गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०
 
आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची एक वेगळीच excitement असते. तशी ती मधुश्रीलाही होती. मधुश्री अरविंद आपटे, दिसायला गोरीपान आणि अतिशय देखणी. दहावीत ८५% मिळवून, नावाजलेल्या डी. एम. कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला होता. खूप चांगला अभ्यास करून तिला बाबांसारखं इंजिनिअर व्हायचं होतं.
  
अकरावीच्या वर्गात, काही शाळेतल्या मैत्रिणीही बरोबर होत्या. मधुश्री, आश्लेषा आणि मिताली, तिघी शाळेत तश्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या पण कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप झाला. तिघीही सुस्वरूप. कॉलेजमध्ये त्यांना बार्बी ग्रुप म्हणून नाव पडलं होतं. तिघी मिळून रोज सायकलवरून कॉलेजला जात. कॉलेजमध्ये मुलींसाठीचा पार्किंग लॉट वेगळा होता.   
 
कॉलेज सुरु होऊन ६ महिने लोटले. आजचा कॉलेजचा दिवस इतर दिवसांसारखाच. आज फिजिक्सचं practical होतं. Practical झाल्यावर तिघी सायकल stand कडे चालत चालल्या. आज सायकल शोधायला फार कष्ट पडणार नव्हते. बराचसा कॉलेज लेक्चर्स संपवून घरी गेलं होतं. काही मोजक्याच सायकली पार्किंग लॉटमध्ये उरल्या होत्या. मधू, आशू आणि मितू तिघींना आज पार्किंग ला जवळ जवळच जागा मिळाली होती.  तिघी आपापल्या सायकलींपाशी पोहोचल्या. सायकलच्या पुढच्या बास्केटमध्ये sac ठेवताना मधूला काहीतरी दिसलं. तिच्या बास्केटमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं. अरे बापरे गुलाबाची फुलं? खाली चिठ्ठीही होती. तिने आशू आणि मितूला हाक मारली, “हे बघा ना काय आहे?”
“आं??” -आशू
“कोणी ठेवलं?” -मितू.
“आता मला काय माहित?.. काय करू मी?” -मधू.
“चिठ्ठीत काय आहे?” -आशू. मधूने चिठ्ठी उघडली.
“कविता आहे.” -मधू.
“नाव आहे का?” -मितू.
“अनामी प्रेमिक म्हणून लिहिलंय. काय करू इथेच टाकून देऊ का?” – मधू.
“नको इथे नको.” -आशू.
“अग घरी कशी नेऊ? आईला काय सांगू?” -मधू.
“चिठ्ठी आत्ता पुरती लपवून ठेव.” -मितू.
“आणि फुलं?” -मधू.
“माझ्या बागेतली आहेत म्हणून सांग.” -आशू. आशूचा मोठा बंगला होता. बंगल्याभोवती मोठी बाग होती. तिच्या नावावर हे खोटं बिनदिक्कत खपलं असतं.
“ओके”. मधूला तेवढ्यापुरता तोडगा मिळाला होता.
“ए पण माझ्या बास्केट मध्ये का ठेवलं???.. तुमच्या दोघींपैकी कुणासाठी तर नसेल ठेवलेलं, चुकून माझ्या बास्केटमध्ये??…” मधूची उगाच शंका.
“परत ठेवलं तर बघू कुणाच्या बास्केट मध्ये आहे ते…” – आशू.
घरी आल्यावर आईने मधूला विचारलंच फुलांबद्दल. “आशूच्या बागेत खूप फुलं आली होती. तिने दिली आहेत” असं मधूनं सांगितलं. आईशी खोटं बोलणं मधूला आवडलं नाही.
दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. सुदैवाने आज आईने काही विचारलं नाही. फुलं आशूच्या बागेतलीच असावीत असा समज तिने करून घेतला असावा. मधूला खोटं बोलायला लागलं नाही, ह्याचं समाधान होतं. 
पुढं हे वारंवार घडायला लागलं. दोनदा तीनदा आई म्हणलीही, “आशूच्या बागेत केवढी फुलं येतात ना?” एवढ्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्नही आईने परस्पर सोडवला होता. काही फुलं देवासाठी ठेऊन, उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा ती गुलकंद करत होती. गुलकंद फारच चांगला होत होता.
अकरावीचं उरलेलं वर्ष आणि बारावीचं आख्खं वर्ष, आशूच्या बागेतल्या फुलांचा मधूच्या घरी गुलकंद बनत होता. मधूच्या कपाटातही अनामी प्रेमिकाच्या कवितांची मोठी चवड लागली होती.
 
