दशम ग्रह

दशम ग्रह -संपदा म्हाळगी-आडकर ७/१०/१०
 
दशम ग्रह! नाही, नाही मी एरिसबद्दल बोलत नाहीये. मी बोलतेय दशम ग्रह अर्थात जावई! परवा माझ्या असं लक्षात आलं की, जावयाच्या जातीला स्थळ, काल, जन्म, भाषा, संस्कृती ह्या कोणत्याही गोष्टीने काही फरक पडत नाही. बर घडलंही तसंच! ऑफिसमधल्या कोणाची तरी सासू घरी राहायला येणार होती आणि थोडे-थोडके नाही २ महिने!
 
सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुनेला सासूबरोबर रहायची फार वेळ येत नाही. तश्यात जावयाने सासू बरोबर राहण्याचे प्रसंग तर विरळाच! म्हणजे ट्रीप वगैरे छोट्या दौऱ्यात जावयाने सासूच्या समवेत काढलेला वेळ ह्यात धरलेला नाही. (ट्रीप मध्ये ‘पडणारं तोंडावर तोंड’ हे रोज ‘पडणाऱ्या तोंडावर-तोंड’ पेक्षा वेगळं असतं.) त्यामुळे “घरी सासू राहायला येणार” ह्याचं टेन्शन जसं सुनेला येऊ शकतं तसं ते जावयालाही येऊ शकतं.
 
तसंच काहीसं माझ्या ऑफिसमधल्या एका महाशयांचा झालं होतं. बर आता हे महाशय आहेत चीनी, चाळीशीतले, उच्चशिक्षित पण ह्या सगळ्याचा, त्यांच्या जावई स्वभावाला काही फरक पडत नाही. त्यांचं, “आज सासू-सासरे चीनमधून येणार आहेत व आता २ महिने राहणार आहेत. मला घरी जाऊ नये असं वाटतंय”, हे सांगताना झालेलं वाकडं तोंड पाहून सगळ्यांना हसू आलं. तेही गमतीत अतिशयोक्ती करताहेत हे सगळ्यांना माहित होतं. सर्वांनी आपापले अनुभव कथन करायला सुरुवात केली. भौगोलिक अंतरामुळे, थोड्या थोड्या दिवसांसाठी येऊन राहणं कसं शक्य नाही आणि परवडत नाही असा सूर भारतीय आणि चीनी लोकांनी आळवायला सुरुवात केली. ‘मला माझ्या सासूबरोबर राहणे कसे अशक्य आहे’, ह्याचे किस्से गोरी पुरुष मंडळी रंगवून सांगायला लागली. (“माझे सासू सासरे २ महिने राहायला आले तर मी काय माझी बायकोही रडेल!”, अशीही टिप्पणी एका गोऱ्याने केली.)
एकूणच “बायकोला झेलतोय ते काही कमीय? त्यात अजून भर…”, असा सर्वांचा रोख होता हे आम्हा (सुज्ञ) बायकांच्या लक्षात आलं होतं तोपर्यंत!
माझी एक भारतीय सहकारी म्हणाली, घरच्या बागेत असलेल्या टूल-शेडकडे बोट दाखवून तिचा नवरा मुलाला “ये तुम्हारी नानीका घर है|” असं शिकवतो. (मुलाची नानी म्हणजे तिची आई, नवऱ्याची सासू) ‘आई आली आणि तिच्यापुढे नातवाने सगळं सोडून, बरोबर तेच सांगितलं तर काय होईल?’, असं तिला टेन्शन! मग सगळ्या बायकांनी मिळून त्यांना सासू (बायकोची आई) कशी चांगली असते आणि जावयाचे लाड करते. ती जावयाला कशी निरनिराळ्या डिशेस खायला घालते वगैरे.. सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या संभाषणावरून एक जाणवलं,
सासूचे किस्से किंवा गॉसिप मन लावून सांगण्याच्या बाबतीत, पुरुष बायकांचा हात नक्कीच धरू शकतील. 
मगाचच्या चीनी महाशयांना, त्यांची बॉस, “सासू-सासऱ्यांना एअरपोर्टवर आणायला जा” म्हणून सुचवत, चिडवत होती. ‘ज्युरी ड्युटी’ च्या नावाखाली, महाशयांनी एअरपोर्टवर न जाण्याची सवलत बायकोकडून मिळवली होती. पण ‘ज्युरी ड्युटी’ संपल्यावर एअरपोर्टवर न जाता, महाशय ऑफिसमध्ये हजर! त्यावरून सर्वांनी त्यांना परत चिडवले. कसेबसे बॉसने ४ वाजता त्यांना ऑफिसातून पिटाळले. बर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बॉयलर दुरुस्तीला माणूस यायचा होता म्हणून “(सासू सासरे घरी असताना) १/२ दिवस घरून काम करावे लागणार!” ह्या कल्पनेने ते दु:खी होते.  बॉसने जाताना “उद्या पूर्ण दिवस घरूनच काम करा, ऑफिसला येऊ नका” अशी सक्त ताकीद दिली. महाशयांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
 
