Archive for मे, 2010

अंतर्धान (भाग ३)

अंतर्धान (भाग ३) -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०
 
भाग १
भाग २
भाग ३

कोपऱ्यातील खुर्चीत अभ्यासाचं पुस्तक वाचत बसलेला रोहित, उठून सुहासपाशी आला.
“मामा, तुला काही खायचंय का?”
“नाही, नको,…..  तुला भूक लागलीय का?”
“हो, थोडी!”
“बर मग तू खाऊन येतोस का?”
“तू पण ये ना, मला एकट्याला खायची सवय नाही रे! म्हणजे एकट्याने खाल्लं तरी वाढायला माआजी असायची”, सुहाला आईचं नाव ऐकून कससंच झालं.
“बर चल! नर्सला सांगून जाऊयात.”

हॉस्पिटलच्या उपहारगृहात दोघं समोरासमोर बसली.
“रोहित, तू काय घेणार?”
“मी साधा डोसा”. वेटरला बोलावून सुहासने साधा डोश्याची ऑर्डर दिली.
“मामा आणि तुला काही?”
“नको”
“अरे घे! खूप वेळ काही खाल्लं नाही तर आम्लपित्त होतं असं माआजी म्हणते”, आईचं नाव ऐकून सुहासला परत अस्वस्थ वाटलं. पण त्याने वेटरला बोलावून स्वत:साठी खायला ऑर्डर केलं. 

 
तुला माहितेय मामा, “माआजी तुझी खूप आठवण काढते. मला तर ती सुहाच म्हणायची. सुरवातीला मला कळायचं नाही. हळूहळू समजलं, आता मी ‘सुह्या’ म्हणलं तरी ओ देतो आणि ‘रोह्या’ म्हणलं तरी”, असं म्हणून रोहित प्रसन्न हसला. रोहितला सुहास फार ओळखत नव्हता. कर्तव्यापुरतं आईला भेटायला गेल्यावर, रोहितची अधूनमधून गाठ पडे. पण रोहितच्या हास्यातली ती प्रसन्नता सुहासच्या ओळखीची होती… ती आईसारखी होती.
 
“माझे सगळे लाड करते ती! आणि कसली जातीची सुगरण रे…. किती वेगवेगळे लाडू, चिवडे, अनारसे.. आणि तिच्या उकडीच्या मोदकांना काही तोडच नाही बघ. रोज मला धारोष्ण दुध तापवलं कि त्यावरची साय साखर घालून द्यायची. तुला पण आवडते ना रे खूप? मला सांगायची ती. म्हणायची, आमच्या सुहाला हे फार आवडतं, पण त्याला कसं देणार?”
“हं”
“माझ्यामध्ये ती तुलाच पहायची बहुतेक!” रोहितचं हे वाक्य ऐकून, इतका वेळ दूर कुठेतरी टक लावून पाहत असलेल्या सुहासने चटकन समोर पाहिलं. रोहित १७-१८ वर्षांचा पण ‘एवढं शहाणपण कुठून आलं ह्याच्यात? अंगभूत आहे? की परिस्थितीमुळे आलेलं कि आईच्या सहवासाने…’
“हो.. तुझा राहून गेलेला सहवास माआजी माझ्यामध्ये मिळवत होती बहुतेक. तू जेंव्हा मामापाशी होतास तेंव्हा वेडीपिशी झाल्यासारखी वागायची म्हणे. शेजारी म्हणायचे, ‘सुहाच्या राहून गेलेल्या सहवासात तिचा जगणंच राहून गेलंय!'”, रोहितचं बोलणं ऐकून सुहासचा बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडू लागला.
“मामा, रडू नकोस मामा, काही होणार नाही तिला! माआजी बरी होईल, लवकरच!”, रोहितही रडू लागला.
“मी कधी ओळखूच शकलो नाही रे तिला! आणि.. तू…” सुहासला पुढे काही बोलताच येईना… रोहित येऊन त्याच्या शेजारी बसला.
 
वेटरने पदार्थ आणून टेबलावर ठेवले. क्षणभर दोघांकडे बघून तो निघून गेला. हॉस्पिटलच्या उपहारगृहात असे प्रसंग त्याने अनेकदा पहिले होते.
सुहासने स्वत:ला सावरलं. त्याने रोहितला धीर दिला. “रोहितच्या रूपाने जवळचं कोणीतरी आहे” ह्याचा त्याला भास झाला. कधी न जाणवलेली ममतेची भावना त्याच्या मनात घर करून गेली.
 
