सुझी कॉलेजच्या शिक्षणानिमित्त युरोपात राहिली होती. भाषांची आवड असल्याने तिने Spanish आणि जर्मन शिकून घेतली. तिने वाचायला सुरुवात केली.
 
तारीख- ४ ऑगस्ट १९३८   ठिकाण- प्राग
प्रिय स्टीव्ही,
तू कसा आहेस? तुला भेटून खूप दिवस झाले. तुला झेक समजत नाही म्हणून मी जर्मन मध्ये लिहायचा प्रयत्न करत आहे. ३ महिन्यापूर्वी भेटलास तेंव्हा तू हे गुलाबी कागद मला दिले होतेस आणि प्रेमपत्र  लिहायला सांगितलंस, पण मला माहित नाही प्रेमपत्र कसं लिहितात. शाळेत फक्त पत्रच शिकवलं आहे.
 
तू भेटून गेलास आणि काही दिवसात आम्हाला घर सोडव लागलं. सध्या आम्ही बाबांच्या ऑफिसच्या तळघरात राहत आहोत. अरे हो सांगायचं राहून गेलं बाबांचं ऑफिस बंद आहे. २ दिवसांपूर्वी बाबा दिवसाच ऑफिसातून परत घरी आले. आईने भरभर पिशव्या भरल्या. आई म्हणाली “आता आपल्याला इथे राहता येणार नाही.” मी येताना काही सामान बरोबर कोटामध्ये लपवून आणलं. त्यात हे कागदही आणले. आम्ही इकडे आलो. आईने येताना काही ब्रेड, टोस्ट आणले आहेत. इथे थोड्याफार सोई आहेत म्हणजे दिवे, बाथरूम वगैरे. आई बाबा फरशीवरच झोपतात. माझ्यासाठी आईने एक ब्लांकेट आणलं आहे. 
 
काल आई आली त्यामुळे पत्र अर्धवट सोडावे लागले. मला असंच अधून मधून लिहावं लागेल कदाचित. काल अंकल गोल्डबर्ग आले होते. येताना थोडं दुध आणि ब्रेड घेऊन आले. ऑफिस असल्याने त्यांना फार सामान आणता येत नाही. लोकांना शंका येते म्हणतात. ब्रेड रोझमेरी फ्लेवर्ड, अगदी माझ्या नावासारखा. ओह् मी तुला सांगितल का माझा मधलं नाव आईने रोझमेरी ठेवलंय.
 
बाहेर काय चाललंय काही कळत नाही. मधेच रणगाड्यांचे, सायरनचे आवाज येत असतात. ह्या तळघराला भिंतींवर वरती झडपा आहेत. पण त्या उघडल्याने धूळ आत येते. उघडलेल्या झडपेतून कोणीतरी आत बघेल अशी आईला भीती वाटते. ती मला अजिबात बाहेर बघू देत नाही. दिवे आहेत पण ते लावता येत नाहीत. अंधारात लिहायला जड जातंय. माझं खरं अक्षर खूप चांगलं आहे. जर्मन लिहायची सवय नसल्याने लिहायला वेळ लागतो. चुका पण असतील समजून घे.
 
काल माझ्या हातून चुकून दिवा लावला गेला. बाबा खूप ओरडले मला. रात्रीच्या वेळी दिवा दिसला तर नाझी शोधत येतात असं काहीसं म्हणत होते. तुला माहितेय हे नाझी कोण आहेत?
अंकल गोल्डबर्ग आज परत आले होते. खूप दमल्यासारखे दिसत होते. बाबांच्या ऑफिस मधल्या कोणाला तरी पकडून नेल्याचं सांगत होते. तेंव्हापासून आई नुसती रडतेय. तिला काय होतंय मला कळत नाहीये. कोण कोणाला पकडून नेतंय?
 
बाबा आज बाहेर गेले पण धावत पळत परत आले. दूर कुठेतरी धरपकड चालल्याचं आईला सांगत होते. आई परत रडली. “का त्रास देत आहेत हे लोक? आम्ही ज्यूंनी त्यांचं काय बिघडवलं आहे?” असं काहीसं बोलत होती. मला कळलं नाही.
 
गेले ४ दिवस मला बरं नव्हतं. सारखा ब्रेड खाऊन पोट दुखतंय माझं. पण पर्याय नाही. दुसरं काही शिल्लक नाहीये. अंकल गोल्डबर्ग पण खूप दिवसात आले नाहीत.
 
आज जरा बरं वाटतंय. मोकळ्या हवेत भरभरून श्वास घ्यावासा वाटतोय, पण बाहेर जाता येत नाहीये. मी झडप थोडीशी किलकिली केली तर ते आईच्या लक्षात आलं. मला ओरडली. पण नंतर तिने मला समजावलं. तुला माहितेय हे कोणीतरी नाझी ज्यूंना त्रास देतायेत. हिटलर म्हणून कोणीतरी माणूस आहे, तो त्यांचा मेन आहे. आईने मला विश्वासात घेऊन सांगितलं, मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटतंय.
 
