“आई, आज गजर झाला नाही का ग?” खोलीतून बाहेर येत, उत्पल डोळे चोळत आईला म्हणाला.
“अरे झाला की. खूप वेळ वाजत होता. शेवटी मीच येऊन बंद केला. तुला हाक मारली, हलवलं पण” -आई.
“पण उठवायचं ना!” -उत्पल.
“हाक मारली, हलवलं? आता अजून काय करायचं? तू अजिबात उठत नव्हतास. काल रात्री गेम खेळत बसला असशील. मी दोन वाजता उठले तेंव्हा तुझ्या खोलीतला दिवा चालू होता.” बोलता बोलता, आईने चहाचा कप समोर ठेवला. आईला काही उत्तर न देता तो जवळ ओढून उत्पलने तोंडाला लावला. आईलाही उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
“उत्पल, बाबा विचारात होते, फोटोचं काय झालं म्हणून. मी काय सांगू त्यांना?” -आई.
“बर मला आता उशीर झालाय. मी आवरून येतो पटकन. आपण नंतर बोलू.” -उत्पल.
“का आज इतकी घाई काय आहे? तू तर लेट जातोस ना?” -आई.
“आज नवीन कॅन्डीडेट्स येणार आहेत” -उत्पल.
 
***
 
“दर्शना, झाली का तयारी?”, डबा आणून देतच आईने प्रश्न विचारला.
“हो झाली.” -दर्शना.
“प्रमाणपत्र वगैरे घेतलंस ना ग?” -आई.
“हो. आई तू डबा दिलास पण कधी खायला वेळ होईल माहित नाही. इंटरव्यू किती वेळ चालेल माहित नाही.” -दर्शना.
“जेंव्हा होईल तेंव्हा खा. जायला वेळ असेल तर आताच खाऊन घे. रिकाम्या पोटी डोकं चालत नाही.” -आई.
“नको मी बघीन. आता खायला वेळ नाहीये.” -दर्शना.
 
***
 
“शारदा! तू बोलली नाहीस मनुशी?” -श्रीधर.
“नाही हो! काल बोलणार होते, गेले पण होते तिच्या खोलीत. आधीच उशिरा आली होती. आल्या आल्या झोपली बिचारी. दमली होती बहुतेक” -शारदा.
“आज इंटरव्यूला गेलीय. त्यामुळे आज राहू दे” -श्रीधर.
“बर” -शारदा.
“पण उद्या नक्की विषय काढ. मुलाकडची मंडळी फार थांबायची नाहीत. स्थळ चांगलं आहे” -श्रीधर. 
“हं” -शारदा. 
 
***
 
दर्शनाने रिसेप्शनिस्टकडे नाव नोंदवलं. येऊन इतर उमेदवारांबरोबर प्रतीक्षालयात बसली.
“अरेच्या! शुभदा, तू पण इकडे?” -दर्शनाला बालमैत्रीण इथेच भेटायची होती.
“हाय दर्शना! कशी आहेस? Long time” -शुभदा.
“येस. मी छान. तू?” -दर्शना.
“मी पण छान, इकडे इंटरव्यूला का?” -शुभदा.
“हो. आय लव गेम्स! चांगली संधी दिसली म्हणून म्हणलं अप्लाय करावं” -दर्शना.
“सेम हिअर. आय लव गेमिंग टू. आज पहिल्या पातळीची चाचणी आहे ना ग?” -शुभदा.
“येस….. तू कुठे खेळतेस? आपण शेअर करू ना…” -दर्शना. दोघींच्या गप्पा रंगल्या. बाकीचे उमेदवार बरेच तणावाखाली वाटत होते. काहीजण काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होते.
 
एक व्यक्ती घाईघाईने ऑफिसमध्ये शिरली. दर्शना आणि शुभदाचं गप्पांमुळे, आजूबाजूला लक्ष नव्हतं. ऑफिसात आलेल्या व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. “किती जोरात बोलताहेत ह्या मुली? इंटरव्यूचं टेन्शन नाही का ह्यांना? आत गेल्यावर कळेल”, “हुशार असतील कदाचित. त्यामुळे त्यांना टेन्शन नसेल कदाचित. ओनीर पाहिलंच कोण किती पाण्यात आहे”. त्या व्यक्तीने विचार केला. एकदा त्यांच्याकडे पाहिलं. रेसेप्शनिस्टकडे आजच्या भेटी-गाठींची माहिती घेऊन ती व्यक्ती आपल्या केबिनकडे गेली. जाताना परत एकदा दोघींकडे पाहिलं. त्याच्या केबिनच्या दरवाजाच्या आवाजाने दोघी जागेवर आल्या. कंपनीतली कोणतीतरी मोठ्या हुद्द्याची व्यक्ती इथून गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं. दोघीही थोड्याश्या वरमल्या.
 
***
 
“ओनीर इंटरव्यू कसे चालू आहेत?” -उत्पलने फोनवरून प्रश्न विचारला. आज ऑफिसमध्ये तो उशिरा आला होता.
“सो फार सो गुड. चांगले चालू आहेत. काही अगदीच बिगिनर्स आहेत. बहुतेक सगळे गेमिंग सोफ्टवेअरचा अजिबात अनुभव नसलेले” -ओनीर.
“ओह बर. लेट्स सी हाऊ इट गोज. मुख्य म्हणजे गेमिंगचा कल पाहिजे. aptitude!” -उत्पल.
 
फोन झाल्यावर उत्पल इंटरव्यूविषयी विचार करत होता. “काही चांगले कॅन्डीडेट्स मिळाले पाहिजेत. टेक्निकली सॉलिड!”.
नेहमीच्या सवयीने इमेल चेक केल्या. “आज पण एकही इमेल नाही तिची? कुठे गेलीय कुठे हि मुलगी?” तो मनाशी बोलत होता. 
ओनीर आणि उत्पल हे दोघेही पूर्वीचे सहकर्मचारी. सोफ्टवेअर तंत्रज्ञानात तसा दोघांनाही आठेक वर्षांचा अनुभव. गेमिंग सोफ्टवेअरची दोघांना चांगली जाण होती. शेवटी दोघांनीही, नोकरी सोडून, एकत्र येऊन एक गेमिंग सोफ्टवेअर कंपनी सुरु केली. सगळी कामं निम्मी जबाबदारी उचलून करायची असं त्यांनी आधीच ठरवलं. कंपनीत दोघांचा समान वाटा होता आणि कंपनीच्या नावातही… ओनीरचा ‘O’ आणि उत्पलचा ‘pal’.
काहीतरी विसरला म्हणून, उत्पल परत रिसेप्शनिस्ट कडे गेला. त्या दोन मुली अजून तिथेच होत्या. हसत होत्या. “ह्यांचा नंबर आला नाही वाटतं?” त्याने मनाशी विचार केला. त्या दोघींचा मेंदीवरून विषय चालला होता. एकीनं हातावर मेंदी काढली होती. “ती मेंदीवाली छान आहे”, विचार करत तो केबिनकडे परत गेला.
 
(क्रमश:)
Advertisements