Posts tagged ‘anusuchit’

बबल

बबल -संपदा म्हाळगी-आडकर ७/१७/१०
 
काल काही निमित्ताने सिटीमध्ये जाण्याचा योग आला. ट्रेन घेऊन एकटीच सिटीमध्ये जाऊन आले. माझा जॉब सिटीमध्ये नसल्याने, ट्रेनने एकटीने जाण्याची वेळ खूप कमी येते. मुळची पुण्याची असल्याने तसा ट्रेनशी संबंध कमीच! लोकलमध्ये चढण्याची सवय नसलेल्याला जसे नेहमीचे पासेन्जर्स, पाकीटमार जसे पटकन ओळखतात तसे काहीसे लोकांनी मलाही ओळखले असावे.
 
ट्रेनमध्ये बसल्यावरही “हा माझा ‘alone time’ आहे” हे मनाला पटत नव्हतं. त्यामुळे त्या सुरुवातीच्या ५-१० मिनिटांत नवऱ्याला, मुलीच्या पाळणाघरात फोन करून सूचना देऊन झाल्या. ट्रेन सुरु झाली. फलाटावरून ट्रेन निघाली, तशी बाहेर बघण्यात गुंग झाले. समांतर धावणारे रूळ आमच्या रूळांशी स्पर्धा करताहेत असं वाटलं. संरक्षक भिंती पलीकडचे रस्ते, घरं, गाड्या, माणसं सगळं मागे टाकत, आम्ही कुठेतरी दूर निघालो होतो. भिंतीपलीकडली वेअरहाउसेस, धूर ओकणाऱ्या फाक्टारीज, स्क्रापहाउसेस, जंकयार्ड्स, त्यातल्या पिचलेल्या, चेपलेल्या, गंजलेल्या गाड्या सगळं भकास दिसत होतं. रुळांकडेच्या संरक्षक भिंती, इमारतींवर ठिकठिकाणी केलेली/खोडलेली ग्राफिटी दिसत होती. खूपवेळ त्या ग्राफिटीमध्ये काहीतरी सुंदर शोधण्याचा प्रयत्न केला, पण एका ग्राफिटीचा अपवाद वगळता फार काही हाती लागलं नाही. वाटलं, ही सुबत्तेच्या आणि संधींच्या देशातली अवकळा! उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने निर्जन झालेल्या शाळा, जागा डोळ्यांना अधून-मधून खुपत होत्या.
 
मी ट्रेनमध्ये बसले ती ट्रेन जाण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून, त्यामुळे सगळ्या गोष्टी सोडून आपण दूर खेचले जातोय असं वाटत होतं. sci-fi सिनेमामध्ये जसं माणूस एखाद्या टाइम बबल मधून बाहेर ओढला जातो, तसं वाटू लागलं. “असंच जर खरंच खेचता आलं असतं माणसाला टाइम बबलबाहेर तर?”, असा विचार क्षणभर तरळून गेला. खिडकीबाहेरचं सगळं चल/अचल भौतिक नजरेसमोरून धावत होतं. धावत होतं पण फसवं! क्षणभर वाटलं, आपल्याकडे पाहून वेडावून हसतंय, कदाचित म्हणतंय, “ही वेडी ‘आपण दूर खेचले जातोय’ असं समजतेय!” 
 
ट्रेन थांबली, सत्य माहित होतं, कळतही होतं पण मनात आलं, “आलो का बबलच्या बाहेर?” ट्रेनचा प्रवास संपवून, अंडरग्राउंड ट्रेनस्टेशन मधून बाहेर आले. इतकावेळ अडकलेला श्वास, मोकळ्या हवेत भरभरून घेतला. आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे उंच टोलेजंग इमारती होत्या. आजूबाजूचं भौतिक नवीन होतं पण भौतिक होतं, तसंच होतं. हा परत एक बबलच होता. एका बबल मधून फक्त मी दुसऱ्या बबलमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही बबल साबणाच्या बुडबुड्याप्रमाणे, पृष्ठभागावर मोहक रंग मिरवणारे आणि अंत:रंगात रिक्त!
Advertisements

जेजे वॉकिंग

जेजे वॉकिंग -संपदा म्हाळगी-आडकर ६/९/१०
 
२ आठवड्यांपूर्वी आमच्या भारतातल्या टीम मधला एक सहयोगी इकडे युएसमध्ये आला. तसा तो या आधीही इथे येऊन गेला आहे त्यामुळे इथल्या गोष्टींना बऱ्यापैकी सरावला आहे. त्याच्या, जिभेला पीळ पाडणाऱ्या दक्षिणात्य नावाने इकडे बऱ्याच गोऱ्यांची विकेट घेतल्याने, आल्याच्या काही दिवसातच त्याचे नव्याने नामकरण करण्यात आले. “जेजे”! कायम हसतमुख आणि happy-go-lucky असल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे.
 