नर्सने सुहासला बोलावून आई निवर्तल्याचं सांगितलं. सुहास येऊन, रोहित शेजारच्या खुर्चीत बसला. गेले २ दिवस आई कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. पण एक आशा होती, ती बरी होईल. आता ती आशा ही संपली होती. हळूहळू गवसायला लागलेलं, एका वादळासकट भर्रकन दूर उडून गेल्यासारखं वाटलं.
“मामा काय झालं?”
“गेली.. गेली ती.. माझी आई, तुझी माआजी गेली रोह्या!”, सुहास स्फुंदत होता.
“पण ती तर बरी होणार होती. डॉक्टर म्हणाले होते, ‘ती बरी होईल म्हणून'”
“नाही रे बाळा, ती नाही थांबली, आपल्याला एकट सोडून गेली ती!”, सुहास त्याला समजावत होता. रोहित अविश्वासाने रडू लागला. रडणाऱ्या रोहितला सुहासने आपल्या कुशीत घेतलं, क्षणभर विचार केला, ‘आपण एकटे कसे? दोघं आहोत की एकमेकांना.’ ती माउली अंतर्धान पावली होती… ममतेचं दान सुहासच्या पदरात टाकून!

(समाप्त)

Advertisements

अंतर्धान (भाग २)

अंतर्धान (भाग २) -संपदा म्हाळगी-आडकर ५/२८/१०
 
भाग १
भाग २
भाग ३
“सुहा, ए सुहा”, आई लंगडत लंगडत परसात आली. सुहा परसात लगोरी खेळत होता.
आई नक्की काहीतरी काम सांगणार असं गृहीत धरून जीवावर आल्यासारखं सुहा म्हणाला, “कायsss ग?”
“एक काम करशील माझं?”
“आता नाही, मी खेळतोय.”, सुहा निरुत्साही पणे म्हणाला.
“अरे वैद्यांकडे जाऊन औषध आणायचं होतं. पाय फार सुजायला लागलाय रे!”, विहिरीपासल्या निसरड्यावरून ती पाय घसरून पडली होती.
सुह्याने दुर्लक्षील्याने, थोडा वेळ आई तशीच उभी होती. “सुहा ऐकतोस ना?”
“काय???”
“माझं औषध आणतोयेस ना?”
“सोपानला का सांगत नाहीस? तो आणेल की!”, सुहा तक्रारीच्या सुरात म्हणाला.
“अरे तो गोठ्यात आहे. धार काढतोय. अण्णांना धारोष्ण दुध लागतं तुला माहितेय न?”
“ए नाही ग! आमचा खेळ संपल्याशिवाय नाही.”, त्याचं बोलणं ऐकून आई घरात गेली. थोड्या वेळानं स्वत: चपला घालून परसातून बाहेर पडली. तिचा पाय खूपच दुखत असावा.
 
“वैद्यांकडे जाता जाता वाटेत पडली होती आई! शिरपतीने बैलगाडीत घालून घरी पोहोचती केली. नीच जातीच्या माणसाच्या गाडीत बसून आली म्हणून अण्णांनी विटाळली, विटाळली म्हणून घरभर बोंबाबोंब केली होती.  दुसऱ्या दिवशी हातावर काळनिळ झालं होतं. पण ते कशानं झालं होतं? पडण्याने का अण्णांच्या मारण्याने… मला का नाही उमजलं ते? मी गेलो असतो वैद्यांकडे तर हे सगळं टळलं असतं…”, सगळं आठवून, सुहासच्या डोळ्यात अश्रू तरारले.
 
शाळेचं आणि सुहाचं फार पटलंच नाही. शाळेतून आलेल्या तक्रारी आणि मिळवलेले कमी गुण ह्या दोन्ही कारणांनी अधून मधून अण्णांकडून चोप मिळायचा. कधी आई पाठी घालायची. कधी अण्णांनी मारलं तर जवळ घ्यायची. “तुमच्याच लाडानं वेडा झालाय. काही गरज नाही जवळ घ्यायची, लाड करायची”, अण्णा ओरडायचे. सुहाला जवळ घेताना आईला दहावेळा विचार करावा लागे.
 