घरी येऊन ही गम्मत मी नवऱ्याला सांगितली तर तो म्हणे, “हो साहजिक आहे! तुझी आई इकडे ३ महिने आली होती तेंव्हा सगळे माझ्या बरोबर sympathize करत होते”, “तुझ्या आईला सोडायला एअरपोर्टला चाललो होतो तेंव्हा मला मार्क म्हणाला, ‘Mother-in-law leaving… What a relief! after you drop her off, go to a bar and have 3-4 shots of taquila! Believe me it works!’ (सासू परत चाललीय काय सुख आहे! एअरपोर्टवर सोडून आलास की बार मध्ये जाऊन टकीलाचे ३-४ शोट्स लाव. विश्वास ठेव, मस्त लागू पडतं) (खरं सांगायचं तर, मार्कचं जरा चुकलंच! टकीला नवऱ्याने नाही बायकोने घ्यायला हवी कारण नवऱ्याची सासू विमानात बसलीय पण बायकोची सासू घरी होती ना! टकीला टाकीत पडली कि सगळी विमानं हलकी होतात…)
थोडक्यात काय जावई ह्या दशम ग्रहाचं स्थान प्रत्येक सासूच्या पत्रिकेत जरी निराळं असलं तरी ह्या ग्रहाची चाल मात्र कायम तिरकीच!
 
Advertisements

लिपस्टिक

लिपस्टिक -संपदा म्हाळगी-आडकर ५/२९/१०
 
मुली आणि नटणं-मुरडणं हे समानार्थी शब्द असल्याचं मान्य करण्यास कोणाची हरकत नसावी. माझ्या बाबतीतही ते खरं आहे. लहानपणी म्हणजे अगदी ४-५ वर्षाची असताना मला झगमग कपडे, उंच टाचेच्या चपला, मेक-अप, नटणं-मुरडणं ह्याचं विलक्षण आकर्षण होतं. माझ्या मामीला ह्या गोष्टींचं ज्ञान आणि आवड असल्याने ती माझी रोल-मॉडेल होती.
 
शनिवार-रविवार आजोळी राहायला गेल्यावर, आजीच्या खाऊचं, मामाच्या पॉट आईस्क्रीमचं जेवढं कौतुक असायचं, त्याहीपेक्षा मामी आता स्वत:चं कशी आवरते हे पाहायला मिळायचं कौतुक जास्त! मामीकडून कर्लर्स लावून घेऊन सरळसोट केस कुरळे करून घेऊन मजा यायची. तिच्या उंच टाचेच्या sandals मी कितीवेळा घातल्या असतील देव जाणे. उंच टाचेच्या चपला त्याकाळात घ्यायला आणि घालायला आम्हाला सक्त मनाई होती. त्यामुळे शनिवार-रविवार मामाकडे भातुकली खेळताना मामीचे उंच टाचेचे sandals घालून, त्या घालून धडपडून आम्ही हौस भागविली.

