गुप्तधन -संपदा म्हाळगी-आडकर
 
झुंजारवाडीच्या सरपंचपदी धुरंदर पाटीलाची निवड झाल्यापासून तो चांगलाच हवेत होता. तसं धुरंदर म्हणण्यासारखा त्याने अजून काहीही केलं नव्हतं. आपल्या वडिलांना, झुंजारराव पाटीलांना, अभिमान वाटावा असं एकच काम त्याने केलं होतं. वडिलांसाठी गावाचं नाव हुन्नरवाडीचं झुंजारवाडी केलं होतं. ठाकरेंकडून त्याने प्रेरणा घेतली असावी कदाचित.
 
धुरंदरला वाड-वडिलार्जित बराच पैसा-अडका आणि जमीन-जुमला मिळाला पण त्याची अतीची हाव काही कमी होत नव्हती. ह्या ना त्या मार्गाने पैसा कसा मिळेल ह्याचा तो सारखा विचार करीत असे. गुप्त धनापायी त्याने बरेच यज्ञ याग केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. तसा तो व्हायचा नव्हताच. धुरंदर स्वत: काहीही काम करत नसे. वंशपरंपरेने मिळालेला पैसा वाढवण्यासाठीही तो काहीही करत नव्हता. घर चालत होतं, कुठे काही थांबत नव्हतं.
 
धुरांदरची बायको पण त्याच्यासारखीच. आयत्या मिळालेल्या संपत्तीवर ती बसून होती. दाग-दागिन्यांनी मढलेली होती. नवऱ्याच्या गुप्त धनाच्या वेडात तीही सहभागी होती. पैसा आल्यावर “मी हे करीन, ते करीन” ह्या विचारात ती रात्रंदिवस गढलेली असायची.
 
गावाच्या भटजींचा मात्र धुरांदरच्या वेडामुळे खूप फायदा झाला होता. दर महिन्याला धुरंदर पाटलाकडे यज्ञ-याग, पूजा-अर्चा, अभिषेक न चुकता चालू असल्याने भटजींना भरपूर दक्षिणा मिळत असे. पूजेमुळे भटजींना तरी गुप्त नाही पण सुप्त धनाचा लाभ होत होता.

 

धुरांदरच्या बायकोला, शेवंताला, अधून मधून गुप्तधनाची, श्रीमंत झाल्याची स्वप्न पडायची. स्वप्न पाहताना ती झोपेत बोलायचीही. त्यांचा मुलगा चक्रधर तिला झोपेतून उठवायचा. आज तिला परत स्वप्न पडलं. स्वप्नात कोल्हापूरची महालक्ष्मी माता आली. महालक्ष्मी तिचा माहेरची कुलदेवी होती. देवी म्हणाली, “शेवंते, झोपलीस काय उठ.”. शेवंताचा डोळ्यांवर विश्वास बसेना.
“देवी तू आलीस” असं म्हणून शेवंता झोपेतल्या झोपेत चार वेळा देवीच्या पाया पडली. तिच्या चुळबुळीने, शेजारी झोपलेला चक्रधर जागा झाला.
“आये तुझी स्वप्नं बास कर आता, मी पडीन कि बाजेवरून खाली. स्वप्नं तुला आणि ढुशी मला” चक्रधर झोपेतच बोलला. त्याच्या बोलण्याने शेवंता थोडीशी जागी झाली पण कूस बदलून परत झोपी गेली. स्वप्न सुरूच राहिलं.
“माये मला माफ कर, तो आमचा चक्या जरा मधे मधे करत व्हता.”-शेवंता.
“मी तुला वर द्यायला आली आहे” -देवी.
“वर आता ते काय असतं?” -शेवंता.
“तू लवकरच खूप श्रीमंत होशील.” -देवी.
“ओह त्याला वर म्हणत्यात होय?… श्रीमंत म्या??” -शेवंताची ट्यूब पेटायला जरा वेळ लागला.
“हो तूच, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल.” -देवी.
“काय करायचं? पूजा घालायची का जेवण द्यायचं?” -शेवंता.
“त्यातलं काही नाही. तुझ्या गळ्यातल्या चपलाहारात २० लक्ष्मीच्या चकत्या आहेत.”-देवी.
“व्हय की. ४ तोळ्याचा हाय.” -शेवंता. देवीच्या विधानात आपण सारखं मधे बोलतोय ह्याची जाणीव झाल्यावर, तिने जीभ चावली. “माये, एक डाव माफी कर”
“ऊठ आणि त्यातल्या ५-५ चकत्या, गावातल्या ४ विहिरींमध्ये टाक. स्वतःच्या विहिरीत टाकायच्या नाहीत.” -देवी.
“बर” -शेवंता. शेवन्ताने नकळत गळ्यातल्या चपलाहाराला हात लावला.
“असं करशील तर तुला मोठं धन प्राप्त होईल” -देवी.
“करीन मी देवी, नक्की करीन” -शेवंता.
 
