गाडीची तोतो -संपदा म्हाळगी-आडकर ५/१५/१०
 
मागच्या आठवड्यात पाऊस झाल्याने, आज गाडी धुवायला गॅस स्टेशन (पेट्रोल पंप)  वर घेऊन गेलो होतो. गाडी आतून खराब झाल्याने आधी वॅक्युम केली, मग गाडी धुण्यासाठी ऑटोमॅटिक कार-वॉश मध्ये नेली. आधी वॅक्युमच्या आवाजाने घाबरलेली माझी दीड वर्षाची मुलगी, त्या ऑटोमॅटिक कार-वॉशमध्ये पार भांबावून गेली.

कार-वॉशच्या बोळात शिरल्यावर, अंधार झाल्याने मगाचचा (रडण्याचा) विसरलेला सूर, तिला परत आठवला. ती तरी काय करणार बिचारी, कार-वॉश मधली तिची पहिलीच वेळ होती. तिच्या बाजूच्या खिडकीच्या काचेवर कार-वॉश मशीन रोलरच्या रबरपट्ट्या आपटायला लागल्यावर, बाहेरून कोणीतरी भूतीण आपल्या झिंज्या आपटत असावी, असा चेहरा करून ती रडायला लागली. मी पुढे बसल्याने, माझे distant सांत्वन तिला पुरेनासं झालं. 

“हे काय चालू आहे?”, ह्याचं स्पष्टीकरण देण्याचे मी आणि माझा नवऱ्याने काही वायफळ प्रयत्न केले. मग तिला म्हणलं, “अग, आपण गाडीला तोतो (अंघोळ) घालायला घेऊन आलोय”. माझं बोलणं तिला फारसं पटलं नाही. तिनं रड चालूच ठेवलं. मग तिला म्हणलं, “तू तोतो करतेस की नाही, आई तोतो करते, बाबा करतो न तशी गाडीची तोतो”, ते पण पटलं नाही. (बर ती दीड वर्षाची आहे. तिला सजीव आणि निर्जीव गोष्टींतला फरक अजून करत नाही, हे सुज्ञ वाचकांना कळेल ही अपेक्षा!)
 
ती कशालाच दाद देत नाही म्हणल्यावर मी सरळ बोलायला सुरुवात केली. “शंभो हरहर गंगे, भागीरथी, कृष्णामाई….” ओळखीचं काहीतरी ऐकू आल्यासारखं ती गप्प बसली. तिला बहुतेक पटायला लागलं होतं की अंघोळ सुरु आहे. म्हणून मी थांबले, तर परत थोडसं रडू ऐकू येणार, तेवढ्यात परत सुरुवात केली, “ह्या खांद्यावर, त्या खांद्यावर, धार पडू दे माहेर वाढू दे!”, “ह्या खांद्यावर, त्या खांद्यावर, पाठीवर, पोटावर, धार पडू दे, पाठ-पोट वाढू दे गाडीचं!”. “गाडीचं पाठ-पोट वाढू दे!”, हे ऐकून माझा नवरा मात्र हसून-हसून बेहाल झाला. हे करता करता पाणी थांबलं, आमचा कार-वॉश संपला. मी हसत हसत मागे वळून मुलीकडे पाहिलं. ती काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं माझ्याकडे पाहत होती. मला लक्षात आलं, गाडीची अंघोळ संपली होती पण शेवटी ओवाळलं नव्हतं ना! मग परत “ओवाळु ओवाळु….” झालं. आणि अश्याप्रकारे गाडीची तोतो पूर्ण झाली.
Advertisements