लहानपणी लिपस्टिक ह्या गोष्टीने मला जबरदस्त भुरळ घातली होती. माझे लिपस्टिक विषयीचे किस्से, आमच्या घरात खूप फेमस आहेत. माझ्या वडिलांना एवढ्या लहान मुलींनी नटणे अजिबात मान्य नव्हते. लिपस्टिक लावण्यास त्यांचा जबरदस्त विरोध होता. आता पालकाच्या भूमिकेतून जाताना माझा stand फारसा वेगळा नाही.

आमच्या घराशेजारी असलेल्या मंदिरात उत्तर भारतीय पुजारी होते. त्यांच्या नवपरिणीत बायकोलासुद्धा नटण्याची फार हौस! त्यामुळे विकडेजमध्ये ती माझे शिक्षण घेत असे. ओठाला ती लावत असलेली एक शेंदरी पावडर, लिपस्टिकपेक्षा वेगळी पण लिपस्टिकचा इफेक्ट देणारी होती. न राहवून मी, एकदा तिच्याकडून ती लावून घेतली. घरी आल्यावर बाबांनी मला तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत बंद करून ठेवलं होतं. मला कोंडून बाबा स्वत: तेवढा वेळ खोलीच्या बाहेर बसले होते हे मला माहित होतं. माझ्या कृत्याचं मला काही वाईट वाटलं नाही पण त्यानंतर मी तसं कधी केलं नाही. आता ते सगळं आठवून हसू येतं.

असाच अजून एक किस्सा म्हणजे माझ्या मामीच्या लिपस्टिकचा! मामीला लिपस्टिकची फार हौस. रोज ऑफिसला जाताना ती लिपस्टिक लावायची. तिची एक आवडती, गडद रंगाची, भारीची लिपस्टिक मला खूप आवडायची पण ती कधीही लावायला मिळणार नाही हे मला माहित होतं. पण ती कशी लावतात हा फील घ्यायची हौस ना! मग काय, माझ्या ४ वर्षांच्या मेंदूला एक कल्पना सुचली. मी सरळ ती लिपस्टिक उचलून खिडकीच्या जाळीवर फासली. मामीची अर्धी-एक लिपस्टिक मी संपवली असावी त्या दिवशी. माझी आठवण म्हणून मामा मामीने ती जाळी कधीही न धुता, ती खूण तशीच ठेवली होती कित्येक वर्षे!
 
मोठे झाल्यावर, समजायला लागल्यावर, कमवायला लागल्यावर आपल्याला हवे ते घेणे शक्य आणि प्राप्त होते. पण आता काय करावे आणि करू नये ह्याची जराशी अक्कलही आली. बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर जास्त भर पडू लागला. लिपस्टिकला माझा विरोध अजूनही नाही पण कोणत्या वयात लावावी आणि कोणत्या वयात लावू नये ही मते आता ठाम आहेत.

हौसे, नवसे आणि गवसे

हौसे, नवसे आणि गवसे – संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१० 

माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत ३ प्रकारची माणसं असतात, हौसे, नवसे आणि गवसे!

