हौसे, नवसे आणि गवसे


हौसे, नवसे आणि गवसे – संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१० 

माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत ३ प्रकारची माणसं असतात, हौसे, नवसे आणि गवसे!

हौसे म्हणजे जत्रेची हौस भागवण्यासाठी आलेली हौशी मंडळी. जत्रा “कोणत्या देवाची आहे” ह्याचं ह्या लोकांना फार देणं-घेणं नसतं. हे लोक जत्रेला फक्त एन्जॉय करायला येतात.हि मंडळी टोळक्या-टोळक्याने फिरताना दिसतात.जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी साधारण ४०-४५% हीच मंडळी असतात. (संत्या, गन्या, पक्या कॅटेगरी)
दुसरे नवसे म्हणजे नवस फेडायला आलेली भाविक मंडळी.हि मंडळी आपल्या सहकुटुंब सहपरिवार आलेली असतात. बोकडाचा बळी देणारी, पोराला पायावर घालणारी, पायऱ्यांवर लोळण घेणारी किंवा भंडाऱ्यात न्हाऊन निघणारी मंडळी हीच.
आणि तिसरा प्रकार गवसे म्हणजे ‘कुठे काही गावतंय का?’ ‘कुठे हात मारता येतोय का?’ असं पाहणारी भुरटी चोर मंडळी. जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी १०% प्रमाण ह्याच लोकांचं.

मला ब्लॉग लिहून फार काळ झाला नाहीये. माझा ब्लॉग विशेष/ पंचतारांकित आहे अशातली गत नाही. ह्या क्षेत्रातल्या मातबर मंडळींच्या मानाने माझा ब्लॉग ‘कीस झाडकी पत्ती! पण असं असून, ब्लॉगिंग बाबतीत “हौसे, नवसे आणि गवसे” हा अनुभव प्रकर्षाने येऊ लागला आहे. ढोबळ ठोकताळा असा-

ब्लॉगला भेट देणारे हे जर जत्रेला येणारं पब्लिक धरलं, तर ह्यात

६० ते ७०% पब्लिक हे हौशी. त्यांना ‘कोणी’ ‘काय’ आणि ‘कसं’ लिहिलंय ह्याचं त्यांना सोयर-सुतक नसतं. ही मंडळी ब्लॉगर्सच्या कोणत्याश्या साईटवरून, सुरुवातीच्या ४ ओळी वाचून, तुमच्या ब्लॉगवर येतात. विषय, विचार आणि अभिव्यक्ती ह्यांच्याशी त्यांना काही घेणं नसावं. “ते सगळा ब्लॉग वाचतात तरी का?” हा मला न सुटलेला प्रश्न आहे. ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा. सगळं एन्जॉय करण्यात (थोडक्यात वाचण्यात आणि वाचनीय शोधण्यात) हे लोक इतिकर्तव्यता मानत असावेत.

आता नवशांबद्दल बोलू. हे नवसे म्हणजे तुमच्या ब्लॉगला नियमित भेट देणारे, तुमच्या नव्या लेखनासाठी नोंद करणारे, कॉमेंट्स देणारे आणि भविष्यातील कॉमेंट्सला सबस्क्राइब करणारे. कधी कधी लिहिलेलं आवडल्यास/ न आवडल्यास तसं सांगणारे. हे लोक ब्लॉगिंगबाबतीत बरेच सिरिअस असतात (अथवा तसे भासवतात.). असे वाचक साधारण २५-३०%. (ब्लॉगला देवाचे स्थान देण्याचा हा प्रयत्न नाही.)

उरलेले गवसे, हे खऱ्या अर्थी “कुठे काही मिळतंय का?” ह्या शोधार्थ भटकणारे. म्हणजे “आपल्या ब्लॉगवर काहीतरी लिहिण्यासाठी, दुसऱ्याच्या ब्लॉगवर काही मिळतंय का?” 😉 हे लोक म्हणजे, काही न मिळाल्यास वर्तमानपत्रातील बातम्या आपल्या भाषेत परत पोस्ट करणारे, स्वत:च्या ब्लॉगवर दुसऱ्याचे लेखन पोस्ट करून, उचित श्रेयही न देणारे अथवा “हे लिखाण माझे नाही” हे कधीही मान्य न करणारे महाभाग!  बर ह्या लोकांमध्ये काही संकेतस्थळ (वेबसाईट्स) पण आहेत. indiarss.net, Topsy.com सारख्या! अशा गवश्यांचे प्रमाण साधारण ५-७%. (दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)

तर शेवटी काय जत्रेत सगळ्या प्रकारचे लोक असणारच! आपण आपली ब्लॉगिंग जत्रा चालूच ठेवायची आणि ब्लॉग्जचा उरूसही! हेरंबच्या भाषेत जय ब्लॉगिंग!

