अंतर्धान


अंतर्धान -संपदा म्हाळगी-आडकर ५/२३/१०
 
भाग १
भाग २
भाग ३
 
अतिदक्षतागृहाच्या काचेच्या तावदानातून आत बघत सुहास अतिशय निर्विकार चेहऱ्याने उभा होता. आईच्या कोमेजलेल्या, निपचित देहाकडे पाहत होता. त्याची सत्तरएक वर्षांची, इतकी वर्षे जगण्याच्या लढाईत जिंकणारी आई, मृत्यूशी झुंज देत होती. सुहासला आठवलं, मागच्या भेटीत आई म्हणाली होती, ‘सुहा, अंथरुणावर लोळागोळा होऊन पडून राहण्यापेक्षा एका झटक्यात मरण यावं रे बाबा!’ आणि तेच तिला आत्ता येत नव्हतं. सुहासला माहित होतं, तिचा जीव अडकलाय इथे सुहासमध्ये, रोहितमध्ये… आणि अजून बऱ्याच अश्या गोष्टींमध्ये ज्या असू शकल्या असत्या. अश्या अंतर्धानक्षणीही ती मृत्यूची आराधनाच करत असेल.
 
“सुहा, अरे ऐक माझं. लग्नासारखी गोष्ट वेळेतच झाली पाहिजे बाबा!”
“आई मी तुला कितीदा सांगितलंय. मला उगीच भरीला घालू नकोस. मी लग्न करणार नाहीये.”
“सुहा, तुला आत्ता करायचं नाहीये का? तसं असेल तर सांग मला. थोडे दिवसांनी पाहू. आलेल्या स्थळांना तसं कळवता येईल.”
“आई, आत्ता नाही आणि कधीच नाही. मला लग्न करायचं नाहीये.”
“मग काय ब्रम्हचारी होणार आहेस का?”, आई रागानेच म्हणाली. सुहासचा पारा कधीच चढला होता. लग्नाच्या विषयाने त्याला तिरमिरी येत असे. ‘का?’ हे त्याचं त्यालाही का माहित नव्हतं.
“तुम्ही बाप लेक मला कधी सुख लागू देणार आहात का?”, पाठमोरी वळून आई स्वयंपाकघराकडे चालू लागली. तिचा रडणारा चेहरा सुहाला दिसला नाही पण डोळ्याकडे गेलेला पदर दिसला होता.
 

रोहितच्या खांद्यावरल्या हाताने सुहास भानावर आला. रोहितला आईचा फार लळा होता. रोहित सुहासच्या आत्येबहिणीचा मुलगा. आई गेल्यावर मामीआजीनेच त्याचा सांभाळ केला होता. “माआजीला बरं नाही” म्हणाल्यावर दिवसरात्र तो हॉस्पिटलात होता, सुहास मामाबरोबर.

“मामा, मी जरा औषधं घेऊन येतो.”
“हे पैसे घे.”
“नको आहेत माझ्याकडे, आधीचे उरलेले.”
“बर”.
“जाऊन येतो.”
“हं” रोहितच्या येण्याने खंडित झालेला सुहासच्या विचारांचा प्रवाह, परत वाहू लागला.
 
खरंय आईला कधी सुखच लागलं नाही. आधी अण्णांच्या तापट आणि आततायी स्वभावाने आणि नंतर माझ्या बेताल वागण्याने. “बेताल? माझं वागणं बेताल खरंच होतं? असेल कदाचित. कदाचित नाही नक्कीच. अंत:मन कधी खोटी ग्वाही देणार नाही.”
 
