Archive for ऑक्टोबर, 2010

बिट्टी

बिट्टी -संपदा म्हाळगी-आडकर १०/११/१०
माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे.
लहानपणी काही विचार आणि मनोभावना ह्यांची सांगड, आपण आपल्याला पटेल त्या पद्धतीने घालतो. आणि तेच खरे/बरोबर मानून पुढे जात असतो, आपले भाव-विश्व त्याभोवती गुंफत असतो. “Back-of-the-mind” कुठेतरी माहितही असतं कि ‘हे सगळं खोटं आहे’. पण पटत नाही. ते सगळं हार्मलेस असतं, निरागस असतं. त्यातलीच हि एक बिट्टी!
बिट्टी, मधलं बोट (middle finger) चाफेकळी (index finger) वर आणून धरलेली बिट्टी! लहानपणी कितीवेळा धरली असेल बिट्टी.. सांगता येणं कठीण आहे. कोणकोणत्या कारणांनी धरली ह्याची यादी पण फार मोठी आहे…. कधी मित्र-मैत्रिणीने काहीतरी वाईट गोष्टीला (चुकून/उमजून) स्पर्श केला म्हणून,… कधी मैनेची जोडी दिसली म्हणून तर कधी मेलचा डब्बा दिसला म्हणून..
शाळेतून घरी जाताना, चुकून मैत्रिणीचा पाय घाणीत पडला तर “ईई… लीना आता तुझी बिट्टी!” हे वाक्य आपोआप तोंडावर यायचं! मग घरी जाईपर्यंत आमचं बोटावर बोट तसंच. ‘जिची बिट्टी धरलीय’ त्या मैत्रिणीने अधून-मधून बोटं तपासून पहायची, बिट्टी आहे कि नाही. समजा बोटं दुखायला लागलीच, तर मैत्रिणीला दाखवून दुसऱ्या हाताची बिट्टी आधी धरायची आणि मग आधीची सोडायची. एवढा आटापिटा कश्यासाठी? Hygiene बद्दल आम्हाला खूप ज्ञान होतं अश्यातली गत नाही.
मैनेची जोडी दिसणं.. आणि बिट्टी धरणं, हि एक फार मजेशीर गोष्ट आहे…त्याविषयी एक चारोळी हि आहे जी मला माझ्या कॉलेज जीवनात (ऑफ-कोर्स मैत्रिणींकडून) समजली….
One for sad,
Two for Joy,
Three for letter
Four for Boy!
म्हणजे तुम्हाला १ मैना दिसली म्हणजे काहीतरी वाईट होणार.. (तसा काही वाईट झाल्याचं स्मरणात नाही..), मैनेची जोडी दिसली तर आनंद होईल. ३ मैना एकत्र दिसल्या तर तुम्हाला (hopefully गुलाबी) पत्र येईल. हो! कारण पूर्वीच्या काळी रिझल्ट पोस्टाने यायचा. म्हणजे “निकाल” काय लागला ह्याचं प्रेमपत्र यायचं. आमच्या शाळेत नापास विद्यार्थिनींना पत्र यायची म्हणे. आणि शेवटी ४ मैना दिसल्या कि मुलगा (तो पण hopefully सपनोंका राजकुमार) भेटेल. असा ह्या कवितेचा अर्थ आहे. तर अशा ह्या मैना दिसल्या कि हाताची बिट्टी धरायची. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे एका ओळीची एक बिट्टी. म्हणजे मैनांचा थवा दिसला तर बिट्ट्याच बिट्ट्या!
तशीच गोष्ट मेलच्या डब्ब्याची, मेलचा डब्बा म्हणजे मेल/पोस्ट/पत्र नेणारी गाडी! भारतात ह्या गाड्या गडद लाल रंगाच्या असल्याने कुठूनही चटकन नजरेत भरतात. अशी हि गाडी दिसली कि नजरेबरोबर आमची बोटही वळायची! हा मेलचा डब्बा ‘गुडलक चार्म’ मनाला जायचा. एका डब्यासाठी एक बिट्टी! पोस्त ऑफीसाजवळून जाताना पंचाईत व्हायची. विश्रामबाग वाड्यापाशी, सिटीपोस्टापाशी किंवा कॅम्पात पोस्टऑफिसजवळ खूप मेलगाड्या दिसायच्या.. आता स्कुटी चालवताना बिट्ट्या कश्या धरायच्या? आहे कि नाही यक्ष प्रश्न!
मला आठवतंय, आम्ही एकदा कॅम्पातून पास होताना, जवळ जवळ २०-२५ मेलचे डब्बे पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले. मागे बसलेल्या मैत्रिणीला विचारलं, “अग पाहिलेस का केवढे मेलचे डब्बे आहेत?” तर ती म्हणाली, “हाताची बोटं संपली आता पायाच्या बोटांच्या बिट्ट्या धरल्या आहेत!”. 🙂 तेंव्हाही आम्ही पोट धरून हसलो होतो.
आता बिट्ट्या तर धरल्या पण त्या सोडायच्या कश्या? तर त्या सोडायच्या ४ पायांचा प्राणी पाहून…. म्हणजे शाळेतून घरी जाताना काही कारणांनी बिट्टी धरली कि घरी जाईपर्यंत कुत्रा, मांजरासारखे प्राणी शोधात फिरायचा… कधी कधी तर “अग त्या रस्तावर कुत्रं नक्की असतं…” असं म्हणून वाट वाकडी करून, बिट्ट्या सोडायला जायचं. आणि अगदी नाहीच सुटली बिट्टी घरी जाईपर्यंत आणि बोटं दुखायला लागली कि कोणत्यातरी माणसाकडे पाहून बिट्टी सोडायची (म्हणजे त्या माणसाला चार पायाचा प्राणी मानून…)
बिट्टीचे असे निरागस खेळ चालायचे… तशीच गोष्ट जॉलीची! पण ती परत कुठल्याश्या पोस्टमध्ये!
Advertisements