हौसे म्हणजे जत्रेची हौस भागवण्यासाठी आलेली हौशी मंडळी. जत्रा “कोणत्या देवाची आहे” ह्याचं ह्या लोकांना फार देणं-घेणं नसतं. हे लोक जत्रेला फक्त एन्जॉय करायला येतात.हि मंडळी टोळक्या-टोळक्याने फिरताना दिसतात.जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी साधारण ४०-४५% हीच मंडळी असतात. (संत्या, गन्या, पक्या कॅटेगरी)
दुसरे नवसे म्हणजे नवस फेडायला आलेली भाविक मंडळी.हि मंडळी आपल्या सहकुटुंब सहपरिवार आलेली असतात. बोकडाचा बळी देणारी, पोराला पायावर घालणारी, पायऱ्यांवर लोळण घेणारी किंवा भंडाऱ्यात न्हाऊन निघणारी मंडळी हीच.
आणि तिसरा प्रकार गवसे म्हणजे ‘कुठे काही गावतंय का?’ ‘कुठे हात मारता येतोय का?’ असं पाहणारी भुरटी चोर मंडळी. जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी १०% प्रमाण ह्याच लोकांचं.

मला ब्लॉग लिहून फार काळ झाला नाहीये. माझा ब्लॉग विशेष/ पंचतारांकित आहे अशातली गत नाही. ह्या क्षेत्रातल्या मातबर मंडळींच्या मानाने माझा ब्लॉग ‘कीस झाडकी पत्ती! पण असं असून, ब्लॉगिंग बाबतीत “हौसे, नवसे आणि गवसे” हा अनुभव प्रकर्षाने येऊ लागला आहे. ढोबळ ठोकताळा असा-

ब्लॉगला भेट देणारे हे जर जत्रेला येणारं पब्लिक धरलं, तर ह्यात

६० ते ७०% पब्लिक हे हौशी. त्यांना ‘कोणी’ ‘काय’ आणि ‘कसं’ लिहिलंय ह्याचं त्यांना सोयर-सुतक नसतं. ही मंडळी ब्लॉगर्सच्या कोणत्याश्या साईटवरून, सुरुवातीच्या ४ ओळी वाचून, तुमच्या ब्लॉगवर येतात. विषय, विचार आणि अभिव्यक्ती ह्यांच्याशी त्यांना काही घेणं नसावं. “ते सगळा ब्लॉग वाचतात तरी का?” हा मला न सुटलेला प्रश्न आहे. ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा. सगळं एन्जॉय करण्यात (थोडक्यात वाचण्यात आणि वाचनीय शोधण्यात) हे लोक इतिकर्तव्यता मानत असावेत.

आता नवशांबद्दल बोलू. हे नवसे म्हणजे तुमच्या ब्लॉगला नियमित भेट देणारे, तुमच्या नव्या लेखनासाठी नोंद करणारे, कॉमेंट्स देणारे आणि भविष्यातील कॉमेंट्सला सबस्क्राइब करणारे. कधी कधी लिहिलेलं आवडल्यास/ न आवडल्यास तसं सांगणारे. हे लोक ब्लॉगिंगबाबतीत बरेच सिरिअस असतात (अथवा तसे भासवतात.). असे वाचक साधारण २५-३०%. (ब्लॉगला देवाचे स्थान देण्याचा हा प्रयत्न नाही.)

उरलेले गवसे, हे खऱ्या अर्थी “कुठे काही मिळतंय का?” ह्या शोधार्थ भटकणारे. म्हणजे “आपल्या ब्लॉगवर काहीतरी लिहिण्यासाठी, दुसऱ्याच्या ब्लॉगवर काही मिळतंय का?” 😉 हे लोक म्हणजे, काही न मिळाल्यास वर्तमानपत्रातील बातम्या आपल्या भाषेत परत पोस्ट करणारे, स्वत:च्या ब्लॉगवर दुसऱ्याचे लेखन पोस्ट करून, उचित श्रेयही न देणारे अथवा “हे लिखाण माझे नाही” हे कधीही मान्य न करणारे महाभाग!  बर ह्या लोकांमध्ये काही संकेतस्थळ (वेबसाईट्स) पण आहेत. indiarss.net, Topsy.com सारख्या! अशा गवश्यांचे प्रमाण साधारण ५-७%. (दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)

तर शेवटी काय जत्रेत सगळ्या प्रकारचे लोक असणारच! आपण आपली ब्लॉगिंग जत्रा चालूच ठेवायची आणि ब्लॉग्जचा उरूसही! हेरंबच्या भाषेत जय ब्लॉगिंग!