सोपान वाड्याला ताज्या फुलांचं तोरण बांधत होता. वाड्यात सगळ्या दारांना आंब्याच्या डहाळ्या लावल्या होत्या. नुकत्याच सावरून, वाळलेल्या शेणाचा वास सर्वत्र पसरला होता. बायका रांगोळ्या काढत होत्या. लहान मुलं पळापळी करीत होती. त्यांच्या आया त्यांना लांबूनच दटावत होत्या. दटावल्यानंतर “बघाना अजिबात ऐकत नाही. चार-चौघात शोभा करतो”, असं म्हणत आपापसात कुजबुजत होत्या. गोतावळ्यातील मुलांच्या एकत्रित मुंजी असल्यातरी वाड्यात मात्र लगीनघाई होती.
आज सुहाचीही मुंज होती. आईची पार धांदल उडून गेली होती. एकत्र मुंज सोहळा असल्याने बाहेर गावहून आलेल्या पाहुण्या-रावळ्यांचं चहापान, खानपान वाड्यावरच होतं. एकत्रित मुंजीचा संकल्प सुहाच्या वडिलांचा असल्याने तिला जास्तच काळजी घ्यावी लागत होती. सगळ्या मुंजी आपल्याच घरातल्या असल्यासारखी ती झपाटून कामं करत होती. थोड्याच वेळात घटिका भरेल असा निरोप आला. आई सुहाला शोधत घरभर फिरली. मुहूर्ताला मुंज मुलगा जागेवर नसता तर सुहाच्या वडिलांच्या क्रोधाग्निला तिला सामोरं जावं लागलं असतं.
 
सुहा बाकीच्या पोरांबरोबर लपाछपी खेळण्यात गुंतला होता. तो आणि सुमी वरच्या माळ्यावर गोण्यांमध्ये लपले होते. स्वत:चे घर असल्याने सुहाला काने-कोपरे माहित होते. इकडे माळ्यावर कोणी शोधत येणार नाही आणि आलं तर कसा मस्त धप्पा देता येतो हे त्याने सुमीला समजावलं. सुमी तशीही लिंबू-टिंबू होती. खूप वेळ कोणी शोधायला आलं नाही म्हणून सुमीने भुणभुण सुरु केली,
“ए सुहास, आपण जाऊ या रे, कोणीच येत नाही.”, असं म्हणून ती उठू लागली.
“थांब ग सुमे!”
“नको मी जातेच कशी, तुमची मुंज आहे बाबा, तुम्हाला कोणी बोलणार नाही, मला आई शोधत असेल. मला न मागता धम्मकलाडू मिळायचा.”
“थांब ग! तू बाहेर गेलीस तर तू वाचशील कारण तू लिंबू-टिंबू आहेस, पण मला राज्य घ्यावं लागेल” दोघं थोडा वेळ गप्प बसले.
तेवढ्यात बाहेरून धप्पाचा जोरात आवाज झाला. तो ऐकल्यावर सुमी म्हणाली, “बघ धप्पा पण झाला. आम्हाला बुवा मुंज पण नाही आणि धप्पा पण!”
“म्हणजे?”
“हो तुम्हा मुलांना मुंज, मला काहीच नाही.”
“तू सांग न तुझ्या आई-दादांना, तुझं लग्न करायला. मग होईल फिटाम-फिट”, सुहा हसत म्हणाला.
“हो? मग तुमची मुंज आणि माझं लग्न होईल ना रे?”, सुमी निरागसपणे म्हणाली.
“हो”, सुहा हसत म्हणाला. तेवढ्यात सुहाला आईची हाक ऐकू आली. माळ्याचा जिना उतरून तो खाली गेला.
आई किती सुंदर दिसत होती. पाटल्या, बांगड्या, तोडे, चिंचपेटी, गौरवर्णाला शोभून दिसणारी प्रेमळ, पिंगट नजर, कपाळावर नेहमीची चंद्रकोर. लग्नाचा जपून ठेवलेला फिकट गुलाबी रंगाचा भरजरी शालू ती नेसली होती. स्वत:च्या मुलाची मुंज असून तिला नवी साडी घेता आली नव्हती… अण्णांमुळे. पण त्या जुन्या नऊवारी शालूतही ती अतिशय सुरेख दिसत होती. नाकातली मोत्याची नथ तिला फार छान दिसत होती. “आपली आई किती सुंदर आहे”, ह्याची जाणीव सुहाला होऊन गेली. “आईने रोज असाच नटलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. पण अण्णा करू देणार नाहीत. त्यांच्या देखरेखीत आईला एक दागिना ल्यायला कधी मिळायचा नाही.”
 