आताही हि एवढी प्रस्तावना करण्याचे कारण हे की आज जेजे काहीसं बाहेरचं काम करून, रस्ता ओलांडून, ऑफिसमध्ये परत येत होता. भारतीय पद्धतीने, दोन्ही बाजूला बघून, गाडी येत नाही हे पाहून त्याने रस्ता ओलांडला खरा पण पलीकडे पोहोचल्यावर त्याच्या स्वागतास्तव अमेरिकी मामा (पोलीस) थांबला होता. पोलिसाने थांबवून शांतपणे चौकशी केली आणि नंतर “जे वॉकिंग” केल्याबद्दल १६५ अमेरिकी डॉलर्सचे तिकीट हातात देऊन निघून गेला. हा एकूणच प्रकार जेजे साठी नवा आणि तेवढाच धक्कादायक होता. ऑफिस मध्ये येऊन त्याने आम्हाला जेंव्हा सांगितलं, तेंव्हा थोडे वाईट वाटलं. भारतीय खिशाला मिळालेला १६५ अमेरिकी डॉलर्सचा दणका पाहून काही लोक हळहळले सुद्धा! जेजे मात्र शांत होता. नेहमीसारखा हसत नव्हता एवढेच. ते तिकीट न्याहाळत असतानाच, आपण पोलिसाला चुकून चुकीचा पत्ता दिल्याचा साक्षात्कार त्याला झाला.
 
अमेरिकेत रस्ता ओलांडताना, चौकात आखलेल्या २ पांढऱ्या पट्ट्यांमधूनच रस्ता ओलांडावा लागतो. काहीसं आपल्याकडे असलेल्या झेब्रा क्रोसिंग सारखंच! पट्ट्यांबरोबर, चौकामध्ये सिग्नलच्या खांबावर हाताच्या कक्षेत एक बटन असतं. हे बटन दाबून, चालण्याचा सिग्नल मिळाला तरच रस्ता ओलांडायचा असतो. अश्या पद्धतीने रस्ता न ओलांडल्यास अथवा अवैध पद्धतीने रस्ता ओलांडल्याबद्दल किंवा पदपथावरून न चालल्यास किंवा तत्सम दिरंगाईबद्दल पोलीस दंडाचे तिकीट देतात. सकाळच्या ट्रेन पकडण्यासाठी गडबडीत, शोर्टकट घेणारे, ‘जे वॉकिंग’ करून आपल्या खिशाला शोर्ट कट मारून घेताना मी अनेकवेळा पाहिलं आहे.
 
जेजेने मात्र आपल्या सवयीने मधून रस्ता ओलांडला. आम्हाला वाईट वाटलं, आम्ही त्याला ह्या नियमाविषयी सांगायला हवं होतं. पण तेवढ्यात एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने त्याच्या एका तिकिटाचा किस्सा सांगितला. मग अजून काही जणांनी आपले खमंग किस्से सांगितले. मिळालेले “तिकीट कसे टोलवता येईल” वगैरे सल्ले पण झाले.  मग भारतातल्या पोलीस, ट्राफिक आणि जे वॉकिंग(?)बद्दल चर्चा झाली. काही क्षण हसण्यात गेले. एव्हाना जेजे पण रंगात येऊन भारतातले किस्से सांगत होता. त्याचा खुललेला मूड पाहून एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने जाहीर केलं, “आज पासून हे ‘जे वॉकिंग’ नसून ‘जेजे वॉकिंग’ आहे”. सगळे मनमुराद हसले, जेजेसुद्धा!  एकूण काय जेजेला ‘जे वॉकिंग’ बद्दल तिकीट मिळालं आणि आम्हाला काही आनंद क्षण! उद्या अजून एकजण येणार आहे भारतातून, त्याला आल्या आल्या सांगायला हवं ‘जेजे वॉकिंग’ नव्हे ‘जे वॉकिंग’ बद्दल! कदाचित दोन्हीबद्दल!
  

