Posts from the ‘उहापोह’ Category

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना -संपदा म्हाळगी-आडकर ७/२१/१० 
 
मी सचिन तेंडूलकर ह्या व्यक्तीची निस्सीम चाहती आहे. व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसाईक आयुष्यात त्याने एक सुंदर बॅलन्स सांभाळला आहे. त्याच्या चरित्राविषयी जेंव्हा आंतरजालावर वाचलं तेंव्हा मन संमिश्र भावनांनी भरून गेलं.
 
सचिनने चरित्र लिहिणं चांगलं आहे. सचिनचं चरित्र खूप जणांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. ह्यात कोणतेही दुमत नाही. पण ह्या चरित्राच्या १० प्रती अश्या असतील ज्यांत एका पानात सचिनचे रक्त मिसळले असेल. (रक्त म्हणल्यावर पहिल्यांदा अंगावर काटा आला.) ह्या १० प्रती, प्रत्येकी ७५००० डॉलर्सला (बाजारभावाप्रमाणे ३५ लाख २५ हजार रुपये) विकल्या जातील. हा सर्व पैसा सचिनने उभारलेल्या धर्मादाय संस्थेला दिला जाईल. व ह्या पैशातून शाळा उभारली जाईल. Sounds great! (हि शाळा कोणासाठी? म्हणजे गोरगरिबांसाठी आहे का हे स्पष्ट केलेले नाही. Hopefully हि शाळा गोरगरीबांसाठी असावी, तिचा व्यवसाय होऊ नये.)
 

माझ्या मनातील पहिली भावना:
हे रक्त त्याने दान केलं असतं तर? कदाचित कोणाचे तरी प्राण वाचतील.

माझ्या मनातील दुसरी भावना:
पण रक्तदान केल्यास त्याचा फायदा एका व्यक्तीला होईल.

माझ्या मनातील तिसरी भावना:
रक्तादानाऐवजी हि पुस्तके विकली आणि मिळालेल्या पैशातून म्हणल्याप्रमाणे शाळा उभारली तर त्याचा फायदा अनेक मुलांना होईल.

माझ्या मनातील चौथी भावना:
तो रक्तदान करतही असेल कदाचित. तो भविष्यात पुन्हा करू शकतो.
 
माझ्या मनातील पाचवी भावना:
सचिनचा रक्तदान/ रक्तस्वाक्षरीयुक्त पुस्तके ह्या निर्णयाने परिणाम होणाऱ्या जीवांचे गुणोत्तर (ratio) बघता, त्याचा निर्णय उजवा वाटतो.
 
माझ्या मनातील सहावी भावना:
मग त्याने भविष्यात रक्तादानाऐवजी पुस्तकेच काढावी का? हे त्याच्या रक्ताचे व्यावसाईकीकरण होईल का?
 
पहिल्या प्रश्नाचे उत्तर सचिन देऊ शकेल. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही सापडले नाही. दोन्ही प्रश्न अनुत्तरीत आहेत.
Advertisements

हौसे, नवसे आणि गवसे

हौसे, नवसे आणि गवसे – संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१० 

माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत ३ प्रकारची माणसं असतात, हौसे, नवसे आणि गवसे!

हौसे म्हणजे जत्रेची हौस भागवण्यासाठी आलेली हौशी मंडळी. जत्रा “कोणत्या देवाची आहे” ह्याचं ह्या लोकांना फार देणं-घेणं नसतं. हे लोक जत्रेला फक्त एन्जॉय करायला येतात.हि मंडळी टोळक्या-टोळक्याने फिरताना दिसतात.जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी साधारण ४०-४५% हीच मंडळी असतात. (संत्या, गन्या, पक्या कॅटेगरी)
दुसरे नवसे म्हणजे नवस फेडायला आलेली भाविक मंडळी.हि मंडळी आपल्या सहकुटुंब सहपरिवार आलेली असतात. बोकडाचा बळी देणारी, पोराला पायावर घालणारी, पायऱ्यांवर लोळण घेणारी किंवा भंडाऱ्यात न्हाऊन निघणारी मंडळी हीच.
आणि तिसरा प्रकार गवसे म्हणजे ‘कुठे काही गावतंय का?’ ‘कुठे हात मारता येतोय का?’ असं पाहणारी भुरटी चोर मंडळी. जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी १०% प्रमाण ह्याच लोकांचं.

