Posts tagged ‘laghukatha’

घनव्याकूळ – १

घनव्याकूळ -संपदा म्हाळगी-आडकर ११/१७/१०  

आज सकाळी बाहेर धो-धो (नवऱ्याच्या भाषेत रापचिक) पाऊस पडत होता. gas वरचा आल्याचा चहा, पाच मिनिटं पावसात भिजून ये म्हणून सांगत होता. डोक्यात कविता होती ग्रेसची! “ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता…” बाहेरचा धो-धो पाऊस, मनात रिमझिम करत होता. वळणाचं पाणी वळणावर येऊन मार्गस्थ होतं, पण मी रेंगाळत होते एकाच शब्दावर.. “घनव्याकूळ”..

“घनव्याकूळ”.. व्याकूळ मन… घनासारखा ओथंबलेला…. बरसायला व्याकूळ मन….काहीतरी सुचतंय… वाटतंय लिहावसं म्हणून घेतलंय लिहायला… बघता बघता मालिकाच झालीय… त्यातला हा पहिला पाऊस….
 
घनव्याकूळ – १
 
“आज कुठून आल्ये मी ह्या सिग्नलला? समदा दिस गेला, दमकी भी गावली नाई. आनी इथली पोरं तर मला हाकून द्यायला लागली. त्यातून ह्यो पाऊस!”, स्वत:च्या नशिबाला कोसत बिंदी कोपऱ्यात  बसली होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. कोपऱ्यातच आपलं कृश अंग अजूनच चोरून शक्य तितका आडोसा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. तसं पावसापासून वाचवायला अंगाशिवाय काहीच नव्हतं.
 
सिग्नलच्या पलीकडे मोठ्या अलिशान दुकानांची रांग होती. दुकानांच्या स्वच्छ चकचकीत काचांवरून पावसाचं पाणी ओघळून वाहत होतं. दुकानातले दिवे, माणसं, कपडे, समान, ती सगळी चकचकीत दुनिया पाण्याबरोबर वाहून जातेय असं वाटत होतं. दुकानाच्या दरवाजात महानगरपालिकेने कित्येक वेळा अतिक्रमण कारवाई करून, काढून टाकलेले छत होतं. अवेळी पावसानं घात केलेले काही जण तिथे खोळंबून थांबले होते.

“पाऊस भी धरून राहिलाय… मीबी जाऊ का तिकडं?”, चकचकीत दुकानाबाहेरच्या छताकडे बघत बिंदीने विचार केला. “पर ह्यो दुकानदार बोलला तर? मागं अशीच थांबल्ये तर एक दुकानदार वसकन अंगावर आला. काय काय ऐकीवलंन मला! मला बाहेर उभी पाहून, ह्यांचं कष्टम्बर य्येत न्हाईत म्हणे. जाऊ दे न राईलं…” मनातला विचार झटकून बिंदी तशीच अवघडून उभी राहिली. अंग थोडं भिजलंच होतं. थंडी वाजत होती. 

चौकाच्या टोकाला एक चहाची हातगाडी उभी होती. हातगाडीला हातगाडीवाल्यानं, हातगाडीच्या छपराला दोन्ही बाजूला दोन काठ्या व त्यावर ताडपत्री टाकून ते अजून वाढवलं होतं. त्याला अतिक्रमणवाल्यांची त्याला भीती नव्हती. गिर्हाईक ताडपत्रीखाली उभे राहून चहा पीत होते. चहाबरोबर कांदा भजी आणि वडेही होते. पाऊस होता.. त्यामुळे धंदा चांगला होता. 
“भूक लागलीय… पोटात आग पडलीय… सकाळपासून काईबी खाल्लं नाई…. समोरच्या हातगाडीकडून चहा घेऊ का?… अंगातली थंडीबी जाईल. पर पैसे कुटे हाईत? कालचं पाच रूपयं सोडलं तर काही उरला न्हाई. पाच रुपये चाहत संपले तर रातच्याला काय खानार? आत्ता खाल्लं तर रातच्याला परत भूक लाग्येल….” चहाच्या हातगाडीकडे न बघण्याचा प्रयत्न करत बिंदी बसून राहिली. पावसानं सगळी पाठ भिजली होती… “जाऊ… नको राऊ द्ये….”
 
अर्धाएक तास झाला. हातगाडीचा, चहाचा, पैशाचा विचार करत बिंदी तळमळत बसली होती. पाऊस चांगलाच लागला होता. थंडीत खूप वेळ बसणं बिंदीला असह्य झालं होतं. धावतच तिनं रस्ता ओलांडला. हातगाडी वाल्याला कटिंग सांगितला. तिच्याकडे एकदा बघून हातगाडीवाला कामात मग्न झाला. बिंदी हातगाडीवरच्या स्टोव्हपाशी उभी राहिली. स्टोव्हची गर्मी तिला प्रफुल्लीत करून गेली. आपण पावसात भिजतोय ह्याचा तिला विसर पडला.
 
कटिंग हातात मिळाल्यावर, बिंदीला बरं वाटलं. हातगाडीवाल्याला पैसे देऊन, वाफाळलेल्या चहाचा ग्लास तिने तोंडाला लावला. आजूबाजूला माणसं होती. टायवाली… स्वच्छ कपड्यातली…. तिच्या खूप जवळ उभी असलेली पण तिच्या खूप दूर असलेली.. कुणी चहा पीत होतं… कुणी गप्पा मारत होतं.. कुणी वडे खात होतं… कोणी बिंदीला नोटीस केलं नाही… बिंदीने तरी त्यांना कुठे नोटीस केलं म्हणा. तीही तिच्याच चहात गुंतली होती. एक घोट घेतला तेवढ्यात “एह्ह लडकी अंदर खडी रेह..” ह्या आवाजानं ती भानावर आली. हातगाडीवाला तिला ताडपत्री खाली उभं राहायला सांगत होता. काहीशी अनिच्छेनीच ती ताडपत्रीखाली उभी राहिली. चहा मस्त होता. “अमृततुल्य” नसला तरी तिला बास होता.
 
“एह येह पकड..”. हातगाडीवाल्यानं काहीतरी कागदात गुंडाळलेलं पुढं करून म्हणलं. बिंदीने वर पाहिलं. “हं ले..” असं म्हणत त्याने हात पुढं केला. काही न बोलता बिंदीने पुडा हातात घेतला. हातगाडीवाला परत कामात व्यस्त झाला. पुडा हाताला गरम लागला म्हणून तिने उत्साहाने उघडला. हातगाडीवाल्याने त्यात काही भजी आणि एक वडा दिला होता…. बिंदीला शब्द फुटेना… तशी शब्दांची गरज नव्हती… तिने काही म्हणावं म्हणून तिला ते दिलेलं नव्हतंच मुळी!
 
 
Advertisements

गुप्तधन

गुप्तधन -संपदा म्हाळगी-आडकर
 
झुंजारवाडीच्या सरपंचपदी धुरंदर पाटीलाची निवड झाल्यापासून तो चांगलाच हवेत होता. तसं धुरंदर म्हणण्यासारखा त्याने अजून काहीही केलं नव्हतं. आपल्या वडिलांना, झुंजारराव पाटीलांना, अभिमान वाटावा असं एकच काम त्याने केलं होतं. वडिलांसाठी गावाचं नाव हुन्नरवाडीचं झुंजारवाडी केलं होतं. ठाकरेंकडून त्याने प्रेरणा घेतली असावी कदाचित.
 
धुरंदरला वाड-वडिलार्जित बराच पैसा-अडका आणि जमीन-जुमला मिळाला पण त्याची अतीची हाव काही कमी होत नव्हती. ह्या ना त्या मार्गाने पैसा कसा मिळेल ह्याचा तो सारखा विचार करीत असे. गुप्त धनापायी त्याने बरेच यज्ञ याग केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. तसा तो व्हायचा नव्हताच. धुरंदर स्वत: काहीही काम करत नसे. वंशपरंपरेने मिळालेला पैसा वाढवण्यासाठीही तो काहीही करत नव्हता. घर चालत होतं, कुठे काही थांबत नव्हतं.
 
धुरांदरची बायको पण त्याच्यासारखीच. आयत्या मिळालेल्या संपत्तीवर ती बसून होती. दाग-दागिन्यांनी मढलेली होती. नवऱ्याच्या गुप्त धनाच्या वेडात तीही सहभागी होती. पैसा आल्यावर “मी हे करीन, ते करीन” ह्या विचारात ती रात्रंदिवस गढलेली असायची.
 
गावाच्या भटजींचा मात्र धुरांदरच्या वेडामुळे खूप फायदा झाला होता. दर महिन्याला धुरंदर पाटलाकडे यज्ञ-याग, पूजा-अर्चा, अभिषेक न चुकता चालू असल्याने भटजींना भरपूर दक्षिणा मिळत असे. पूजेमुळे भटजींना तरी गुप्त नाही पण सुप्त धनाचा लाभ होत होता.

 

धुरांदरच्या बायकोला, शेवंताला, अधून मधून गुप्तधनाची, श्रीमंत झाल्याची स्वप्न पडायची. स्वप्न पाहताना ती झोपेत बोलायचीही. त्यांचा मुलगा चक्रधर तिला झोपेतून उठवायचा. आज तिला परत स्वप्न पडलं. स्वप्नात कोल्हापूरची महालक्ष्मी माता आली. महालक्ष्मी तिचा माहेरची कुलदेवी होती. देवी म्हणाली, “शेवंते, झोपलीस काय उठ.”. शेवंताचा डोळ्यांवर विश्वास बसेना.
“देवी तू आलीस” असं म्हणून शेवंता झोपेतल्या झोपेत चार वेळा देवीच्या पाया पडली. तिच्या चुळबुळीने, शेजारी झोपलेला चक्रधर जागा झाला.
“आये तुझी स्वप्नं बास कर आता, मी पडीन कि बाजेवरून खाली. स्वप्नं तुला आणि ढुशी मला” चक्रधर झोपेतच बोलला. त्याच्या बोलण्याने शेवंता थोडीशी जागी झाली पण कूस बदलून परत झोपी गेली. स्वप्न सुरूच राहिलं.
“माये मला माफ कर, तो आमचा चक्या जरा मधे मधे करत व्हता.”-शेवंता.
“मी तुला वर द्यायला आली आहे” -देवी.
“वर आता ते काय असतं?” -शेवंता.
“तू लवकरच खूप श्रीमंत होशील.” -देवी.
“ओह त्याला वर म्हणत्यात होय?… श्रीमंत म्या??” -शेवंताची ट्यूब पेटायला जरा वेळ लागला.
“हो तूच, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल.” -देवी.
“काय करायचं? पूजा घालायची का जेवण द्यायचं?” -शेवंता.
“त्यातलं काही नाही. तुझ्या गळ्यातल्या चपलाहारात २० लक्ष्मीच्या चकत्या आहेत.”-देवी.
“व्हय की. ४ तोळ्याचा हाय.” -शेवंता. देवीच्या विधानात आपण सारखं मधे बोलतोय ह्याची जाणीव झाल्यावर, तिने जीभ चावली. “माये, एक डाव माफी कर”
“ऊठ आणि त्यातल्या ५-५ चकत्या, गावातल्या ४ विहिरींमध्ये टाक. स्वतःच्या विहिरीत टाकायच्या नाहीत.” -देवी.
“बर” -शेवंता. शेवन्ताने नकळत गळ्यातल्या चपलाहाराला हात लावला.
“असं करशील तर तुला मोठं धन प्राप्त होईल” -देवी.
“करीन मी देवी, नक्की करीन” -शेवंता.
 