दारू आणि विनोद

दारू आणि विनोद -संपदा म्हाळगी-आडकर ०७/०५/२०१०

दारू…… मदिरा, ड्रिंक्स, अल्कोहोल कितीही वेगवेगळी नावे दिली तरी दारू ही दारूच! कुणाची काचेच्या ग्लासातली, कुणाची स्टीलच्या पेल्यातली. कुणाची चपटीतली, कुणाची बाटलीतली. कुणाची पेगातली, कुणाची क्वार्टरमधली, कुणाची खम्ब्यातली एवढाच काय तो फरक!

अनेक जणांच्या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असलेली दारू…. दारूची आणि दारू ह्या विषयाची मी आग्रही नाही कि पुरस्कर्ती नाही. कोणत्याही दारू विक्रेत्या कंपनीची प्रवक्ताही नाही. पण दारू व त्यातून निर्माण होणारे विनोद हे कोणीही दारू न पिताही एन्जोय करू शकतो. ह्या तिसऱ्या कॅटेगरीतली मी आहे. दारू आणि विनोद दोन्हीमध्ये नशा आहे हे एकच साम्य. असाच काहीसा दारूनिर्मित खुसखुशीत विनोद टीव्हीवर पाहायला मिळाला तो इथे शेअर करत आहे. ‘फू बाई फू’ मधला हा तुकडा पाहून, खूप दिवसांनी खळाळून हसू आलं!  अभिनेत्याच्या अदाकारीला दाद द्यावी लागेल. बऱ्याच वर्षांत प्रथमच पाहिलेला विश्वासार्ह दारुडा वैभव मांगले ह्यांनी अप्रतिम रंगवला आहे.

सिगारेटच्या प्रत्येक जाहिरातीखाली जसे “स्मोकिंग इज इन्जुरिअस टू हेल्थ” असं लिहितात, तसं आता अमेरिकेत दारूच्या जाहिरातीनंतर “प्लीज ड्रिंक रीस्पोन्सिबली” ही ओळ दाखवायला लागले आहेत. अतिशय चांगला उपक्रम आहे, म्हणजे त्याचा उपयोग किती होतो कोण जाणे. (हे सिनेमानंतर राष्ट्रगीत लावल्यासारखंच आहे. राष्ट्रगीत लावण्याचा उपक्रम चांगला पण लोक थांबतात का हो राष्ट्रगीतासाठी?) वैभव मांगले ह्यांच्या ह्या अभिनयानंतर “सो मच लाफिंग कॅन बी टूsss बेनेफ़िशिअल टू हेल्थ!” अशी टीप लिहावी लागेल.

अथवा

http://www.youtube.com/watch?v=r0I-wcWo-qA

मिसेस/मिस्ट्रेस

मिसेस/मिस्ट्रेस -संपदा म्हाळगी-आडकर ६/३०/१०  

नचिकेतने आज ‘मिस्टर काय करतात?’ म्हणून पोस्ट टाकली आणि डोक्यात शब्द आला तो ‘मिसेस’. मिस्टर आणि मिसेस हे शब्द बऱ्यापैकी जोडीने वापरले जातात. भारतात मिसेस हा शब्द सरळसोट बायको ह्याअर्थी वापरला जातो. चारचौघात बायकोला उद्देशून तिचं नाव घ्यायचा जमाना आत्ताचा. त्या आधीची पिढी बायकोला चारचौघात “माझी मिसेस” असंच उद्देशत असे. त्यात चूक काहीच नाही, कारण शब्दकोशात मिसेस (स्पेलिंग Mistress) ह्या शब्दाचा अर्थ married woman (लग्न झालेली बाई) हाच दिलेला आहे.

