अध्वर्यू  -संपदा म्हाळगी-आडकर  १/२०/१०  
 
जयहिंद मिलचा सगळ्यात जुना कामगार म्हणून एकनाथ वेसणे प्रसिद्ध होता. खरंतर मिल मालकापुढे आत्तापर्यंत तोच तग धरून उभा होता. चार एक वर्षांपूर्वी तो युनिअनचा लीडरही झाला. कडक शिस्तीचा पण कर्तव्यकठोर म्हणून प्रसिद्ध होता. कामगारांबद्दल त्याला कळवळा होता. मिलमध्ये त्याला मान होता.
 
घरी वारकरी पंथाचं प्रस्थ होतं. एकनाथही दरवर्षी न चुकता वारीला जात असे. रोज विठोबासारखं, आपल्या सावळ्या कपाळावर उभं गंध लावून तो कामाला जायचा. मिलच्या निळ्या युनिफोर्ममध्ये, कमरेवर हात ठेऊन उभा राहिला की सावळ्या विठोबाचा अवतारच दिसायचा. वारीचे प्रसंग रंगवून सांगणं त्याला फार आवडायचं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कोणी पिन मारली की लगेच अभंग गाऊन दाखवायचा.
 
एकनाथच्या घरी म्हातारी आई, बायको, मुलगा विश्वनाथ आणि मुलगी राधा होते. विश्वनाथ कॉलेजात तिसऱ्या वर्षात आणि राधा शाळेत नववीत शिकत होते. विश्वनाथ हुशार आणि तल्लख बुद्धीचा होतं. वडिलांच्या कामात, राजकारणात त्याला रस होता. मिलमध्ये चाललेल्या घडामोडींबद्दल वडिलांशी चर्चा करायला त्याला आवडत असे.
 
गेल्या काही वर्षात मिलमध्ये नवी भरती झाली नव्हती. पण कुणाकुणा कामगारांचे मुलगे त्यांच्या जागी चिकटले होते. गेल्या वर्षी अशीच काही नवी मुले दाखल झाली होती. मिलमध्ये तरुणांची संख्या जाणवण्या इतपत वाढली होती. नवं रक्त जुन्या जाणत्यांना कधी डोईजड होईल ह्याचा नेम नव्हता. 
 
नवं वर्ष उजाडलं पण मिल मालकाने पगारवाढीचं नाव काढलं नव्हतं. नवीन पोरांमध्ये चुळबुळ सुरु झाली होती. त्यांची काही चूक नव्हती त्यात. शिकाऊ कामगार म्हणून त्यांना पगारही कमी मिळत होता. महागाई रोज नवे उच्चांक गाठत होती. तुटपुंज्या पगारात घरचं भागवणार तरी कसं? नवीन असल्याने उघड उघड बंद पुकारणं त्यांना मानावाण्यासारखं नव्हतं. पण कुठतरी ठिणगी पेटल्याची जाणीव एकनाथला होती.
 
एक दिवस सकाळीच काही कामगार त्याला घरी भेटायला आले. “दादा पगारवाढीबद्दल  मालकाशी बोला” म्हणून सांगू लागले. पगारवाढ दिली नाही तर संप करू म्हणू लागले. एकनाथने त्यांना समजावलं, “काही दिवस धीर धरा. मी पुजारीशी बोलतो. त्याने मालकाला सांगितलं की मालक बोलवेल आपल्याला बोलणी करायला”. काही दिवस वाट पाहायचं ठरलं. विश्वनाथ त्यांचं बोलणं ऐकत होता. 
 
गंगाधर पुजारी, मालकाचा उजवा हात होता. अतिशय बेरकी होता. तो एकनाथला चांगला ओळखत होता पण एकनाथ त्याला चांगला ओळखत होता का? पुजारीच्या मनाचा ठाव आत्तापर्यंत कोणाला लागला नव्हता. एकनाथ जाऊन, पुजारीला भेटला. बोलता बोलता संपाचं सूतोवाच केलं. पुजारी मालकाशी बोलतो म्हणाला. 
 
महिना लोटला तरी मालकाकडून बोलावणं आलं नाही. कामगारांचा धीर सुटत चालला होता. एकनाथही त्यांना फार दिवस थोपवू शकणार नव्हता. युनिअनच्या मीटिंगमध्ये मालकाशी बोलायचं ठरलं. ह्यावेळी ते पुजारी थ्रू जाणार नव्हते. १०% पगारवाढ मागायची असं ठरलं. मालक एवढं देणार नाही हे एकनाथला माहित होतं. पण कामगारांनी ते ऐकून घेतलं नाही. २ दिवसांनी संप सुरु होऊन, मिलला टाळा लागला.
 