शेवंता जागी झाली. उठून बसल्यावर तिला जाणवलं की हे स्वप्न होतं. माहेरची देवी स्वप्नात आल्याने ती आनंदून गेली. पण चपलाहार मोडावा लागणार ह्या विचाराने कष्टी झाली.  “ह्यास्नी सांगावं का? त्ये कधी सोनं पाण्यात सोडू द्यायचे न्हाईत. त्यांच्यापायी गुप्तधन जायचं की. गुप्तधन मिळालं की सांगीन त्यांना स्वप्नाचं, देवीच्या वराचं.”, शेवन्ताने विचार केला.
परत झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप येत नव्हती. तिने चक्रधरला उठवलं.
“काय ग आये, झोपू दे की” -चक्रधर.
“ए चक्या ऊठ की, चल जायचय” -शेवंता.
“एवढ्या रातचीला कुठे नेतीस आता?”-चक्या.
“आधी ऊठ तर मग सांगती” -शेवंता. शेवंता चक्याला घेऊन घराबाहेर आली. तिचं सगळं स्वप्न त्याला सांगितलं.
“आये तू काय करणार आता? टाकणार व्हय सोनं पाण्यात?” -चक्या.
“व्हय तर देवीचा कौल हाय त्यो!” -शेवंता.
“बा खवळल की! परवा पतंग आनायला दिलेलं ५ रुपै हरवलं तर रट्टा हानला त्यानं माह्या पाठीत” -चक्या.
“त्यास्नी सांगतंय कोण? आपण दोघंच जायचं. डायरेस गुप्तधन मिळालं की सांगू त्यास्नी.” -शेवंता.
शेवन्ताचा प्रस्ताव, चक्याने मान्य केला. ते दोघं घराबाहेर पडले.
“चार व्हिरी कोनत्या घ्याव्या रं?” -शेवंता.
“सोनावान्यांची जवळच हाय ती घेऊ. एक भटजींची, एक काने वकिलांची, एक किसन वाण्याची!” -चक्या.
“वाण्याची नको. त्याचं आणि तुझ्या बाचं पटत न्हाई” -शेवंता.
“आता ऱ्हाईल्याच किती व्हिरी? एक भिम्याची पण ती माळावर हाय, गावात न्हाई. तिथं जाऊन परत येईस्तोवर उजडतय की” -चक्या.
“देवी म्हणाली गावातलीच व्हीर पाहिजे. बर मग राहिलं. वाण्याचीच व्हीर खरी” -शेवंता.
दोघं जाऊन हळूच ४ विहिरीत ५-५ बिल्ले टाकून आले. परत येऊन चक्या झोपी गेला. पण शेवंताला झोप येत नव्हती. “गुप्तधन भेटल का?.. नक्की भेटल… न्हाई भेटलं तर? ह्यास्नी काय सांगू? ह्ये काय म्हनतील?” हे विचार तिच्या मनात चालले होते.
 
दुसऱ्या दिवशी शेवंता काहीशी उशिरा उठली. घाईघाईनं कामाला लागली. पूजेला भटजी यायचे होते. आज त्यांना पण उशीर झाला होता. धुरंदर आत येऊन शेवंताला म्हणाला, “भटजी कसं न्हाई आलं?” गळ्यात चपलाहार नाही हे नवऱ्याला कळू नये म्हणून सोवळ्यात असल्यासारखी, दोन्ही खांद्यांवर पदर घेऊन शेवंता चुलीशी बसली होती.
“चक्या कुठं हाय?” -धुरंदर
“झोपला असंल” -शेवंता.
“त्याला धाडतो भटजींना आनायला” -धुरंदर.
धुरंदरने चक्याला झोपेतून उठवून भटजींकडे पिटाळले. थोड्याच वेळात तो परतही आला.
“बाss ते आज यायचे न्हाईत” -चक्या.
“काय झालं? काय येईनात झाले त्ये? त्यांनीच न्हाई सांगितलं व्हय, पूजा महत्वाची हाय म्हणून?” -धुरंदर.
“मला त्ये माहित न्हाई? भटीणबाईंनी सांगितलं त्ये आज येणार न्हाईत.” असं बोलून चक्या निघून गेला.
“जरा जाऊन येतो”, असं शेवंताला सांगून धुरंदर निघून गेला. थेट जाऊन भटजींच्या घरी धडकला. भटीणबाईंनी सगळा वृत्तांत कथन केला. भटजींना तर सकाळी सकाळी अंघोळ करताना महालक्ष्मीमाता बिल्ल्याच्या रुपात भेटली. असेच काहीसे चमत्कार, गावात घडत होते. भटजी, सोनावणे, काणे आणि किसन वाणी सगळ्यांना विहिरीत आज सकाळी महालक्ष्मीच्या प्रतिमा असलेले बिल्ले सापडले होते.
 
घरी आला तसा धुरंदर तडक स्वतःच्या विहिरीवर गेला. मोटेच्या सहाय्याने वेगाने पाणी काढू लागला. काढलेले पाणी शेतात सोडू लागला. मोटेचा आणि पाण्याचा आवाज ऐकून शेवंता बाहेर आली.
“अव काय करतायसा?” -शेवंता.
“अग सोनं शोधातोया. गावात सगळ्या व्हीरीत सोनं सापडतंय. त्या किसन्यालाही गावलंय. त्याला गावलं तर आपल्यालाही गावल.” -धुरंदर जोमानं पाणी काढत होता. शेवंता काही न बोलता आत गेली. काय बोलावं तिला सुचतच नव्हतं. गावातल्या विहिरीत सापडणार सोनं तिचंच होतं. नवऱ्याला सांगितलं तर तो बोलेल हे उघड होतं.
 
म्हणता म्हणता रात्र झाली. धुरंदरचं पाणी काढणं चालूच होतं. तो दमल्याने, वेग थोडा कमी झाला होता. आज तो जेवण-खाण्यासाठी ही थांबला नव्हता. शेवंताला त्याची कीव आली. बाहेर जाऊन धुरंदरला थांबवून तिनं सगळं सांगून टाकलं. धुरंदरला तिचा राग आला. पण तिला बोलून काही उपयोग नव्हता. आजवर त्याने स्वत:ने  गुप्तधनापायी खूप पैसा खर्च केला होता.
 
३-४ महिन्यात धुरंदरकडून भटजींना पूजेसाठी बोलावणं आलं नव्हतं. आज अचानक ते आल्याने, भटजींना आश्चर्य वाटलं. पिक चांगलं आल्याने धुरंदरने सत्य-नारायणाची पूजा घालायचं ठरवलं होतं. धुरंदरने वेळेवर घातलेल्या पाण्याने, पिक जोमात वाढलं होतं. काळ्या धरणीमातेनं, उदरात दडवलेलं गुप्तधन स्वत:हून बाहेर काढून दिलं होतं.
 
 

मूनरूफ

मूनरूफ -संपदा म्हाळगी-आडकर २/१६/१०
 
माझ्या गोष्टीचा इंग्रजी अनुवाद:
अनुवाद सौजन्य: वेगा
अनुवाद येथे वाचता येईल: http://vegapoint.blogspot.com/2010/03/moonroof.html
 
“मानसी अग झालं कि नाही तुझं? किती वेळ?” मिलिंद ची रोज सकाळ सारखी आजही अखंड बडबड चालू होती.
“आले आले.. डबे भरतेय.” मानसी ही ठरलेली उत्तर देत होती. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजूनही उष्ट्या हळदीचा वास तसाच होता.

 मिलिंद आणि मानसी आय टी पार्क मध्ये प्रेमात पडलेल्या असंख्य जोडप्यांपैकीच एक. एकमेकांना साजेसे. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कारित. लव्ह मरेज. थोडसं घाई-गडबडीत झालेलं. नाही पळून-बिळून नाही केलं. मिलिंदच्या बाबांना पाच महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न गडबडीत उरकावं लागलं.
“मानसी आवर ना! गाडी जाईल.” -मिलिंद परत.

मिलिंदचे बाबा सेवानिवृत्त होते. ते आज घरी नव्हते. मिलिंदच्या बहिणीकडे नाशिकला ते हवाबदलासाठी गेले होते. ते घरी असले कि त्यांची सकाळी छान करमणूक होत असे. मिलिंद आणि मानसीची धावपळ आणि त्यातूनही त्यांची शाब्दिक झोम्बाझोम्बी बाबांना दिवसभर फ्रेश ठेवायची. मानसीला ते शक्य तेवढी मदत करत. पण त्यांच्या तब्येतीला जपण्यासाठी मानसी त्यांना काही करून देत नसे. मिलिंदची आई त्याच्या लहानपणीच म्हणजे तो आठवीत असतानाच देवाघरी गेली. मोठ्या बहिणीने आणि बाबांनीच त्याचा सांभाळ केला होता.
 
मिलिंद-मानसीचं घर एका जुन्या वाड्यात होता. ते वाड्याच्या मालकाचे भाडेकरू होते. कधीतरी वाड्याचं बांधकाम होऊन स्वत:ची हक्काची जागा होईल अश्या अपेक्षेनी मिलिंदच्या बाबांनी दुसरं घर घेतलं नव्हतं.  मिलिंदला ते नवा flat घे म्हणून मागे लागले होते. तसा त्याने घेतला ही असता पण बाबांच्या बायपासमध्ये झालेल्या खर्चामुळे flat चं त्याने लांबणीवर टाकलं होतं. परत आयत्या वेळेस वाड्याच्या मालकाने बांधकाम काढलं तर पैसे तयार हवे म्हणून तो इतरत्र पैसे गुंतवण्यास तयार नव्हता. मानसीनेही समजूतदारपणे सगळं कलाकलानं घेतलं.

