रेअर-व्यू -संपदा म्हाळगी-आडकर ४/१३/१०
 
आज जरा जास्तच उशीर झाला. आजच्या रिलीजमध्ये एवढे बग्स येतील असं वाटलं नव्हतं. आई काळजीत असेल. इतरवेळी उशीर झाला होता पण एवढा नाही. त्यातून इतरवेळी कोणीतरी ओळखीचं बरोबर असायचं. त्यामुळे आईला थोडं निर्धास्त असायचं. ह्या नवीन प्रोजेक्टवर ओळखीचं कोणीपण नाहीये. सगळा नवा ग्रुप. एकेक जण पटापट गाड्या आणि बाईक्स काढून गेले.
“आई मी निघालेय इकडून, कंपनीच्या कॅब मधून येतेय. नाही, स्नेहा नाहीये. तिचं प्रोजेक्ट वेगळं आहे…. वेलांडे सर आहेत बरोबर, स्वप्ननगरी पर्यंत… हो.. विचारते.. हं”
 
आज स्नेहाला पण ‘जा’ म्हणून सांगावं लागलं. ती तरी किती वेळ थांबणार माझ्याकरिता? उगाच माझ्यामुळे तिला उशीर! तसे वेलांडे सर आहेत बरोबर म्हणा. पण ह्या वेळेला कंपनीच्या गाडीने जायचं टेन्शन आलंय. त्यातून वेलांडे सर राहतात स्वप्ननगरीत, माझ्या अलीकडे तीन stop. म्हणजे ते आधी उतरणार! त्यांना सांगावं का? “मला घरापर्यंत सोबत करा म्हणून?”. मी त्यांना एवढं ओळखत नाही अजून…. थोड्या वेळाने बोलते त्यांच्याशी.
नेहमीचा गाडीवाला दिसत नाहीये. तो कसा असेल? त्याची ड्युटी संपली असेल केंव्हाच. कंपनींच्या गाड्यांत एक driver थोडीच असतो? माझं आपलं काहीतरीच.
 
विकी म्हणाला होता सोडतो म्हणून, पण मीच नको म्हणले. आधीच डीपार्टमेंट मधले सगळे आमच्याबद्दल बोलतात. तो करतोही माझ्या मागे-मागे, मला काय कळत नाही का? आत्तापण नक्की माझ्याकरता थांबला होता तो. बिच्चारा!! गेले असते त्याच्याबरोबर तर…!! पण आता नाही म्हणलेय न मग आलिया भोगासी… वेलांडे सरांशी बोलायचय, पण ते तर driver शी गप्पा मारताहेत. त्यांच्या ओळखीचा दिसतोय हा driver! तसा अजून बराच वेळ आहे म्हणा. घरी पोहोचायला किमान १ तास तरी नक्की.
 
हवा किती छान आहे नाही. सकाळच्या घाई-गर्दीत हाच रस्ता किती निर्दयी वाटतो आणि आत्ता किती सुखकर! अरे ‘जयहिंद’ चं होर्डिंग नवीनच दिसतंय. ड्रेस किती सुंदर आहे. गेलं पाहिजे ‘जयहिंद’ मध्ये.  
अश्या आडवेळेला घराबाहेर यायचा प्रसंग कधी आलाच नाही. आकाश पण छान निरभ्र आहे. चांदण्या लुकलुकाताहेत. एकदम मस्त. अरे पण आज चंद्र दिसत नाहीये.. अमावस्या तर नाही आज. अरे देवा! अमावस्या… ती पण आजच हवी होती का? अभद्र विचारही कशी वेळ पाहून येतात. ते झटकण्यासाठी मालविकाने घट्ट डोळे मिटले.
 
अरेच्या रिंग कोणाच्या मोबाईलची वाजली, माझी? वेलांडे सरांची? का driver ची? 
“हं वसू बोल ग, मी पोहोचतच आलोय. अजून १० मिनिटांत येईन. …. हं .. ओह तू गाडी लावलीयेस का गेटपाशी.. thanks .. किल्ली आहे माझ्याकडे…. हं मग येतो २ मिनिटांत…”
अरेच्या मी झोपले कधी? डोळा लागू नये म्हणून किती प्रयत्न केला तरी लागलाच. वेलांडे सरांच्या बायकोचा फोन होता वाटतं. ब्रेक किती जोरात लावला ह्या driverने? माझी तर सगळी झोप उडाली. हे काय स्वप्ननगरी आलं पण?
“मालविका बाय! उद्या भेटू ऑफिसमध्ये. उशिरा आलीस तरी चालेल. गुड वर्क टुडे!” वेलांडे सर पायरी उतरता उतरता म्हणाले.
“सर.. “-मालविका. उतरता उतरता सरांनी प्रश्नार्थक नजरेनी वळून पाहिलं.
“गुड नाईट”-मालविका.
“गुड नाईट”.
 
