल्या जपून
 
गुलाबी पत्रे काही, त्यांचे पिवळे कागद
निळी शाई उडालेली, त्यांवर आठव सांडून
 
काही मिळाले रुमाल, दिले आईने विणून
मऊसर पोत त्यांचा, अगदी तसाच अजून
 
मला ताईने दिलेल्या, तिच्या बांगड्या काढून
तिचा भास होतो मला, त्यांची होता किणकिण
 
पाही जुनेसे पाकीट, डोळे किलकिले करून
तीन वर्षापूर्वीची भावाची ओवाळण
 
तळाशीच गाठोड्याच्या काही ठेवले राखून
बाबांनी येताना दिलेले, उबदार पांघरूण
 
बाबा माझे म्हणतील, डोळे वाटेला लावून
“दुधावरली साय डोळे भरून पाहीन”
 
माय भेटीस आतुरली, माझा जीव जाई कढून
अश्या अल्पश्या भेटीत, मानीन सारे सण
 
आज बांधता सामान, गवसलेले जे जे कण
मुक्तहस्ते उधळून केली, घरभर पखरण
 
मी चालले माहेरी, अशी स्मृतीरिक्त होऊन
येई परत माघारी, नवे गाठोडे घेऊन
 

कहाणी

कहाणी -संपदा म्हाळगी-आडकर २/२४/१०
 
काळामागे धावत जाते पुलाखालाचे पाणी
भविष्याचे वर्तमान अन वर्तमानाची कहाणी
 
प्रारंभाला होती भरली, घटिका पाणीग्रहणी
नायक राजा आणि नायिका एक दिसाची राणी
 
घरट्यासाठी झटतो राजा, शोधी दाणा-पाणी
राणीसुद्धा पावकी निमकी, हिशोबाची दिवाणी
 
कहाणीतला हरेक पन्ना, ना नुसती देणी-घेणी
रुसवे-फुगवे, प्रेम जिव्हाळा, कधी रक्ताचे पाणी
 
रक्तातून मग कळी उमलते, सिंचून तिला पाणी
फुल कळीचे होताना, सुरु नवीन कहाणी
 
कधी लाभल्या पायघड्या, पण कधी सफर अनवाणी
कधी सूरत रडवेली, तर कधी गायली सुरात गाणी 
 
कहाणीत ह्या चुका अनेक किती करावी गिनती
पण सावरण्या, पांघरण्या सबळ सोबत नाती
 
ताटातूट अन दुराव्याची, भीती अंत:करणी
कहाणी संपूर्ण होताना, जाई जीवन सुफळ करुनी

देवकीनंदन

देवकीनंदन -संपदा म्हाळगी-आडकर २/२०/१०
 
थोडक्यात पार्श्वभूमी: कृष्णजन्मानंतर येऊ घातलेल्या पुत्रविरहाचा शोक देवकी करत आहे. तेंव्हा बाळकृष्णाने तिला कसे समजावले. काहीशी काल्पनिक अशी ही कविता!
 
मम सजल नेत्रांत तुझे रूप साठवून
पळभर ना सरला, कसे करू रे त्यजन?
 
मामा असे लडिवाळ हीच जगताची खूण
कंस ठरला अपवाद, तुझे माझे हे प्राक्तन
 
तव अग्रज दुर्दैवी कुणी केले ना रक्षण
गोकुळीच्या नंदाघरी तुझे होईल जतन
 
कान्हा यशोदेचा प्रिय, सर्वां लाडका होईल
पान्हा देवकीच्या ऊरी होई दगड सुकून 
 
माते, वियोगाचे दु:ख नाही शब्दांत वर्णन
तुज वाचून जीवन हेच भविष्य कथन
 
तुझे आरक्त नयन आणि संतत रुदन
माय यमुना सरिता करी भावना दर्शन
 
मी येईन स्वप्नात आज देतो हे वचन
बाललीला माझ्या तुझे करतील रंजन
 
करी मामा अधर्म, स्वकीयांच्या हत्या घृण
त्याचे करीन मर्दन अन धर्माचे उत्थान
 
जरी लाडका सर्वांचा आणि यशोदेला कान्हा प्रिय
वसुदेवाच्या वासुदेवा म्हणतील देवकीनंदन
 

मोगरा

मोगरा -संपदा म्हाळगी-आडकर २/८/१०
 
माझ्या मनातला हा मोगरा फुलावा
वाऱ्यासवे विमुक्त तो दूर दरवळावा
 
पाहील शोधू कोणी जर स्त्रोत सुगंधाचा
दिसेल ना कुणाही हा मोगरा मनीचा
 
मम साजणास सुद्धा, हा कूटप्रश्न पडावा
मग रात्रभर तोही विचारात तळमळावा
 
तो विचारेल मजला, येई गंध मोगऱ्याचा
वास हा तुझा का, का नव्या अत्तराचा?
 
पाही घरात शोधू तो कळ्या मोगऱ्याच्या
मी सांगणार नाही, ‘हा वास अंतरीचा’
 
धुंडेल दिशा दाही, पण गावणार नाही
हा मोगरा मनीचा, असेल त्याच्या पायी.