दु:ख राधेच्या भर्ताराचे -संपदा म्हाळगी-आडकर १/२२/१०
 
थोडक्यात पार्श्वभूमी: राधा कृष्ण प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. राधा कृष्णाची सर्वात मोठी भक्त होती. ती विवाहित होती. तिच्या भर्ताराविषयी फारसे लिहिले गेलेले नाही. त्याची व्यथा समजून घेण्याचा हा एक प्रयत्न!
 
असे सुंदर आर्या ती राधा माझी भार्या
माझा संसार त्यागून भाळली यादववर्या
 
वृंदावनी नित्य चाले, राधेसंगे त्याची रास
माझ्या भरल्या घरात, माझा चाले वनवास
 
माझा संसारी सन्यास, हा कसला विसंग
तिला नको माझा संग, पण हवासा सत्संग
 
तो जगाचा कर्तार, तो विष्णूचा अवतार
व्यर्थ जगत फिरतो मी राधिका भर्तार 
 
तो सगुण निर्गुण, तो ज्ञान मी अज्ञान
पूर्वजन्मीच्या पापांचे का मी करितो क्षालन?
 
हा पत्नीत्यक्त जीव, माझी चालतसे निंदा
का ह्यात लपविला माझा मोक्ष रे गोविंदा?
 
Advertisements