 
 ***
 
संध्याकाळी एका डिनर पार्टीला जाऊन दोघं उशिरा परत आली. खूप दिवसांनी मिलिंदने बाईक बाहेर काढली होती. ऑफिसला जाताना ऑफिसची बस असल्याने बाईक काढायची वेळ येत नसे. तसाही बाईकवरून ऑफिसला जायला मानसीचा नकार होता. ट्राफिक आणि अपघात ह्याला घाबरून!
 
बाबा ताईकडे गेल्याने मिलिंद मानसीला एकांत मिळाला होता. दोघं एकमेकांना लग्नाआधी आठेक महिने ओळखत होती. पण नव्या भूमिकेतून समोरच्या माणसाला नव्याने जाणून घेत होते. मिलिंद डोळे मिटून, बेडवर पडून, मानसीची वाट पाहत होता. “वर्क डेला कशाला पार्ट्या ठेवतात हे लोक? त्यातून मानसीच्या मैत्रिणीची पार्टी म्हणजे, असून अडचण न जाऊन खोळंबा!”, पडल्या पडल्या त्याचा मनात विचार चालू होता, “पण गाडी छान होती.”
मानसी आवाराआवर आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून बेडवर येऊन बसली. “मिलिंद! तुला संध्या आणि आनंद कसे वाटले?” -मानसी.
“चांगले आहेत… बोलायला, वागायला”, डोळे न उघडता मिलिंद म्हणाला.
“सॅंडी माझी खूप जुनी फ्रेंड आहे” मिलिंदच्या केसात हात फिरवत मानसी म्हणाली. तिच्या हात फिरवण्याने मिलिंदला अजूनच झोप यायला लागली.
“काय रे ऐकतोयेस ना?”, त्याला मधेच हलवून उठवत मानसी म्हणाली, “त्यांची गाडी पण छान आहे नाही”
“हं”- मिलिंद. डोळे मिटलेलेच.
“ए आपण पण घ्यायची गाडी?” -मानसी.
“हं”-मिलिंद.
“हं नाही. ए खरं सांग ना. कधी घेऊयात आपण गाडी? घर नाहीतर गाडी तरी”-मानसी.
“उद्या”, असं म्हणत मिलिंदने मानसीला डोळा मारला. हाताने तिला स्वत:कडे खेचलं.
“उं शहाणा आहेस मला माहितेय उद्या कधी येत नाही…” -मानसी. पुढचं तिला काही बोलताच आलं नाही. कारण तिचे ओठ…
 
 ***
 
“मिलिंद! सॅंडी आज गाडी घेऊन आली होती ऑफिसला. तिने लायसन्स काढलं. आम्हाला चक्कर पण मारली अरे तिने”. मानसीचं बोलणं प्रोसेस न करता मिलिंद ऐकून स्टोअर करत होता.
“ऐकतोयेस ना रे!” -मानसीने खात्री केली.
“हो बोल.”, बँकेची स्टेटमेंटस चेक करण्याचं महत्वाचं काम करत मिलिंद टेबलापाशी बसला होता.
“अरे त्यांच्या गाडीला मूनरूफ आहे” -मानसी.
“ओह बर” -मिलिंद.
“काय मस्त वाटतं मूनरूफ!” -मानसी.
“ए आपणही गाडी घेतली की मूनरूफ सांगू हं! पैसे जास्त पडतात पण I think we can afford that much!”, जीभ चावून हसत मानसी म्हणाली.
“बर” -मिलिंद.
“कधी घेऊयात गाडी?”, मानसी परत मुळपदावर.
“घेऊयात” -मिलिंद. गाडी घेणं अशक्य नव्हतं पण ती घेतली आणि घराचं निघालं तर पैसा कुठून उभा करायचा? हा त्याचा प्रश्न होता.
“घेऊयात पण कधी?” -मानसी टेबलापाशी येऊन उभी राहिली. बोलताना थोडी अधीर वाटली, म्हणून मिलिंदने वर पाहिलं. आत्तापर्यंत RAM मध्ये स्टोअर केलेलं सगळा कॅशेत आणलं.
“घेऊयात ना घाई काय आहे?”, तिला शांत करण्याच्या उद्देशाने मिलिंद म्हणाला.
“घर नाहीतर गाडी तरी घे मला”, मानसी नाराजीच्या स्वरात म्हाणाली. ज्या घरात मिलिंदचं बालपण गेलं, त्याच्या आईच्या आठवणी आहेत ती जागा त्याला सोडून द्यायला सांगणं तिच्या मनाला पटणार नव्हतं म्हणून घराच्या बाबतीत तिनं स्वतःला समजावला होतं. त्याची जाणीव मिलिंदलाही होती.
“हे बघ मानसी, तुला माहितेय बाबांच्या बायपासचा मोठा खर्च आत्ताच झालाय. माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पण चालू आहेत. आपल्या लग्नाच्या वेळी झालेला खर्च वेगळाच.” -मिलिंद. मानसी तोंड फुगवून ऐकत होती. “आपण घेऊयात न गाडी. पण गाडी घेतली आणि वाड्याचं काम निघालं तर मग त्याचे पैसे कुठून आणायचे? मग अजून एक हप्ता मागे लावून घ्यायचा का? तुला माहितेय घराच्या पैशासाठी आपल्याला तयार असायला हवं. मालक कधीही काम सुरु करेल. “, मिलिंद पोटतिडकीने बोलत होता.
“काही महिने थांब. थोडे पैसे गोळा झाले की घेऊ.” तो तिला समजावत म्हणाला.
“माझ्या बँक अकौंटमध्ये आहेत ना ते वापर.” -मानसी.
“मानसी त्यात तुझे लग्नाआधीचे काही पैसे आहेत. ते मी घेणार नाही. आणि उरलेली रक्कम आपत्कालीन म्हणून ठेवायचं ठरलंय ना आपलं?” -मिलिंद. आपला अहंकार मधे न आणता मिलिंदने तिला स्पष्ट सांगितलं.
“पण मी सांगतेय ना तुला ते पैसे वापरायला मग तुला काय प्रोब्लेम आहे?” -मानसी आततायीपणे म्हणाली.
“मानसी तुला कळत नाहीये.” -मिलिंद.
“मग सांग ना मला.” -मानसी.
“आत्ता नको. तुझं डोकं शांत झाल्यावर.” -मिलिंद. मानसी धुसफुसत स्वयंपाकघरात गेली. दोन-तीन भांडी आपटल्याचा आवाज आला. मिलिंद परत क्रेडीटकार्ड्सचे चार्जेस पाहण्यात गुंग झाला.
 
दोन दिवस मानसीच्या रागात आणि मिलिंदने तिचा राग काढण्यात गेले. “बाबा ताईकडे आहेत, चांगला वेळ मिळालाय तर ही भांडत काय बसलीय?” मिलिंद विचार करत होता. “She is wasting time!”, असा विचार करून हळहळत होता. “काहीतरी करायला हवं!”
“१०-१५ दिवसात बाबा परत येतील. एवढा रुसवा पुरे झाला का? का continue करावा? बाबांसमोर नको राग वगैरे…” अशी मानसीचीही मनात तारेवरची कसरत चालू होती.
 
 ***
 
आज मानसीला ऑफिसमध्ये उशीर होणार होता. तिच्या प्रोजेक्टचा रिलीज होता. मिलिंद नेहमीच्या बसने घरी आला. नेहमीचे व्यवहार सुरळीत चालले असले तरी मानसीच्या मनात अजून गाडीचा विषय होताच. “काय करावं हिच्या रागाला? आज काय वार.. बाबांना यायला किती दिवस?” असं म्हणून मिलिंदने कालनिर्णय पाहिलं. आणि एकदम काहीतरी दिव्य सापडल्यासारखं “येस” म्हणून ओरडला. “कसं अगदी जुळून आलंय”, मनातलं अलगद ओठांवर आलं. घाईघाईत बाईक काढून तो चौकाच्या दिशेने निघाला.
 
रीलीझमुळे मानसीला उशीर झाला म्हणून तो तिला बाईकवरून stop वर आणायला गेला. दमली होती बिचारी. घरी आली तशी पर्स टाकून म्हणाली,
“आईचा फोन आला होता. चंद्राला औक्षण कर म्हणून. आज कोजागिरी आहे वाटतं. मी कॅलेंडर पाहिलंच नाही रे! मसाल्याचं दुध पण केलं नाही!”
“हो का कोजागिरी? ओह बर”-मिलिंद.
हातपाय धुवून मानसी स्वयंपाकघरात गेली. gas वर पातेल्यात मसाला दुध ठेवलं होतं.
“हे कोणी केलं? तू केलंस?” -मानसी.
“येस ma’m! गरम आहे म्हणून झाकलं नाहीये” -मिलिंद.
“तुला माहित होतं आज कोजागिरी आहे ते?” -मानसी.
“हो मी मघाशी कॅलेंडर पाहिलं.” -मिलिंद- “आता ते शेजारी झाकलेलं पातेलं बघ”
तिने पाहिलं तर त्यात सुकी भेळ होती आणि शेजारी ओल्या भेळेची तयारी पण. तिला एकदम मस्त वाटलं. एकदम सही!
“तू हे सगळं केलंस? सॉलिड आहेस.” -मानसी.
“हं”- मिलिंद – “बर तू औक्षणाची तयारी कर आणि गच्चीत ये.”
“गच्चीत कशाला? चंद्र इथे खिडकीतून पण दिसतोय की!” -मानसी.
“अग कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एका कवडातून पाहणार तू? त्याची बेज्जती आहे ही.”, मिलिंद डोळा मारत म्हणाला “ये मी भेळ आणि दुध घेऊन पुढे जातोय” -मिलिंद.

मानसी ऑफिसचा पश्चिमी पेहराव बदलून, छान पंजाबी ड्रेस घालून, औक्षणाचं ताट घेऊन गच्चीत आली. मिलिंदने गच्चीचा चेहराच बदलला होता. त्याने स्वत: झाडून, पाणी टाकून गच्ची साफ केलेली होती. मधोमध सतरंजी टाकली होती. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या.
“हे पण तू?” -मानसी.
“मग आमचा चंद्र दमून भागून यायचा होता ना?” मिलिंदच्या ह्या बोलण्याने, अंगावरून मोरपीस फिरावं तसं वाटलं मानसीला. किंचित लाजलीही ती.