शेवंता जागी झाली. उठून बसल्यावर तिला जाणवलं की हे स्वप्न होतं. माहेरची देवी स्वप्नात आल्याने ती आनंदून गेली. पण चपलाहार मोडावा लागणार ह्या विचाराने कष्टी झाली.  “ह्यास्नी सांगावं का? त्ये कधी सोनं पाण्यात सोडू द्यायचे न्हाईत. त्यांच्यापायी गुप्तधन जायचं की. गुप्तधन मिळालं की सांगीन त्यांना स्वप्नाचं, देवीच्या वराचं.”, शेवन्ताने विचार केला.
परत झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप येत नव्हती. तिने चक्रधरला उठवलं.
“काय ग आये, झोपू दे की” -चक्रधर.
“ए चक्या ऊठ की, चल जायचय” -शेवंता.
“एवढ्या रातचीला कुठे नेतीस आता?”-चक्या.
“आधी ऊठ तर मग सांगती” -शेवंता. शेवंता चक्याला घेऊन घराबाहेर आली. तिचं सगळं स्वप्न त्याला सांगितलं.
“आये तू काय करणार आता? टाकणार व्हय सोनं पाण्यात?” -चक्या.
“व्हय तर देवीचा कौल हाय त्यो!” -शेवंता.
“बा खवळल की! परवा पतंग आनायला दिलेलं ५ रुपै हरवलं तर रट्टा हानला त्यानं माह्या पाठीत” -चक्या.
“त्यास्नी सांगतंय कोण? आपण दोघंच जायचं. डायरेस गुप्तधन मिळालं की सांगू त्यास्नी.” -शेवंता.
शेवन्ताचा प्रस्ताव, चक्याने मान्य केला. ते दोघं घराबाहेर पडले.
“चार व्हिरी कोनत्या घ्याव्या रं?” -शेवंता.
“सोनावान्यांची जवळच हाय ती घेऊ. एक भटजींची, एक काने वकिलांची, एक किसन वाण्याची!” -चक्या.
“वाण्याची नको. त्याचं आणि तुझ्या बाचं पटत न्हाई” -शेवंता.
“आता ऱ्हाईल्याच किती व्हिरी? एक भिम्याची पण ती माळावर हाय, गावात न्हाई. तिथं जाऊन परत येईस्तोवर उजडतय की” -चक्या.
“देवी म्हणाली गावातलीच व्हीर पाहिजे. बर मग राहिलं. वाण्याचीच व्हीर खरी” -शेवंता.
दोघं जाऊन हळूच ४ विहिरीत ५-५ बिल्ले टाकून आले. परत येऊन चक्या झोपी गेला. पण शेवंताला झोप येत नव्हती. “गुप्तधन भेटल का?.. नक्की भेटल… न्हाई भेटलं तर? ह्यास्नी काय सांगू? ह्ये काय म्हनतील?” हे विचार तिच्या मनात चालले होते.
 