एकदा शाळेत न जाता, शेतात फिरत बसल्याने अण्णांनी बंबाखालच्या निखाऱ्याने चटका दिला. पण आई मध्ये पडली, अण्णांच्या हातातला निखारा तिनं फेकून दिला. अण्णांवर जवळ-जवळ ओरडलीच. अण्णांनाही ते नवीनच होतं,  ते चमकले. त्या निखाऱ्यानं भाजलं तिला, पण त्याची पर्वा नव्हती.
“अश्याच ओझ्याखाली राहिलं, तर पोर दबून जायचं…. आपल्यासारखं”, तिनं विचार केला. अण्णांच्या मर्जीनं सुहाची मामाकडे रवानगी केली. सुहाचा मामा शिक्षक होता. सुहाचा मामे-भाऊ, त्याच्याच वयाने एवढा अन अतिशय तल्लख बुद्धीचा होता. त्याच्या जोडीनं सुहाला ही अभ्यासाची गोडी लागेल हा आईचा मनोदय होता. तसं झालं ही!
 
सुहाच्या मनातला अभ्यासाविषयीचा तिटकारा खूप कमी झाला होता. पण एक नवीनच अढी निर्माण झाली होती, आईविषयी. मामाकडे राहिलं पाठवल्याचा राग, त्या  चिमुकल्या मनाने आईवर धरला होता. बघता बघता सुहा कॉलेजातून पदवी घेऊन बाहेर पडला. विनासायास सरकारी नोकरी मिळाली. तो घराबाहेरच राहत होता. सुहा सुट्टीत घरी यायचा. अण्णांशी समोरासमोर भेट होणार नाही असं पाहायचा. आई रोज सगळं त्याच्या आवडीचं करायची. उकडीचे मोदक काय.. अनारसे काय.. साखरांबा… काकवी… कसली कसली लोणची.. चटण्या काही काही सोडायची नाही. तापवलेल्या दुधाची ताजी साय-साखर रोज खायला द्यायची. तरी सुहा आईशी तुटक वागायचा. पण ती माउली सगळं पंखाखाली घ्यायची.
अण्णा गेले, तेंव्हा आई पन्नाशीत होती. आईला आधाराची गरज होती. सुहाला त्याची जाणीव होती. आर्थिक आधाराला सुहा होता पण मानसिक आधाराला कोण? काही काळाने रोहित आईपाशी आल्याने तो विषय सुहासाठी परस्पर हाता-वेगळा झाला होता. रोहित आल्याने आईला फार मोठा विरंगुळा होता.
 
काचेतून बघताना सुहाला आईच्या साय-साखरेची चव आठवली. ती चव बराच वेळ सुहासच्या जिभेवर रेंगाळत राहिली.
कोपऱ्यातील खुर्चीत अभ्यासाचं पुस्तक वाचत बसलेला रोहित, सुहासपाशी आला.
(क्रमश:)

अंतर्धान

अंतर्धान -संपदा म्हाळगी-आडकर ५/२३/१०
 
भाग १
भाग २
भाग ३
 
अतिदक्षतागृहाच्या काचेच्या तावदानातून आत बघत सुहास अतिशय निर्विकार चेहऱ्याने उभा होता. आईच्या कोमेजलेल्या, निपचित देहाकडे पाहत होता. त्याची सत्तरएक वर्षांची, इतकी वर्षे जगण्याच्या लढाईत जिंकणारी आई, मृत्यूशी झुंज देत होती. सुहासला आठवलं, मागच्या भेटीत आई म्हणाली होती, ‘सुहा, अंथरुणावर लोळागोळा होऊन पडून राहण्यापेक्षा एका झटक्यात मरण यावं रे बाबा!’ आणि तेच तिला आत्ता येत नव्हतं. सुहासला माहित होतं, तिचा जीव अडकलाय इथे सुहासमध्ये, रोहितमध्ये… आणि अजून बऱ्याच अश्या गोष्टींमध्ये ज्या असू शकल्या असत्या. अश्या अंतर्धानक्षणीही ती मृत्यूची आराधनाच करत असेल.
 
“सुहा, अरे ऐक माझं. लग्नासारखी गोष्ट वेळेतच झाली पाहिजे बाबा!”
“आई मी तुला कितीदा सांगितलंय. मला उगीच भरीला घालू नकोस. मी लग्न करणार नाहीये.”
“सुहा, तुला आत्ता करायचं नाहीये का? तसं असेल तर सांग मला. थोडे दिवसांनी पाहू. आलेल्या स्थळांना तसं कळवता येईल.”
“आई, आत्ता नाही आणि कधीच नाही. मला लग्न करायचं नाहीये.”
“मग काय ब्रम्हचारी होणार आहेस का?”, आई रागानेच म्हणाली. सुहासचा पारा कधीच चढला होता. लग्नाच्या विषयाने त्याला तिरमिरी येत असे. ‘का?’ हे त्याचं त्यालाही का माहित नव्हतं.
“तुम्ही बाप लेक मला कधी सुख लागू देणार आहात का?”, पाठमोरी वळून आई स्वयंपाकघराकडे चालू लागली. तिचा रडणारा चेहरा सुहाला दिसला नाही पण डोळ्याकडे गेलेला पदर दिसला होता.
 