प्रेमाची उतरंड

प्रेमाची उतरंड -संपदा म्हाळगी-आडकर १०/८/१०
 
माणूस प्रेम करतो. कोणावर करतो? स्वत:वर… आजूबाजूच्या व्यक्तिंवर (आई वडील, जिवलग.. इ.) …. पाळीव प्राण्यांवर… घरावर… घरातल्या वस्तूंवर… टीव्हीवर.. इतकंच काय टीव्हीतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांवर सुद्धा! कोणी म्हणेल देशावर.. देशबांधवांवर… मातृभूमीवर.. चला एकवेळ मान्य करू.  पण ह्या प्रेमाची उतरंड कोणी कशी रचलीय? बहुतेक वेळा वर नमूद केलेले प्रेमाचे प्रकार एकावर एक ठेवलेले असतात. म्हणजे सगळ्यात खाली स्वत: वरचं प्रेम, मग त्यावर आजूबाजूच्या व्यक्तिंवरचं…. प्राण्यांवरचं… सो ऑन. (टीप: स्वत:वरचं प्रेम गौण समजून बाकीच्या प्रेमाला प्राधान्य देणं अशातला ह्या उतरंडीचा अर्थ लावू नका. पुढे वाचा!)
उतरंडीत सगळ्यात खाली असलेला घडा सगळ्या वरच्या घड्यांचा भार सहन करत असतो. (लग्नात मुली पूजतात तो गौरीहर imagine करा) ‘आपण बाकी प्रेमांपुढे आपलं स्वत:वरचं प्रेम दाबून टाकतो’ अश्यातलं काही नाही. खरं पाहता तो खालचा घडा सगळ्यात सेफ(सुरक्षित) असतो. उतरंडीला धक्का लागला तर सगळ्यात आधी वरचे घडे खाली येतात… सर्वात उंचावरून खाली आढळतात आणि फुटतात. म्हणजे देशप्रेम… राष्ट्रप्रेम… सगळ्याचा फुटून चक्काचूर सगळ्यांत पहिल्यादा होतो.
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असं राम सांगून गेला, पण उपयोग काय? रामच्या नावावर आज राजकारण झालं. आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर “रामराज्य” आणायचं सोडून, नेत्यांनी राज्य केलं… धर्माचं राजकारण केलं.. स्वत: स्वर्गसुख उपभोगलं पण लोकांना देशोधडीला लावलं. स्वहित लोकहिताच्या पुढे ठेवलं. मग त्यांचा स्वप्रेमाचा घडा सगळ्यात मोठा नाही का? अयोध्या प्रश्नी निकाल लागला पण राजकारण संपलं नाही. आता तिथे मंदिर/ मशीद बांधेपर्यंत किंवा बांधून झाल्यावरही हे भिजतं घोंगड तसंच राहील. हे काय करून गेला राम? लोकोद्धारासाठी अयोध्येमध्ये जन्म घेऊन, सोन्याची लंका नको म्हणणारा, स्वहितापुढे जनहित, देशप्रेम ठेवणारा रामसुद्धा मनुष्ययोनीच्या भोगांपासून सुटला नाही. रामाचं सोडा तो देवपण असलेला मनुष्य होता. आपलं काय?
देशावर हल्ले झाले. युद्धं झाली. सैनिक-लोकं मारली गेली. संसार उधवस्त झाले. ‘मनांवर कायमची खूण राहिली’ ह्या सगळ्या म्हणायच्या सांगायच्या गोष्टी! हल्ल्यांनी direct affect झालेली जनता सोडता, सर्व हल्ले/युद्धं विस्मरणात जातात. जवानांच्या शवपेट्यांचे गैर-व्यवहार होतात. gas एजन्सी आणि पेट्रोल पंपांसाठी राजकारण होतं. मिडियाचं सगळयात महत्वाचं काम प्रबोधनाचं!  पण तिथेही हल्ल्यांचा उपयोग कव्हरेज दाखवण्यासाठी होतो. channel ची TRP वाढवण्यासाठी होतो. टीव्ही अवार्ड्स मिळवण्यासाठी होतो.