दुसऱ्या दिवशी शेवंता काहीशी उशिरा उठली. घाईघाईनं कामाला लागली. पूजेला भटजी यायचे होते. आज त्यांना पण उशीर झाला होता. धुरंदर आत येऊन शेवंताला म्हणाला, “भटजी कसं न्हाई आलं?” गळ्यात चपलाहार नाही हे नवऱ्याला कळू नये म्हणून सोवळ्यात असल्यासारखी, दोन्ही खांद्यांवर पदर घेऊन शेवंता चुलीशी बसली होती.
“चक्या कुठं हाय?” -धुरंदर
“झोपला असंल” -शेवंता.
“त्याला धाडतो भटजींना आनायला” -धुरंदर.
धुरंदरने चक्याला झोपेतून उठवून भटजींकडे पिटाळले. थोड्याच वेळात तो परतही आला.
“बाss ते आज यायचे न्हाईत” -चक्या.
“काय झालं? काय येईनात झाले त्ये? त्यांनीच न्हाई सांगितलं व्हय, पूजा महत्वाची हाय म्हणून?” -धुरंदर.
“मला त्ये माहित न्हाई? भटीणबाईंनी सांगितलं त्ये आज येणार न्हाईत.” असं बोलून चक्या निघून गेला.
“जरा जाऊन येतो”, असं शेवंताला सांगून धुरंदर निघून गेला. थेट जाऊन भटजींच्या घरी धडकला. भटीणबाईंनी सगळा वृत्तांत कथन केला. भटजींना तर सकाळी सकाळी अंघोळ करताना महालक्ष्मीमाता बिल्ल्याच्या रुपात भेटली. असेच काहीसे चमत्कार, गावात घडत होते. भटजी, सोनावणे, काणे आणि किसन वाणी सगळ्यांना विहिरीत आज सकाळी महालक्ष्मीच्या प्रतिमा असलेले बिल्ले सापडले होते.
 
घरी आला तसा धुरंदर तडक स्वतःच्या विहिरीवर गेला. मोटेच्या सहाय्याने वेगाने पाणी काढू लागला. काढलेले पाणी शेतात सोडू लागला. मोटेचा आणि पाण्याचा आवाज ऐकून शेवंता बाहेर आली.
“अव काय करतायसा?” -शेवंता.
“अग सोनं शोधातोया. गावात सगळ्या व्हीरीत सोनं सापडतंय. त्या किसन्यालाही गावलंय. त्याला गावलं तर आपल्यालाही गावल.” -धुरंदर जोमानं पाणी काढत होता. शेवंता काही न बोलता आत गेली. काय बोलावं तिला सुचतच नव्हतं. गावातल्या विहिरीत सापडणार सोनं तिचंच होतं. नवऱ्याला सांगितलं तर तो बोलेल हे उघड होतं.
 
म्हणता म्हणता रात्र झाली. धुरंदरचं पाणी काढणं चालूच होतं. तो दमल्याने, वेग थोडा कमी झाला होता. आज तो जेवण-खाण्यासाठी ही थांबला नव्हता. शेवंताला त्याची कीव आली. बाहेर जाऊन धुरंदरला थांबवून तिनं सगळं सांगून टाकलं. धुरंदरला तिचा राग आला. पण तिला बोलून काही उपयोग नव्हता. आजवर त्याने स्वत:ने  गुप्तधनापायी खूप पैसा खर्च केला होता.
 
३-४ महिन्यात धुरंदरकडून भटजींना पूजेसाठी बोलावणं आलं नव्हतं. आज अचानक ते आल्याने, भटजींना आश्चर्य वाटलं. पिक चांगलं आल्याने धुरंदरने सत्य-नारायणाची पूजा घालायचं ठरवलं होतं. धुरंदरने वेळेवर घातलेल्या पाण्याने, पिक जोमात वाढलं होतं. काळ्या धरणीमातेनं, उदरात दडवलेलं गुप्तधन स्वत:हून बाहेर काढून दिलं होतं.
 
 
Advertisements