औक्षण झाल्यावर दोघांनी चंद्राला नमस्कार केला. दुधाचा नैवैद्य दाखवला. मग एक एक दुधाचा पेला स्वत:साठी घेऊन दोघे सतरंजीवर बसले. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रभेनी आसमंत भरून गेला होता. आकाशाच्या काळ्या मखमलीवर कोणीतरी चांदण्यांचं भरतकाम केल्याचा भास होत होता. हवा पण छान होती आणि सहवासही हवाहवासा.
“मानसी तुला मूनरूफ हवं होतं ना? हे बघ मूनरूफच आहे. आवडलं?”
“मिलिंद यू आर ग्रेट! Thank you!”, मानसी म्हणाली.
“ग्रेट वगैरे काही नाही ग! कालान्वये गाडी घेऊच आपण, तुला हवी तशी, मूनरूफवाली, पण तोपर्यंत मून पाहायचा नाही का?” -मिलिंद.
“हं” -मानसी.
“आणि मानसी आपली तर हनिमून फेज चालू आहे. आता मी तुला मून दिला तू मला हनी नको द्यायला?” – असं लाडाने म्हणत मिलिंद मानसीकडे झुकला.
त्याला दूर ढकलून, मानसी उठून, धावत गच्चीचा जिना उतरू लागली. जाताना हसत मागे वळून म्हणाली, “देईन ना ढगांच्या दुलईआड!”
 

प्लांचेट

प्लांचेट -संपदा म्हाळगी-आडकर १/२७/१०


प्रो. भडभडेंचं मानसशास्त्राचं लेक्चर चालू होतं. लेक्चरच्या सुरुवातीलाच त्यांनी फळ्यावर मोठ्या अक्षरात “भूत-पिशाच्च” असं लिहिलं. एरवीही त्यांची लेक्चर्स चांगली व्हायची. एखादा विषय खुलवून कसा शिकवावा हे कोणी त्यांच्याकडून शिकावं. आजच्या लेक्चरचा विषय वाचून, बाकावर parabola आणि hyperbola सारखे बसलेले सर्व विद्यार्थी एकदम बाकाशी काटकोनात बसले.

प्रो. भडभडे मानसशास्त्रात प्रवीण पण भूमितीच्या संज्ञा वापरायला त्यांना फार आवडायचं. बाकावर डोकं ठेऊन झोपलेल्या विद्यार्थ्यांना Parabola आणि पुढच्या बाकावर पाय ठेऊन शरीर काहीसा गोलाकार करून बसलेल्यांना hyperbola म्हणायला त्यांनी सुरुवात केली, तेंव्हा त्यांचं त्यांनाच फार हसू आलं. “पत्की madam न्ना सांगितलं पाहिजे त्यांच्या भूमितीच्या लेक्चरला उदाहरण म्हणून उपयोगी पडेल” अशी अजून वरती कोपरखळी.
पुढचा एक तास भूत-पिशाच्च असते की नसते, ह्यापासून तुम्हाला आलेले भुताचे अनुभव इथपर्यंत सर्व चर्चांमध्ये रंगून गेला.
लेक्चर संपल्यावर वैजयंती, कीर्ती आणि शमिका बाहेर पडल्या. दरवाजाबाहेर थांबून आदित्य आणि गिरीशची वाट पाहत उभ्या होत्या. आज विक्रम कॉलेजला आला नव्हता. काल रात्री ट्रेकवरून उशिरा परत आल्याने, सकाळची लेक्चर्स बुडली होती. तो १२:३० च्या सुमारास कॅन्टीनमध्ये भेटणार होता. सगळे कॅन्टीनकडे निघाले.
“आद्या लेक्चर काय सही झालं ना रे”, चालता चालता गिरीशने विचारले.
“भन्नाट, मी विचारच केला नव्हता. भडभडे बाप माणूस आहे.”- आदित्य.
“आता तो विषय नको” शमिका जवळ जवळ किंचाळली.
“का ग? घाबरलीस कि काय?”-गिरीश.
“घाबरले वगैरे नाही रे गिऱ्या” -शमिका.
“घाबरली कसली नाही. लोक अनुभव सांगत होते, तेंव्हा माझा हात धरून बसली होती पूर्णवेळ.” वैजू हसत म्हणाली. शमिकाने वैजूकडे चिडून एक कटाक्ष टाकला.
“हे भूत-बित सगळं झूट आहे यार!” -गिरीश.
“मला भीती वाटली नाही. पण इन केस वाटली तर मी राम नाम घेते. वर्क्स लाईक magic!” -कीर्ती.
“खरंय” -शमिका.
“कसल्या तुम्ही पोरी, म्हणे psycology स्पेशल करणार!” -गिरीश.
“ए तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतात ना मग गुमान शांतीला धरा.” -कीर्ती.
बोलता बोलता कॅन्टीन आलं. विक्रम आधीच आला होता. आठ जणांचा एक टेबल त्याने राखून ठेवलं होतं.
“हाय विक्या” -सगळे. “हेलो”-विक्रम.
“कसा आहेस? ट्रेक कसा झाला?” -आदित्य
“अरे सही झाला. पण सॉलिड दमलोय रे. रात्री फार उशीर झाला. झोप नाही झाली त्यामुळे.” -विक्रम.
“ए कुठे गेला होतास ट्रेकला?” -वैजू.
“राजगड!” -विक्रम.
“काश… मला ही येत आलं असतं.” -वैजू.
“पुढच्या वेळेला चल की. खरंतर पुढचा ट्रेक आपण सगळ्यांनी मिळून करूयात का?” -विक्रम
“येस चालेल” -आदित्य.
“चालेल नाही धावेल.” वैजू खूपच एक्साईट झाली. ती ग्रुपची tomboy म्हणून प्रसिद्ध होती.
शमिका आणि कीर्तीनी एकमेकींकडे पाहिलं. दोघींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
“काउंट अस आउट! आम्ही येणार नाही.” -शमिका. कीर्तीने तिच्या उत्तरात आपला नकार मिसळला.
“बर ट्रेकला आम्ही जाऊ, तुम्ही पिकनिकला तरी याल का?” -गिरीश.
“पिकनिक कुठे?” -कीर्ती. थोडसं हायसं वाटून कीर्ती म्हणाली.
“माझ्या मामाचं पालीला फार्महाउस आहे. ओवरनाईट पिकनिकला जाऊया तिकडे. आम्ही सकाळी ट्रेकला जाऊ, तुम्ही फार्महाउसवर थांबा. Hows that?” -गिरीश
“लय भारी!” -आदित्य.
“मजा येईल, मी आईला मोबाईल करते” -वैजू.
“घरी विचारून सांगतो” -शमिका आणि कीर्ती.
/div>