‘बिग बॉस’ सारखे कार्यक्रम पाकिस्तानच्या लोकांना घेऊन येतात. पाकिस्तानी सर्वसामान्य लोकांबद्दल मला आकस नाही पण प्रेमही नाही. त्यांच्या देशाकडून आपल्याला एवढा धोका असताना, का आणायचं त्यांना इकडे? आणि मग हल्ला झाला कि घाई गडबडीने त्यांना परत पाठवून द्यायचं! मग त्याचा मोठा गाजावाजा करायचा! जेवढा मोठा गाजावाजा तेवढी TRP! आणि TRP वाढवतं कोण? आपल्यासारखे छाती ठोकून देशप्रेम सांगणारे लोक! हे सगळं कशाला? मनोरंजन आपल्या जागी, देशप्रेम आपल्या जागी नको का? “controversy/ negative publicity ने TRP वाढवणे”, हा सगळयात सोपा मार्ग नव्या मिडियाने का अवलंबला आहे? मग नाही का आपल्या (मिडियातले लोक आणि आपण प्रेक्षक) स्वप्रेमाचा घडा सगळयात मोठा आणि देशप्रेमाचा सगळयात लहान?
सीमेवर जाऊन लढण्याची ताकद आपल्यात नाही, तर सामाजिक लढे चालवू असंही नाही. सगळीकडेच शेपूटघाले आपण! पण नको बघूया ‘बिग बॉस’, घालू बहिष्कार! बघू जमतंय का? ठाकरे म्हणताहेत म्हणून नाही करायचं, एकदा स्वत:ला वाटतंय म्हणून तरी करूयात. चेंज हवा असेल तर तो initiate करायची तयारी (आणि जवाबदारी) पण नको का? प्रेमाची उतरंड आपलीच, मग ती आपणच बदलू का नाही शकत? घेऊया राष्ट्रप्रेमाचा घडा सगळयात खाली, ठेऊया त्याला सगळयात सेफ!

IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads

IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads -संपदा म्हाळगी-आडकर १०/६/१०
 
 
हि माझी नवी आवडती सीरिअल. अमेरिकेत Ice Road Truckers हि सीरिअल बऱ्यापैकी हिट आहे. अमेरिकेतील हिमाच्छादित व दुर्गम अश्या भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम हे Ice Road Truckers म्हणजेच ट्रकचालक करतात. बर्फाळ प्रदेशातून जाताना, दुर्गमता, प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते ह्या सर्वांचा सामना करत आपलं काम चोख पार करत ते इतर ट्रकचालकांना मदत करतात. यंत्रांचं पुढारलेपण घेऊन, निसर्गावर मात करत ते पुढे जातात. पण काही दुर्दैवी चालक काळावर मात करू शकत नाहीत. दुर्गम ठिकाणी इंधन संपल्याने मदतीची वाट पाहत, तिष्ठत बसण्याची अथवा एका चुकीच्या वळणाने बर्फाखाली जलसमाधी मिळाल्याची वेळ काही ट्रक चालकांवर येते.
 
