“ओनीर इंटरव्यू कसे चालू आहेत?” -उत्पलने फोनवरून प्रश्न विचारला. आज ऑफिसमध्ये तो उशिरा आला होता.
“सो फार सो गुड. चांगले चालू आहेत. काही अगदीच बिगिनर्स आहेत. बहुतेक सगळे गेमिंग सोफ्टवेअरचा अजिबात अनुभव नसलेले” -ओनीर.
“ओह बर. लेट्स सी हाऊ इट गोज. मुख्य म्हणजे गेमिंगचा कल पाहिजे. aptitude!” -उत्पल.

 फोन झाल्यावर उत्पल इंटरव्यूविषयी विचार करत होता. “काही चांगले कॅन्डीडेट्स मिळाले पाहिजेत. टेक्निकली सॉलिड!”.
नेहमीच्या सवयीने इमेल चेक केल्या. “आज पण एकही इमेल नाही तिची? कुठे गेलीय कुठे हि मुलगी?” तो मनाशी बोलत होता. 
ओनीर आणि उत्पल हे दोघेही पूर्वीचे सहकर्मचारी. सोफ्टवेअर तंत्रज्ञानात तसा दोघांनाही आठेक वर्षांचा अनुभव. गेमिंग सोफ्टवेअरची दोघांना चांगली जाण होती. शेवटी दोघांनीही, नोकरी सोडून, एकत्र येऊन एक गेमिंग सोफ्टवेअर कंपनी सुरु केली. सगळी कामं निम्मी जबाबदारी उचलून करायची असं त्यांनी आधीच ठरवलं. कंपनीत दोघांचा समान वाटा होता आणि कंपनीच्या नावातही… ओनीरचा ‘O’ आणि उत्पलचा ‘pal’.
काहीतरी विसरला म्हणून, उत्पल परत रिसेप्शनिस्ट कडे गेला. त्या दोन मुली अजून तिथेच होत्या. हसत होत्या. “ह्यांचा नंबर आला नाही वाटतं?” त्याने मनाशी विचार केला. त्या दोघींचा मेंदीवरून विषय चालला होता. एकीनं हातावर मेंदी काढली होती. “ती मेंदीवाली छान आहे”, विचार करत तो केबिनकडे परत गेला.
 
***
 
घरी कॉम्पुटरच्या टेबलाचा खाना उघडल्यावर, उत्पलला एक पाकीट दिसलं. ते त्यानं ठेवलेलं नव्हतं. “आईने ठेवलं असेल. सकाळी काहीतरी फोटोबद्दल बोलत होती ती”, त्याच्या मनात विचार आला. “परत एका मुलीचा फोटो असेल. आई बाबांना का इतकी घाई झालीय लग्नाची? माझी तयारी नाहीये अजून. सांगूनही ऐकत नाहीत”, “मला आत्ता लग्न करायचं नाहीये, का मला ह्या मुलींशी लग्न करायचं नाहीये?”, “तिने इमेलही केली नाही आज. किती वेळा चेक केलं मी”, “मी तिच्या प्रेमात पडलोय का? का मी दर १५ मिनिटांनी तिची इमेल आलीय का पाहत होतो?”, “मला ती आवडलीय हे नक्की”, “फोटो पाहू कि नको? का आधी इमेल चेक करू?” सगळे विचार मनात पिंगा घालत होते.
लॉगइन केलं. अजून इमेल नाही. मग फोटो बघायचा ठरवलं, पाकीट उघडलं. “अरेव्वा! छान आहे कि मुलगी. सुंदर! आईने अगदी शोधून आणलीय”, “काहीशी सकाळच्या मेंदीवालीसारखी दिसते नाही? का तीच??..” थोडा वेळ गेला.
“मला काय होतंय हे? मला ‘SaberCat’ आवडतीय, तिच्या इमेल्सची मी वेड्यासारखी वाट पाहतोय. मग ती सकाळची मेंदीवाली, ती मला दिसायला खूपच आवडलीय.  आणि योगायोग म्हणजे तीच आईला पण आवडलीय म्हणूनच तिने फोटो दिलाय आणून. मेंदीवालीचं स्थळ चालत आलाय. मग ‘SaberCat’ चं काय?”, “मी वेडा होईन आता”. laptop बंद करून तो झोपी गेला.
 