हो नाही करता करता एकदाचा दिवस ठरला. ठरल्या दिवशी सगळे पालीच्या दिशेने निघाले. शमिकाच्या बाबांनी त्यांची जीप आणि ड्रायव्हर दिला होता. त्यामुळे पालीपर्यंत जाण्याची सोय झाली होती. पालीला पोहोचल्यावर, ट्रेकवाली मंडळी ट्रेकला गेली. शमिका आणि कीर्ती गाडीतून गावात हिंडून आल्या. संध्याकाळी सगळे परत फार्महाउसवर भेटले.
फार्महाउस मोठं प्रशस्त होतं. गिरीशचा मामा एक आड एक शनिवार-रविवार चक्कर मारत असल्याने छान ठेवलेलं होतं. सगळ्या सोयी होत्या. ट्रेकवरून आलेल्या मंडळींची आवाराआवर झाल्यावर सगळे जेवायला बसले. घरून थोडंफार बांधून आणलं होतं. पिकनिकचं ठरल्या दिवशीच, कोणीकोणी काय काय आणायचं ह्याच्या याद्या झाल्या होत्या. शमिकाने मस्त मुगाच्या डाळीची खिचडी टाकली होती. सगळे पोटभर जेवले.
रात्रीचे ९ वाजले होते. जेवण झाल्यावर सगळे दिवाणखान्यात, येऊन बसले. पत्त्यांचे डाव टाकायचं ठरलं. सहा जणांचं laddis. खेळता खेळता कीर्ती आणि आदित्य पुरते कंगाल झाले. कीर्तीची किरकिर सुरु झाली, “ए आपण वेगळं काहीतरी खेळुयात ना. पत्ते आता बोअर झाले.”
“का हरायला लागलीस म्हणून?” -विक्रमने हसत विचारलं.
“अहं, बोअर झालं. आपण अंताक्षरी नाहीतर डंब शेराज खेळुयात का?”
“ए नको ही वैजू काय खुणा करते काही कळत नाही.” -आदित्य.
“हाऊ आबाउट भुताच्या गोष्टी?..” – विक्रमला चेव आला. सकाळी लेक्चरचा सगळा वृत्तांत आदित्यने त्याला सांगितला होता. “नाहीतर प्लांचेट???” लोकांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा वेळी त्याने दिला नाही.
“आय एम अप” -आदित्य. “मी टू!” -गिरीश.
“दौडेगा.” -वैजू.
“मला तर भीती वाटते पण ट्राय करू” -कीर्ती.
“ए ती भुतं खरंच येतात का? येत असतील तर नको बाबा. अरे घाबरलेल्याच्या मानगुटीवर बसतात म्हणे.” -शमिका.
“शमे यार ग्रो अप. भूतबित काही नसता यार.” -गिरीश.
“अग काही नाही होत. सॉलिड मजा येते. आम्ही खूप वेळा ट्रेकच्या इथे केलं आहे. तुम्हाला भीती वाटायला लागली तर आपण थांबू तिथेच. ए गिऱ्या, स्वयंपाकघरातला पाट आणि वाटी घेऊन ये रे!” -विक्रम.
“ए नको रे. सॉलिड मजा कसली नंतर लिक्विड सुटायची वेळ यायची.” -शमिका. शमिका नको म्हणेपर्यंत गिरीश किचनपाशी पोहोचला ही होता.
“मी झोपायला जाते. मला हे असलं काही करायचं नाही. कीर्ती तू येतेस का झोपायला?” -शमिका.
“शमे ५ मिनिटं बस मग जाऊ.” -कीर्ती. कीर्तीने शमिकाला जबरदस्ती थांबवलं.
गिरीश आणि विक्रम प्लांचेटच्या तयारीला लागले. पाट उलटा ठेऊन त्यावर ए तो झेड अक्षरं लिहिली. दिवे गेले तर पर्याय म्हणून आणलेली मेणबत्ती पेटवून उलट्या वाटीवर लावली.
“कोणाला बोलवायचं?” -आदित्य
“गांधी नाहीतर नेहरू?” -विक्रम
“इतिहास पक्का आहे का? त्यांनी उलटे प्रश्न विचारले तर?” -गिरीशची आपली उगाच टिंगल.
“मग तुम्ही सांगा.” -आदित्य. सगळे विचार करू लागले.
“विनीत कुमारच्या भुताला बोलावू. मला तो सॉलिड आवडायचा, गेला बिचारा” -वैजू. विनीत कुमार उदयोन्मुख नट होता. तरुणपणीच कार अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. मद्य पिऊन कार चालवल्याचा त्याच्यावर आरोप होता.
“चालेल. पण वैजू भुतं दिसत नाहीत. विनीत कुमार तुला दिसणार नाहीये” गिरीशची परत टिंगल.
“माहितेय” -वैजू.
“मी जातेय” -शमिका.
“बस ग, अजून सुरु कुठे झालंय?” -कीर्तीने तिला हात धरून खाली बसवलं. मनातल्या मनात तीही “राम राम” जपतच होती.
सगळी तयारी झाल्यावर विक्रमने भुताची आराधना सुरु केली. काही क्षणांनी वाटी फिरल्याचा भास झाला.
“ए आला वाटतं” -आदित्य.
“विनीतजी तुम्ही आलात का?” -विक्रम. काहीच झालं नाही. सगळे उत्कंठेने वाटीकडे पाहू लागले.
“पूर्ण स्पेलिंग करायचं नसेल तर ‘येस’ साठी Y आणि ‘नो’ साठी N सांगा.” -परत विक्रम. वाटी Y कडे सरकली.
“येस”, वैजू आनंदाने किंचाळली.
“कसे आहात?”, आपण चुकीचा प्रश्न तर विचारला नाही ना म्हणून गिरीशने जीभ चावली. उत्तर आलं नाही.
“ए गिऱ्या उगाच भडकवू नको रे!” -विक्रम.
“तुमच्या निधनाचे आम्हाला खूप दु:ख आहे” -वैजू. वाटीने O आणि K वर सरकून ‘OK’ म्हणलं.
“तुम्ही दारू प्यायली होती काहो गाडी चालवताना ?” -आदित्य. सगळ्यांनी चमकून आदित्यकडे बघितलं. शब्दबाण सुटला होता. आता काही करणं शक्य नव्हतं. उत्तरासाठी सगळे वाटीकडे पाहू लागले. वाटी Y कडे सरकली. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा आदित्यला हायसं वाटलं.
“विचारा कोणीतरी” -विक्रम.
“तुमचा पायल बावेजावर खरच प्रेम होता काहो?” -वैजू. ‘विनीत कुमार आणि प्रेम’ हा वैजूच्या जिव्हाळ्याचा विषय होता. विनीत कुमारने तिला इतकं झपाटलं होतं की, “आमची दोघांचीही नावं ‘V’ वरून आहेत हा योगायोग नाही. देवाने ते मुद्दामच केलंय” असा काहीसं ती बडबडायची.
वाटी अलगद Y कडे सरकली.
“अजूनही आहे का?” -परत वैजू. वाटी अलगद N कडे सरकली. “का?” -वैजू.
“ए वैजे, सगळे प्रश्नं तू विचारणार आहेस का? आम्हाला पण विचारायचंय.” -गिरीश. वैजू फिरंगुटून गप्प बसली.
“पायलने अतुल चौधरीशी लग्न केलं म्हणून तुम्ही चिडला आहात का?” -गिरीश. एकेकाळी पायल आणि विनीतची मैत्री वर्तमानपत्रांचे रकाने भरत होती. विनीत जाण्याच्या काही दिवस आधी, पायल आणि त्याचं ब्रेक-अप झालं होतं. त्यामुळे विनीत खचून दारूच्या आहारी गेला होता.
वाटी Y कडे सरकली. प्लांचेट यशस्वी होत असल्याचा विक्रमला आनंद होता.
“तुम्हाला वरती आता कोणीतरी मेनका भेटली असेलच की करमणुकीला?” -गिरीशची पुन्हा टिंगल.
“ए गिऱ्या.” -वैजू.
वाटी थरथरू लागली.
“ए चिडला का रे तो?” -आदित्य.
“बहुतेक!” -विक्रम. “मी चालले” -शमिका सोफ्यावरून उठून खोलीच्या दिशेने चालू लागली.
“ए थांब, मी पण आले.”, कीर्ती तिच्या मागे गेली.
वाटीची थरथर थांबली.
“विनीतजी तुम्ही आहात का?” -विक्रम. बराच वेळ थांबूनही उत्तर आलं नाही. “गेला वाटतं परत!” -विक्रम.
“आता झोपायचं का? खूप उशीर झालाय” -वैजू.
मेणबत्ती विझवून, पाट आणि वाटी जागेवर ठेवून सगळे आपापल्या खोल्यांत गेले.
सकाळी हलकीशी जाग आल्यावर, वैजूला चेहरा ओढल्यासारखा वाटला. चेहऱ्यावर काहीतरी लागलं होतं. ओढली गेल्याने कातडी दुखत होती. तिने उठून आरश्यात पाहिलं. चेहऱ्याला टूथपेस्ट लावली होती कोणीतरी. पेस्ट वाळून कडक झाल्याने कातडी ओढली गेली होती. तिने वळून, झोपलेल्या शमिका आणि कीर्तीकडे पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्याला पेस्ट लागली होती. त्यांना झोपेतून उठवून, “हे नक्की विक्रमचं काम आहे”, असं म्हणून ती झपाझपा विक्रमच्या खोलीकडे चालत गेली. दार वाजवलं, विक्रमने चेहरा पुसतच दरवाजा उघडला.
“विक्या, गाढवा हे काय केलंस?” -वैजू.
“काय?” -विक्रम बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. तोही चेहऱ्याची पेस्ट धुवूनच बाहेर येत होता.
“ही पेस्ट…”-वैजू. शमिका आणि कीर्ती मागून चालत येत होत्या.
“अग मी नाही लावली.” -विक्रम.
“फेक आता” -वैजू.
“अग खरंच सांगतो. माझ्याही चेहऱ्याला लावली होती कोणीतरी.” -विक्रम. वैजूचा आरडाओरडा ऐकून, गिरीश आणि आदित्यही उठून बाहेर आले. त्यांच्याही चेहऱ्याला पेस्ट होती. सहा जणांपैकी फक्त विक्रमच्याच चेहऱ्याला पेस्ट नव्हती.
“तूच लावलीस.” -शमिका आणि कीर्ती.
“ऐकाssss माझ्याही चेहऱ्याला होती, मी धुतली रे आत्ताच.” -विक्रमने समजवायचा खूप प्रयत्न केला.
“टूथपेस्ट तूच आणणार होतास, म्हणजे तूच लावलीस.” -कीर्ती.
“अरेच्च्या, मी टूथपेस्ट आणलीय पण अजून तिला हातही लावला नाहीये.” -विक्रम.
“तूच!!! तू दोन आणल्या असशील. एक आम्हाला लावली आणि एक भरलेली आता आम्हाला दाखवशील.” -वैजू.
“अग नाही ग बायांनो! गिऱ्याने केलं असेल. त्याला कालपासूनच टिंगल करायचा मूड होता.” -विक्रम
“ए मी नाही! स्वताच्या चेहऱ्याला मी का लावून घेईन?” -गिरीश.
विक्रमने sac पहिली. टूथपेस्ट अजूनही तशीच होती. सीलसकट. त्याने तिला हातही लावला नव्हता. हा नक्की गिरीशचाच खोडसाळपणा हे त्याने मनात पक्कं ठरवलं होतं. बाकी सगळे विक्रमनेच हे केलय असं समजून त्याला शिव्या देत होते. एकूण पिकनिकला धमाल आल्याने सगळे खुश होते. परत पुन्हा पालीला, फार्महाउसवर यायचं ठरलं.
सकाळचा चहा घेऊन, आंघोळी करून सगळे जीपमधून पुण्याला परत निघाले. दूर कुठेतरी एका स्मशानाचा रखवालदार त्याची हरवलेली टूथपेस्ट शोधत होता. त्याच स्मशानात, विनीत कुमारच्या कबरीपाशी एक संपलेली टूथपेस्ट पडली होती.

गुलकंद

गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०
 
आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची एक वेगळीच excitement असते. तशी ती मधुश्रीलाही होती. मधुश्री अरविंद आपटे, दिसायला गोरीपान आणि अतिशय देखणी. दहावीत ८५% मिळवून, नावाजलेल्या डी. एम. कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला होता. खूप चांगला अभ्यास करून तिला बाबांसारखं इंजिनिअर व्हायचं होतं.
  
अकरावीच्या वर्गात, काही शाळेतल्या मैत्रिणीही बरोबर होत्या. मधुश्री, आश्लेषा आणि मिताली, तिघी शाळेत तश्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या पण कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप झाला. तिघीही सुस्वरूप. कॉलेजमध्ये त्यांना बार्बी ग्रुप म्हणून नाव पडलं होतं. तिघी मिळून रोज सायकलवरून कॉलेजला जात. कॉलेजमध्ये मुलींसाठीचा पार्किंग लॉट वेगळा होता.   
 