ह्या सीरिअलचा नवा अविष्कार म्हणजे IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads. हि सीरिअल आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे हे Deadliest Roads हिमालयातील आहेत. अमेरिकेतून आलेले ३ अनुभवी ट्रकचालक हिमालयाच्या बर्फाच्छादित राशींतून वाट काढत पुढे जाणार आहेत. परक्या देशात, अनोळखी लोकांमध्ये, अनोळखी रस्त्यांवर मार्गक्रमण करताना त्यांचे अनुभव कॅमेरात टिपले जाणार आहेत. ह्या ३ ट्रकचालकांमध्ये लिसा हि एक स्त्री चालक आहे. उरलेले दोघे रिक व अलेक्स हे मुरलेले चालक आहेत. मुरलेले असूनही त्यांना भारतातील रस्त्यांवर येणारे अनुभव वेगळे व लक्षणीय असतील ह्यात वाद नाही. ह्या ट्रक चालकांना ३ क्लीनर्स सोबत दिले आहेत.
असह्य उकाडा (ट्रकमध्ये A.C. नाही हे वेगळे सांगायला नको), रस्त्यावरील गर्दी, दुचाक्यांचे प्रमाण, बेभान वाहतूक, गाय-बैलांसारखे सोबती, चिंचोळे रस्ते, चढते घाट, लेन-ड्राईविंगची सवय ह्या सर्वांमध्ये अमेरिकी ट्राफिक सेन्स किती काळ टिकतो, हे पाहायला नक्की आवडेल. पहिला भाग पाहता, दिल्लीतून निघताना लिसाला मिळालेले un-divided attention, “स्त्री ट्रक चालक” (सुज्ञांनी “गोरी चमडी” असे वाचावे.) आकर्षण जग-जाहीर करून गेले. तिला स्त्री म्हणून येणारे अनुभव पाहण्याची उत्सुकता नक्कीच आहे. छोट्या वाहन चालकांचे वाहन कौशल्य (गाड्या घुसवणे, घाटामध्ये हेड-ऑन कोलीजन टाळण्याचे तंत्र) पाहून रिकने उघडलेली आपली शिवराळ इंग्रजीची थैली, ब्लीपच्या स्वरुपात प्रेक्षकांचे मनोरंजन करते. (माझा प्रश्न हा कि, “हे गोरे टीव्हीवाले (हा वर्णभेदाचा पुरस्कार नव्हे, सोयीस्कर म्हणून वापरलेला शब्द) इंग्रजी शिव्या ब्लीप करू शकतील पण क्लीनर्स/स्पॉटर्सन्नी दिलेल्या इरसाल हिंदी शिव्यांचं काय?”, त्या शिव्यांचं काय होतं हे मला पाहायचं आहे.) ह्या ट्रक चालकांनी आत्तापर्यंत दिल्लीपासून सिमल्यापर्यंत प्रवास पूर्ण केला आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगा, उंच कडे, खोल शब्द तोकडा पडेल इतक्या खोल दऱ्या, वळणदार रस्ते हे सर्व वर्णन करण्यासाठी पारणं फिटणे, नेत्रदीपक, नयनरम्य वगैरे शद्ब कमीच! पहिला भाग पाहून मनोरंजन झाले हे खरं असलं तरी मनात कुठेतरी भारतीय ट्रकचालाकांबद्दल आदर वाढला. दारू पिऊन ट्रक (for that matter कोणतेही वाहन) चालाविनारयांसाठी हा आदर मुळीच नाही. तो आहे, पोटाला २ वेळेचं मिळण्यासाठी, हाताला रोजगार म्हणून, जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांसाठी! सोनाराने कान टोचावे लागतात अशी म्हण आहे.. ह्यावेळी सोनार गोरा होता!