सरांना सांगायच होतं ‘घरापर्यंत सोडा’ म्हणून पण सर तर उतरण्याच्या तयारीत होते. मला का झोप लागली आणि तीही आत्ताच?
सर काय म्हणाले फोनवर, त्यांच्याकडे गाडी होती, बायकोने गेटपाशी लावलेली, त्यांनी सोडलं असतं मला गाडीवर… झोपेतून उठल्याने मालविकाला प्रोसेसिंगला थोडा उशीर झाला. मी त्यांना तरी खूप कुठे ओळखते म्हणा, पण ह्या driver बरोबर एकटी जाण्यापेक्षा सरांबरोबर गेले असते. सरांना पण लक्षात आलं नाही वाटतं.
हा driver पण पोरगेलाच दिसतोय. चांगला असला म्हणजे मिळवलं. डोळे किती लालेलाल दिसताहेत त्याचे. झोप आलीय त्याला? प्यायलेला तर नाही न!! पुढे बघून गाडी नीट चालव म्हणजे झालं. ‘श्रीराम जयराम जय जय राम’.
 
वेलांडे सरांनी सवयीने बाईकची किल्ली खिशातून काढली. बाईक सुरु केल्यावर त्यांच्या लक्षात आलं. “मालविकाला सोडायला हरकत नव्हती. माझ्या लक्षातच नाही आलं. एकटीला गाडीतून पाठवायला नको होतं. तसा संतोष चांगला मुलगा आहे. गाडी पण व्यवस्थित चालवतो. पण दिवस बरे नाहीत. कोणाची बुद्धी कधी फिरेल सांगता येत नाही”, असा विचार करून त्यांनी बाईकला किक मारली.
 

गाडीच्या रेअर-व्यू आरश्यात कुठलासा प्रखर दिवा दिसला. तो बराच वेळ गाडीच्या मागे येतोय हे संतोषच्या लक्षात आलं. इतके वेळा जागा दिली, हाताने खूण केली पण हा दुचाकीवाला पुढे जाईना. संतोषने २ सणसणीत शिव्या हासडल्या. “हा कोण मागे येतोय.. %#&%$, %$%#$^” त्या शिव्या ऐकून मालविका अजून घाबरली. ‘श्रीराम जयराम जय जय राम’.
‘गाडीत मी आणि पोरगी एकटेच म्हणून कोणी पाठलाग तर करत नसेल न? दिवस वाईट आहेत. दिवसागणिक बाई-पोरींच्या बातम्या ऐकायला मिळतात. नको तो उद्योग व्हायचा’, संतोष विचार करीत होता.

“म्याडम तुमचं घर कुठं आहे?” संतोषने विचारलं. तिने ‘स्वप्नसागर’ म्हणून सांगितलं.
“स्वप्नसागर मध्ये कुठं?” -संतोष.
‘ह्याला काय करायचय?’, अनिच्छेनेच तिने इमारतीचा क्रमांक सांगीतला.
“काय आहे म्याडम दिवस चांगले न्हाईत. कोण कधी कुणाचा पाठलाग करतंय, सांगता येत न्हाई. तुम्हाला आतमध्ये सोडतो”. -संतोष. त्याच्या बोलण्याने मालविकाला एकदम हायसं वाटलं. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ चा तिला विसर पडला. ‘ह्या वेळेला driver चांगला होता म्हणून ठीक, पण हि रिस्क परत घ्यायची नाही. सरांना सोबत करायला सांगायची, नाहीतर सरळ विकीला घरी सोडायला सांगायचं’, तिने ठरवून टाकलं. 
 
स्वप्नसागरच्या गेटपर्यंत मागचा दुचाकीवाला पाठलाग करतच होता. त्याला पाहून संतोषचा संताप संताप होत होता. ‘म्याडमला सुखरूप घरी पोहोचवणं’, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. 
गाडी मालविकाच्या इमारतीसमोर थांबली. संतोषला आणि नशिबाला धन्यवाद देऊन मालविका गाडीच्या पायऱ्या उतरली. ती बिल्डींगच्या आत गेल्यावरच संतोषने गाडी हाकली.
पाठलाग करणारा दुचाकीवालाही एव्हाना गायब झाला होता. “म्याडम” गेल्यावर ‘त्याच्या’ कडे बघून घ्यायचं संतोषने मनोमन ठरवलं होतं. पण तो दुचाकीवाला कुठे दिसत नव्हता.
 
वेलांडे सरांनी स्वप्नसागरच्या गेटपाशी बाईक कडेला थांबविली. गेटपासून बिल्डींग अगदी सहज दिसत होती. मालविका बिल्डींगमध्ये शिरताना दिसली. ‘संतोषने पोहोचवलं व्यवस्थित’. त्यांनी बाईक सुरु केली. बाईक स्वप्ननगरीकडे मार्गस्थ झाली.
Advertisements