रोहितच्या खांद्यावरल्या हाताने सुहास भानावर आला. रोहितला आईचा फार लळा होता. रोहित सुहासच्या आत्येबहिणीचा मुलगा. आई गेल्यावर मामीआजीनेच त्याचा सांभाळ केला होता. “माआजीला बरं नाही” म्हणाल्यावर दिवसरात्र तो हॉस्पिटलात होता, सुहास मामाबरोबर.

“मामा, मी जरा औषधं घेऊन येतो.”
“हे पैसे घे.”
“नको आहेत माझ्याकडे, आधीचे उरलेले.”
“बर”.
“जाऊन येतो.”
“हं” रोहितच्या येण्याने खंडित झालेला सुहासच्या विचारांचा प्रवाह, परत वाहू लागला.
 
खरंय आईला कधी सुखच लागलं नाही. आधी अण्णांच्या तापट आणि आततायी स्वभावाने आणि नंतर माझ्या बेताल वागण्याने. “बेताल? माझं वागणं बेताल खरंच होतं? असेल कदाचित. कदाचित नाही नक्कीच. अंत:मन कधी खोटी ग्वाही देणार नाही.”
 
सोपान वाड्याला ताज्या फुलांचं तोरण बांधत होता. वाड्यात सगळ्या दारांना आंब्याच्या डहाळ्या लावल्या होत्या. नुकत्याच सावरून, वाळलेल्या शेणाचा वास सर्वत्र पसरला होता. बायका रांगोळ्या काढत होत्या. लहान मुलं पळापळी करीत होती. त्यांच्या आया त्यांना लांबूनच दटावत होत्या. दटावल्यानंतर “बघाना अजिबात ऐकत नाही. चार-चौघात शोभा करतो”, असं म्हणत आपापसात कुजबुजत होत्या. गोतावळ्यातील मुलांच्या एकत्रित मुंजी असल्यातरी वाड्यात मात्र लगीनघाई होती.
आज सुहाचीही मुंज होती. आईची पार धांदल उडून गेली होती. एकत्र मुंज सोहळा असल्याने बाहेर गावहून आलेल्या पाहुण्या-रावळ्यांचं चहापान, खानपान वाड्यावरच होतं. एकत्रित मुंजीचा संकल्प सुहाच्या वडिलांचा असल्याने तिला जास्तच काळजी घ्यावी लागत होती. सगळ्या मुंजी आपल्याच घरातल्या असल्यासारखी ती झपाटून कामं करत होती. थोड्याच वेळात घटिका भरेल असा निरोप आला. आई सुहाला शोधत घरभर फिरली. मुहूर्ताला मुंज मुलगा जागेवर नसता तर सुहाच्या वडिलांच्या क्रोधाग्निला तिला सामोरं जावं लागलं असतं.
 
