Archive for एप्रिल, 2010

रद्दी

रद्दी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२७/१०
 

रद्दी हा अगदीच रद्दी विषय नाही. किमान काही जणांसाठी. लहानपणी रद्दी टाकण्याचा केवढा उत्साह असायचा. बाबा आमच्यासाठी ते काम राखून ठेवत. त्या निमित्ताने आम्ही काही उद्योग न करता, एकाजागी बसत असू.  रद्दी टाकण्यापूर्वी, सगळी वर्तमानपत्रं नीट लावायची हा बाबांचा दंडक होता. आता तुम्ही म्हणाल, अनायासे रद्दी घालायची मग कशाला नीट लावायला हवीत. तर त्याचा कारणं  अशी,
१. नीट लावल्याने एका पिशवीत व्यवस्थित आणि जास्त वर्तमानपत्रं बसतात, त्यामुळे ज्यादा पिशव्या कराव्या लागत नाहीत.
२. रद्दीवाल्याला पण रद्दी घेणे सोपे जायचे. (सहिष्णुतावाद)
  
रद्दी एकसारखी करताना मजा यायची. जुनी वर्तमानपत्रं चाळताना, त्यातल्या शिळ्या बातम्या, जुनी भविष्य वाचताना वेळ जात असे. राजकारण, त्यातली सत्तांतरे, मतांतरे, स्थित्यंतरे सगळं डोळ्याखालून घालायला मिळायचं. रंगीत, मऊसर पुरवण्या, कव्हर घालायच्या उद्देशाने बाजूला काढल्या जायच्या. वेगवेगळ्या सणांचे ‘विशेष’ अंक पहिले कि होऊन गेलेल्या सणांची आठवण यायची. रद्दीतल्या अंकांमधले चिंटू वाचायला गम्मत यायची. खेळाचं पान माझ्या आवडीचं असायचं. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूचं कोणतं छायाचित्र ‘miss’  तर नाही न झालं, हे पाहण्याची धडपड असायची. तीच गोष्ट “सुट्टीचं पान” आणि शब्दाकोड्यांची! ती पानं आधी शोधून काढून बाजूला ठेवायची. जमल्यास बाबांचा डोळा चुकवून एखादं कोडं सोडवून घ्यायचं. 

 
वर्तमानपत्रांच्या रद्दी नंतर वेळ यायची सटरफटर रद्दीची. म्हणजे कॅलेंडर्स, डायऱ्या, मासिकं, पुस्तकं (अभ्यासाची नाही. ती आम्ही भावाबहिणींमध्ये पुढे “pass-on” करायचो.), हस्तलिखीतं, वगैरे… मग त्यात काहीतरी रोचक मिळायचं. कॅलेंडर्सच्या मागे सोडवलेली गणितं दिसायची. हस्तलिखीतातल्या स्वत:च्याच अक्षराचं कौतुक वाटायचं. मग त्यातल्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंचा गठ्ठा वेगळा. असं करत, वर्तमानपत्रांच्या रद्दीच्या मोठ्या गठ्ठ्याशेजारी आमचा एक छोटा गठ्ठा तयार व्हायचा! 
 
हि सगळी रद्दी पिशव्यांत भरून, आम्ही बाबांच्या स्कुटरवरून रद्दीवाल्याकडे घेऊन जात असू. रद्दीच्या दुकानात चंपक, चांदोबा, चाचा चौधरी, किशोरचे अंक दिसताहेत का ह्याकडे आमचं लक्ष अधिक. बाबांच्या मागे लागून रद्दीच्या पैशातून (आणि कधी कधी बाबांना भर घालायला लावून) आम्ही ती बाल-पुस्तके घरी घेऊन येत असू. काही दिवसांनी परत त्याची रद्दी करायला!
 