मी अमेरिकेत आले तेंव्हा घरी असताना TV ने माझी सोबत केली. माझ्या अतिरिक्त आणि बऱ्यापैकी अनावश्यक ज्ञानात भरही टाकली. अमेरिकन TV वर नात्यांवर भाष्य करणारे (भाष्य कसले.. त्यांची खिल्ली उडवणारे), नात्यांमधले दुरावे कमी करण्याचा प्रयत्न करणारे (तसा दिखावा करणारे) असे बरेच कार्यक्रम असतात. आणि दुर्दैवाने प्रसिद्धही असतात. तेंव्हा फावल्या वेळात आणि TV वर अजून पाहण्यासारखे काही नसल्यास तो पाचकळपणा मी पाहत असे. 

त्या कार्यक्रमांत, सहसा २ बाया आणि १ पुरुष किंवा २ पुरुष आणि १ बाई असे येतात आणि कचाकचा भांडतात. विषय काय असणार हे तुम्हाला कळलंच असेल, “विवाहबाह्य/नातेबाह्य संबंध”! हे लोक (म्हणजे कार्यक्रमात सहभागी झालेले)  नेहमी आपल्या बायकोला वाईफ म्हणत, which is OK. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण ‘त्या’ दुसऱ्या बाईला म्हणजे ‘पती पत्नी और वोह’ मधली ‘वोह’, थोडक्यात ‘ठेवलेल्या बाईला’ ते Mistress (मिस्ट्रेस) म्हणत. (आता खाल्ल्या का आमच्या इंग्रजी ज्ञानाने गटांगळ्या? तर्खडकर वगैरे तर लोटांगणे घालायचे ह्यांच्यापुढे!) मला बापुडीला प्रश्न पडायचा हा बायकोला मिसेस/मिस्ट्रेस का म्हणत नाहीये? बायकोला सोडून तिसरीलाच का मिस्ट्रेस म्हणतोय म्हणून मला स्ट्रेस यायचा. 🙂 पुढे पुढे कळलं कि खरी गोची काय आहे. थोडक्यात काय आपल्याकडची ‘लग्नाची बायको’ इकडे ‘ठेवलेली बाई’ होते.

ती

ती -संपदा म्हाळगी-आडकर ६/२७/१०

आज खूप वर्षांनी मराठी नाटक पाहायचा योग आला. युएसमध्ये मराठी नाटक पाहायला मिळणं हे काहीसं दुर्मिळच. मराठी नाटकं एकतर खूप कमी वेळा इकडे येतात. त्यामुळे मिस करणं शक्यच नव्हतं. नाटक होतं, “ती”. “ती” ऐकल्यावर नाटक स्त्रीला केंद्रबिंदू ठेवून केलेलं असणार हे उघड होतं. ग्रुपमधल्या मैत्रिणींनी एकत्र जाऊन नाटक पाहायचं ठरवलं.

 “ती”, सादरकर्त्या वंदना गुप्ते आणि राणी वर्मा. हे जाहिरातीत जेंव्हा वाचलं तेंव्हा सॉलिड उत्सुकता निर्माण झाली. वंदना गुप्ते हे नाव ऐकल्यावर “जायचंच” असं ठरवलं. मराठीतली “फटाकडी” ह्या वर्गात बसणारी आणि तरीही एक शालीनता जपलेली हि गुणी अभिनेत्री बहुतेक सगळ्यांना आवडते. म्हणलं, राणी वर्मा आहे म्हणजे गाणं असणारच हे उघड होतं.

