स्वरूप-विश्वरूप -संपदा म्हाळगी-आडकर २/१/१०  
 
थोडक्यात पार्श्वभूमी: कौरव पांडवांच्या युद्धात कृष्णाने अर्जुन व संजयाला विश्वरूप दर्शन दिले. ते आपल्यालाही दाखविण्याचा हट्ट राधा कृष्णाकडे करत आहे. तिचा हट्ट आणि कृष्णाने दिलेले उत्तर शब्दांकित करण्याचा हा एक प्रयत्न!
 

तव सहवासे उपकृत मी जरी, सुदैवी मजहून लोक कितीतरी
सर्वश्रुता तव सखी मी जरी, निजरूपा तव उपेक्षिता खरी ||धृ||
 
गोकुळीच्या त्या गोपकरी, तव अनुकंपा मनी धरी
त्यांपारी मी श्रेष्ठ जरी, अधिगता अपरीचीता तरी
सर्वश्रुता तव सखी मी जरी, निजरूपा तव उपेक्षिता खरी ||१||
 
कुरुक्षेत्रीच्या रणीकंदनी, पार्था तुजसम मिळे सारथी
अन तव ज्ञानाची अनुभूती, दुर्भागी मी जाहले कष्टी उरी
सर्वश्रुता तव सखी मी जरी, निजरूपा तव उपेक्षिता खरी ||२||
 
धृतराष्ट्राचा असून सारथी, भाग्यवान संजय सर्वार्थी
दिधली त्यासी अमोघ दृष्टी, भगवदगीते तो जीव उद्धरी
सर्वश्रुता तव सखी मी जरी, निजरूपा तव उपेक्षिता खरी ||३||
 
येई मुकुंदा, दाव झडकरी विश्वरूप तव करून नेत्रभरी
ह्या जन्मा तू क्षणी सफलकरी, मनोरथे अन्य कुठली नुरी
सर्वश्रुता तव सखी मी जरी, निजरूपा तव उपेक्षिता खरी ||४||
 
हे शामले, प्रियतमे, प्रेयसी, कृष्णप्रिया तू मम अर्धांगी
खेळेल तुजसव रासरंगी, विश्वरूप जरी हा बैरागी
वृथा कथसी स्वत:स दुर्भागी, पाहिलेस ना स्व अंत:रंगी
सर्वश्रुता मम सखी तू जरी, स्वरूपा उपेक्षिता खरी ||५||
 
Advertisements