रद्दी आता ही जमते, पण भारतातल्या सारखी नाही. आता ती नेऊन द्यायला रद्दीवाला नाही. रद्दी केरात टाकावी लागते. पण कधी अशीच जुनी पाने चाळताना, जुन्या बातम्या नव्याने समोर येतात. जुने संदर्भ लागतात. आणि लिखाणाला नवे विषय मिळतात. आता केरात टाकायच्या आधी रद्दी अशीच घेऊन बसणार आहे. काहीतरी मिळेलच. काही नाही तर लहानपणीच्या आठवणींना उजाळा तरी नक्की मिळेल.
Advertisements

लतादीदींचं सहस्त्रचंद्रदर्शन

लतादीदींचं सहस्त्रचंद्रदर्शन -संपदा म्हाळगी-आडकर ४/२६/१०
 
हे वर्ष “लतादीदींच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचं वर्ष” असं परवा सकाळ वाचताना कळलं. त्यांच्याबद्दल आधीही खूप जणांनी लिहिलंय, अजूनही खूप लोक लिहितील. आज मला लिहावसं वाटतंय. कारण एकच, आपल्या तंत्रशुद्ध तरीही मधुर आणि भावपूर्ण अशा सुरांचं दान त्यांनी माझ्यासारख्या यकश्चित श्रोत्याच्या पदरात भरभरून घातलंय.
 
सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे १००० वेळा चंद्राचे दर्शन. वयाच्या ८०व्या वाढदिवसापर्यंत माणसाच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येतात. असे १००० पूर्ण चंद्र बघण्याचं भाग्य फार कमी जणांना लाभते. आपल्या सर्वांच्या प्रिय लतादीदींना ते प्राप्त होणे हा त्यांच्याहून आपल्यासाठी मणिकांचन योग आहे. गरिबीतून वर येऊन आपल्या पाठच्या भावंडांना मोठं करत, त्यांनी  स्वत:चं गाणं चालू ठेवलं. आजवर एवढं मोठं काम करून ठेवलंय, की अजून सहस्त्र वर्षे गेली तरी तेवढं व त्या तोडीचं, कोणाला करायला जमणार नाही. त्यांनी निर्माण केलेल्या सुरांच्या चांदण्यात आपण न्हाऊन निघालो आणि तेही इतकी वर्षं, किती भाग्यवान आपण!  
क्षणभर मनात विचार चमकून गेला, लतादीदी स्वत: सुरांचं चांदणं बरसवतात, मग चंद्रालाही त्यांचा हेवा वाटत असेल. पण हेवा का वाटेल? उलट तोही स्वत:ला नशीबवान समजत असेल, इतकी वर्षं त्याला लतादीदींचं दर्शन करायला मिळालं म्हणून!
 
लता मंगेशकर आणि चंद्र ह्याचं पूर्वजन्मापासूनचं काहीतरी नातं असावं असं मला अगदी मनापासून वाटतं. पूर्वजन्मीची नाती ह्या जन्मीच्या ऋणानुबंधात बदलतात असं कुठसं वाचल्यासारखं आठवतंय. हे ऋणानुबंध ह्या आयुष्यात त्यांच्या कितीतरी गाण्यात दृढ झाले आहेत. वेगवेगळ्या गाण्यांमध्ये वेगवेगळं नातं. म्हणजे काही गाण्यांत तो त्याचा सखा आणि काहींत सोबती. कधी मित्र कधी प्रेमी. तर कधी अगदी सुखद खलनायक. किती सुंदर गाणी आणि त्यात चंद्राची निरनिराळी रूपं.
 
पुढचे काही दिवस मी लतादीदींच्या चंद्राला संबोधून/उल्लेखून गायलेल्या गाण्यांच्या संकलनामध्ये घालणार आहे. लतादीदींना माझ्याकडून वाढदिवसाची हीच सप्रेम भेट. तुम्हाला लतादीदींची चंद्रावरची गाणी(हिंदी/मराठी) आठवली तर मला नक्की कळवा. प्रिय लतादीदींना सहस्त्रचंद्रदर्शनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
लतादीदींनी चंद्राला संबोधून/उल्लेखून गायलेली गाणी 
 