सुहा बाकीच्या पोरांबरोबर लपाछपी खेळण्यात गुंतला होता. तो आणि सुमी वरच्या माळ्यावर गोण्यांमध्ये लपले होते. स्वत:चे घर असल्याने सुहाला काने-कोपरे माहित होते. इकडे माळ्यावर कोणी शोधत येणार नाही आणि आलं तर कसा मस्त धप्पा देता येतो हे त्याने सुमीला समजावलं. सुमी तशीही लिंबू-टिंबू होती. खूप वेळ कोणी शोधायला आलं नाही म्हणून सुमीने भुणभुण सुरु केली,
“ए सुहास, आपण जाऊ या रे, कोणीच येत नाही.”, असं म्हणून ती उठू लागली.
“थांब ग सुमे!”
“नको मी जातेच कशी, तुमची मुंज आहे बाबा, तुम्हाला कोणी बोलणार नाही, मला आई शोधत असेल. मला न मागता धम्मकलाडू मिळायचा.”
“थांब ग! तू बाहेर गेलीस तर तू वाचशील कारण तू लिंबू-टिंबू आहेस, पण मला राज्य घ्यावं लागेल” दोघं थोडा वेळ गप्प बसले.
तेवढ्यात बाहेरून धप्पाचा जोरात आवाज झाला. तो ऐकल्यावर सुमी म्हणाली, “बघ धप्पा पण झाला. आम्हाला बुवा मुंज पण नाही आणि धप्पा पण!”
“म्हणजे?”
“हो तुम्हा मुलांना मुंज, मला काहीच नाही.”
“तू सांग न तुझ्या आई-दादांना, तुझं लग्न करायला. मग होईल फिटाम-फिट”, सुहा हसत म्हणाला.
“हो? मग तुमची मुंज आणि माझं लग्न होईल ना रे?”, सुमी निरागसपणे म्हणाली.
“हो”, सुहा हसत म्हणाला. तेवढ्यात सुहाला आईची हाक ऐकू आली. माळ्याचा जिना उतरून तो खाली गेला.
आई किती सुंदर दिसत होती. पाटल्या, बांगड्या, तोडे, चिंचपेटी, गौरवर्णाला शोभून दिसणारी प्रेमळ, पिंगट नजर, कपाळावर नेहमीची चंद्रकोर. लग्नाचा जपून ठेवलेला फिकट गुलाबी रंगाचा भरजरी शालू ती नेसली होती. स्वत:च्या मुलाची मुंज असून तिला नवी साडी घेता आली नव्हती… अण्णांमुळे. पण त्या जुन्या नऊवारी शालूतही ती अतिशय सुरेख दिसत होती. नाकातली मोत्याची नथ तिला फार छान दिसत होती. “आपली आई किती सुंदर आहे”, ह्याची जाणीव सुहाला होऊन गेली. “आईने रोज असाच नटलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. पण अण्णा करू देणार नाहीत. त्यांच्या देखरेखीत आईला एक दागिना ल्यायला कधी मिळायचा नाही.”
 
“सुहा, किती शोधायचं तुला? घटिका भरत आली.”
“आम्ही लपाछपी खेळत होतो काकू!”, सुमी आईला म्हणाली.
“हो ना”, सुहाने होत हो मिसळलं.
“सुमे, तू चल तुझी आई शोधतीय कधीची. सुहा, लपाछपी खेळतोय म्हणे, थोड्या वेळानं तुझ्या अण्णान्पासून मला लपायची वेळ आली असती”, असं म्हणत आई सुहाला हाताला धरून निघून गेली.
 
मांडवात मुंजीच्या विधींची तयारी चालू होती. घटिका भरायला काही पळ उरले होते. सुमी आईला म्हणाली, “आई मला लग्न करायचंय.”, तिचं हे बोलणं ऐकून आजूबाजूंच्या बायकांत खसखस पिकली. सुमीच्या आईला मात्र वरमल्यासारखं झालं.
“गप ग सुमे!”
“आई मला लग्न करायचं म्हणजे करायचं. सुह्याची मुंज मग माझं लग्नतरी करा.”, परत खसखस. एव्हाना मांडवातल्या सगळ्यांचं लक्ष गेलं होतं. सुमीच्या आईने समजावलं पण काही उपयोग झाला नाही. सुमीचं मात्र “माझं लग्न करा, लग्न करा” चालूच होतं.
“कुणी सांगितलं तुला? नसतं लग्नाचं खूळ!”, सुमीच्या आईनं रागानं विचारलं.
“सुह्यानं!”, सुमी चटकन बोलून गेली. आजूबाजूला परत हश्या.
“पण सुमे, कोणाशी करणार तू लग्न?”, कोणत्याश्या भोचक मावशीनं हसत विचारलं.
थोडासा विचार करून “कोणाशी म्हणजे…. सुह्याशी.. तो आवडतो मला..”, सगळे हसले. सुमीची आई वरमली.
“आजच सुहाची सोडमुंज सुद्धा उरकून घ्या, सुहाची आई!”, मगाचच्या भोचक मावशी परत बोलल्या. इतर बायका खळाळून हसल्या. सुहाला हाताला धरून, घेऊन आलेली सुहाची आईदेखील हसली. सुहा मात्र न हसता तसाच उभा होता. दुरून सुहाचे अण्णा त्याच्याकडे रागाने पाहत होते म्हणून कदाचित!
 
सुहासला सगळं आठवलं, ‘मुंजीनंतर कोठीत नेऊन अण्णांनी खरपूस समाचार घेतला होता, मात्र त्या माराने सुमीच्या स्मृती मनावर कोरल्या गेल्या कायमच्या!’ पण त्याहून डोळ्यासमोर तरळत राहिलं, ते आईचं लोभसवाण रूप! अण्णांच्या हयातीत आईला मनासारखं काही करता आलं नाही, आणि आपणही तिच्या मनासारखं केलं नाही म्हणून त्याला वाईट वाटलं.
 
