जेजे वॉकिंग -संपदा म्हाळगी-आडकर ६/९/१०
 
२ आठवड्यांपूर्वी आमच्या भारतातल्या टीम मधला एक सहयोगी इकडे युएसमध्ये आला. तसा तो या आधीही इथे येऊन गेला आहे त्यामुळे इथल्या गोष्टींना बऱ्यापैकी सरावला आहे. त्याच्या, जिभेला पीळ पाडणाऱ्या दक्षिणात्य नावाने इकडे बऱ्याच गोऱ्यांची विकेट घेतल्याने, आल्याच्या काही दिवसातच त्याचे नव्याने नामकरण करण्यात आले. “जेजे”! कायम हसतमुख आणि happy-go-lucky असल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे.
 
आताही हि एवढी प्रस्तावना करण्याचे कारण हे की आज जेजे काहीसं बाहेरचं काम करून, रस्ता ओलांडून, ऑफिसमध्ये परत येत होता. भारतीय पद्धतीने, दोन्ही बाजूला बघून, गाडी येत नाही हे पाहून त्याने रस्ता ओलांडला खरा पण पलीकडे पोहोचल्यावर त्याच्या स्वागतास्तव अमेरिकी मामा (पोलीस) थांबला होता. पोलिसाने थांबवून शांतपणे चौकशी केली आणि नंतर “जे वॉकिंग” केल्याबद्दल १६५ अमेरिकी डॉलर्सचे तिकीट हातात देऊन निघून गेला. हा एकूणच प्रकार जेजे साठी नवा आणि तेवढाच धक्कादायक होता. ऑफिस मध्ये येऊन त्याने आम्हाला जेंव्हा सांगितलं, तेंव्हा थोडे वाईट वाटलं. भारतीय खिशाला मिळालेला १६५ अमेरिकी डॉलर्सचा दणका पाहून काही लोक हळहळले सुद्धा! जेजे मात्र शांत होता. नेहमीसारखा हसत नव्हता एवढेच. ते तिकीट न्याहाळत असतानाच, आपण पोलिसाला चुकून चुकीचा पत्ता दिल्याचा साक्षात्कार त्याला झाला.
 
अमेरिकेत रस्ता ओलांडताना, चौकात आखलेल्या २ पांढऱ्या पट्ट्यांमधूनच रस्ता ओलांडावा लागतो. काहीसं आपल्याकडे असलेल्या झेब्रा क्रोसिंग सारखंच! पट्ट्यांबरोबर, चौकामध्ये सिग्नलच्या खांबावर हाताच्या कक्षेत एक बटन असतं. हे बटन दाबून, चालण्याचा सिग्नल मिळाला तरच रस्ता ओलांडायचा असतो. अश्या पद्धतीने रस्ता न ओलांडल्यास अथवा अवैध पद्धतीने रस्ता ओलांडल्याबद्दल किंवा पदपथावरून न चालल्यास किंवा तत्सम दिरंगाईबद्दल पोलीस दंडाचे तिकीट देतात. सकाळच्या ट्रेन पकडण्यासाठी गडबडीत, शोर्टकट घेणारे, ‘जे वॉकिंग’ करून आपल्या खिशाला शोर्ट कट मारून घेताना मी अनेकवेळा पाहिलं आहे.
 
जेजेने मात्र आपल्या सवयीने मधून रस्ता ओलांडला. आम्हाला वाईट वाटलं, आम्ही त्याला ह्या नियमाविषयी सांगायला हवं होतं. पण तेवढ्यात एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने त्याच्या एका तिकिटाचा किस्सा सांगितला. मग अजून काही जणांनी आपले खमंग किस्से सांगितले. मिळालेले “तिकीट कसे टोलवता येईल” वगैरे सल्ले पण झाले.  मग भारतातल्या पोलीस, ट्राफिक आणि जे वॉकिंग(?)बद्दल चर्चा झाली. काही क्षण हसण्यात गेले. एव्हाना जेजे पण रंगात येऊन भारतातले किस्से सांगत होता. त्याचा खुललेला मूड पाहून एका गोऱ्या सहकर्मचाऱ्याने जाहीर केलं, “आज पासून हे ‘जे वॉकिंग’ नसून ‘जेजे वॉकिंग’ आहे”. सगळे मनमुराद हसले, जेजेसुद्धा!  एकूण काय जेजेला ‘जे वॉकिंग’ बद्दल तिकीट मिळालं आणि आम्हाला काही आनंद क्षण! उद्या अजून एकजण येणार आहे भारतातून, त्याला आल्या आल्या सांगायला हवं ‘जेजे वॉकिंग’ नव्हे ‘जे वॉकिंग’ बद्दल! कदाचित दोन्हीबद्दल!
  
Advertisements