हिंदी (वाचकांचं दान)
१. आधा है चंद्रमा रात आधी 
२. धीरे धीरे चल चांद गगनमें
३. वोह चांद खिला वोह तारे हसे
४. चंदा ओ चंदा.. किसने चुराई तेरी मेरी निंदिया
५. आधा है चंद्रमा रात आधी
६. रुक जा रात ठेहेर जा रे चंदा
७. चांद फिर निकाला मगर तुम ना आये
८. तू चंदा मै चान्दिनी तू तरुवर मै शाख
९. चांद दले पंखा झले मैया तुम्हारी
१०. चंदा की चांदनी में झूमे झूमे दिल मेरा
११. आ जा सनम मधुर चांदनी में हम
१२. भीगी चांदनी छायी बेखुदी
१३. चंदा रे जा रे जा रे
१४. वो चांद मुसकाया सितारे शरमाये
१५. याद रखना चांद तारों इस सुहानी रात को
१६. रूठा हुआ चंदा है रूठी हुई चांदनी
१७. तुम चांद के साथ चले आओ
१८. तेरे बिना आग ये चांदनी
१९. फ़िर वोही चांद वो ही हम वो ही तनहाई है
२०. चकोरी का चंदा से प्यार
२१. चंदा रे मोरी पतिया ले जा
२२. बदली में छुपे चांद ने कुछ मुझ से कहा है
२३. झूम झूम झूम झूम रही प्यार की दुनिया
२४. ये रात ये चांदनी फ़िर कहां
२५. दुनिया में चांद सूरज है कितने ह्सीं
२६. ऐ चांद प्यार मेरा तुझ से ये कह रहा
२७. सोयी सोयी चांदनी है खोयी खोयी रात है
२८. चंदा जा चंदा जा रे जा रे
२९. खुशियों के चांद मुस्कुराये रे
३०. तारों की ज़ुबां पर है मुहब्बत की कहानी
३१. ये वादा करो चांद के सामने
 
मराठी

१. दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
२. चांद मातला, मातला त्याला कशी आवरु
३. निळ्या आभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती

 

“I am OK” is priceless

“I am OK” is priceless  –संपदा म्हाळगी-आडकर ४/२३/१०
 
पोस्टच्या नावांच्या बाबतीत माझा ‘मधुर भांडारकर’ होत चाललाय बहुतेक! आज पण नाव इंग्रजीच! बर आता पोस्टला सुरुवात!

 

मास्टरकार्डची जाहिरात १ ->
सुंदर पोल्का डॉट फ्रॉक घातलेली छोटी मुलगी धावत जात आहे. आवाज: पोल्का डॉट ड्रेस _ _ $
सगळे समूह फोटोसाठी बसले आहेत, आवाज: नवीन मॉडेलचा कॅमेरा _ _$
फोटो काढला जातो, आवाज: आजीच्या वाढदिवसाला समूह फोटो priceless (अमूल्य), ‘देअर आर समथिंग्ज मनी कान्ट बाय, फॉर एव्हरीथिंग एल्स देअर इज मास्टरकार्ड!’
माझ्या मनातली भावना: जाहिरातकर्त्याने काळजाला हात घातला.
 
मास्टरकार्डची जाहिरात २ ->
चेहरा दिसत नाहीये. कॉफीचा मग कोणीतरी टेबलावर ठेवतंय. आवाज: कॉफी _ _ $
हातातलं पुस्तक उचलून तोच मनुष्य उठून चालू लागलाय, आवाज: नवीन खिळवून ठेवणारं पुस्तक _ _$
हातातलं पुस्तक झपकन खाली नेलं जातं, आवाज: आपण Unzipped आहोत हे कळणं priceless (अमूल्य), ‘देअर आर समथिंग्ज मनी कान्ट बाय, फॉर एव्हरीथिंग एल्स देअर इज मास्टरकार्ड!’
माझ्या मनातली भावना: जाहिरातकर्त्याची विनोदवृत्ती काय सॉलिड आहे.
 