रोहित औषधं घेऊन परत आला. त्याने काचेच्या दारातून परिचारिकेला बोलावून औषधं दिली. त्याच्याकडे पाहून, सुहासने अंतर्धान पावू बघणाऱ्या आईकडे वळून पाहिलं.
(क्रमश:) 

गाडीची तोतो

गाडीची तोतो -संपदा म्हाळगी-आडकर ५/१५/१०
 
मागच्या आठवड्यात पाऊस झाल्याने, आज गाडी धुवायला गॅस स्टेशन (पेट्रोल पंप)  वर घेऊन गेलो होतो. गाडी आतून खराब झाल्याने आधी वॅक्युम केली, मग गाडी धुण्यासाठी ऑटोमॅटिक कार-वॉश मध्ये नेली. आधी वॅक्युमच्या आवाजाने घाबरलेली माझी दीड वर्षाची मुलगी, त्या ऑटोमॅटिक कार-वॉशमध्ये पार भांबावून गेली.

कार-वॉशच्या बोळात शिरल्यावर, अंधार झाल्याने मगाचचा (रडण्याचा) विसरलेला सूर, तिला परत आठवला. ती तरी काय करणार बिचारी, कार-वॉश मधली तिची पहिलीच वेळ होती. तिच्या बाजूच्या खिडकीच्या काचेवर कार-वॉश मशीन रोलरच्या रबरपट्ट्या आपटायला लागल्यावर, बाहेरून कोणीतरी भूतीण आपल्या झिंज्या आपटत असावी, असा चेहरा करून ती रडायला लागली. मी पुढे बसल्याने, माझे distant सांत्वन तिला पुरेनासं झालं. 

“हे काय चालू आहे?”, ह्याचं स्पष्टीकरण देण्याचे मी आणि माझा नवऱ्याने काही वायफळ प्रयत्न केले. मग तिला म्हणलं, “अग, आपण गाडीला तोतो (अंघोळ) घालायला घेऊन आलोय”. माझं बोलणं तिला फारसं पटलं नाही. तिनं रड चालूच ठेवलं. मग तिला म्हणलं, “तू तोतो करतेस की नाही, आई तोतो करते, बाबा करतो न तशी गाडीची तोतो”, ते पण पटलं नाही. (बर ती दीड वर्षाची आहे. तिला सजीव आणि निर्जीव गोष्टींतला फरक अजून करत नाही, हे सुज्ञ वाचकांना कळेल ही अपेक्षा!)
 
ती कशालाच दाद देत नाही म्हणल्यावर मी सरळ बोलायला सुरुवात केली. “शंभो हरहर गंगे, भागीरथी, कृष्णामाई….” ओळखीचं काहीतरी ऐकू आल्यासारखं ती गप्प बसली. तिला बहुतेक पटायला लागलं होतं की अंघोळ सुरु आहे. म्हणून मी थांबले, तर परत थोडसं रडू ऐकू येणार, तेवढ्यात परत सुरुवात केली, “ह्या खांद्यावर, त्या खांद्यावर, धार पडू दे माहेर वाढू दे!”, “ह्या खांद्यावर, त्या खांद्यावर, पाठीवर, पोटावर, धार पडू दे, पाठ-पोट वाढू दे गाडीचं!”. “गाडीचं पाठ-पोट वाढू दे!”, हे ऐकून माझा नवरा मात्र हसून-हसून बेहाल झाला. हे करता करता पाणी थांबलं, आमचा कार-वॉश संपला. मी हसत हसत मागे वळून मुलीकडे पाहिलं. ती काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं माझ्याकडे पाहत होती. मला लक्षात आलं, गाडीची अंघोळ संपली होती पण शेवटी ओवाळलं नव्हतं ना! मग परत “ओवाळु ओवाळु….” झालं. आणि अश्याप्रकारे गाडीची तोतो पूर्ण झाली.

टाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००”-भाग ७

७. किरण मजुमदार-शॉ
 
06-kiran-mazumdar-shaw_50

Kiran Mazumdar-Shaw 
Fighting cancer locally and globally
by Lance Armstrong 

When a parent is lost to cancer in the developing world, it means no school for kids, no more food on the table and future in which the only certainty is poverty. In 2010 we’ll lose 8 million people as this disease quietly becomes the world’s leading cause of death. And developing nations will keep getting hit the hardest.
 
Facing down this challenge is Dr. Kiran Mazumdar-Shaw. At age 25, she created a biotech company in her garage. Never mind that no one in the 70’s knew what biotech was, that she is a woman and that backers were hard to come by because of these two points. Today the start-up, Biocon International, is a $1 billion operation.
 