बारावी झाल्यावर, मधूच्या बारावीसाठी थांबवलेली, बाबांची बदली अखेर नागपूरला झाली. मधूने नागपूरच्या इन्जिनिअरिन्ग कॉलेजात प्रवेश घेतला. बारावीत चांगले मार्क्स मिळाले होते. आशू आणि मितू अजून पुण्यातच होत्या, इन्जिनिअरिन्ग करत. तिघीही एकमेकींच्या संपर्कात होत्या. नागपूरला शिफ्ट झाल्याने आईचा गुलकंद मात्र बंद झाला होता. मधूचं इन्जिनिअरिन्ग झाल्यावर, तिच्या बाबांनी एक चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. ती आता नवरयाबरोबर यु. एस. मध्ये राहत होती. 
 
बारावी नंतर जवळ जवळ सहा एक वर्षांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा होता. मितू आणि आशूने जायचं ठरवलं. आशूबरोबर तिचा होणारा नवराही होता. त्याचे ऑफिस मधले काही सहकारी मेळाव्याला जाणार असल्याने तोही आला होता. त्याच्या सहकाऱ्यांना आशूला भेटण्याची इच्छा होती. त्याने सगळ्यांशी आशू आणि मितालीची ओळख करून दिली. सहकाऱ्यांमध्ये तुषारही होता. त्याने आशू आणि मितूला ओळखलं. “अरे आपण एकाच batch मध्ये होतो. सायन्स बी डिविजन. तुमच्याबरोबर अजून एक असायची ना?”, तो  म्हणाला.
“हो मधू, मधुश्री.” -आशू म्हाणाली.
“ती कुठे आहे? आली नाही का?” -तुषार.
“नाही ती यु.एस. ला असते. मागच्या वर्षी आली होती. यावर्षी परत यायची आहे.” -मितू.
“ओह बर!” -तुषार.
“तिच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे पुढच्या महिन्यात.” -मितू. न विचारता ज्यादाची माहिती द्यायची तिला सवयच होती.
“पुस्तक??” -तुषार.
“हो कवितांचा.. कवितासंग्रह… मागच्या वर्षी एक भाग तिने प्रकाशित केला आहे. ह्यावर्षी दुसरा.” -आशू.
“ओह बर! काय नाव पुस्तकाचं?” -तुषार.
“गुलकंद!”
“बरं…”
  
दुसऱ्या दिवशी तुषार आप्पा बळवंत चौकात गेला. त्याने ‘गुलकंद’ शोधून काढलं. त्यावर लेखिकेचं नाव नव्हतं. पण प्रकाशक म्हणून नाव होतं, ‘मधुश्री साने, अभय साने’. “अरेच्च्या, हिचं नाव मधुश्री आपटे होतं ना?… लग्न झालेलं दिसतंय!”, तो मनात हळहळला. त्याने ते पुस्तक विकत घेतलं. दुकानाबाहेर येऊन, साईड stand वर लावलेल्या, आपल्या तिरक्या बाईकवर रेलून उभा राहिला. पिशवीतून पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये, लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी “गुलकंद” असं लिहिलं होतं. त्याला मुखपृष्ठ आवडलं. पुस्तक उघडून तो चाळू लागला. पुस्तकाच्या पाचव्या पानावर ऋणनिर्देश होता…
“माझ्या अनामी प्रेमिकास, तू दिलेल्या गुलाबांचा गुलकंद मी तुला देऊ शकले नाही, पण ह्या तुझ्या मुरलेल्या कवितांचा गुलकंद तुझ्यापर्यंत पोहोचावा ही इच्छा! तुझी ओळख पटल्यास, पुढच्या आवृत्तीचे योग्य श्रेय (मोबदला)  तुला देण्यात येईल -मधुश्री अभय साने.”
 
Advertisements