तिकीट काढली. नाटक अगदी हाऊसफुल होतं. सुरुवात एकदम झकास झाली. वंदना गुप्तेच ती! खरंतर त्यांना एकेरी बोलवण्याइतकी माझी लायकीही नाही पण वयही नाही. पण त्यांच्या त्या उस्फुर्त आणि लाइव्हली अभिनयाने त्यांनीच ही अंतरं कुठेतरी कमी केल्यासारखी वाटतात. सुरुवातीला प्रयोगाने मनाची पकड घेतली. स्त्री, तिचं व्यक्तिमत्व, तिची भावुकता, तिचं प्रेम, तिचं अनेक नात्यातून होणारं transition सगळं कुठेतरी पटायला लागलं. बाईचा म्हणजे “ती”चा जन्म आणि तिच्यातून अजून एका “ती”चा जन्म हे सगळं खूप भावून गेलं. माझ्या स्वत:मधल्या “ती”ला स्पर्शून गेलं.

संहिता, काहीश्या जागा सोडल्या तर उत्तम आकार घेत होती. प्रयोगात सगळं एकदम छान चालू होतं. तर एकदम शेवट आला. एकदम चाचपडायला झालं. शेवट काहीसा घाई-गडबडीत आणि tentative झाल्याचा फील आला. नाटक अपूर्ण राहिल्यासारखे वाटून प्रेक्षागृहाच्या बाहेर पडलो. अजून थोडासा वेळ घेऊन सविस्तर शेवट लिहायला हरकत नव्हती. हे माझे एक वैयक्तिक पुणेकरी मत!
 
प्रयोगात योग्य ठिकाणी योग्य अशी गाणी आणि कथाकथनही होतं. काही गाणी चलत्चित्र स्वरुपात तर काही राणी वर्मा ह्यांनी स्वत: गायलेली. राणी वर्मा ह्यांचे गाणे मी ह्यापूर्वी ऐकले आहे. त्यांचा आवाज आज बसल्यासारखा वाटत होता. काही गाणी प्रत्येकाच्या लग्नाच्या व्हिडीओ कॅसेटमध्ये असणारी टिपिकल होती. पण त्यात निर्मात्यांचा दोष नाही. त्यांपेक्षा अथवा तितक्या अवीट गोडीची गाणी त्यानंतर झाली नाहीत हीच खंत. पूज्य माणिक वर्मा ह्यांचा स्वर हिंदोळा समर्पक वापरामुळे मन हेलावून गेला. 
 
मला सगळ्यात जाणवला तो दोन्ही भगिनींचा समंजसपणा. इकडच्या हौशी कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींशी त्या विनातक्रार (आणि विना attitude) मिळतं-जुळतं घेत होत्या. त्यांना स्टेजवर करायला लागलेल्या तडजोडीत, भपका किंवा मोठेपणाचा लवलेशही दिसला नाही. ह्या उलट एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवलेल्या आणि आता इथे राहणाऱ्या काही अभिनेत्री, स्वत:ला “Odd-man-out” दाखवण्यात समाधान मानतात. ह्याबद्दल एक स्वतंत्र पोस्ट होईल.
 
एकूण “ती” नाटकाचा गाभा चांगला आहे. संदेशही कालानुरूप आहे. पण संहिता अजून ताकदीची करायला हवी. चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीला उतरायचे हा निकष असल्यास, बदल अपरिहार्य आहेत. प्रयत्न उत्तम!

जेजे वॉकिंग

जेजे वॉकिंग -संपदा म्हाळगी-आडकर ६/९/१०
 
२ आठवड्यांपूर्वी आमच्या भारतातल्या टीम मधला एक सहयोगी इकडे युएसमध्ये आला. तसा तो या आधीही इथे येऊन गेला आहे त्यामुळे इथल्या गोष्टींना बऱ्यापैकी सरावला आहे. त्याच्या, जिभेला पीळ पाडणाऱ्या दक्षिणात्य नावाने इकडे बऱ्याच गोऱ्यांची विकेट घेतल्याने, आल्याच्या काही दिवसातच त्याचे नव्याने नामकरण करण्यात आले. “जेजे”! कायम हसतमुख आणि happy-go-lucky असल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे.
 