मला ब्लॉग लिहून फार काळ झाला नाहीये. माझा ब्लॉग विशेष/ पंचतारांकित आहे अशातली गत नाही. ह्या क्षेत्रातल्या मातबर मंडळींच्या मानाने माझा ब्लॉग ‘कीस झाडकी पत्ती! पण असं असून, ब्लॉगिंग बाबतीत “हौसे, नवसे आणि गवसे” हा अनुभव प्रकर्षाने येऊ लागला आहे. ढोबळ ठोकताळा असा-

ब्लॉगला भेट देणारे हे जर जत्रेला येणारं पब्लिक धरलं, तर ह्यात

६० ते ७०% पब्लिक हे हौशी. त्यांना ‘कोणी’ ‘काय’ आणि ‘कसं’ लिहिलंय ह्याचं त्यांना सोयर-सुतक नसतं. ही मंडळी ब्लॉगर्सच्या कोणत्याश्या साईटवरून, सुरुवातीच्या ४ ओळी वाचून, तुमच्या ब्लॉगवर येतात. विषय, विचार आणि अभिव्यक्ती ह्यांच्याशी त्यांना काही घेणं नसावं. “ते सगळा ब्लॉग वाचतात तरी का?” हा मला न सुटलेला प्रश्न आहे. ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा. सगळं एन्जॉय करण्यात (थोडक्यात वाचण्यात आणि वाचनीय शोधण्यात) हे लोक इतिकर्तव्यता मानत असावेत.

आता नवशांबद्दल बोलू. हे नवसे म्हणजे तुमच्या ब्लॉगला नियमित भेट देणारे, तुमच्या नव्या लेखनासाठी नोंद करणारे, कॉमेंट्स देणारे आणि भविष्यातील कॉमेंट्सला सबस्क्राइब करणारे. कधी कधी लिहिलेलं आवडल्यास/ न आवडल्यास तसं सांगणारे. हे लोक ब्लॉगिंगबाबतीत बरेच सिरिअस असतात (अथवा तसे भासवतात.). असे वाचक साधारण २५-३०%. (ब्लॉगला देवाचे स्थान देण्याचा हा प्रयत्न नाही.)

उरलेले गवसे, हे खऱ्या अर्थी “कुठे काही मिळतंय का?” ह्या शोधार्थ भटकणारे. म्हणजे “आपल्या ब्लॉगवर काहीतरी लिहिण्यासाठी, दुसऱ्याच्या ब्लॉगवर काही मिळतंय का?” 😉 हे लोक म्हणजे, काही न मिळाल्यास वर्तमानपत्रातील बातम्या आपल्या भाषेत परत पोस्ट करणारे, स्वत:च्या ब्लॉगवर दुसऱ्याचे लेखन पोस्ट करून, उचित श्रेयही न देणारे अथवा “हे लिखाण माझे नाही” हे कधीही मान्य न करणारे महाभाग!  बर ह्या लोकांमध्ये काही संकेतस्थळ (वेबसाईट्स) पण आहेत. indiarss.net, Topsy.com सारख्या! अशा गवश्यांचे प्रमाण साधारण ५-७%. (दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)

तर शेवटी काय जत्रेत सगळ्या प्रकारचे लोक असणारच! आपण आपली ब्लॉगिंग जत्रा चालूच ठेवायची आणि ब्लॉग्जचा उरूसही! हेरंबच्या भाषेत जय ब्लॉगिंग!

“I am OK” is priceless

“I am OK” is priceless  –संपदा म्हाळगी-आडकर ४/२३/१०
 
पोस्टच्या नावांच्या बाबतीत माझा ‘मधुर भांडारकर’ होत चाललाय बहुतेक! आज पण नाव इंग्रजीच! बर आता पोस्टला सुरुवात!