वर्षानुवर्षे आपण मास्टरकार्डच्या जाहिराती पाहत आलो आहे. माझ्या मनाच्या भावनांवरून त्या जाहिराती चांगला परिणाम साधतात असं माझंतरी मत आहे. अलीकडेच मास्टरकार्डची एक नवीन जाहिरात पाहण्यात आली.
मास्टरकार्डची जाहिरात ३ ->
एक जोडपं आणि एक माणूस, एका कड्यावर वेगवेगळे उभे राहून सृष्टीसौंदर्य पाहत आहेत. दोन्ही पुरुषांच्या हातात, एकसारखे कॅमेराज आहेत. एकट्या माणसाला कॅमेरा महाग पडलाय. तो जोडप्याच्या कॅमेराकडे वाकून पाहताना कड्यावरून खाली पडतो.
तो पडत असताना आवाज: औषध _ _$, X-ray _ _$, Chiropractor (फिजिओथेरपिस्ट) _ _$
खाली जाऊन पडलेला माणूस दिसत नाही पण त्याचा आवाज येतो “I am OK” (“मी ठीक आहे”).
आवाज: सारखाच कॅमेरा ३०% कमी किमतीला घेणे priceless (अमूल्य), ‘देअर इज अ स्मार्टर वे टू बाय मास्टरकार्ड मार्केटप्लेस!’ – असं काहीसं. 
 

जाहिरातीचा परिणाम OK. जाहिरातीला जे पोहोचवायचं होतं ते तिने पोहोचवलं का? -“हो, मास्टरकार्ड मार्केटप्लेस वापरून वस्तूंवर सूट मिळेल”. जाहिरातकर्त्याचं काम चोख.

माझ्या मनातली भावना: माणूस खाली पडला आणि तो तिकडून ‘I am OK’  असं सांगतोय, हे priceless (अमूल्य) नाही का?

माणूस खाली पडला. त्याच्या दुखण्यावर होणारा खर्च मोजणे ह्याला एक वेळ आपण विनोदाची झालर समजू. पण ‘तो मनुष्य जोडप्याच्या, स्वस्तात मिळालेल्या कॅमेराकडे बघताना खाली पडला’ म्हणून तो कॅमेरा जिथून (मास्टरकार्ड मार्केटप्लेस) घेतला त्याचे महत्व नमूद करणे, मला फारसे पटले नाही. माणसाचा जीव कधीपण priceless (अमूल्य). जाहिरातकाराने देखील तसेच दाखवायला हवे होते. शेवटी ‘सर सलामत तो पगडी पचास’. जीव राहिलं तरच लोक मास्टरकार्डचा वापर करतील. माणूस पडला आणि काहीतरी आयुष्यभराचं दुखणं लागून राहिलं तर तो महाग कॅमेरा घेतल्याचा दु:ख करणार नाही, कड्यावरून पडल्याचं दु:ख करेल.
 
जगात माणसाच्या जीवाची किंमत कमी व्हायला लागलीय का?

‘आठवी अ’ ची खिडकी

‘आठवी अ’ ची खिडकी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२१/१०
 
हा लेख कुणाला थिल्लर वाटू शकतो. तसं वाटण्यास माझी काही हरकत नाही. हि गोष्ट जेंव्हा मी काही जणांना सांगितली तेंव्हा त्यांची प्रतिक्रियादेखील “शाळेत शिकायला जात होतात न मग… ?” अशी होती. वाचणाऱ्यांनी एकूणच फार लोड घेऊ नये, असा सल्ला!
 
आमची शाळा पुण्यात नावाजलेली! पुण्यात मध्यवर्ती आणि गजबजलेल्या पेठेत असल्याने काहीशी जागेच्या तुटवड्याने ग्रासलेली. शाळेच्या आजूबाजूला सगळ्या रहिवासी इमारती. शाळा सर्व बाजूने बंदिस्त असल्याने, शाळेत असताना आजूबाजूचं रहिवासी अस्तित्व कधी जाणवलं नाही.
नाही म्हणायला आमचा ‘आठवी अ’ चा वर्ग मात्र एका रहिवासी इमारतीच्या अगदी जवळ होता. म्हणजे शाळेच्या इमारतीत आणि त्या रहिवासी इमारतीत साधारण पाच फुट रुंदीचा बोळ होता. आमच्या वर्गाची मागची बाजू त्या इमारतीच्या मागच्या बाजूला होती. वर्गाच्या मागील बाजूच्या खिडक्या इमारतीच्या बाजूला उघडत. इमारतीची ती मागील बाजू असल्याने तिकडे घराच्या मोऱ्या (बाथरूम्स) येत. सुदैवाने किंवा दुर्दैवाने उंची जास्त असल्याने, आम्ही कायम “Back बेन्चेर्स”. त्यामुळे आमच्या बरोबर मागच्या खिडकीत इमारत. तर ह्या खिडकीमुळे आणि त्यातून ऐकू येणाऱ्या संवादांमुळे आमची चांगली करमणूक व्हायची.
 