Jetlag

Jetlag -संपदा म्हाळगी-आडकर ४/१९/१०
 

मायदेशाला जाऊन, मस्त ट्रीप झाल्यावर येणारा  Jetlag हि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मायदेशाबाहेर जाऊन आलेल्या लोकांसाठी Jetlag हा शब्द अनोळखी नाही. Jetlag ची थोडक्यात माहिती अशी-
जगामध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी दिवस रात्रीचे वेगवेगळे प्रहर चालू असतात. हे प्रहर संतुलित करण्यासाठी, जगामध्ये वेगवेगळे कालखंड पडले आहेत. ज्यांना इंग्रजीमध्ये टाइमझोन्स असे म्हणतात.
भारत आणि अमेरिका हे दोघेही वेगवेगळ्या कालखंडात पडतात. ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर भारत आणि अमेरिका हे पृथ्वीवर एकमेकांच्या अगदी उलट बाजूस आहेत. (पाठीला पाठ लावल्यासारखे) त्यामुळे दोघांमध्ये वेळेचा फरकही फार मोठा आहे. लोकांना ह्याचा प्रकर्षाने अनुभव येतो. एका देशात जेंव्हा रात्र तेंव्हा दुसऱ्या देशात दिवस आणि उलट.

अश्या ह्या दिवस रात्रीच्या उलट सुलट वेळा असल्याने, ह्या दोन देशांदरम्यान प्रवास झाल्यावर फार पंचाईत होते. भारतातून अमेरिकेत आल्यावर अथवा अमेरिकेतून भारतात आल्यावर, दिवसा झोप येणे आणि रात्री निशाचर होणे असे प्रकार काही दिवस चालतात. बऱ्याच वेळा रात्री-अपरात्री सणकून भूक लागते. त्यात वाईट काही नाही म्हणा.. (रिकाम्या पोटी झोप न येण्याची कारणे देणारे पण बरेच असतात :)) विशेषत: लहान मुलांबरोबर प्रवास केला असेल आणि मुलांना Jetlag आला तर पालकांचे हाल कुत्रं खात नाही. असंच काहीसं ह्या वेळेस माझं आणि माझ्या नवऱ्याचं झालं. मुलीला Jetlag आल्याने ती रात्रभर आम्हाला जागवायची आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये, आम्हाला पेंग यायची. काही विचारू नका.
 
असा हा Jetlag येऊ नये ह्याकरिता विमान कंपन्या काही उपाययोजना करतात. म्हणजे तुम्ही जेंव्हा विमानातून प्रवास करत असाल तेंव्हा काही ठराविक वेळेला विमानातील दिवे बंद करतात. त्यावेळेस विमानातील हवाईसुंदरीदेखील खिडक्या उघडण्यास प्रतिबंध करतात. कारण असे की, बाहेर प्रकाश असला तरी प्रवाश्यांनी झोपावे. तर काही ठराविक वेळेस विमानातील सर्व दिवे चालू करून, खिडक्या उघडण्यास सांगतात. कारण असे की, प्रवाशांनी झोपेतून उठावे किंवा जागे राहावे. ही झोपण्याची किंवा जागण्याची वेळ, पोहोचण्याच्या ठिकाणाशी (Destination)  अशी मिळती-जुळती असते की तिथे पोहोचल्यावर प्रवाश्यांना Jetlag येऊ नये. काही प्रवासी मात्र विमानात पूर्ण वेळ झोपलेले मी पहिले आहेत. किती सुदैवी!
लहान मुले मात्र ह्यातील काही जुमानत नाहीत. पर्यायाने पालकांनाही त्यांच्याप्रमाणे वागावं लागतं. तशीच गोष्ट विमानात झोप न येणाऱ्यांची! त्यांना Jetlag शिवाय पर्याय नाही. 🙂
 
एकूण काय मायदेशाला जाऊन, मस्त ट्रीप झाल्यावर, दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायला लागणारयांसाठी Jetlag हि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. Jetlag जाण्यासाठी तसा उपाय काही नाही- ‘दिवसा जागे राहणे/ तसा प्रयत्न करणे आणि रात्री झोपणे/ झोपण्याचा प्रयत्न करणे”