जेवताना आईने विषय काढला, “उप्पू, फोटो पाहिलास का रे?”
“हो” -उत्पल.
“आवडली का मुलगी? चांगली शिकलेली आहे” -आई.
“हो चांगली आहे” -उत्पल.
“मग त्यांना फोन करून भेटायला बोलावू का?” -आई.
“एक दिवस थांब, मी विचार करून सांगतो” -उत्पल. आईचा थोडा हिरमोड झाला. 
 
मनुच्या घरीसुद्धा जेवणं आटोपली. मनु आईला मागची आवारावर करायला मदत करत होती.
“मनु, एक छान स्थळ आलंय. मुलगा चांगला आहे. घर चांगलं आहे. स्वत:ची कंपनी आहे. फोटो आणलाय मी केंद्रातून. फोटो तुझ्या टेबलावर ठेवलाय तो बघ. तू तयार असशील तर पुढे बोलणी करू” -आई.
“बर आपण उद्या सकाळी बोलू. मला आता अर्जंट मेल चेक करायच्यात, मी चालले” -मनु.
“ठीक आहे. फोटो बघ” -आई. 
 
***
 
यु आर लॉग्ड इन ऍज ‘SaberCat’. लगेच instant मेसेज आला.
Caveman: “कुठे होतीस तू?”
SaberCat: “इथेच आहे. व्यस्त होते जरा”
Caveman: “मी तुला मिस केलं”
SaberCat: “मी पण मिस केलं तुला”
Caveman: “तुझा विश्वास बसणार नाही, मी तुला पाहिलं नाहीये पण मला वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडलोय”
SaberCat: “आणि आता मी काय सांगतेय ह्यावर तुझा विश्वास बसणार नाही, मी भेटले तुला आज आणि तुला कळलंही नाही”
Caveman: “काय सांगतेस काय?”
              “आज मला कितीतरी मुली भेटल्या हिला कसा ओळखू?”
SaberCat: “हं खरंय”
Caveman: “तू कसं ओळखलंस मला?”
SaberCat: “अंत:चक्षुंनी… हीहीही.. अगदी आत्तासुद्धा तुझी छबी माझ्या डोळ्यांसमोर आहे.”
Caveman: “खरं सांग”
SaberCat: “खरंच सांगतेय. गाठी वर बांधल्या जातात हेच खरं. तू मला पसंत आहेस”
Caveman: “खरं सांग”
SaberCat: “बाय. गुड नाईट”
Caveman: “सांग ना आता. हा कसला आंधळी कोशिंबीरचा खेळ चालवला आहेस तू?”
SaberCat: “बर एक हिंट”
Caveman: “ओके”
SaberCat: “तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला, माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा…. बाय, मी गेले आता, कीप गेसिंग!” 
 
“आज भेटलो? आणि हिंट काय म्हणे ‘तळव्यावर मेंदीचा… ‘, श्रावण चालू आहे. एक दोघींचा अपवाद सोडला तर सगळ्यांच्या हातावर मेंदी आहे. कोण कोण मुली भेटल्या आज मला? ओनीरची बहिण, ऑफिसची रेसेप्शनिस्ट, शेजाऱ्यांची रेवा, बसमध्ये नेहमी दिसणाऱ्या, इंटरव्यूला आलेल्या मुली… इंटरव्यूला आलेली मेंदीवाली तर नाही ना? मेंदीवाली असेल तर सहीच! तिला मी माझा आयडी सांगितला होता ‘Caveman’. तीच असायला हवी ती ‘दर्शना काळे – सुदर्शना’. आईला पण काही प्रॉब्लेम नसेल. तिला पण पसंत आहेच. आईला सांगून टाकावं ‘हो’ म्हणून. आगे जो होगा देखा जायेगा”
 
***
 
सकाळी मनुने लाजत आईला आपला होकार सांगितला. दर्शनाच्या बाबांनीही यथावकाश फोन करून भेटण्याची वेळ ठरवली. दुसऱ्या दिवशीच भेटायचं ठरलं.
उत्पल ऑफिस मधून लवकर घरी आला. आवरून तयार झाला. थोड्या वेळात पाहुणे आले. आई वडिलांच्या मागून दर्शनाही आत आली. तिला पाहून उत्पल खूष झाला. मनात विचार सुरु झाले, “अरे सही हीच ती मेंदीवाली. पण हीच ‘SaberCat’ असेल का?”
 
चहा झाला, खाणं झालं, गप्पा झाल्या. सगळे म्हणाले, “मुलांना एकमेकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू द्या”  उत्पलने सुरुवात केली, “तुला मेंदी खूप आवडते का?”
“हो, मला तिचा ओला लालचुटुक रंग खूप आवडतो” -दर्शना. “आत्ता ‘ओला’ म्हणाली का ही?”, उत्पलच्या आशा पल्लवित झाल्या.
“तुला ऑनलाईन गेमिंग मध्ये रस आहे का?” -उत्पल.
“उत्पल हा काय प्रश्न? तू काय तुझ्या कंपनीसाठी इंटरव्यू घेतोयेस का?”, उत्पलची आई जराशी चिडून म्हणाली.
“विचारू द्यात वाहिनी. दोघांचे विचार जुळतात का नाही हे बघू द्यात. बोल दर्शु” -दर्शनाचे बाबा.
“नाही” -दर्शना.
“अजिबात नाही?”, थोडसं खट्टू आणि बरचसं आश्चर्यचकित होऊन उत्पल म्हणाला.
“अगदी अजिबात नाही असं नाही” -दर्शना.
“ओह बर मग ठीक आहे. कुठे करते?”, उत्पल थोडसं उत्कंठीत होऊन म्हणाला.
“कुठे म्हणजे कॉम्पुटरवर!”, दर्शना थट्टेच्या स्वरात म्हणाली.  
“नाही म्हणजे कुठल्या साईटवर?”, उत्पल फारच अधीर झाला.
“प्रेमगेम्स.नेट!”, असं म्हणून दर्शना गालातल्या गालात हसली. साईट ओळखीची नसल्याने उत्पल नाराज झाला. “म्हणजे ही ती नाही, ही ‘SaberCat’ नाही”, त्याने मनाशी पक्कं केलं. “इंटरव्यूला तर वेगळी साईट सांगितली होतीस” असं अगदी तोंडावर आलं होतं उत्पलच्या. पण वैयक्तिक आणि व्यावसाईक जीवनं एकत्र करायची नाहीत हे त्याने आधीच ठरवलं होतं.
“कोणता गेम?”, उत्पलने धंद्याचा रिसर्च सुरु केला.
“गेम, ‘आंधळी कोशिंबीर’!”, दर्शना परत थट्टेच्या स्वरात म्हणाली.  
“माझं लॉगीन आय डी ‘Caveman’ आहे”, असं म्हणून दर्शना खुदकन हसली.
“हो का? मग माझं लॉगीन ‘SaberCat’ आहे”, असं बोलून उत्पलही हसू लागला. त्यांच्या बोलण्याचा आणि हसण्याचा दोन्हीचा अर्थबोध इतर कोणालाही झाला नाही. अजून काहीही विचारायचे नाही असं ठरवून, दर्शना आणि उत्पलने पसंत केल्याचं सगळ्यांना सांगितलं.
दर्शनाच्या तळव्यावर आता उत्पलच्या नावाची मेंदी लागणार होती. ओला लालचुटुक रंगही येणार होता, दोघांच्या मनात प्रीत हिंदोळा घेत होती!
-समाप्त.
 
 
Advertisements