रद्दी


रद्दी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२७/१०
 

रद्दी हा अगदीच रद्दी विषय नाही. किमान काही जणांसाठी. लहानपणी रद्दी टाकण्याचा केवढा उत्साह असायचा. बाबा आमच्यासाठी ते काम राखून ठेवत. त्या निमित्ताने आम्ही काही उद्योग न करता, एकाजागी बसत असू.  रद्दी टाकण्यापूर्वी, सगळी वर्तमानपत्रं नीट लावायची हा बाबांचा दंडक होता. आता तुम्ही म्हणाल, अनायासे रद्दी घालायची मग कशाला नीट लावायला हवीत. तर त्याचा कारणं  अशी,
१. नीट लावल्याने एका पिशवीत व्यवस्थित आणि जास्त वर्तमानपत्रं बसतात, त्यामुळे ज्यादा पिशव्या कराव्या लागत नाहीत.
२. रद्दीवाल्याला पण रद्दी घेणे सोपे जायचे. (सहिष्णुतावाद)
  
रद्दी एकसारखी करताना मजा यायची. जुनी वर्तमानपत्रं चाळताना, त्यातल्या शिळ्या बातम्या, जुनी भविष्य वाचताना वेळ जात असे. राजकारण, त्यातली सत्तांतरे, मतांतरे, स्थित्यंतरे सगळं डोळ्याखालून घालायला मिळायचं. रंगीत, मऊसर पुरवण्या, कव्हर घालायच्या उद्देशाने बाजूला काढल्या जायच्या. वेगवेगळ्या सणांचे ‘विशेष’ अंक पहिले कि होऊन गेलेल्या सणांची आठवण यायची. रद्दीतल्या अंकांमधले चिंटू वाचायला गम्मत यायची. खेळाचं पान माझ्या आवडीचं असायचं. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूचं कोणतं छायाचित्र ‘miss’  तर नाही न झालं, हे पाहण्याची धडपड असायची. तीच गोष्ट “सुट्टीचं पान” आणि शब्दाकोड्यांची! ती पानं आधी शोधून काढून बाजूला ठेवायची. जमल्यास बाबांचा डोळा चुकवून एखादं कोडं सोडवून घ्यायचं. 

 
वर्तमानपत्रांच्या रद्दी नंतर वेळ यायची सटरफटर रद्दीची. म्हणजे कॅलेंडर्स, डायऱ्या, मासिकं, पुस्तकं (अभ्यासाची नाही. ती आम्ही भावाबहिणींमध्ये पुढे “pass-on” करायचो.), हस्तलिखीतं, वगैरे… मग त्यात काहीतरी रोचक मिळायचं. कॅलेंडर्सच्या मागे सोडवलेली गणितं दिसायची. हस्तलिखीतातल्या स्वत:च्याच अक्षराचं कौतुक वाटायचं. मग त्यातल्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंचा गठ्ठा वेगळा. असं करत, वर्तमानपत्रांच्या रद्दीच्या मोठ्या गठ्ठ्याशेजारी आमचा एक छोटा गठ्ठा तयार व्हायचा! 
 
हि सगळी रद्दी पिशव्यांत भरून, आम्ही बाबांच्या स्कुटरवरून रद्दीवाल्याकडे घेऊन जात असू. रद्दीच्या दुकानात चंपक, चांदोबा, चाचा चौधरी, किशोरचे अंक दिसताहेत का ह्याकडे आमचं लक्ष अधिक. बाबांच्या मागे लागून रद्दीच्या पैशातून (आणि कधी कधी बाबांना भर घालायला लावून) आम्ही ती बाल-पुस्तके घरी घेऊन येत असू. काही दिवसांनी परत त्याची रद्दी करायला!
 
रद्दी आता ही जमते, पण भारतातल्या सारखी नाही. आता ती नेऊन द्यायला रद्दीवाला नाही. रद्दी केरात टाकावी लागते. पण कधी अशीच जुनी पाने चाळताना, जुन्या बातम्या नव्याने समोर येतात. जुने संदर्भ लागतात. आणि लिखाणाला नवे विषय मिळतात. आता केरात टाकायच्या आधी रद्दी अशीच घेऊन बसणार आहे. काहीतरी मिळेलच. काही नाही तर लहानपणीच्या आठवणींना उजाळा तरी नक्की मिळेल.

12 Comments

  1. माझी बायको रद्दी टाकण्याचे मला काम देतच नाही ! मी एकदा का त्या कामाला बसलो की रद्दी काढणं रहाते बाजूला, व प्रत्येक अंकच मला ठेवावासा वाटतो ! नाहीतर कात्रणे चित्र कापीत कापीत शिल्लक रहाते त्याला रद्दी तरी कसे म्हणायचे व रद्दी वाल्याने ते का घ्यायचे?

    1. माझ्या वडिलान्ना देखिल कात्रण कापलेली वर्तमानपत्रे रद्दित टाकली कि राग यायचा. त्यामुळे रद्दिच काम मिळाल कि मे सरळ पानच्या पान बाजुला ठेवायचे.

  2. radditoon itakya chhan athavani baher kadhlyaat…
    Khoop chhaan..mala tar raddit kahitari mahatvache jaail asech sarkhe vatat rahate..

    By the way, Sonal chya blog var junya kapdyanvishayi atyant sundar post hoti..

    Sonalwaikul.wordpress.com

  3. रद्दी केवळ पेपरचीच विकली जाते. माळ्यावरच्या रद्दी सामानाचा तर वेगळाच अनूभव असतो. एकदा माळ्यावर काय आहे, हे पाहिलं, आणि मला नको असलेलं बायकोला हवं असतं, आणि तिला हवं असलेलं मला नकॊ अस्तं.
    रद्दी विकल्यावर पुस्तकं आणणं .. सेम टू सेम.. 🙂

    1. माळ्यावरच्या सामानाचं काही विचारू नका. माळ्यावर रुखवताच्या सामानापासून, बाळाच्या छोट्या कपड्यांपर्यंत सगळं ठेवलेलं मी पाहिलंय. त्यावर एक मोठा लेख होईल. त्याची झलक तुमच्या ढेकुण स्पेशल मध्ये मिळाली.

      रद्दीच्या तर अजून आठवणी म्हणजे आमच्या कपाटावर जिथे आम्ही रद्दी ठेवत होतो तिथे चिमणीने घरट बांधलं. तेंव्हा तर रद्दीसाठी जीव अडकलेला आणि चिमणीसाठीही!

  4. ” तेंव्हा तर रद्दीसाठी जीव अडकलेला आणि चिमणीसाठीही! ”

    हा अनुभव तर खरेच ’ अडकलेला ’ !

Leave a reply to शब्दांकित उत्तर रद्द करा.