लॉगइन ‘SaberCat’, पासवर्ड “********”. काही मेसेज नाही, इमेल पण नाही. वाट पहिली, ‘Caveman’ चा पत्ता कुठंय. आलाच नाही तो. “का आला नाही तो? झोपला कि काय?”, “झोपला कश्यावरून? त्याच्याकडे दिवस असेल तर?”, “चिडला तर नसेल ना माझ्यावर? काल मी लॉगइन केलं नाही म्हणून”, “येना रे! तुला इंटरव्यूबद्दल सांगायचय.”
 
***
सकाळी शिंकत शिंकतच, शुभदा स्वयंपाकघरात आली.
“शुभा, किती ग ही सर्दी! इतकी सर्दी होते तर मग कशाला लावायची मेंदी?”, आई नाराजीच्या स्वरात शुभाला म्हणाली.
“अग आई सकाळ ची वेळ आहे म्हणून वाटतंय. नंतर कमी होईल” -शुभदा.
“पण आधीच तुझी थंड प्रकृती त्यातून हिवाळा मग हवेत कशाला उद्योग?” – आई. शुभदाला आईची तक्रार अपेक्षितच होती.
“आई, आज मी दुपारी जेवायला घरी नाहीये ” -शुभदा.
“अग सुट्टीच्या दिवशी तरी घरी जेव” -आई.
“अग परवा इंटरव्यूला दर्शु भेटली. किती वर्षांनी! तुला आठवते का ग?” -शुभदा.
“हो” -आई.
“तिथे सगळं बोलणं झालं नाही, म्हणून आज ‘वैशाली’ त भेटायचं ठरलंय” -शुभदा.
“बर, पण लवकर या घरी. स्थळ आणि वेळेचं भान राहत नाही एकदा गप्पा सुरु झाल्यावर” -आई. आईचं म्हणणं पटल्यासारखं “हं”, म्हणून, शुभदा तिकडून निघून गेली.
 
शुभदा आणि दर्शना दोघी ‘वैशाली’ त भेटल्या.
“शुभा, तुझी मेंदी बघू” -दर्शना. शुभाने हात पुढे केला. “छान आलीय. माझ्यापेक्षाही छान! किती सुंदर रंगलीय ग!”.
“हो. मला पण काढावीशी वाटली” -शुभदा.
“नवऱ्याचं भरपूर प्रेम असणार आहे म्हणजे!” -दर्शना.
“लेट्स होप!” -शुभदा. दोघी खिदळल्या.
 
***
 
“हेलो ओनीर, कसा आहेस?” -उत्पलने ओनीरला फोन लावला.
“मी ठीक, तू?” -ओनीर.
“मी पण ठीक. अरे इंटरव्यूजबद्दल बोलायचं होतं” -उत्पल.
“अरे हो! तुला मी इमेल केलीय पण बोललेलं जास्त बर” -ओनीर.
“हं” -उत्पल.
“मी ६ जणांना शोर्टलिस्ट केलंय. तू त्यांचं दुसऱ्या पातळीचं स्क्रीनिंग कर” -ओनीर.
“ओके! कोणी चांगलं आहे का?” -उत्पल.
“येस, ४ मुलं आणि २ मुली आहेत. टेक्निकली सॉलिड आहेत. सहापैकी दोघातिघांना गेमिंगचा aptitude आहे असं वाटतंय” -ओनीर.
“ओके, ठीक आहे. मंगळवारी बोलावलंय ना?” -उत्पल.
“हो” -ओनीर.
“ठीक आहे. सोमवारी ऑफिसमध्ये भेटू” -उत्पल. 
दोघांनी फोन ठेवला, “आय होप ती मेंदीवाली सिलेक्ट झाली असेल”.
 
***

 

“मनु, भेटली का शुभदा?” -आई.
“हो! खूप मजा आली” -मनु.
“कशी आहे ती? पुढच्या वेळेला तिला घरी बोलव. मी सांगितलंय म्हणून सांग” -आई.
“हो” -मनु.
 
(क्रमश:) 
Advertisements