Every year, Shaw donates $2 million to support health insurance coverage for 100,000 Indian villagers. She devoted $10 million to creating the 1400-bed Mazumdar-Shaw Cancer Centre in Bangalore, India. When it opens this year, it will treat poor patients for free in the evenings so they can continue to work and care for their families during the day.
 
Thanks you, Dr. Shaw, for treating cancer like the global crisis it has become.
 
Armstrong is a champion cyclist and the founder of LiveStrong.
 

किरण मजुमदार-शॉ
कॅन्सरशी लढा स्थानिक आणि जागतिक
-लान्स आर्मस्ट्रॉन्ग 
 
विकसनशील देशात, कॅन्सरने आई अथवा वडील गमावलेल्या कुटुंब म्हणजे, मुलांना शाळा नाही, जेवायला अन्न नाही आणि भविष्यात खात्रीलायक गोष्ट काही असेल तर ते म्हणजे दारिद्य्र! २०१० साली आपण कॅन्सरमुळे ऐंशी लाख लोकांना गमावू. हा दुर्धर आजार हळूहळू जगातील मृत्यूंचे मुख्य कारण बनत चालला आहे. आणि विकसनशील देश ह्या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत.
 
हेच आव्हान स्वीकारून, डॉ. किरण मझुमदार-शॉ ह्यांनी, वयाच्या पंचविसाव्यावर्षी, आपल्या garage मध्ये जैविक तंत्रज्ञानाची कंपनी सुरु केली. सत्तरच्या दशकात कोणाला जैवतंत्रज्ञान कोणाला ठाऊक नव्हतं हे सोडा. त्यातून एक स्त्री व्यावसाईक, ह्या दोन गोष्टींमुळे पाठींबा फारसा मिळत नव्हता आज तीच कंपनी “Biocon International”, १ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय आहे.
 
दरवर्षी १ लाख भारतीय गरीब खेडुतांच्या आरोग्य विम्यासाठी, शॉ वीस लाख डॉलर्स दान करतात. भारतातील बंगलोरमधील, मजुमदार-शॉ कॅन्सर सेंटर ह्या चौदाशे खाटांच्या इस्पितळाच्या उभारणीसाठी त्यांनी एक कोटी डॉलर्स खर्च केले. ह्या वर्षी जेंव्हा ते सुरु होईल, तेंव्हा संध्याकाळच्या वेळात गरीब रुग्णांचा तेथे मोफत इलाज केला जाईल. संध्याकाळी अश्यासाठी की ते दिवसभर काम करून आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतील.
 
कॅन्सर ही व्याधी जागतिक संकट असल्याप्रमाणे त्याचे निराकरण करण्याबद्दल डॉ. शॉ तुमचे धन्यवाद! 
  
आर्मस्ट्रॉन्ग हा सर्वोत्कृष्ठ सायकलपटू आहे. LiveStrong ह्या सेवाभावी संस्थेचा तो संस्थापक आहे. हा स्वत: कॅन्सर सर्वाय्वर (कॅन्सर पासून वाचलेला) आहे. फ्रांसची Tour de France ही अतिशय नावाजलेली स्पर्धा त्याने ७ वेळा जिंकली आहे. कॅन्सरवर मात केल्यावर आजही तो सायकलस्पर्धेत भाग घेतो आहे.
 
***

टाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००”- भाग ६

६. सचिन तेंडूलकर 

 

Sachin Tendulkar
Cricket’s record breaker
by Deepak Chopra
 
In the history of cricket, only one man has scored a double century-200 runs- in a one day International match, and his name is Sachin Tendulkar. To millions of Indians and countless fans around the world, this act, which caps a career of record-breaking feats, arouses a sense of awe.
 
Cricket casts the tinist shadow on the American sports scene, but globally it stokes the fire in people’s souls. Inherited from imperial England, the world’s second most watched team sport has become a symbol of beating colonials at their own game. Sports heroes such as Tendulkar, 37, stand for national dignity in a way that perhaps only a postcolonial nation can understand. And feel grateful for.
 
Chopra is a New York Times best-selling author.
 

सचिन तेंडूलकर
क्रिकेटचे विक्रम मोडणारा
-दीपक चोप्रा  
 
एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात फक्त एका माणसाने द्विशतक केलेले आहे आणि तो म्हणजे सचिन तेंडूलकर. हा विक्रम लाखो भारतीयांसाठी आणि जगभरातील असंख्य चाहत्यांसाठी, सर्व विक्रमांमध्ये सर्वोच्च ठरला आहे.
 