मला आठवतंय, त्या खिडकीतून आम्हाला खूप वेळा बाथरूम सिंगिंग’ ऐकायला मिळालं आहे आणि तेही अगदी चुकीच्या वेळेला. म्हणजे कधी प्रार्थना चालू असताना, तर कधी तास चालू असताना.
आता कल्पना करा प्रार्थना चालू असताना कोणाचं ‘इतकं’ सुरेल बाथरूम सिंगिंग ऐकायला मिळालं तर काय होईल. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेची कसोटीच ती! त्यातून ते सूर ऐकून हसू फुटलंच तर “का हसलो?” ह्याचं शिक्षिकांना कारण तरी काय सांगणार? अश्या वेळी गैरवर्तन म्हणून ‘वर्तन-पत्रिके’वर सही ठरलेली. प्रसंगी ‘राहुल, पाणी चला जायेगा’ सारखे माय-लेकांचे डायलॉग, ऐकायला येत. मग वर्गातील मागच्या ओळींत एकच खसखस पिकत असे.
 
सगळ्यात मजा यायची ती शनिवारी. त्यादिवशी सकाळची शाळा असल्याने, घरातील बहुतेक सगळ्यांच्या अंघोळीन्ना आम्ही कान देत असू/ नव्हे त्या आपोआप कानावर पडत. त्यादिवशी तर बाथरूम सिंगिंगची मैफल असे. विचार करा, शनिवारी सकाळी आम्ही ‘भीमरूपी महारुद्रा…’ म्हणतोय आणि पाठीमागून ‘काटा लगा…’ ऐकू येतंय.

Jetlag

Jetlag -संपदा म्हाळगी-आडकर ४/१९/१०
 

मायदेशाला जाऊन, मस्त ट्रीप झाल्यावर येणारा  Jetlag हि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मायदेशाबाहेर जाऊन आलेल्या लोकांसाठी Jetlag हा शब्द अनोळखी नाही. Jetlag ची थोडक्यात माहिती अशी-
जगामध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी दिवस रात्रीचे वेगवेगळे प्रहर चालू असतात. हे प्रहर संतुलित करण्यासाठी, जगामध्ये वेगवेगळे कालखंड पडले आहेत. ज्यांना इंग्रजीमध्ये टाइमझोन्स असे म्हणतात.
भारत आणि अमेरिका हे दोघेही वेगवेगळ्या कालखंडात पडतात. ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर भारत आणि अमेरिका हे पृथ्वीवर एकमेकांच्या अगदी उलट बाजूस आहेत. (पाठीला पाठ लावल्यासारखे) त्यामुळे दोघांमध्ये वेळेचा फरकही फार मोठा आहे. लोकांना ह्याचा प्रकर्षाने अनुभव येतो. एका देशात जेंव्हा रात्र तेंव्हा दुसऱ्या देशात दिवस आणि उलट.