कॉलेज सुरु होऊन ६ महिने लोटले. आजचा कॉलेजचा दिवस इतर दिवसांसारखाच. आज फिजिक्सचं practical होतं. Practical झाल्यावर तिघी सायकल stand कडे चालत चालल्या. आज सायकल शोधायला फार कष्ट पडणार नव्हते. बराचसा कॉलेज लेक्चर्स संपवून घरी गेलं होतं. काही मोजक्याच सायकली पार्किंग लॉटमध्ये उरल्या होत्या. मधू, आशू आणि मितू तिघींना आज पार्किंग ला जवळ जवळच जागा मिळाली होती.  तिघी आपापल्या सायकलींपाशी पोहोचल्या. सायकलच्या पुढच्या बास्केटमध्ये sac ठेवताना मधूला काहीतरी दिसलं. तिच्या बास्केटमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं. अरे बापरे गुलाबाची फुलं? खाली चिठ्ठीही होती. तिने आशू आणि मितूला हाक मारली, “हे बघा ना काय आहे?”
“आं??” -आशू
“कोणी ठेवलं?” -मितू.
“आता मला काय माहित?.. काय करू मी?” -मधू.
“चिठ्ठीत काय आहे?” -आशू. मधूने चिठ्ठी उघडली.
“कविता आहे.” -मधू.
“नाव आहे का?” -मितू.
“अनामी प्रेमिक म्हणून लिहिलंय. काय करू इथेच टाकून देऊ का?” – मधू.
“नको इथे नको.” -आशू.
“अग घरी कशी नेऊ? आईला काय सांगू?” -मधू.
“चिठ्ठी आत्ता पुरती लपवून ठेव.” -मितू.
“आणि फुलं?” -मधू.
“माझ्या बागेतली आहेत म्हणून सांग.” -आशू. आशूचा मोठा बंगला होता. बंगल्याभोवती मोठी बाग होती. तिच्या नावावर हे खोटं बिनदिक्कत खपलं असतं.
“ओके”. मधूला तेवढ्यापुरता तोडगा मिळाला होता.
“ए पण माझ्या बास्केट मध्ये का ठेवलं???.. तुमच्या दोघींपैकी कुणासाठी तर नसेल ठेवलेलं, चुकून माझ्या बास्केटमध्ये??…” मधूची उगाच शंका.
“परत ठेवलं तर बघू कुणाच्या बास्केट मध्ये आहे ते…” – आशू.
घरी आल्यावर आईने मधूला विचारलंच फुलांबद्दल. “आशूच्या बागेत खूप फुलं आली होती. तिने दिली आहेत” असं मधूनं सांगितलं. आईशी खोटं बोलणं मधूला आवडलं नाही.
दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. सुदैवाने आज आईने काही विचारलं नाही. फुलं आशूच्या बागेतलीच असावीत असा समज तिने करून घेतला असावा. मधूला खोटं बोलायला लागलं नाही, ह्याचं समाधान होतं. 
पुढं हे वारंवार घडायला लागलं. दोनदा तीनदा आई म्हणलीही, “आशूच्या बागेत केवढी फुलं येतात ना?” एवढ्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्नही आईने परस्पर सोडवला होता. काही फुलं देवासाठी ठेऊन, उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा ती गुलकंद करत होती. गुलकंद फारच चांगला होत होता.
अकरावीचं उरलेलं वर्ष आणि बारावीचं आख्खं वर्ष, आशूच्या बागेतल्या फुलांचा मधूच्या घरी गुलकंद बनत होता. मधूच्या कपाटातही अनामी प्रेमिकाच्या कवितांची मोठी चवड लागली होती.
 
बारावी झाल्यावर, मधूच्या बारावीसाठी थांबवलेली, बाबांची बदली अखेर नागपूरला झाली. मधूने नागपूरच्या इन्जिनिअरिन्ग कॉलेजात प्रवेश घेतला. बारावीत चांगले मार्क्स मिळाले होते. आशू आणि मितू अजून पुण्यातच होत्या, इन्जिनिअरिन्ग करत. तिघीही एकमेकींच्या संपर्कात होत्या. नागपूरला शिफ्ट झाल्याने आईचा गुलकंद मात्र बंद झाला होता. मधूचं इन्जिनिअरिन्ग झाल्यावर, तिच्या बाबांनी एक चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. ती आता नवरयाबरोबर यु. एस. मध्ये राहत होती. 
 
बारावी नंतर जवळ जवळ सहा एक वर्षांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा होता. मितू आणि आशूने जायचं ठरवलं. आशूबरोबर तिचा होणारा नवराही होता. त्याचे ऑफिस मधले काही सहकारी मेळाव्याला जाणार असल्याने तोही आला होता. त्याच्या सहकाऱ्यांना आशूला भेटण्याची इच्छा होती. त्याने सगळ्यांशी आशू आणि मितालीची ओळख करून दिली. सहकाऱ्यांमध्ये तुषारही होता. त्याने आशू आणि मितूला ओळखलं. “अरे आपण एकाच batch मध्ये होतो. सायन्स बी डिविजन. तुमच्याबरोबर अजून एक असायची ना?”, तो  म्हणाला.
“हो मधू, मधुश्री.” -आशू म्हाणाली.
“ती कुठे आहे? आली नाही का?” -तुषार.
“नाही ती यु.एस. ला असते. मागच्या वर्षी आली होती. यावर्षी परत यायची आहे.” -मितू.
“ओह बर!” -तुषार.
“तिच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे पुढच्या महिन्यात.” -मितू. न विचारता ज्यादाची माहिती द्यायची तिला सवयच होती.
“पुस्तक??” -तुषार.
“हो कवितांचा.. कवितासंग्रह… मागच्या वर्षी एक भाग तिने प्रकाशित केला आहे. ह्यावर्षी दुसरा.” -आशू.
“ओह बर! काय नाव पुस्तकाचं?” -तुषार.
“गुलकंद!”
“बरं…”
  
दुसऱ्या दिवशी तुषार आप्पा बळवंत चौकात गेला. त्याने ‘गुलकंद’ शोधून काढलं. त्यावर लेखिकेचं नाव नव्हतं. पण प्रकाशक म्हणून नाव होतं, ‘मधुश्री साने, अभय साने’. “अरेच्च्या, हिचं नाव मधुश्री आपटे होतं ना?… लग्न झालेलं दिसतंय!”, तो मनात हळहळला. त्याने ते पुस्तक विकत घेतलं. दुकानाबाहेर येऊन, साईड stand वर लावलेल्या, आपल्या तिरक्या बाईकवर रेलून उभा राहिला. पिशवीतून पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये, लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी “गुलकंद” असं लिहिलं होतं. त्याला मुखपृष्ठ आवडलं. पुस्तक उघडून तो चाळू लागला. पुस्तकाच्या पाचव्या पानावर ऋणनिर्देश होता…
“माझ्या अनामी प्रेमिकास, तू दिलेल्या गुलाबांचा गुलकंद मी तुला देऊ शकले नाही, पण ह्या तुझ्या मुरलेल्या कवितांचा गुलकंद तुझ्यापर्यंत पोहोचावा ही इच्छा! तुझी ओळख पटल्यास, पुढच्या आवृत्तीचे योग्य श्रेय (मोबदला)  तुला देण्यात येईल -मधुश्री अभय साने.”
 

अध्वर्यू

अध्वर्यू  -संपदा म्हाळगी-आडकर  १/२०/१०  
 
जयहिंद मिलचा सगळ्यात जुना कामगार म्हणून एकनाथ वेसणे प्रसिद्ध होता. खरंतर मिल मालकापुढे आत्तापर्यंत तोच तग धरून उभा होता. चार एक वर्षांपूर्वी तो युनिअनचा लीडरही झाला. कडक शिस्तीचा पण कर्तव्यकठोर म्हणून प्रसिद्ध होता. कामगारांबद्दल त्याला कळवळा होता. मिलमध्ये त्याला मान होता.
 
घरी वारकरी पंथाचं प्रस्थ होतं. एकनाथही दरवर्षी न चुकता वारीला जात असे. रोज विठोबासारखं, आपल्या सावळ्या कपाळावर उभं गंध लावून तो कामाला जायचा. मिलच्या निळ्या युनिफोर्ममध्ये, कमरेवर हात ठेऊन उभा राहिला की सावळ्या विठोबाचा अवतारच दिसायचा. वारीचे प्रसंग रंगवून सांगणं त्याला फार आवडायचं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कोणी पिन मारली की लगेच अभंग गाऊन दाखवायचा.
 
एकनाथच्या घरी म्हातारी आई, बायको, मुलगा विश्वनाथ आणि मुलगी राधा होते. विश्वनाथ कॉलेजात तिसऱ्या वर्षात आणि राधा शाळेत नववीत शिकत होते. विश्वनाथ हुशार आणि तल्लख बुद्धीचा होतं. वडिलांच्या कामात, राजकारणात त्याला रस होता. मिलमध्ये चाललेल्या घडामोडींबद्दल वडिलांशी चर्चा करायला त्याला आवडत असे.
 
गेल्या काही वर्षात मिलमध्ये नवी भरती झाली नव्हती. पण कुणाकुणा कामगारांचे मुलगे त्यांच्या जागी चिकटले होते. गेल्या वर्षी अशीच काही नवी मुले दाखल झाली होती. मिलमध्ये तरुणांची संख्या जाणवण्या इतपत वाढली होती. नवं रक्त जुन्या जाणत्यांना कधी डोईजड होईल ह्याचा नेम नव्हता. 
 
नवं वर्ष उजाडलं पण मिल मालकाने पगारवाढीचं नाव काढलं नव्हतं. नवीन पोरांमध्ये चुळबुळ सुरु झाली होती. त्यांची काही चूक नव्हती त्यात. शिकाऊ कामगार म्हणून त्यांना पगारही कमी मिळत होता. महागाई रोज नवे उच्चांक गाठत होती. तुटपुंज्या पगारात घरचं भागवणार तरी कसं? नवीन असल्याने उघड उघड बंद पुकारणं त्यांना मानावाण्यासारखं नव्हतं. पण कुठतरी ठिणगी पेटल्याची जाणीव एकनाथला होती.
 
एक दिवस सकाळीच काही कामगार त्याला घरी भेटायला आले. “दादा पगारवाढीबद्दल  मालकाशी बोला” म्हणून सांगू लागले. पगारवाढ दिली नाही तर संप करू म्हणू लागले. एकनाथने त्यांना समजावलं, “काही दिवस धीर धरा. मी पुजारीशी बोलतो. त्याने मालकाला सांगितलं की मालक बोलवेल आपल्याला बोलणी करायला”. काही दिवस वाट पाहायचं ठरलं. विश्वनाथ त्यांचं बोलणं ऐकत होता. 
 
गंगाधर पुजारी, मालकाचा उजवा हात होता. अतिशय बेरकी होता. तो एकनाथला चांगला ओळखत होता पण एकनाथ त्याला चांगला ओळखत होता का? पुजारीच्या मनाचा ठाव आत्तापर्यंत कोणाला लागला नव्हता. एकनाथ जाऊन, पुजारीला भेटला. बोलता बोलता संपाचं सूतोवाच केलं. पुजारी मालकाशी बोलतो म्हणाला. 
 
महिना लोटला तरी मालकाकडून बोलावणं आलं नाही. कामगारांचा धीर सुटत चालला होता. एकनाथही त्यांना फार दिवस थोपवू शकणार नव्हता. युनिअनच्या मीटिंगमध्ये मालकाशी बोलायचं ठरलं. ह्यावेळी ते पुजारी थ्रू जाणार नव्हते. १०% पगारवाढ मागायची असं ठरलं. मालक एवढं देणार नाही हे एकनाथला माहित होतं. पण कामगारांनी ते ऐकून घेतलं नाही. २ दिवसांनी संप सुरु होऊन, मिलला टाळा लागला.
 
