कागद वाचताना अश्रू कधी झरू लागले, सुझीला कळलंच नाही. पत्र संपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. रॉबिनचे डोळेही पाणावले होते. त्याने हळूच सुझीला कुशीत घेतलं.
 
**** 
 
बाटलीचं काय करावं ह्या विचारात रॉबिन कित्येक दिवस गढलेला होता. हा विषय सुझीपाशी काढला की तिला रडू यायचं आणि दिवसाचं खोबरं व्हायचं. “हिने एवढं का मनाला लावून घेतलंय?” हे त्याला समजेना. शेवटी त्याने विषय काढला.
“सुझी ह्या बाटलीबद्दल वर्तमानपत्रात द्यायला हवं” -रॉबिन. सुझीनं चमकून बघितलं.
“हो ह्या बाटलीबद्दल लोकांना कळायला हवं. इतिहासातला हा मोठा दुवा आहे.” -रॉबिन.
“हो आणि कदाचित रोझमेरी किंवा स्टीव्ही जिवंत असतील तर त्यांना देऊन टाकू.” -सुझी. तिला परत रडू आलं.
“सुझी काय झालंय तुला? हा काय वेडेपणा आहे?” -रॉबिन.
“तिचं केवढं प्रेम होतं त्याच्यावर” -सुझी. रडणं चालूच होतं.
“हे बघ ते दोघं जिवंत असणं थोडं अवघड आहे. पण ह्या बाटलीची बातमी द्यायला तुझा होकार आहे नं?” -रॉबिन.
“हं”, हो तर म्हणलं होतं पण ह्या आशेनी की रोझमेरी आणि स्टीवी जिवंत असतील तर ते संपर्क साधतील. रॉबिनने चार्लस्टन हेराल्डचा नंबर शोधून काढला.
 
दुसऱ्या दिवशी ही ब्रेकिंग न्यूज चार्लस्टन हेराल्डमध्ये झळकली. सगळ्या शहरात पसरली. मुलाखतीसाठी घरचा फोन सारखा खणखणत होता. सकाळपासून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन रॉबिनला थकवा आला होता. सुझी फोनवर बोलणं शक्य नव्हतं. रोझमेरीच्या पत्राने ती फारच उदास झाली होती. त्यातून सकाळपासून तोच विषय चालू होता. आशा फक्त एकच की कोणीतरी संपर्क करेल.
 
१५ दिवस झाले. अजून कोणीही बाटलीसाठी संपर्क केला नव्हता. बाटली संबंधित कोणीही व्यक्ती पुढे आली नव्हती. नाझींच्या मृत्यू छावणीत रोझमेरीचा अंत झाल्याचं रॉबिनने मनाशी पक्कं केलं होतं. पण स्टीव्हीचं काय? तो कुठे आहे? आहे का…का..?
बाटलीकडे पाहून सुझीला अजूनच नैराश्य येत होतं. त्याने राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहालयाला संपर्क करायचं ठरवलं.
 
राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहालयाने बाटलीची सत्यता पडताळून पहिली. सर्व कसोट्यांवर पार झाल्यावर, संग्रहालयाने पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. रोझमेरीची बातमी देशाच्या सर्व छोट्या मोठ्या वर्तमानपत्रात, टीव्ही वाहिन्यांवर दिसली. बाटलीच्या हस्तांतराचा दिवस ठरला. ह्या प्रक्रियेमध्ये सुझीने कोणताही सक्रीय भाग घेतला नाही.
 
**** 
 
रविवारी सकाळी सुझी pancakes बनवत होती. रॉबिनला pancakes खूप आवडत. तेवढ्यात फोन वाजला. तिला त्याचा राग आला. pancakes चा सोनेरी रंग तिला हवा तसा आला नाही की तिला राग येई. फोनच्या नादात तिचे pancakes अनेक वेळा जळले होते. तणतणत तिने फोन उचलला.
“Hello सुझी and रोबिन्ज होम” -सुझी
“Hello, कॅन आय स्पीक टू रॉबिन जेफरसन प्लीज?” -दुसरीकडून स्त्रीआवाज आला.
“शुअर, मी त्याची बायको बोलतेय. कोण बोलतंय?” -सुझी.
“माझं नाव मेरीडीथ कार्टर. मी तुमच्या बाटलीबद्दल वर्तमानपत्रात वाचलं. त्याविषयी बोलायचं होतं.” -स्त्रीआवाज. तेवढ्यात रॉबिन जिना उतरून स्वयंपाकघरात आला. तो आल्यावर सुझीने फोन ध्वनिक्षेपकावर टाकला.
“बोला.” -सुझी.
“मी वेन, न्यू जर्सी मधून बोलतेय. माझ्याबरोबर माझी आजीही राहते. तिचं नाव लायली अडॅम्स. ती पूर्वाश्रमीची लायली लेविन आहे.” -मेरीडीथ.
ते ऐकून सुझी तिथेच थिजली. तिला काय बोलावं कळेना. आनंदाने डोळे विस्फारून ती रॉबिनकडे पाहू लागली.
“Hello..कोणी आहे का?” -मेरीडीथ.
“हो हो, मी रॉबिन, तुमच्या दोघींचं बोलणं मी ऐकलं.” -रॉबिन. पुढचा बराच वेळ फोनवर बोलण्यात गेला. सुझी तिथेच निशब्द उभी होती. तव्यावरचे pancakes केंव्हाच करपले होते.
 
**** 
 
एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. रॉबिनला ते जाणवत होतं.
(क्रमश:)
Advertisements