बाटलीतली श्रीमंती  –संपदा म्हाळगी-आडकर २/५/१०
 
चार्लस्टन, वर्जिनियाच्या समुद्र किनाऱ्यावर आज रॉबिन एकटाच फिरत होता. सुझी आज त्याच्याबरोबर वॉकला आली नव्हती. २ दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे, तिला कणकण आली होती. वादळानंतर समुद्र शांत दिसत होता. आपल्या गर्भितातलं त्याने बरंच काही किनाऱ्यावर रितं केलं होतं. कचरा आणि समुद्री पाचोळ्यातून अधून मधून रंगीबेरंगी शंख-शिंपले चमकत होते.
 
मार्क ऍन्थनीचं कोणतंसं गाणं गुणगुणत, रेंगाळत रॉबिन वाळूतून चालत होता. मधेच वाळूत आपलं नाव लिहित होता. चमचमणाऱ्या शिंपल्यांना न्याहाळत पुढे जात होता. काही शिंपले उचलायची त्याची इच्छा होत होती. सुझीला असला कचरा अजिबात आवडत नसे. तिच्या नकळत रॉबिनने गराजमध्ये एका खोक्यात त्याच्या कचऱ्याचा संग्रह केला होता. 
 
थोडं अंतर चालत गेल्यावर, खूप मोठं काहीतरी चमकल्याचा त्याला भास झाला. “अरे वा! एवढा मोठा शिंपला!”, असा विचार करून तो धावत जवळ गेला. काचेची काहीतरी वस्तू वाळूत रुतली होती. त्यावरून प्रकाश परावर्तीत झाला होता. उत्कंठेने खणून पाहिल्यावर ती एक दारूची बाटली निघाली. “लोक कचरा करतात आणि किनाऱ्यावर नाहीतर समुद्रात टाकतात”, असा विचार करून तो ती टाकून द्यायच्या बेतात असताना ती बाटली सीलबंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने ती सुमुद्राच्या पाण्यात धुतली तेंव्हा तिच्या आत काहीतरी असल्याचं दिसलं.
 
**** 
 
“सुझीssss, हे बघ मी काय आणलंय?”, घरी येऊन कधी एकदा सुझीला बाटली दाखवीन असं त्याला झालं होतं. तो तिला शोधत स्वयंपाकघरात गेला.
“काय?”, आपल्यासाठी फुलंतर आणली नाहीत ना म्हणून सुझी आनंदून म्हणाली. त्याने ती बाटली तिच्यासमोर ठेवली.
“हे काय?” -सुझी
“किनाऱ्यावर मिळाली.” -रॉबिन.
“तुला कितीदा सांगितलं, असा कचरा आणू नकोस. माझ्या ओट्यावरून आधी उचल तुझा कचरा.”-सुझी.
“कचरा नाहीये ग.”-रॉबिन
“तुझ्या गराजमधल्या बॉक्समध्ये ठेव.” असं म्हणून सुझी हसली. “अरे हिला कसं कळलं माझ्या बॉक्सबद्दल?”, रॉबिन चमकला.
“अग कचरा नाहीये. त्यात आहे काहीतरी. Its a bottled message!” -रॉबिन
‘Bottled Message’ असं म्हणल्यावर सुझीची उत्कंठा शिगेला पोहोचली. “ओके मग ती बाटली धू आधी” -सुझी. तिचं बोलणं ऐकून रॉबिनला हुरूप आला. तो स्वयंपाकघरातल्या बेसिनकडे जाऊ लागला.
“अंम इथे नाहीssss ” -सुझी किंचाळली. काही न बोलता तो प्रसाधनगृहाकडे गेला. थोड्यावेळाने बाटली घेऊन परत स्वयंपाकघरात आला. टेबलावर एक स्वच्छ कपडा मधोमध ठेऊन, सुझी त्याची वाट पाहत टेबलापाशी बसली होती.
“काय असेल ग आत?” -रॉबिन.
“Lets see” -सुझी.
 
बाटली वाईनची होती. तिच्या गडद रंगाने आतलं स्पष्ट दिसत नव्हतं. तोंडाला चामड्याची छोटी चिंधी गुंडाळली होती. त्याने अलगद ती चिंधी सोडली. आत कॉर्क घट्ट बसवलं होतं. त्याने ते ओढून काढलं. वाईनचा दर्प आला. सुझीला कसंसच झालं पण उत्कंठेपायी ती तशीच बसून राहिली. “ह्या कापडावर ओत”, म्हणाली. रॉबिननी बाटली कापडावर उलटी धरली. काही सुंदर मोती लगबग बाटलीतून बाहेर आले. “ओह मोती” -सुझी ओरडली. काही मोती घरंगळून टेबलावरून पायउतार होणार एवढ्यात दोघांनी ते झेलले.
“ब्युटीफुल!!! हे खरे मोती आहेत. खूप जुनेही वाटताहेत.” -सुझी.
“हं” -रॉबिन. मोत्याबरोबर काही वेगवेगळ्या रंगाचे दगडही बाटलीतून बाहेर पडले. त्यांकडे बघण्यात रॉबिन गुंग होता. त्यातला एक दगड हातात घेऊन सुझी म्हणाली, “हे काय आहेत?”
“साधे दगड आहेत, वेगवेगळ्या रंगाचे.” -रॉबिन.
“कोणी दगड का ठेवेल?” -सुझी
“माहित नाही.” -रॉबिन.
“अजून काय आहे?” -सुझी. रॉबिनने बाटली खिडकीच्या दिशेने प्रकाशात धरली.
“काहीतरी दिसतंय. लुक्स लाईक पेपर!” -रॉबिन. 
“काढ काढ” -सुझी अजूनच excite झाली.
“हं” -रॉबिन.
 
बाटलीचं तोंड फारच अरुंद असल्याने, हात अथवा बोट घालून कागद बाहेर काढणं शक्य नव्हतं.
“I need tongs” -रॉबिन. सुझी धावत जाऊन चिमटा घेऊन आली.
“तुझे tongs?” -रॉबिन. सुझी स्वच्छतेची भोक्ती होती. तिच्या गोष्टी असल्या कचराकामाला कशी काय देतीय ह्याचं रॉबिनला आश्चर्य वाटलं.
“घेना आता” -सुझीनं चिडवण्याकडे फार लक्ष दिलं नाही.
थोडीशी मारामारी केल्यावर कागद चिमट्यामध्ये आला.
“Careful!! फाटू देऊ नकोस” सुझीच्या सूचना चालू होत्याच.
बघता बघता २ पिवळसर कागद बाहेर आले.
 
“ए हातमोजे घालूयात, त्याशिवाय टच नको करायला” -सुझी.
“काही होत नाही ग” -सुझीच्या स्वच्छताधर्माचा राग येऊन रॉबिन म्हणाला.
“अरे काहीतरी इतिहासकालीन दस्तऐवज असेल” -सुझी. तिचं एकदम पटल्यासारखं रॉबिन हातमोजे घालून कागद पाहू लागला. सुझीनेही हातमोजे घातले.”काहीतरी लिहिलंय. पण कळत नाहीये. लिपी इंग्रजी आहे, पण इंग्रजीमध्ये नाहीये!” -रॉबिन. त्याच्या हातातला कागद स्वतःकडे घेऊन सुझी पाहू लागली. आणि झटक्यात म्हणाली, “इट्स जर्मन!”.
सुझी कॉलेजच्या शिक्षणानिमित्त युरोपात राहिली होती. भाषांची आवड असल्याने तिने Spanish आणि जर्मन शिकून घेतली. तिने वाचायला सुरुवात केली.
(क्रमश:)
Advertisements