जुगार


जुगार –संपदा म्हाळगी-आडकर ५/२/१०
 
दारावरची बेल वाजली. नंतर सवय असल्यासारखा दरवाजा उघडला गेला. मेघनाने आतूनच विचारलं कोण आहे? ‘दिवस चांगले नाहीत. मी आज पण खालची कडी घालायला विसरले. वरची कडी काय कोणालाही हात घालून उघडता येते’ विचारांची सुपरफास्ट गाडी कधीच सुटली होती. “मीच आहे रखमा!”, दरवाजाकडून आवाज आला. रखमाचा आवाज ऐकून मेघनाला हायसं वाटलं. ‘ह्यानंतर न विसरता खालची कडी घालायची’ तिने मनाशी पक्कं केलं.
“येss ग रखमा. तू लवकर आलीस? माझी अंघोळ व्हायचीय अजून”, मेघना रखमाबाईंना म्हणाली. रखमाबाई गेली ५ वर्षं मेघनाकडे कामाला होत्या. विश्वासू होत्या. त्यांचाही मेघनावर फार जीव होता. वयानी साधारण चाळीशीत. त्या साधारण सगळ्यांची सकाळची भांडी घासून मेघनाकडे येत असत. तसं केल्याने त्यांना जरा निवांत टेकता येई. मेघनाचाही एकीकडे स्वयंपाक चालू असे. सकाळच्या त्या गडबडीत दोघींच्या गप्पा व्हायच्या. ‘आज आपण स्लो आवरतोय का?’ असा विचार येऊन मेघनाने घड्याळाकडे पाहिलं. साडे आठच वाजले होते. रखमाबाई आज लवकर आल्या म्हणजे काहीतरी विशेष हे मेघनाच्या लक्षात आलं होतं.
 
“अहो वहिनी, तुमचं बरोबर चाललंय मीच लवकर आलीय. कामं आटोपून लवकर घरी जायचंय मला” -रखमा काहीशी वैतागलेल्या स्वरात म्हणाली.
“बर आता आलीच आहेस तर चहा घेशील का घोटभर. माझा पण राहिलाय” -मेघनाला रखमाला थोडा वेळ थोपवून धरायला कारण हवं होतं.
“केलेला असेल तर द्या. माझ्यासाठी टाकू नका वहिनी” -रखमा.
“हे काय तयार आहे” -मेघना. रखमाच्या नकळत मेघनाने तयार चहात चहा पावडर आणि दुध वाढवून घातलं. उकळी येण्याची वाट पाहत ती तशीच ओट्यापाशी उभी राहिली.
“आज लवकर लवकर का एवढं?” -मेघनाने सहज विचारलं. सकाळी केलेल्या शिळ्या पोळीच्या कुस्करयाचे दोन बाउल्स भरून, एक तिने रखमाच्या हातात दिला. रखमा तिथेच खाली बसून खाऊ लागली.
“अहो वहिनी, विशेष कसलं डोम्बल्याचा? घरी काहीतरी इपरीत घडायच्या आत परत जायचंय” -रखमा काळजीच्या स्वरात म्हणाली.

“काय ग रखमा? काय झालं?” -मेघनासुद्धा आपुलकीने विचारू लागली.
“अहो वहिनी, तुम्हाला माहितीय ना मागच्या साली माझी भ्हन गेली. म्या गेली होती परवा बघायला काय चालू हाय बाप-लेकीचं. भहीनीचा दादला लय पेतो. आताशा तर लयच व्हाढलंय. त्यास्नी एकाच लेक, संगीता. लई आबाळ होती बिचारीची. खायला वेळेवर न्हाई, पोटभरीचा तर सोडाच. श्याला तर कधीच सुटली.”
मेघना अगदी मन लावून ऐकत होती. “मग?”

“मंग काय, म्या घिऊन आली माझ्याकडं. तिकडं र्राइली तर तिचं काय व्हील सांगता यायचं न्हाई.” -रखमा.

“हे तू चांगलं केलंस” -मेघनाला आतून खूप बरं वाटलं.
“मला पोर-बाल न्हाई. माझ्यापाशी र्राइल, त्यातून तिचं वय असं आडनिड. एकट्या पेताड बापाबरोबर ठेवायची कशी हिला? असं वाटलं म्हणून आणली.” -रखमा.
“हं बरोबर आहे तुझं”,  रखमाचं बोलणं अगदी पटल्यासारखं मेघना म्हणाली. तेवढ्यात चहा तयार झाला. मेघनाने तो गाळून दोघींसाठी घेतला.
“पण विपरीत काय त्यात?”, मेघनाला एकदम रखमाचा मागचचं बोलणं आठवलं.
“अव वहिनी, आमच्या घरात आम्ही दोघंच. तिसऱ्या माणसाची आम्हाला सवय न्हाई. आता ही संगी आलीय. बाप्या मानसाबरोबर पोरीला ठेऊन येणं अवघड हाय.” -रखमा.
“म्हणजे?” -मेघनाला समजलं नाही.