अश्या ह्या दिवस रात्रीच्या उलट सुलट वेळा असल्याने, ह्या दोन देशांदरम्यान प्रवास झाल्यावर फार पंचाईत होते. भारतातून अमेरिकेत आल्यावर अथवा अमेरिकेतून भारतात आल्यावर, दिवसा झोप येणे आणि रात्री निशाचर होणे असे प्रकार काही दिवस चालतात. बऱ्याच वेळा रात्री-अपरात्री सणकून भूक लागते. त्यात वाईट काही नाही म्हणा.. (रिकाम्या पोटी झोप न येण्याची कारणे देणारे पण बरेच असतात :)) विशेषत: लहान मुलांबरोबर प्रवास केला असेल आणि मुलांना Jetlag आला तर पालकांचे हाल कुत्रं खात नाही. असंच काहीसं ह्या वेळेस माझं आणि माझ्या नवऱ्याचं झालं. मुलीला Jetlag आल्याने ती रात्रभर आम्हाला जागवायची आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये, आम्हाला पेंग यायची. काही विचारू नका.
 
असा हा Jetlag येऊ नये ह्याकरिता विमान कंपन्या काही उपाययोजना करतात. म्हणजे तुम्ही जेंव्हा विमानातून प्रवास करत असाल तेंव्हा काही ठराविक वेळेला विमानातील दिवे बंद करतात. त्यावेळेस विमानातील हवाईसुंदरीदेखील खिडक्या उघडण्यास प्रतिबंध करतात. कारण असे की, बाहेर प्रकाश असला तरी प्रवाश्यांनी झोपावे. तर काही ठराविक वेळेस विमानातील सर्व दिवे चालू करून, खिडक्या उघडण्यास सांगतात. कारण असे की, प्रवाशांनी झोपेतून उठावे किंवा जागे राहावे. ही झोपण्याची किंवा जागण्याची वेळ, पोहोचण्याच्या ठिकाणाशी (Destination)  अशी मिळती-जुळती असते की तिथे पोहोचल्यावर प्रवाश्यांना Jetlag येऊ नये. काही प्रवासी मात्र विमानात पूर्ण वेळ झोपलेले मी पहिले आहेत. किती सुदैवी!
लहान मुले मात्र ह्यातील काही जुमानत नाहीत. पर्यायाने पालकांनाही त्यांच्याप्रमाणे वागावं लागतं. तशीच गोष्ट विमानात झोप न येणाऱ्यांची! त्यांना Jetlag शिवाय पर्याय नाही. 🙂
 
एकूण काय मायदेशाला जाऊन, मस्त ट्रीप झाल्यावर, दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायला लागणारयांसाठी Jetlag हि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. Jetlag जाण्यासाठी तसा उपाय काही नाही- ‘दिवसा जागे राहणे/ तसा प्रयत्न करणे आणि रात्री झोपणे/ झोपण्याचा प्रयत्न करणे”
 

रेअर-व्यू

रेअर-व्यू -संपदा म्हाळगी-आडकर ४/१३/१०
 
आज जरा जास्तच उशीर झाला. आजच्या रिलीजमध्ये एवढे बग्स येतील असं वाटलं नव्हतं. आई काळजीत असेल. इतरवेळी उशीर झाला होता पण एवढा नाही. त्यातून इतरवेळी कोणीतरी ओळखीचं बरोबर असायचं. त्यामुळे आईला थोडं निर्धास्त असायचं. ह्या नवीन प्रोजेक्टवर ओळखीचं कोणीपण नाहीये. सगळा नवा ग्रुप. एकेक जण पटापट गाड्या आणि बाईक्स काढून गेले.
“आई मी निघालेय इकडून, कंपनीच्या कॅब मधून येतेय. नाही, स्नेहा नाहीये. तिचं प्रोजेक्ट वेगळं आहे…. वेलांडे सर आहेत बरोबर, स्वप्ननगरी पर्यंत… हो.. विचारते.. हं”
 
आज स्नेहाला पण ‘जा’ म्हणून सांगावं लागलं. ती तरी किती वेळ थांबणार माझ्याकरिता? उगाच माझ्यामुळे तिला उशीर! तसे वेलांडे सर आहेत बरोबर म्हणा. पण ह्या वेळेला कंपनीच्या गाडीने जायचं टेन्शन आलंय. त्यातून वेलांडे सर राहतात स्वप्ननगरीत, माझ्या अलीकडे तीन stop. म्हणजे ते आधी उतरणार! त्यांना सांगावं का? “मला घरापर्यंत सोबत करा म्हणून?”. मी त्यांना एवढं ओळखत नाही अजून…. थोड्या वेळाने बोलते त्यांच्याशी.
नेहमीचा गाडीवाला दिसत नाहीये. तो कसा असेल? त्याची ड्युटी संपली असेल केंव्हाच. कंपनींच्या गाड्यांत एक driver थोडीच असतो? माझं आपलं काहीतरीच.
 
