एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. रॉबिनला ते जाणवत होतं.
 
**** 
  
दारावरची बेल वाजली. मेरीडीथने हसून स्वागत केलं. रॉबिन आणि सुझी आत आले. शुभेच्छांची देवाण घेवाण झाली. सुझीची नजर कोणाला तरी शोधत होती. मेरीडीथला ते जाणवलं. ती दोघांना बेडरूममध्ये घेऊन गेली. कोणीतरी आरामखुर्चीत बसलं होतं.
“नॅना” मेरीडीथने हाक मारली. गुलाबी रंगाचा झगा घातलेली, सुरकुतलेल्या चेहऱ्याची एक नव्वदीतली सुंदर आजी बसली होती. तिचे पांढरे शुभ्र दाट केस फारच सुंदर दिसत होते.
“अग तुला भेटायला बघ कोण आलंय” -मेरीडीथ. आपले थकलेले बारीक डोळे अजूनच मिचमिचे करून आजी रॉबिन आणि सुझीकडे पाहू लागली.
“कोण?” -आजी.
“मी सुझी आणि हा माझा नवरा रॉबिन”, असं बोलत सुझी नकळत आजीच्या पायाशी जाऊन बसली.
“ओह बर मी लायली” -आजी.
“मी तुम्हाला नॅना म्हणू?” -सुझी
“म्हण की तू मला मेरी सारखीच” -आजी.
“तुम्ही हिचं नाव ठेवलं का? तुमच्या नावावरून? रोझमेरीवरून मेरीडीथ?” -सुझी. आजीला आश्चर्य वाटलं. सुझी पिशवीतून बाटली, पत्र, दगड काढून आजीच्या हातात देऊन म्हणाली, “तुमच्या स्टीव्हीच्या आठवणी आणल्यात मी.”
ते सगळं पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आलं.
“स्टीव्ही… माझं पाहिलं प्रेम.. तो पंधरा वर्षांचा मी दहाची…. हे पत्र माझं पाहिलं प्रेमपत्र. ह्या सगळ्या आठवणी माझ्या पहिल्या प्रेमाच्या.. बाबांची वाईनची बाटली फुटली नाही तर.. तुम्हाला कुठे सापडली?” -आजी
“चार्लस्टन वर्जिनिया. अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर” -रॉबिन.
“मी तर जर्मनीत नदीत सोडण्यासाठी दिली होती.” -आजी
“पण नॅना रोझमेरी तुम्ही इकडे कश्या आलात?” -सुझी
“वाचले… मृत्युच्या छावणीत पोहोचले होते.. पण वेळ आली नव्हती. सगळ्या मुलांना पालकांपासून वेगळं केलं नाझींनी. त्यादिवशी मी माझ्या आईला शेवटचं पाहिलं….” -आजी. सुझी आणि मेरीडीथला रडू आलं.
“सगळ्या मुलांना ४ दिवस एका चेंबर मध्ये बंद केलं. खूप थंडी होती. माझ्या बरोबरची खूप मुलं दगावली बिचारी. माझ्या आईने माझ्या कोटात २ बनपाव लपविले होते. ते खाऊन मी दिवस काढले. चौथ्या दिवशी मला एकटीलाच चेंबर मधून बाहेर काढलं. नाझी सैनिक मला लांब कुठेतरी एका ऑफिसात घेऊन गेले. कुठे ते मला कळलं नाही. काहीतरी कागदपत्रांवर माझे अंगठे घेतले आणि मला परत ऑफिसच्या बाहेर घेऊन आले. बाहेर अंकल गोल्डबर्ग उभे होते. त्यांना पाहून मी धावत सुटले. जवळ जाऊन त्यांना मिठी मारली. काही बोलण्याइतका माझ्यात त्राण नव्हता. मी त्यांना अंकल म्हणणार एवढ्यात त्यांनी माझं तोंड दाबलं व उचलून मला गाडीत घातलं” -आजी.
“मग पुढे काय झालं?” -रॉबिन.
“अंकलनी नाझींना मी त्यांची मुलगी असल्याचं सांगितलं होतं. माझ्या आई बाबांनी फक्त माझा सांभाळ केल्याने मी जन्माने ज्यू नाही असं खोटं सांगितलं त्यांनी. अंकलवर विश्वास ठेऊन मला सोडण्यात आलं होतं.” -आजी
“वाव” -तिघांच्या तोंडातून एकाचवेळी बाहेर पडलं.
“अंकलनी माझा मुलीप्रमाणे सांभाळ केलं. त्यांच्या कुटुंबाबरोबर ते मला अमेरिकेत घेऊन आले. त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. इकडे माझे जीवनच बदलून गेले” -आजी.
“ओह वाव” -रॉबिन
“आणि स्टीव्ही? तो भेटला परत?” -सुझी.
“नाही.. पण आज भेटला तुमच्यामुळे.. परत” -आजी. सगळे रडत हसू लागले. आजी हातातल्या वस्तूंकडे पाहू लागली.
“माझे मोती मिळाले का तुम्हाला? मी बाटलीतच ठेवले होते.” -एकदम काहीसं आठवल्यासारखं आजी म्हणाली.
“हो आंट शेल्बीने दिलेले ना?”- असं म्हणत सुझीने हसत पर्समध्ये हात घातला. एक डबी काढून तिने आजीच्या समोर धरली.
आजीला आश्चर्य वाटलं. डबी उघडून तिने एक मोत्याची माळ बाहेर काढली.
“नॅना, तुमचे मोती मी परत ओवून आणलेत पण कधीही सुटू नयेत म्हणून” -सुझी. येता येता सुझी mall मध्ये थांबण्याचं प्रयोजन आता रॉबिनला कळलं होतं. आजीच्या डोळ्यात पाणी आलं.
“काय झालं नॅना?” -मेरीडीथ.
“खाऱ्या पाण्याचं ऋण फेडतेय.” असं म्हणत रोझमेरी आजी हसली. तिला हरवलेलं सगळं नव्याने गवसलं होतं. तिच्या आठवणी समृद्ध झाल्या होत्या आणि ती नव्याने श्रीमंत!
सगळे खुश होते. रॉबिनने बाहेर जाऊन संग्रहालयाला फोन केला व बाटलीच्या हस्तांतरास नकार कळविला.
-समाप्त.
Advertisements