19 Comments

  1. हो, अगदी बरोबर आहे. ‘मराठी’ जत्रेत कोणत्याही पद्धतीने येवोत. पण मराठी जत्रा चालू राहायला हवी. आणि वाढली पाहिजे. मस्त! एक नंबर, नोंद आवडली!

  2. खरंय आपण जत्रा सुरु ठेवायची…मागे मी एकदा याच विषयावर ब्लॉग वाचक म्हणून एक पोस्ट लिहिली होती ती आठवली…हे निरुपण जास्त छान आहे पण…

  3. इ मेल मधे सगळे मेल येत असल्याने सगळे लेख तिथेच वाचल्या जातात म्हणुन इकडे येऊन कॉमेंटलं जात नाही. यावर एक उपाय म्हणजे मेल मधे पुर्ण लेख न जाऊ देणं.. तसं सेटींग कर.

  4. अतिशय चोख ओब्सर्वेशन. पण जत्रा चालायला सर्वांचीच गरज असते. हौशांचे नवशे होणे हे जत्रा यशस्वी होण्याचे लक्षण. ते झाले कि मग नुसती चालणारी जत्रा फुलू लागते. आपली जत्रा अशीच फुलत रहावी ही म्या आणखी एक हौशी जत्रावाल्याची प्रामाणिक सदिच्छा.

  5. हा हा हा मस्त परीक्षण केलेले आहे.
    आत्ताच अधाशासारख्या बर्याच पोस्ट वाचून काढल्या आहेत.
    असेच शब्दांकित करत राहावे.

  6. लोक इतिकर्तव्यता मनात असावेत.,
    mala vatat “maanat ” have.
    (दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)
    ase karanyaane blog valyaacha kaay phayada honaar he malaa samajat naahi.bloggar tase koni olkhat nasat.mhanaje prasiddhi haa hetu pan saadhya hot naahi.aataa ” Samapada”yaa naavala ji olakh aahe ti itaranaa naahi. Mi tumache sagale lekh vachate.pan malaa comment karayacha khup kanatala.mag sagala vel tyat jaial ase vatate. sagala kaam aatapun parat haa udyog karayala vel kuthe asato gruhinila?

    1. Hi मृणाल,
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मला वाटतंय तुझा वाचताना थोडा गोंधळ झालाय.
      “ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा. सगळं एन्जॉय करण्यात (थोडक्यात वाचण्यात आणि वाचनीय शोधण्यात) हे लोक इतिकर्तव्यता मानत असावेत.” हे मी हौशी लोकांबद्दल म्हणालं आहे. तुझ्या कॉमेंटवरून तरी तू ह्या कॅटेगरीत बसतेस असं मला वाटतं.

      “(दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)” हे वक्तव्य गवसे कॅटेगरीसाठी आहे. हि लोकं दुसऱ्याचं लिखाण आपल्या ब्लॉगवर टाकून स्वतःच्या ब्लॉगचे रेटिंग वाढवतात. असे करण्याने मूळलेखकाचा काही फायदा नाही. उलटपक्षी तोटाच आहे. त्याच्या कामाचे श्रेय त्याला कधीही मिळत नाही. ज्याने ते लिखाण ढापले आहे त्याला मात्र कौतुकाचा वर्षाव मिळतो/मिळू शकतो.

      तुम्ही किंवा इतर हौशी लोकांनी माझ्या ब्लॉगला कॉमेंट दिली नाही म्हणून हा लेख नसून, जे लोक लिखाण ढापतात त्यांच्याबद्दल राग आहे.

      टीप: तुम्ही सुचवलेला बदल करण्यात आला आहे.

  7. विषय, विचार आणि अभिव्यक्ती ह्यांच्याशी त्यांना काही घेणं नसावं. “ते सगळा ब्लॉग वाचतात तरी का?” हा मला न सुटलेला प्रश्न आहे. ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा.
    ase mhanane he majhyasarkhya pramanik vachakavar anyaykarak Aarop kelyasarakhe vatat naahi kaa? Mi tumacha niyamit aani sampurn lekh vaachanara vachak aahe.
    http://savadhan.wordpress.com
    NY-USA

Leave a reply to शब्दांकित उत्तर रद्द करा.