ओढ माहेराची -संपदा म्हाळगी-आडकर ३/४/१० 
 
आज कुठसे गाठोडे, मिळाले बांधता सामान
आठवणी माहेराच्या, त्यांचे गवसले कण
 
घट्ट बांधले कापड, थोडे जीर्ण थोडे जून
माहेरच्या आठवणी मी ठेविल्या जपून
 
गुलाबी पत्रे काही, त्यांचे पिवळे कागद
निळी शाई उडालेली, त्यांवर आठव सांडून
 
काही मिळाले रुमाल, दिले आईने विणून
मऊसर पोत त्यांचा, अगदी तसाच अजून
 
मला ताईने दिलेल्या, तिच्या बांगड्या काढून
तिचा भास होतो मला, त्यांची होता किणकिण
 
पाही जुनेसे पाकीट, डोळे किलकिले करून
तीन वर्षापूर्वीची भावाची ओवाळण
 
तळाशीच गाठोड्याच्या काही ठेवले राखून
बाबांनी येताना दिलेले, उबदार पांघरूण
 
बाबा माझे म्हणतील, डोळे वाटेला लावून
“दुधावरली साय डोळे भरून पाहीन”
 
माय भेटीस आतुरली, माझा जीव जाई कढून
अश्या अल्पश्या भेटीत, मानीन सारे सण
 
आज बांधता सामान, गवसलेले जे जे कण
मुक्तहस्ते उधळून केली, घरभर पखरण
 
मी चालले माहेरी, अशी स्मृतीरिक्त होऊन
येई परत माघारी, नवे गाठोडे घेऊन
 
Advertisements