अमेरिकन क्रीडाजगतावर क्रिकेटची विशेष छाप नाही. परंतु जगभरात क्रिकेटमुळे लोकांना जोश चढतो. प्रभावशाली इंग्लंडकडून वाराश्याने मिळालेला क्रिकेट हा जगातील सगळ्यात जास्त पहिला जाणारा दुसरा सांघिक खेळ आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत करण्याची जणू ही खुण आहे. सदतीसवर्षीय तेंडूलकरसारखे, अश्याप्रकारे देशाच्या प्रतिष्ठेसाठी खेळणाऱ्या हिरोंचे कर्तुत्व फक्त भारतासारख्या, एकेकाळी इंग्रजांनी राज्य केलेल्या देशालाच समजू शकते.  भारत त्यांचा कायमच उपकृत राहील.
 
दीपक चोप्रा हे New York Times चे बेस्ट-सेलिंग लेखक आहेत.
 
***

टाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००”- भाग ५

५. पी.नाम्पेरूमाल्सामी
 
P. Namperumalsamy
Restoring sight for India’s blind
by Brian Mullaney
 
In less time than it takes to read this magazine, a simple surgery can give a blind person her eyesight back.
 
A miracle? Absolutely. But Dr. Perumalsamy Namperumalsamy, 70, and his army of cataract fixers at India’s Arvind Eye Care Hospitals make it look easy.The surgery has been around for decades, but the chairman of Arvind- which was founded in 1976 with the goal of bringing assembly-line efficiency to health care- figured out how to replace cataracts safely and quickly: 3.6 million surgeries to date, a new one every 15 minutes.
 
Equally brilliant is the bussiness model: the 30% of patients who can afford to pay subsidize free or low-cost care for the 70% who are poor. “All people have a right to sight”, Namperumalsamy says. As I write these words after a long day spent in the slums in India, I cannot tell you how much admiration I have for him and his team.
 
Mullaney is a co-founder of the Smile Train, which provides more than 125,000 free cleft surgeries per year for kids in developing countries.
 

पी.नाम्पेरूमाल्सामी 
अंध भारतीयांना दृष्टीची संजीवनी देणारे 
-ब्रायन मलानी
 
जेवढा वेळ तुम्हाला हे मासिक वाचण्यास लागेल, तेवढ्या वेळात एका साध्या शस्त्रक्रियेने अंध व्यक्तीस दृष्टी मिळू शकते.
 
आश्चर्य वाटतंय का? नक्कीच. पण सत्तर वर्षीय डॉ. पेरुमाल्सामी नाम्पेरुमाल्सामी आणि “अरविंद आय केअर” येथील त्यांची मोतीबिंदू ठीक करणाऱ्यांची फौज ह्यांनी मात्र हे शक्य व सोपे केले आहे. १९७६ मध्ये स्थापन झालेल्या “अरविंद आय केअर” चे, मोतीबिंदू शस्त्रकियेची कार्यक्षमता वाढवणे हेच ध्येय आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया बरीच वर्षे वापरात आहे. पण अरविंदच्या अध्यक्षांनी मात्र, मोतीबिंदू सुरक्षित आणि जलदपणे करण्याचे तंत्र अवगत केले आहे. आजपर्यंत त्यांनी ३६ लाख शस्त्रक्रिया केल्या असून, दर १५ मिनिटाला एक नवी शस्त्रक्रिया होत आहे.
 
ह्या व्यवसायाचा प्रबंधही तितकाच हुशार: शस्त्रक्रिया परवडू शकणारे ३०% रुग्ण, उरलेल्या  ७०% गरीब रुग्णांच्या मोफत किंवा किफायतशीर शस्त्रक्रियांचे शुल्क भरतात. डॉ. नाम्पेरुमाल्सामी म्हणतात. “दृष्टीवर सगळ्यांचा हक्क आहे.” भारतातल्या झोपडपट्टीत आजचा आख्खा दिवस घालवल्यावर, जेंव्हा मी हा लेख लिहितोय, मला डॉ. नाम्पेरुमाल्सामी आणि त्यांच्या पूर्ण टीमबद्दल असलेला आदर शब्दात व्यक्त करता येणार नाही.
 
मलानी हे Smile Train ह्या संस्थेचे सह-संस्थापक आहेत. Smile Train ही संस्था, अविकसित देशांत, दरवर्षी १२५,००० पेक्षा जास्त मुलांच्या ओठांवर (जीवणी) शस्त्रक्रिया करते.
 
***