अंकल गोल्डबर्ग आज परत आले. खूप दु:खी वाटले. अजून काही ओळखीच्या लोकांना छावणीमध्ये नेल्याचं सांगत होते. त्यांना रडू येत होतं. अंकल स्वतः जर्मन आहेत त्यांना नाझींची लाज वाटत होती. त्यामुळे कदाचित! छावणीत जाणारा माणूस परत येत नाही वाटतं. त्याला मारून टाकतात बहुतेक!
मला आज खूप राग आला आहे. ही मोठी माणसं मला काही सांगत नाहीत. माझी नजर चुकवून रडणारे डोळे पुसतात. मला ह्या तळघराचा कंटाळा आला आहे. अजून किती दिवस इथे राहायचं?
 
आज अंकल स्टाईनगार्टन आले होते. त्यांना अंकल गोल्डबर्गन्नी पाठवलं होतं. अंकल गोल्डबर्गवर कोणीतरी पाळत ठेवतंय असं वाटतंय. त्यामुळे आता अंकल स्टाईनगार्टन मदत करणार आहेत. अंकल गोल्डबर्गन्ना काही होऊ नये. ते मला आवडतात. त्यांनी आम्हाला खूप मदत केलीय. मागच्या वेळी माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते. अंकल स्टाईनगार्टननी काळजी घ्यायला सांगितलंय. बाहेर युद्ध पेटलंय म्हणत होते. ‘God save us!’ रणगाड्यांचे, सायरनचे आवाज चालूच आहेत.
  
आज मला खूप करुण वाटतंय. बाबा आज बाहेर जाऊन आले. आंट शेल्बी छावणीमध्ये गेल्याचं त्यांना कुठूनतरी कळलं. आंट शेल्बीने मला मोत्याची माळ दिली होती. ती माझ्या हातून तुटली.
बाबांनी आज मला जवळ घेऊन सगळं सांगितलंय. हे नाझी ज्यूंना मृत्युच्या छावणीत नेऊन मारून टाकताहेत. आम्हालाही कधीपण पकडतील. मला भीती वाटली. आई बाबांशिवाय मी काय करू? मला पण मारतील का ते? मी तुला परत कधी भेटू शकणार नाही का? मला मारून टाकलं तर हे पत्र तुझ्यापर्यंत कसं पोहोचेल?
 
मी ठरवलंय. हे पत्र तुझ्यापर्यंत कसं पोहोचवायचं ते. अंकलनी दिलेली वाईनची बाटली, आई बाबांनी काल अखेर संपवलीय. ती मी धुवून ठेवलीय. मी ती वापरणार आहे. मी तुला परत न भेटल्यास हे पत्र माझं इच्छापत्र समज. ह्या बाटलीत तुला माझ्या माळेचे मोती मिळतील. काही दगड पण ठेवत आहे. तुला आठवतंय, तू इकडे आला होतास तेंव्हा आपण पिकनिकला गेलो होतो. एल्बे नदीच्या वाळूत हातात हात घालून किती हिंडलो होतो. त्या वाळूत सापडलेले रंगीत दगड तू मला दिले होतेस. ते मी तुला परत देतेय, माझी आठवण म्हणून. आतापर्यंतच्या आयुष्यातली हीच माझी श्रीमंती मी तुझ्या नावावर करीत आहे.
 
आज मी पत्र संपवायचं ठरवलंय. अजून खूप लिहायचं होतं. मला तू किती आवडतोस हे तुला मी शब्दात सांगू शकत नाही.
आज अंकल स्टाईनगार्टन आले आहेत. ही बाटली बंद करून मी त्यांना एल्बेमध्ये टाकायला सांगणार आहे. ज्या नदीच्या काठावर मला तुझे प्रेम गवसले. तिच्याच पाण्याला हा हक्क आहे, माझा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवायचा. मध्ये बाटली फुटली आणि माझ्या पत्राला समाधी मिळाली तर एल्बेकाठी सुरु झालेली आपली प्रेमकहाणी तिच्या पाण्यात समाप्त होईल.
 
माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचावं ही ईश्वराकडे प्रार्थना!
काळजी घे.
तुझी आणि तुझीच,
लायली रोझमेरी लेविन. 
 
कागद वाचताना अश्रू कधी झरू लागले, सुझीला कळलंच नाही. पत्र संपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. रॉबिनचे डोळेही पाणावले होते. त्याने हळूच सुझीला कुशीत घेतलं.
(क्रमश:)
Advertisements