आताही हि एवढी प्रस्तावना करण्याचे कारण हे की आज जेजे काहीसं बाहेरचं काम करून, रस्ता ओलांडून, ऑफिसमध्ये परत येत होता. भारतीय पद्धतीने, दोन्ही बाजूला बघून, गाडी येत नाही हे पाहून त्याने रस्ता ओलांडला खरा पण पलीकडे पोहोचल्यावर त्याच्या स्वागतास्तव अमेरिकी मामा (पोलीस) थांबला होता. पोलिसाने थांबवून शांतपणे चौकशी केली आणि नंतर “जे वॉकिंग” केल्याबद्दल १६५ अमेरिकी डॉलर्सचे तिकीट हातात देऊन निघून गेला. हा एकूणच प्रकार जेजे साठी नवा आणि तेवढाच धक्कादायक होता. ऑफिस मध्ये येऊन त्याने आम्हाला जेंव्हा सांगितलं, तेंव्हा थोडे वाईट वाटलं. भारतीय खिशाला मिळालेला १६५ अमेरिकी डॉलर्सचा दणका पाहून काही लोक हळहळले सुद्धा! जेजे मात्र शांत होता. नेहमीसारखा हसत नव्हता एवढेच. ते तिकीट न्याहाळत असतानाच, आपण पोलिसाला चुकून चुकीचा पत्ता दिल्याचा साक्षात्कार त्याला झाला.
 
अमेरिकेत रस्ता ओलांडताना, चौकात आखलेल्या २ पांढऱ्या पट्ट्यांमधूनच रस्ता ओलांडावा लागतो. काहीसं आपल्याकडे असलेल्या झेब्रा क्रोसिंग सारखंच! पट्ट्यांबरोबर, चौकामध्ये सिग्नलच्या खांबावर हाताच्या कक्षेत एक बटन असतं. हे बटन दाबून, चालण्याचा सिग्नल मिळाला तरच रस्ता ओलांडायचा असतो. अश्या पद्धतीने रस्ता न ओलांडल्यास अथवा अवैध पद्धतीने रस्ता ओलांडल्याबद्दल किंवा पदपथावरून न चालल्यास किंवा तत्सम दिरंगाईबद्दल पोलीस दंडाचे तिकीट देतात. सकाळच्या ट्रेन पकडण्यासाठी गडबडीत, शोर्टकट घेणारे, ‘जे वॉकिंग’ करून आपल्या खिशाला शोर्ट कट मारून घेताना मी अनेकवेळा पाहिलं आहे.
 
जेजेने मात्र आपल्या सवयीने मधून रस्ता ओलांडला. आम्हाला वाईट वाटलं, आम्ही त्याला ह्या नियमाविषयी सांगायला हवं होतं. पण तेवढ्यात एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने त्याच्या एका तिकिटाचा किस्सा सांगितला. मग अजून काही जणांनी आपले खमंग किस्से सांगितले. मिळालेले “तिकीट कसे टोलवता येईल” वगैरे सल्ले पण झाले.  मग भारतातल्या पोलीस, ट्राफिक आणि जे वॉकिंग(?)बद्दल चर्चा झाली. काही क्षण हसण्यात गेले. एव्हाना जेजे पण रंगात येऊन भारतातले किस्से सांगत होता. त्याचा खुललेला मूड पाहून एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने जाहीर केलं, “आज पासून हे ‘जे वॉकिंग’ नसून ‘जेजे वॉकिंग’ आहे”. सगळे मनमुराद हसले, जेजेसुद्धा!  एकूण काय जेजेला ‘जे वॉकिंग’ बद्दल तिकीट मिळालं आणि आम्हाला काही आनंद क्षण! उद्या अजून एकजण येणार आहे भारतातून, त्याला आल्या आल्या सांगायला हवं ‘जेजे वॉकिंग’ नव्हे ‘जे वॉकिंग’ बद्दल! कदाचित दोन्हीबद्दल!