घनव्याकूळ -संपदा म्हाळगी-आडकर ११/१७/१०
आज सकाळी बाहेर धो-धो (नवऱ्याच्या भाषेत रापचिक) पाऊस पडत होता. gas वरचा आल्याचा चहा, पाच मिनिटं पावसात भिजून ये म्हणून सांगत होता. डोक्यात कविता होती ग्रेसची! “ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता…” बाहेरचा धो-धो पाऊस, मनात रिमझिम करत होता. वळणाचं पाणी वळणावर येऊन मार्गस्थ होतं, पण मी रेंगाळत होते एकाच शब्दावर.. “घनव्याकूळ”..
“घनव्याकूळ”.. व्याकूळ मन… घनासारखा ओथंबलेला…. बरसायला व्याकूळ मन….काहीतरी सुचतंय… वाटतंय लिहावसं म्हणून घेतलंय लिहायला… बघता बघता मालिकाच झालीय… त्यातला हा पहिला पाऊस….
घनव्याकूळ – १
“आज कुठून आल्ये मी ह्या सिग्नलला? समदा दिस गेला, दमकी भी गावली नाई. आनी इथली पोरं तर मला हाकून द्यायला लागली. त्यातून ह्यो पाऊस!”, स्वत:च्या नशिबाला कोसत बिंदी कोपऱ्यात बसली होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. कोपऱ्यातच आपलं कृश अंग अजूनच चोरून शक्य तितका आडोसा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. तसं पावसापासून वाचवायला अंगाशिवाय काहीच नव्हतं.
सिग्नलच्या पलीकडे मोठ्या अलिशान दुकानांची रांग होती. दुकानांच्या स्वच्छ चकचकीत काचांवरून पावसाचं पाणी ओघळून वाहत होतं. दुकानातले दिवे, माणसं, कपडे, समान, ती सगळी चकचकीत दुनिया पाण्याबरोबर वाहून जातेय असं वाटत होतं. दुकानाच्या दरवाजात महानगरपालिकेने कित्येक वेळा अतिक्रमण कारवाई करून, काढून टाकलेले छत होतं. अवेळी पावसानं घात केलेले काही जण तिथे खोळंबून थांबले होते.
“पाऊस भी धरून राहिलाय… मीबी जाऊ का तिकडं?”, चकचकीत दुकानाबाहेरच्या छताकडे बघत बिंदीने विचार केला. “पर ह्यो दुकानदार बोलला तर? मागं अशीच थांबल्ये तर एक दुकानदार वसकन अंगावर आला. काय काय ऐकीवलंन मला! मला बाहेर उभी पाहून, ह्यांचं कष्टम्बर य्येत न्हाईत म्हणे. जाऊ दे न राईलं…” मनातला विचार झटकून बिंदी तशीच अवघडून उभी राहिली. अंग थोडं भिजलंच होतं. थंडी वाजत होती.
चौकाच्या टोकाला एक चहाची हातगाडी उभी होती. हातगाडीला हातगाडीवाल्यानं, हातगाडीच्या छपराला दोन्ही बाजूला दोन काठ्या व त्यावर ताडपत्री टाकून ते अजून वाढवलं होतं. त्याला अतिक्रमणवाल्यांची त्याला भीती नव्हती. गिर्हाईक ताडपत्रीखाली उभे राहून चहा पीत होते. चहाबरोबर कांदा भजी आणि वडेही होते. पाऊस होता.. त्यामुळे धंदा चांगला होता.
“भूक लागलीय… पोटात आग पडलीय… सकाळपासून काईबी खाल्लं नाई…. समोरच्या हातगाडीकडून चहा घेऊ का?… अंगातली थंडीबी जाईल. पर पैसे कुटे हाईत? कालचं पाच रूपयं सोडलं तर काही उरला न्हाई. पाच रुपये चाहत संपले तर रातच्याला काय खानार? आत्ता खाल्लं तर रातच्याला परत भूक लाग्येल….” चहाच्या हातगाडीकडे न बघण्याचा प्रयत्न करत बिंदी बसून राहिली. पावसानं सगळी पाठ भिजली होती… “जाऊ… नको राऊ द्ये….”
अर्धाएक तास झाला. हातगाडीचा, चहाचा, पैशाचा विचार करत बिंदी तळमळत बसली होती. पाऊस चांगलाच लागला होता. थंडीत खूप वेळ बसणं बिंदीला असह्य झालं होतं. धावतच तिनं रस्ता ओलांडला. हातगाडी वाल्याला कटिंग सांगितला. तिच्याकडे एकदा बघून हातगाडीवाला कामात मग्न झाला. बिंदी हातगाडीवरच्या स्टोव्हपाशी उभी राहिली. स्टोव्हची गर्मी तिला प्रफुल्लीत करून गेली. आपण पावसात भिजतोय ह्याचा तिला विसर पडला.
कटिंग हातात मिळाल्यावर, बिंदीला बरं वाटलं. हातगाडीवाल्याला पैसे देऊन, वाफाळलेल्या चहाचा ग्लास तिने तोंडाला लावला. आजूबाजूला माणसं होती. टायवाली… स्वच्छ कपड्यातली…. तिच्या खूप जवळ उभी असलेली पण तिच्या खूप दूर असलेली.. कुणी चहा पीत होतं… कुणी गप्पा मारत होतं.. कुणी वडे खात होतं… कोणी बिंदीला नोटीस केलं नाही… बिंदीने तरी त्यांना कुठे नोटीस केलं म्हणा. तीही तिच्याच चहात गुंतली होती. एक घोट घेतला तेवढ्यात “एह्ह लडकी अंदर खडी रेह..” ह्या आवाजानं ती भानावर आली. हातगाडीवाला तिला ताडपत्री खाली उभं राहायला सांगत होता. काहीशी अनिच्छेनीच ती ताडपत्रीखाली उभी राहिली. चहा मस्त होता. “अमृततुल्य” नसला तरी तिला बास होता.
“एह येह पकड..”. हातगाडीवाल्यानं काहीतरी कागदात गुंडाळलेलं पुढं करून म्हणलं. बिंदीने वर पाहिलं. “हं ले..” असं म्हणत त्याने हात पुढं केला. काही न बोलता बिंदीने पुडा हातात घेतला. हातगाडीवाला परत कामात व्यस्त झाला. पुडा हाताला गरम लागला म्हणून तिने उत्साहाने उघडला. हातगाडीवाल्याने त्यात काही भजी आणि एक वडा दिला होता…. बिंदीला शब्द फुटेना… तशी शब्दांची गरज नव्हती… तिने काही म्हणावं म्हणून तिला ते दिलेलं नव्हतंच मुळी!
Like this:
Like Loading...
Related
If you don’t mind, the background color of your blog is so dark that I can’t read it. Consider making it light. 🙂
Very good,we should have that sense to understand ‘घनव्याकूळता ‘ of others.hats of to that hatgadivala.
dont mind pan shevat purn zalyasarkha watat nahiye kathecha…..
khup chan vatli,,katha,………sadhya paausach chalu aahe,aani ya climate madhe hikatha vachtana angat shahare aale,,khup chan varnan kela aahe,shevantichya garibich,,,,,lihat ja…..,,,,………….
Good One!!!
mastch…asha garib lokana madat karayla havi na aapan…changla sandesh milto ya goshtitun..its hearttouching….