विकी म्हणाला होता सोडतो म्हणून, पण मीच नको म्हणले. आधीच डीपार्टमेंट मधले सगळे आमच्याबद्दल बोलतात. तो करतोही माझ्या मागे-मागे, मला काय कळत नाही का? आत्तापण नक्की माझ्याकरता थांबला होता तो. बिच्चारा!! गेले असते त्याच्याबरोबर तर…!! पण आता नाही म्हणलेय न मग आलिया भोगासी… वेलांडे सरांशी बोलायचय, पण ते तर driver शी गप्पा मारताहेत. त्यांच्या ओळखीचा दिसतोय हा driver! तसा अजून बराच वेळ आहे म्हणा. घरी पोहोचायला किमान १ तास तरी नक्की.
 
हवा किती छान आहे नाही. सकाळच्या घाई-गर्दीत हाच रस्ता किती निर्दयी वाटतो आणि आत्ता किती सुखकर! अरे ‘जयहिंद’ चं होर्डिंग नवीनच दिसतंय. ड्रेस किती सुंदर आहे. गेलं पाहिजे ‘जयहिंद’ मध्ये.  
अश्या आडवेळेला घराबाहेर यायचा प्रसंग कधी आलाच नाही. आकाश पण छान निरभ्र आहे. चांदण्या लुकलुकाताहेत. एकदम मस्त. अरे पण आज चंद्र दिसत नाहीये.. अमावस्या तर नाही आज. अरे देवा! अमावस्या… ती पण आजच हवी होती का? अभद्र विचारही कशी वेळ पाहून येतात. ते झटकण्यासाठी मालविकाने घट्ट डोळे मिटले.
 
अरेच्या रिंग कोणाच्या मोबाईलची वाजली, माझी? वेलांडे सरांची? का driver ची? 
“हं वसू बोल ग, मी पोहोचतच आलोय. अजून १० मिनिटांत येईन. …. हं .. ओह तू गाडी लावलीयेस का गेटपाशी.. thanks .. किल्ली आहे माझ्याकडे…. हं मग येतो २ मिनिटांत…”
अरेच्या मी झोपले कधी? डोळा लागू नये म्हणून किती प्रयत्न केला तरी लागलाच. वेलांडे सरांच्या बायकोचा फोन होता वाटतं. ब्रेक किती जोरात लावला ह्या driverने? माझी तर सगळी झोप उडाली. हे काय स्वप्ननगरी आलं पण?
“मालविका बाय! उद्या भेटू ऑफिसमध्ये. उशिरा आलीस तरी चालेल. गुड वर्क टुडे!” वेलांडे सर पायरी उतरता उतरता म्हणाले.
“सर.. “-मालविका. उतरता उतरता सरांनी प्रश्नार्थक नजरेनी वळून पाहिलं.
“गुड नाईट”-मालविका.
“गुड नाईट”.
 
सरांना सांगायच होतं ‘घरापर्यंत सोडा’ म्हणून पण सर तर उतरण्याच्या तयारीत होते. मला का झोप लागली आणि तीही आत्ताच?
सर काय म्हणाले फोनवर, त्यांच्याकडे गाडी होती, बायकोने गेटपाशी लावलेली, त्यांनी सोडलं असतं मला गाडीवर… झोपेतून उठल्याने मालविकाला प्रोसेसिंगला थोडा उशीर झाला. मी त्यांना तरी खूप कुठे ओळखते म्हणा, पण ह्या driver बरोबर एकटी जाण्यापेक्षा सरांबरोबर गेले असते. सरांना पण लक्षात आलं नाही वाटतं.
हा driver पण पोरगेलाच दिसतोय. चांगला असला म्हणजे मिळवलं. डोळे किती लालेलाल दिसताहेत त्याचे. झोप आलीय त्याला? प्यायलेला तर नाही न!! पुढे बघून गाडी नीट चालव म्हणजे झालं. ‘श्रीराम जयराम जय जय राम’.
 