मालकाला ह्या सगळ्याची आगाऊ सूचना पुजारीनी दिली होती. कामगार पगारवाढ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे स्पष्ट होतं. बोलाचाली यशस्वी करून कमीत कमी पगारवाढ कशी देता येईल हे लक्ष होतं. मिलला टाळा लागून १० दिवस झाले होते. प्रोडक्शन पूर्ण थांबलं होतं. इथून पुढचा प्रवास तोट्याचा होता. एकनाथला बोलणी करायला बोलावलं. मालक, पुजारी, एकनाथ आणि काही युनिअनची माणसं सगळे समोरासमोर बसले. मालकाच्या वतीनं पुजारीच बोलत होता. “एकनाथ भाई, जरा कामगारांशी बोला”
“मालक महागाई फार वाढली आहे. पगारवाढ करणं गरजेचं आहे” एकनाथ मालकाकडे बघत म्हणाला.
“अरे इकॉनॉमी डाऊन आहे. कशी देणार पगारवाढ?”-पुजारी
“साहेब ओर्डरीवर ऑर्डरी मिळताहेत कपड्यांच्या. जेवढ्या ऑर्डरी तेवढंच आमचं रक्त जळतं”-एकनाथ
“तुमच्या मागण्या तर सांगा?”-मालक
“पगारवाढ….१०%”-एकनाथ
“१०%??????”-पुजारी. मालक चमकला. “एवढं नाही जमायचं. ३-४ जमेल”
“परवडत नाही साहेब”-एकनाथचा सहकारी.
मालक पुजारीच्या कानात काहीसं कुजबुजला.
“तुम्ही बोलून घ्या कामगारांशी.. वाटलं तर अनुभवानुसार १% जास्त देऊ.”
एकनाथला पटलं जाऊन कामगारांशी बोलायचं ठरलं. युनिअनच्या बैठकीत त्याने मालकाचा प्रस्ताव सांगितला. 
 
नव्या कामगारांना प्रस्ताव रुचला नाही. त्यांना फार वर्षांचा अनुभव नव्हता. त्यांच्या वाट्याला ३% च यायचे होते. अननुभवी कामगारांची संख्या जास्त असल्याने मालकाला खर्चही कमी येणार होता. मालकाने बरोबर खेळी खेळली होती. एकनाथने खूप समजावलं. “तू मालकाला जाऊन मिळाला आहेस. तुला वरून १% आणि खालून १०% मिळणार असतील” असं ऐकून घ्यावं लागलं. एकनाथचे न ऐकता, त्यांनी स्वतः मालकाला भेटायचं ठरवलं. ते गेले पण मालकाशी भांडून परत आले. बैठकीत बाचाबाची ही झाली. प्रकरण हातघाईवर येणार एवढ्यात एकनाथ मधे पडला.
 
संपाचा पेच वाढत चालला होता. मिल बंद होऊन १ महिना झाला होता. उधार-उसनवारीवर कामगारांच्या चुली तग धरून होत्या. कामगारांच्या संतापला वाचा फुटून मिलवर तुरळक दगडफेकही झाली होती. एकनाथला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याने युनिअनच्या बैठकीत “बोलणी करून, पगारवाढ स्वीकारू” म्हणून सांगितलं. सहकाऱ्यांचा विरोधी सूर पाहून त्याने पद सोडायचं ठरवलं.
 
२-३ दिवसांनी मालकाचं बोलावणं आलं. ह्यावेळेला एकनाथला एकट्यालाच बोलावलं होतं. ६% पगारवाढ देण्याची बोलणी झाली. एकनाथ खूष झाला. मालकाने पेढ्यांचा बॉक्स हातात ठेवला. कागदपत्रांवर सह्या झाल्या. बाहेर तिष्ठत उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना ही बातमी देण्यासाठी गेला. तेवढ्यात कुठूनसा आलेला एक मोठा दगड त्याच्या डोक्यावर आदळला. घाव वर्मी बसला होता. तो तिथेच कोसळला. समोर उभ्या असलेल्या त्या कामगारांच्या क्रुद्ध जमावाने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
एकनाथने मालकाशी हातमिळवणी केल्याची पुडी यशस्वीरीत्या सुटली होती. त्याचे पडसाद उमटले. एकनाथ मात्र हॉस्पिटलात पडून मृत्यूशी झुंज देत होता.
 
कामगारान्मधल्या असंतोषाचा फायदा घेत मालकाने, एकनाथला लक्ष बनवले आणि ४-५% पगारवाढ देऊन तात्पुरते शांत केले. पुजारीला मात्र भरघोस बोनस मिळाला होता.
 
***
 
एकनाथ गेल्यावर त्याच्या बायकोने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथचे ही कॉलेजचे शिक्षण संपले होते. त्याने शहरातच राहून नोकरी करण्याचे ठरवले. एकनाथ गेल्यावर, त्याच्या जागी विश्वनाथला मिलमध्ये नोकरी मिळणार होती पण तो तेंव्हा शिकत होता. शिक्षण अर्धवट टाकून नोकरी करण्यास आईचा नकार होता की मिलमध्ये नोकरी करण्यास?
 
आपल्या तल्लखपणामुळे विश्वनाथने लवकरच नोकरी मिळवली. तोही एका मिलमध्ये काम करत होता. मिल मालकाच्या, मुनिमाच्या ऑफिसमध्ये मदतनिसाचं काम. त्याने ते आईला सांगितलं नव्हतं. आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि वेगवान कामाने त्याने लवकरच मिल मालकाची मर्जी संपादन केली. कामातल्या खाचाखोचा समजून घेतल्या. मिलच्या राजकारणाचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं होतं.
 
पुढे मिलमध्ये कामगारांचा संप झाला. विश्वनाथला वडिलांची आठवण झाली. संपामुळे वातावरण तापलं होतं. राजकीय हस्तक्षेपाची चिन्हं दिसत होती. तसा तो झाला असता तर मिल मालकाला आर्थिक फटका बसणार होता. कामगारांच्या पिळवणुकीचं राजकीय भांडवल झालं असतं. मिल मालक आणि मुनीम कामगारांशी बोलणी करत होते. दोनदा झालेली बोलणी फिसकटली होती. मुनीम चिवट होता. त्याला त्याचे खिसे भरण्यात जास्त रस होता.
 
संप होऊन १५-२० दिवस लोटले. एक दिवस कामगारांच्या रागाचं पर्यावसन जाळपोळ आणि दगडफेकीत झालं. मुनिमाच्या ऑफिसवरही दगडफेक झाली. त्यात किरकोळ नुकसान सोडलं तर फार काही झालं नाही. ऑफिसच्या दरवाजावरील पाटीला कामगारांनी काळ फासलं. विश्वनाथ ती पाटी रंगवण्यासाठी पेंटरकडे घेऊन गेला.
 
मिलचा कामगार नेता तरुण होता. सळसळतं रक्त होतं. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तो मागे हटणार नव्हता. विश्वनाथची त्याच्याशी चांगली दोस्ती होती. मुनिमाशी बोलून काहीही होणार नव्हतं. विश्वनाथने तडक मिल मालकाशी बोलायचं ठरवलं. कामगारांचा संप मोडून काढण्याची गरज होती. ती कामगारांची गरज होती आणि मिल मालकाचीही. विश्वनाथ विजेच्या गतीने काम करत होता.
 
४-५ दिवसांनी मुनिमाचा राहत्या घरात खून झाल्याची बातमी आली. कामगारांशी हातमिळवणी केल्याबद्दल मिल मालकाने त्याचा काटा काढल्याची चर्चा सगळीकडे पसरली होती. पण ह्या खुनाचं बालंट कामगारांवर येणार होतं. निम्मं काम झालं होतं.
 
मिल मालकाला बरोबर घेऊन विश्वनाथने कामगारांशी बोलणी केली. सुवर्णमध्य गाठला. संप संपला. विश्वनाथ आता मिलचा नवा मुनीम झाला होता. मुनिमाच्या ऑफिसच्या दारावरची पाटी आधीच रंगवायला गेली होती. काय नाव घालायचं हे विश्वनाथने आधीच सांगितलं होतं. “श्री. विश्वनाथ ए. वेसणे -मुनीम”. पेंटरच्या दुकानात पाटीवर नाव घातलं जात होतं. आधीचं “श्री. गंगाधर पुजारी -मुनीम” हे नाव कधीच पुसलं गेलं होतं. पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी होती. वडिलांसारखं कपाळाला गंध लावून विश्वनाथ वारीला जाणार होता.

भिंग

भिंग  -संपदा म्हाळगी-आडकर १/१६/१०
 
रविवार, सुट्टीचा दिवस. सकाळी सगळं स्लो घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मस्त वाफाळलेला चहा आणि सिगारेट घेऊन तो खिडकीपाशी बसला होता. मुझिक सिस्टीमवर संजीव अभ्यंकरांचा मंत्रमुग्ध करणारा भटियार चालू होता. चहाची वाफ आणि सिगारेटची धुम्रवलये ह्यांची कुस्ती बघण्यात तो गुंग होता. मधेच संजीवच्या  गायकीला दाद देत होता. शेवटी चहा संपला आणि सिगारेटचा विजय झाला. तसा तो व्हायचाच होता. कारण एक संपली तर दुसरी पेटवायला त्याला मनाई करणारं कोणी नव्हतं. खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाल्याने पेपर वाचवा आणि क्रॉसवर्ड मध्ये जाऊन यावं असं त्याने ठरवलं होतं. नवीन पिक्चरचा मुहूर्त होऊन, तो २ आठवड्यात फ्लोअरवर जाणार होता. ह्या दोन आठवड्यात खूप काम असणार होतं. त्या येणाऱ्या कामासाठी तो स्वतःला फ्लशआउट करत होता. स्टान्स घेत होता.  
 
दरवाजाची बेल वाजली. नोकराने दरवाजा उघडला. त्याने हसत गौतमचं स्वागत केलं.  गौतम सोफ्यावर बसला, “मला माझी सीडी हवीय” म्हणाला.
“कोणती सीडी?” -तो
“शशी साल्या, बैजू बावरा. तुला देऊन २ महिने झाले. बायकोने निक्षून सांगितलं होतं तुला देऊ नको म्हणून; तरी मी दिली.”
“बैजू बावरा?? बघायला लागेल”
“अरे कालपासून तिला ऐकायची होती. मी काहीबाही कारणं देऊन टाळतोय.. तिला कळलं तर आकाशपाताळ एक करेल रे..”
“बघतोsssssss”
ती सीडी ऐकून त्याला नक्कीच बरेच दिवस झाले होते, आता ती कोणत्या ढिगाऱ्याखाली असेल हे त्याला सांगता येणार नव्हतं. सीडीच्या कपाटाचा एक एक कप्पा रिकामा करून, सगळ्या सीडीज मधोमध, जमिनीवरच तो ठाण मांडून बसला. गौतमने डोक्याला हात मारला. आता २ तासांची निश्चिंती होती. बायकोला फोन करून तासाभरात येतो असं सांगून तो सोफ्यावरच मांडी घालून बसला. समोरच्या बुककेसमधून त्याने एक पुस्तक आधीच काढलं होतं. नोकराने गौतमसाठी चहाही आणला होता.
 
