IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads -संपदा म्हाळगी-आडकर १०/६/१०
 
 
हि माझी नवी आवडती सीरिअल. अमेरिकेत Ice Road Truckers हि सीरिअल बऱ्यापैकी हिट आहे. अमेरिकेतील हिमाच्छादित व दुर्गम अश्या भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम हे Ice Road Truckers म्हणजेच ट्रकचालक करतात. बर्फाळ प्रदेशातून जाताना, दुर्गमता, प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते ह्या सर्वांचा सामना करत आपलं काम चोख पार करत ते इतर ट्रकचालकांना मदत करतात. यंत्रांचं पुढारलेपण घेऊन, निसर्गावर मात करत ते पुढे जातात. पण काही दुर्दैवी चालक काळावर मात करू शकत नाहीत. दुर्गम ठिकाणी इंधन संपल्याने मदतीची वाट पाहत, तिष्ठत बसण्याची अथवा एका चुकीच्या वळणाने बर्फाखाली जलसमाधी मिळाल्याची वेळ काही ट्रक चालकांवर येते.
 
ह्या सीरिअलचा नवा अविष्कार म्हणजे IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads. हि सीरिअल आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे हे Deadliest Roads हिमालयातील आहेत. अमेरिकेतून आलेले ३ अनुभवी ट्रकचालक हिमालयाच्या बर्फाच्छादित राशींतून वाट काढत पुढे जाणार आहेत. परक्या देशात, अनोळखी लोकांमध्ये, अनोळखी रस्त्यांवर मार्गक्रमण करताना त्यांचे अनुभव कॅमेरात टिपले जाणार आहेत. ह्या ३ ट्रकचालकांमध्ये लिसा हि एक स्त्री चालक आहे. उरलेले दोघे रिक व अलेक्स हे मुरलेले चालक आहेत. मुरलेले असूनही त्यांना भारतातील रस्त्यांवर येणारे अनुभव वेगळे व लक्षणीय असतील ह्यात वाद नाही. ह्या ट्रक चालकांना ३ क्लीनर्स सोबत दिले आहेत.
असह्य उकाडा (ट्रकमध्ये A.C. नाही हे वेगळे सांगायला नको), रस्त्यावरील गर्दी, दुचाक्यांचे प्रमाण, बेभान वाहतूक, गाय-बैलांसारखे सोबती, चिंचोळे रस्ते, चढते घाट, लेन-ड्राईविंगची सवय ह्या सर्वांमध्ये अमेरिकी ट्राफिक सेन्स किती काळ टिकतो, हे पाहायला नक्की आवडेल. पहिला भाग पाहता, दिल्लीतून निघताना लिसाला मिळालेले un-divided attention, “स्त्री ट्रक चालक” (सुज्ञांनी “गोरी चमडी” असे वाचावे.) आकर्षण जग-जाहीर करून गेले. तिला स्त्री म्हणून येणारे अनुभव पाहण्याची उत्सुकता नक्कीच आहे. छोट्या वाहन चालकांचे वाहन कौशल्य (गाड्या घुसवणे, घाटामध्ये हेड-ऑन कोलीजन टाळण्याचे तंत्र) पाहून रिकने उघडलेली आपली शिवराळ इंग्रजीची थैली, ब्लीपच्या स्वरुपात प्रेक्षकांचे मनोरंजन करते. (माझा प्रश्न हा कि, “हे गोरे टीव्हीवाले (हा वर्णभेदाचा पुरस्कार नव्हे, सोयीस्कर म्हणून वापरलेला शब्द) इंग्रजी शिव्या ब्लीप करू शकतील पण क्लीनर्स/स्पॉटर्सन्नी दिलेल्या इरसाल हिंदी शिव्यांचं काय?”, त्या शिव्यांचं काय होतं हे मला पाहायचं आहे.) ह्या ट्रक चालकांनी आत्तापर्यंत दिल्लीपासून सिमल्यापर्यंत प्रवास पूर्ण केला आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगा, उंच कडे, खोल शब्द तोकडा पडेल इतक्या खोल दऱ्या, वळणदार रस्ते हे सर्व वर्णन करण्यासाठी पारणं फिटणे, नेत्रदीपक, नयनरम्य वगैरे शद्ब कमीच! पहिला भाग पाहून मनोरंजन झाले हे खरं असलं तरी मनात कुठेतरी भारतीय ट्रकचालाकांबद्दल आदर वाढला. दारू पिऊन ट्रक (for that matter कोणतेही वाहन) चालाविनारयांसाठी हा आदर मुळीच नाही. तो आहे, पोटाला २ वेळेचं मिळण्यासाठी, हाताला रोजगार म्हणून, जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांसाठी! सोनाराने कान टोचावे लागतात अशी म्हण आहे.. ह्यावेळी सोनार गोरा होता!
 
Advertisements