वेलांडे सरांनी सवयीने बाईकची किल्ली खिशातून काढली. बाईक सुरु केल्यावर त्यांच्या लक्षात आलं. “मालविकाला सोडायला हरकत नव्हती. माझ्या लक्षातच नाही आलं. एकटीला गाडीतून पाठवायला नको होतं. तसा संतोष चांगला मुलगा आहे. गाडी पण व्यवस्थित चालवतो. पण दिवस बरे नाहीत. कोणाची बुद्धी कधी फिरेल सांगता येत नाही”, असा विचार करून त्यांनी बाईकला किक मारली.
 

गाडीच्या रेअर-व्यू आरश्यात कुठलासा प्रखर दिवा दिसला. तो बराच वेळ गाडीच्या मागे येतोय हे संतोषच्या लक्षात आलं. इतके वेळा जागा दिली, हाताने खूण केली पण हा दुचाकीवाला पुढे जाईना. संतोषने २ सणसणीत शिव्या हासडल्या. “हा कोण मागे येतोय.. %#&%$, %$%#$^” त्या शिव्या ऐकून मालविका अजून घाबरली. ‘श्रीराम जयराम जय जय राम’.
‘गाडीत मी आणि पोरगी एकटेच म्हणून कोणी पाठलाग तर करत नसेल न? दिवस वाईट आहेत. दिवसागणिक बाई-पोरींच्या बातम्या ऐकायला मिळतात. नको तो उद्योग व्हायचा’, संतोष विचार करीत होता.

“म्याडम तुमचं घर कुठं आहे?” संतोषने विचारलं. तिने ‘स्वप्नसागर’ म्हणून सांगितलं.
“स्वप्नसागर मध्ये कुठं?” -संतोष.
‘ह्याला काय करायचय?’, अनिच्छेनेच तिने इमारतीचा क्रमांक सांगीतला.
“काय आहे म्याडम दिवस चांगले न्हाईत. कोण कधी कुणाचा पाठलाग करतंय, सांगता येत न्हाई. तुम्हाला आतमध्ये सोडतो”. -संतोष. त्याच्या बोलण्याने मालविकाला एकदम हायसं वाटलं. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ चा तिला विसर पडला. ‘ह्या वेळेला driver चांगला होता म्हणून ठीक, पण हि रिस्क परत घ्यायची नाही. सरांना सोबत करायला सांगायची, नाहीतर सरळ विकीला घरी सोडायला सांगायचं’, तिने ठरवून टाकलं. 
 
स्वप्नसागरच्या गेटपर्यंत मागचा दुचाकीवाला पाठलाग करतच होता. त्याला पाहून संतोषचा संताप संताप होत होता. ‘म्याडमला सुखरूप घरी पोहोचवणं’, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. 
गाडी मालविकाच्या इमारतीसमोर थांबली. संतोषला आणि नशिबाला धन्यवाद देऊन मालविका गाडीच्या पायऱ्या उतरली. ती बिल्डींगच्या आत गेल्यावरच संतोषने गाडी हाकली.
पाठलाग करणारा दुचाकीवालाही एव्हाना गायब झाला होता. “म्याडम” गेल्यावर ‘त्याच्या’ कडे बघून घ्यायचं संतोषने मनोमन ठरवलं होतं. पण तो दुचाकीवाला कुठे दिसत नव्हता.
 
वेलांडे सरांनी स्वप्नसागरच्या गेटपाशी बाईक कडेला थांबविली. गेटपासून बिल्डींग अगदी सहज दिसत होती. मालविका बिल्डींगमध्ये शिरताना दिसली. ‘संतोषने पोहोचवलं व्यवस्थित’. त्यांनी बाईक सुरु केली. बाईक स्वप्ननगरीकडे मार्गस्थ झाली.