गौतमशी बोलता बोलता, सीडी, कॅसेट्स चाळताना, मधूनच एखादी सीडी लावून पाहण्याचा मोह त्याला होत होता. पण संजीवचा राग फारच रंगत आला होता. त्याला आवडणारा त्रिताल चालू होता. गौतमही घाई करत होता. त्याला बायकोबरोबर लंचला जायचं होतं. शेवटी एकदाची गौतमची सीडी सापडली. ती नेताना, गौतम भटियारची सीडी आणि अर्धवट वाचलेलं पुस्तकही घेऊन गेला. २ महिन्यांचा करमणूक कर!
 
क्रॉसवर्डमध्ये जाऊन नवीन पुस्तक घेऊन येण्याचा प्लान, गौतमच्या येण्याने धुळीला मिळाला होता. आता ह्या सीडीज तरी आवराव्या म्हणून तो कामाला लागला. मधेच नोकराला आवाज देऊन, दुपारी जेवायला घरीच असल्याचा सांगितलं. तो परत त्या सीडी सागरात बुडून गेला. भटियार गौतमने नेल्याने, रिकामी जागा भरण्यासाठी तो काहीतरी शोधात होता. मनासारखं, त्याहीपेक्षा मूडसारखं काही सापडत नव्हतं. एवढ्यात जुन्या कॅसेटच्या ढिगाऱ्यात एक “विसरशील खास मला” लिहिलेली कॅसेट नजरेस पडली. अक्षर ओळखीचं होतं. तिचं होतं. सिनेमाची रिळे फिरून फिल्म उलगडावी तश्या स्मृती उलगडू लागल्या. “स्मृती” च्या स्मृती उलगडू लागल्या. दिग्दर्शक म्हणून मानाने मिरवणारा स्वतःचा जीवनपट डोळ्यासमोर पाहून गोंधळून गेला. त्यातला त्याला काहीही एडीट करता येणार नव्हतं.. दुर्दैवाने.
 
 ***
 
चित्रकलेच्या वेडापायी त्याने जेजे मध्ये प्रवेश घेतला. तिथे असताना प्रो. दयालांनी तयार केलेल्या स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचा तो अविभाज्य भाग होता. हा ग्रुप प्रो. दयालांच्या आर्ट क्लास मध्ये जमायचा.  ग्रुप दर महिन्याला एक नवं challenge स्वीकारत असे. वेगवेगळे प्रवाह निवडून, विचारांची अभिव्यक्ती करायला शिकवणं हा त्या मागचा उद्देश होता. ह्या ग्रुपने त्याला पुरतं झपाटलं होतं.
 
शेवटचं वर्ष होतं. “हे challenge पार केलंत तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल”, प्रो. दयालांनी सांगितलं. Challenge च्या दिवशी प्रो. दयाल आले पण एकटे नाहीत. ती त्यांच्या बरोबर होती. सुंदर होती. रंगकर्मी विद्यार्थ्यांची उत्कंठामिश्रित भीती शिगेला पोहोचली. “आज तुम्हाला न्यूड पेंटिंग करायचं आहे” असं अनाउन्स केलं. पण एक अट होती, “सबजेक्ट शरीराने न्यूड असेल पण मन कव्हर्ड आहे. त्या मनाचे रंग दिसू द्या. तिच्या अंत:रंगाचे रंग दिसू द्या.” कॅनवास, पेन्सिल्स, रंग बाहेर आले. विद्यार्थी कामाला लागले. “अंतरंगाचे रंग कसे दाखवायचे?” मोठं challenge होतं.
ती कपडे उतरवून समोर बसली. तिला त्याचा सराव असावा. ती सुंदर होती. तिचा गव्हाळ सोनेरी रंग, पठडीतल्या सुंदरतेच्या परीमाणांना छेद देणारा. कमरेपर्यंत रुळणारे लांबसडक रेशमी केस. कमनीय शरीरात सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली. आखीव चेहऱ्याला किंचित न शोभणारी भेदक नजर… डायरेक्ट काळजाला हात घालणारी. ह्या सौंदर्याच्या पार कसं पाहायचं.. सगळ्यांना प्रश्न पडला होता…त्यालाही पडला. हातात पेन्सिल घेऊन तो कागदावर रेघोट्या ओढू लागला.
 
 ***
 
जेजे मधून पास झाल्यावर त्याने NSD मध्ये प्रवेश केला. सर्जनशीलतेमधले सगळे प्रयोग करून पहायचं त्याने ठरवलं होतं. त्यात जे सगळ्यात जास्त आवडेल, त्याचा व्यवसाय करायचं त्याने ठरवलं होतं. पेंटींग्ज विकून पैसेही मिळत होते त्याने फी भरली जात होती. NSD त खूप मित्र मिळाले. मैत्रिणीही.. ती परत भेटली.. त्याला सिनिअर होती.. NSD त फेमस होती हुशार आणि तीक्ष्ण म्हणून. त्याने तिला ओळखलं.. तिला जेजे मध्ये न्यूड केल्याची आठवण केली. 
“न्यूड करायला कशी तयार झालीस?” असं विचारल्यावर म्हणाली,
“मी अभिनयाचं शिक्षण घेतेय. पहिल्याच वर्गात आम्हाला शिकवलं होतं की ‘Don’t be afraid of your body’, म्हणून केलं. आणि फुकट नाही काही, प्रो. दयालांनी मला मोबदला दिला. एक सुंदर पेंटिंग!… पण तुझं काय झालं? तू झालास का पास?”
“हं”
त्यांची मैत्री घट्ट होती.. नजरेत भरण्याइतकी. तो दिग्दर्शनात होता, ती अभिनयात. दोघा एकमेकांना सर्वार्थी पूरक होते..
 
ती त्याच्याआधी पासआउट झाली.. काम शोधत होती. वेगवेगळ्या निर्मात्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. तो तिला समजावयाचा, तू कोणाकडे जाऊ नकोस.. माझ्या चित्रपटात काम कर.
त्याच्या डोक्यात कथा होती.. पटकथा पण लिहून संपत आली होती. त्याला parallel सिनेमा बनवायचा होता. तो निर्माते आणि प्रयोजाकांकडे चकरा मारत होता. एक निर्माता तयार झाला, सगळं फाईनल झालं. शोषितांच्या बंडावर चित्रपट निघणार होता “विषम” नावाचा. ती मुख्य अभिनेत्री होती. ती खूष होती… अभिनय करायला मिळणार म्हणून.
कास्टिंग झालं, मुहूर्त झाला, प्री-प्रोडक्शन मार्केटिंगसाठी फोटो-शूट चालू होतं. पुर्णांग झाकणारी साडी नेसूनही ती मादक कशी दिसेल ह्याची काळजी निर्मात्यांनी घेतली. ती खूष होती. त्याला ते पटत नव्हतं. त्याच्या चित्रपटात ते महत्वाचं नव्हतं. त्याच्या कथेची ती गरज नव्हती. त्याने विरोध केला. निर्मात्याला नवशिक्या दिग्दर्शकावर विश्वास नव्हताच. असंच चाललं तर पिक्चर चालण्याची खात्री कमीच होती. कथा, पटकथेचा मोबदला देऊन निर्मात्याने त्याची बोळवण केली.
 
ती पण सगळं सोडून येईल, त्याच्यासाठी तरी तसं करेल असं वाटलं. पण तिने नकार दिला. तिला ब्रेक हवा होता आणि तो मिळाला होता. महत्वाकांक्षा मैत्रीपुढे मोठी झाली होती.. प्रेमापुढे मोठी झाली होती… नंतर पिक्चर हिट झाल्याची बातमी आली पण आधी तो कोसळला होता.
 
 ***
 

त्याला सगळं आठवलं. ती कॅसेट तिची होती. तिने ध्वनीमुद्रित केलेली. तिची आवडती गाणी होती त्यात. “विसरशील खास मला” पण होत त्यात. पण तो तिला विसरला नव्हताच. सिनेमाचं रीळ जसं उलगडतं पण गुंता होऊ नये म्हणून लगेच फिल्म दुसऱ्या रिळाला गुंडाळतात, तसं त्याने ती कॅसेट तळाशी ठेऊन सगळ्या सीडीज कप्प्यात कोंबल्या… परत वेळ काढून आवरायचं ठरवलं. उठून सिगारेट शिलगावली.

***

त्याचा “सबकुछ बिकाऊ है” नावाचा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्याने घरी आज मेजवानी आयोजित केली होती. ह्या निर्मात्याने त्याच्या बरोबर काम करायची एक संधी दवडली होती. “सबकुछ बिकाऊ है”  च्या निमित्ताने ते पहिल्यांदाच एकत्र आले होते. पण हा चित्रपट शेवटचा असू नये म्हणून निर्माता प्रयत्न करत होता. कसाही असला तरी शशी दर्जेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक होता.
तो फार पार्ट्यांना जात नाही हे निर्मात्याला माहित होतं म्हणून फक्त जवळच्या आणि चित्रपटाशी निगडीत लोकांना निर्मात्याने बोलावलं होतं.
 
निर्मात्याने जातीने फिरून त्याला सगळं घर दाखवलं. घर मोठं अलिशान होतं… उंची फर्नीचर आणि अप्रतिम कलाकृतींनी टेस्टफुली सजवलं होतं. निर्मात्याने आपल्या पेंटींग्जचं कलेक्शन दाखवलं. एक पेंटिंग पाहताना तो बुचकळ्यात पडला. “हे कुठून आलं?”
“माझ्या एका मैत्रिणीचं आहे, स्मृती दर्शनचं. तिने गिफ्ट दिलंय, मी तिला ब्रेक दिला म्हणून”, निर्माता म्हणाला.
त्याला शब्द सुचेनात.. ते त्याचं होतं. पण स्वाक्षरी त्याची नव्हती… त्याचं पेंटिंग… स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचं.. न्यूड पेंटिंग.. ‘एक भिंग’ नावाचं… सुंदर कमनिय शरीरातून आरपार पाहणारं भिंग. बाह्य सौंदर्याच्या अंत:रंगातला दाहक अंगार दाखवणारं भिंग. त्याने साहलेला अंगार दाखवणारं भिंग… त्याच्या कॅमेऱ्याला ही नसलेलं… भिंग!