 

मास्टरकार्डची जाहिरात १ ->
सुंदर पोल्का डॉट फ्रॉक घातलेली छोटी मुलगी धावत जात आहे. आवाज: पोल्का डॉट ड्रेस _ _ $
सगळे समूह फोटोसाठी बसले आहेत, आवाज: नवीन मॉडेलचा कॅमेरा _ _$
फोटो काढला जातो, आवाज: आजीच्या वाढदिवसाला समूह फोटो priceless (अमूल्य), ‘देअर आर समथिंग्ज मनी कान्ट बाय, फॉर एव्हरीथिंग एल्स देअर इज मास्टरकार्ड!’
माझ्या मनातली भावना: जाहिरातकर्त्याने काळजाला हात घातला.
 
मास्टरकार्डची जाहिरात २ ->
चेहरा दिसत नाहीये. कॉफीचा मग कोणीतरी टेबलावर ठेवतंय. आवाज: कॉफी _ _ $
हातातलं पुस्तक उचलून तोच मनुष्य उठून चालू लागलाय, आवाज: नवीन खिळवून ठेवणारं पुस्तक _ _$
हातातलं पुस्तक झपकन खाली नेलं जातं, आवाज: आपण Unzipped आहोत हे कळणं priceless (अमूल्य), ‘देअर आर समथिंग्ज मनी कान्ट बाय, फॉर एव्हरीथिंग एल्स देअर इज मास्टरकार्ड!’
माझ्या मनातली भावना: जाहिरातकर्त्याची विनोदवृत्ती काय सॉलिड आहे.
 
वर्षानुवर्षे आपण मास्टरकार्डच्या जाहिराती पाहत आलो आहे. माझ्या मनाच्या भावनांवरून त्या जाहिराती चांगला परिणाम साधतात असं माझंतरी मत आहे. अलीकडेच मास्टरकार्डची एक नवीन जाहिरात पाहण्यात आली.
मास्टरकार्डची जाहिरात ३ ->
एक जोडपं आणि एक माणूस, एका कड्यावर वेगवेगळे उभे राहून सृष्टीसौंदर्य पाहत आहेत. दोन्ही पुरुषांच्या हातात, एकसारखे कॅमेराज आहेत. एकट्या माणसाला कॅमेरा महाग पडलाय. तो जोडप्याच्या कॅमेराकडे वाकून पाहताना कड्यावरून खाली पडतो.
तो पडत असताना आवाज: औषध _ _$, X-ray _ _$, Chiropractor (फिजिओथेरपिस्ट) _ _$
खाली जाऊन पडलेला माणूस दिसत नाही पण त्याचा आवाज येतो “I am OK” (“मी ठीक आहे”).
आवाज: सारखाच कॅमेरा ३०% कमी किमतीला घेणे priceless (अमूल्य), ‘देअर इज अ स्मार्टर वे टू बाय मास्टरकार्ड मार्केटप्लेस!’ – असं काहीसं. 
 

जाहिरातीचा परिणाम OK. जाहिरातीला जे पोहोचवायचं होतं ते तिने पोहोचवलं का? -“हो, मास्टरकार्ड मार्केटप्लेस वापरून वस्तूंवर सूट मिळेल”. जाहिरातकर्त्याचं काम चोख.

माझ्या मनातली भावना: माणूस खाली पडला आणि तो तिकडून ‘I am OK’  असं सांगतोय, हे priceless (अमूल्य) नाही का?

माणूस खाली पडला. त्याच्या दुखण्यावर होणारा खर्च मोजणे ह्याला एक वेळ आपण विनोदाची झालर समजू. पण ‘तो मनुष्य जोडप्याच्या, स्वस्तात मिळालेल्या कॅमेराकडे बघताना खाली पडला’ म्हणून तो कॅमेरा जिथून (मास्टरकार्ड मार्केटप्लेस) घेतला त्याचे महत्व नमूद करणे, मला फारसे पटले नाही. माणसाचा जीव कधीपण priceless (अमूल्य). जाहिरातकाराने देखील तसेच दाखवायला हवे होते. शेवटी ‘सर सलामत तो पगडी पचास’. जीव राहिलं तरच लोक मास्टरकार्डचा वापर करतील. माणूस पडला आणि काहीतरी आयुष्यभराचं दुखणं लागून राहिलं तर तो महाग कॅमेरा घेतल्याचा दु:ख करणार नाही, कड्यावरून पडल्याचं दु:ख करेल.
 
जगात माणसाच्या जीवाची किंमत कमी व्हायला लागलीय का?