“अव वहिनी, माझा दादला चांगला हाय तो कधी काही करायचा पण न्हाई. पण..” -रखमा. ‘स्वत:च्या नवऱ्याबद्दल अशी काय बोलतीय ही?’ मेघनाच्या विचारांची सुपरफास्ट गाडी परत सुरु झाली.
“…केलंच तर? त्यो भी पुरुष हाय. इतर बायकांकडे त्यो कसा बघतो मला ठाऊक हाय. दुसऱ्याची पोर… वंगाळली तर कोणी निस्तरायचं?” -रखमा.
“खरंय ग तुझं” – मेघना अजिजीनी म्हणाली.
“बर वंगाळलीच तर दडपतातच कि लोकं. पर पोटुशी राहिली तर श्येण घालतील जातवालं . त्येवढा पुढचं राहू द्या. त्येभी निस्तरता येतंय कि. पण तिलाभी त्ये सगळं आवडाया लागलं तर त्यी राईची घरात अन मला हाकून द्यायचे दोघंही”, रखमाचं ते बोलणं ऐकून मेघना आवक झाली.

“त्यीला कामावर घिऊन आले तर अजून चार बाप्यांच्या नजरेत यायची. आज त्यीला ठेवलीय घरीच पण जीव टांगणीला लागलाय बघा. घरी जाईपर्यंत काही सुचणार न्हाई मला” -रखमा.
“बर आता शांतपणे चहा घे, काही होणार नाही.” -मेघना रखमाला समजावत म्हणाली. पुढची काही मिनटे शांततेत गेली.

“वहिनी, मागं तुम्ही विचारत होता ना, ‘कोणी विश्वासू मुलगी हाय का घरकामाला आणि मयंकला सांभाळायला?’ म्हणून. आमच्या संगीताला घेता का ठेऊन? ती सांभाळेल मयंकला. घरकाम पण करील. इथं स्वैपाकघरातच झोपील” -रखमा एकदम आर्जवाने म्हणाली.
“हो म्हणाले होते. पण मयंक आता पाळणाघरात जातो. मी जरा मनीषशी बोलते. उद्या आण तू संगीताला बरोबर. तिचं काम बघते आणि तुला सांगते”, रखमाचं मन राखायचं म्हणून मेघना म्हणाली. मेघना “संगीताला आण” म्हणाली खरी पण तिच्या डोक्यात विचारांच्या सुपरफास्ट गाडीला आता सुसाट वेग मिळाला होता.

  

‘काय करावं? रखमाची काळजी मला कळते. तिला भाच्चीचं चांगलं व्हावं उलटपक्षी वाईट होऊ नये ह्याची काळजी. का स्वत:चं वाईट होऊ नये ही सुप्त काळजी???’, मेघनाच्या विचारांना आता प्रश्नांचं ट्राफिक लागायला सुरुवात झाली. म्हणून तिच्या विचारांनी यूटर्न घेतला.

‘मी काय करू? मला गरज तर आहे. मयंक हल्ली फार आजारी पडतोय. त्याला पाळणाघरात ठेवण्यापेक्षा, तो घरी राहिलेला कधीही आवडेल मला. संगीची घरकामालाही मदत होईल. इतके दिवस मीच “विश्वासू मुलगी असेल तर सांग”, म्हणून रखमाच्या मागे लागले होते. आता संगीता मिळालीय तर नको  कसं सांगू?’,

‘पण रखमा म्हणाली तस मझ्या बाबतीत ही होऊ शकत….. मनीष दुपारी दुकान बंद करून घरीच येतो. मी ऑफिसला असणार. कुठे कुठे लक्ष देणार?’, ह्या सगळ्या विचारांनी रोड ब्लॉक झाला.

‘ह्या ह्या, अस काही होणार नाही माझ्याबाबतित. मनिश वर माझा पुर्ण विश्वास आहे. खरच आहे का??? ‘, तिने मनाशी तपासून पाहिल.
‘तो अस काही करणार नाही. आणि अस काही झालच तर… ‘, तिच्या मनात रखमाचे शब्द घोंगावू लागले… “आणि वंगाळलीच तर दडपतातच की लोक. पोटुशी राहिली तर… त्येभी निस्तरता येतय की…. “

8 Comments

  1. छे!. जुगार कसला त्यात. विश्वासाचा प्रश्न आहे. आणि नितीमत्तेचा आणि संस्कारांचा.
    मला वाटतं हे इतकं काहि कठीण नाही

    1. जुगार कसा नाही?
      पहिल्यांदा रखमाने खेळलेला – संगीताला घरी आणून, मग मेघनाकडे तिला देऊन
      दुसरा मेघनाने खेळलेला – संगीताला घरी ठेवायचं ठरवून, पुढचे परिणाम दुर्लक्षित करून.

      संगीताचा त्यात कोणी फार विचार करत नाहीये. ती जुगारात पैसा फिरवा तशी फिरणार.

Leave a reply to अश्विनी उत्तर रद्द करा.