“सुहा, किती शोधायचं तुला? घटिका भरत आली.”
“आम्ही लपाछपी खेळत होतो काकू!”, सुमी आईला म्हणाली.
“हो ना”, सुहाने होत हो मिसळलं.
“सुमे, तू चल तुझी आई शोधतीय कधीची. सुहा, लपाछपी खेळतोय म्हणे, थोड्या वेळानं तुझ्या अण्णान्पासून मला लपायची वेळ आली असती”, असं म्हणत आई सुहाला हाताला धरून निघून गेली.
 
मांडवात मुंजीच्या विधींची तयारी चालू होती. घटिका भरायला काही पळ उरले होते. सुमी आईला म्हणाली, “आई मला लग्न करायचंय.”, तिचं हे बोलणं ऐकून आजूबाजूंच्या बायकांत खसखस पिकली. सुमीच्या आईला मात्र वरमल्यासारखं झालं.
“गप ग सुमे!”
“आई मला लग्न करायचं म्हणजे करायचं. सुह्याची मुंज मग माझं लग्नतरी करा.”, परत खसखस. एव्हाना मांडवातल्या सगळ्यांचं लक्ष गेलं होतं. सुमीच्या आईने समजावलं पण काही उपयोग झाला नाही. सुमीचं मात्र “माझं लग्न करा, लग्न करा” चालूच होतं.
“कुणी सांगितलं तुला? नसतं लग्नाचं खूळ!”, सुमीच्या आईनं रागानं विचारलं.
“सुह्यानं!”, सुमी चटकन बोलून गेली. आजूबाजूला परत हश्या.
“पण सुमे, कोणाशी करणार तू लग्न?”, कोणत्याश्या भोचक मावशीनं हसत विचारलं.
थोडासा विचार करून “कोणाशी म्हणजे…. सुह्याशी.. तो आवडतो मला..”, सगळे हसले. सुमीची आई वरमली.
“आजच सुहाची सोडमुंज सुद्धा उरकून घ्या, सुहाची आई!”, मगाचच्या भोचक मावशी परत बोलल्या. इतर बायका खळाळून हसल्या. सुहाला हाताला धरून, घेऊन आलेली सुहाची आईदेखील हसली. सुहा मात्र न हसता तसाच उभा होता. दुरून सुहाचे अण्णा त्याच्याकडे रागाने पाहत होते म्हणून कदाचित!
 
सुहासला सगळं आठवलं, ‘मुंजीनंतर कोठीत नेऊन अण्णांनी खरपूस समाचार घेतला होता, मात्र त्या माराने सुमीच्या स्मृती मनावर कोरल्या गेल्या कायमच्या!’ पण त्याहून डोळ्यासमोर तरळत राहिलं, ते आईचं लोभसवाण रूप! अण्णांच्या हयातीत आईला मनासारखं काही करता आलं नाही, आणि आपणही तिच्या मनासारखं केलं नाही म्हणून त्याला वाईट वाटलं.
 
रोहित औषधं घेऊन परत आला. त्याने काचेच्या दारातून परिचारिकेला बोलावून औषधं दिली. त्याच्याकडे पाहून, सुहासने अंतर्धान पावू बघणाऱ्या आईकडे वळून पाहिलं.
(क्रमश:) 

5 Comments

  1. कथेची सुरुवात व विस्तार खूपच छान झालाय. शेवट मात्र घाईने केल्या सारखा वाटतोय. काहीतरी चमत्कारीकतेने तो केलेला असेल असे वाटले होते !

यावर आपले मत नोंदवा