मालकाला ह्या सगळ्याची आगाऊ सूचना पुजारीनी दिली होती. कामगार पगारवाढ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे स्पष्ट होतं. बोलाचाली यशस्वी करून कमीत कमी पगारवाढ कशी देता येईल हे लक्ष होतं. मिलला टाळा लागून १० दिवस झाले होते. प्रोडक्शन पूर्ण थांबलं होतं. इथून पुढचा प्रवास तोट्याचा होता. एकनाथला बोलणी करायला बोलावलं. मालक, पुजारी, एकनाथ आणि काही युनिअनची माणसं सगळे समोरासमोर बसले. मालकाच्या वतीनं पुजारीच बोलत होता. “एकनाथ भाई, जरा कामगारांशी बोला”
“मालक महागाई फार वाढली आहे. पगारवाढ करणं गरजेचं आहे” एकनाथ मालकाकडे बघत म्हणाला.
“अरे इकॉनॉमी डाऊन आहे. कशी देणार पगारवाढ?”-पुजारी
“साहेब ओर्डरीवर ऑर्डरी मिळताहेत कपड्यांच्या. जेवढ्या ऑर्डरी तेवढंच आमचं रक्त जळतं”-एकनाथ
“तुमच्या मागण्या तर सांगा?”-मालक
“पगारवाढ….१०%”-एकनाथ
“१०%??????”-पुजारी. मालक चमकला. “एवढं नाही जमायचं. ३-४ जमेल”
“परवडत नाही साहेब”-एकनाथचा सहकारी.
मालक पुजारीच्या कानात काहीसं कुजबुजला.
“तुम्ही बोलून घ्या कामगारांशी.. वाटलं तर अनुभवानुसार १% जास्त देऊ.”
एकनाथला पटलं जाऊन कामगारांशी बोलायचं ठरलं. युनिअनच्या बैठकीत त्याने मालकाचा प्रस्ताव सांगितला. 
 
नव्या कामगारांना प्रस्ताव रुचला नाही. त्यांना फार वर्षांचा अनुभव नव्हता. त्यांच्या वाट्याला ३% च यायचे होते. अननुभवी कामगारांची संख्या जास्त असल्याने मालकाला खर्चही कमी येणार होता. मालकाने बरोबर खेळी खेळली होती. एकनाथने खूप समजावलं. “तू मालकाला जाऊन मिळाला आहेस. तुला वरून १% आणि खालून १०% मिळणार असतील” असं ऐकून घ्यावं लागलं. एकनाथचे न ऐकता, त्यांनी स्वतः मालकाला भेटायचं ठरवलं. ते गेले पण मालकाशी भांडून परत आले. बैठकीत बाचाबाची ही झाली. प्रकरण हातघाईवर येणार एवढ्यात एकनाथ मधे पडला.
 
संपाचा पेच वाढत चालला होता. मिल बंद होऊन १ महिना झाला होता. उधार-उसनवारीवर कामगारांच्या चुली तग धरून होत्या. कामगारांच्या संतापला वाचा फुटून मिलवर तुरळक दगडफेकही झाली होती. एकनाथला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याने युनिअनच्या बैठकीत “बोलणी करून, पगारवाढ स्वीकारू” म्हणून सांगितलं. सहकाऱ्यांचा विरोधी सूर पाहून त्याने पद सोडायचं ठरवलं.
 
२-३ दिवसांनी मालकाचं बोलावणं आलं. ह्यावेळेला एकनाथला एकट्यालाच बोलावलं होतं. ६% पगारवाढ देण्याची बोलणी झाली. एकनाथ खूष झाला. मालकाने पेढ्यांचा बॉक्स हातात ठेवला. कागदपत्रांवर सह्या झाल्या. बाहेर तिष्ठत उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना ही बातमी देण्यासाठी गेला. तेवढ्यात कुठूनसा आलेला एक मोठा दगड त्याच्या डोक्यावर आदळला. घाव वर्मी बसला होता. तो तिथेच कोसळला. समोर उभ्या असलेल्या त्या कामगारांच्या क्रुद्ध जमावाने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
एकनाथने मालकाशी हातमिळवणी केल्याची पुडी यशस्वीरीत्या सुटली होती. त्याचे पडसाद उमटले. एकनाथ मात्र हॉस्पिटलात पडून मृत्यूशी झुंज देत होता.
 
कामगारान्मधल्या असंतोषाचा फायदा घेत मालकाने, एकनाथला लक्ष बनवले आणि ४-५% पगारवाढ देऊन तात्पुरते शांत केले. पुजारीला मात्र भरघोस बोनस मिळाला होता.
 
***
 
एकनाथ गेल्यावर त्याच्या बायकोने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथचे ही कॉलेजचे शिक्षण संपले होते. त्याने शहरातच राहून नोकरी करण्याचे ठरवले. एकनाथ गेल्यावर, त्याच्या जागी विश्वनाथला मिलमध्ये नोकरी मिळणार होती पण तो तेंव्हा शिकत होता. शिक्षण अर्धवट टाकून नोकरी करण्यास आईचा नकार होता की मिलमध्ये नोकरी करण्यास?
 
आपल्या तल्लखपणामुळे विश्वनाथने लवकरच नोकरी मिळवली. तोही एका मिलमध्ये काम करत होता. मिल मालकाच्या, मुनिमाच्या ऑफिसमध्ये मदतनिसाचं काम. त्याने ते आईला सांगितलं नव्हतं. आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि वेगवान कामाने त्याने लवकरच मिल मालकाची मर्जी संपादन केली. कामातल्या खाचाखोचा समजून घेतल्या. मिलच्या राजकारणाचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं होतं.
 
पुढे मिलमध्ये कामगारांचा संप झाला. विश्वनाथला वडिलांची आठवण झाली. संपामुळे वातावरण तापलं होतं. राजकीय हस्तक्षेपाची चिन्हं दिसत होती. तसा तो झाला असता तर मिल मालकाला आर्थिक फटका बसणार होता. कामगारांच्या पिळवणुकीचं राजकीय भांडवल झालं असतं. मिल मालक आणि मुनीम कामगारांशी बोलणी करत होते. दोनदा झालेली बोलणी फिसकटली होती. मुनीम चिवट होता. त्याला त्याचे खिसे भरण्यात जास्त रस होता.
 
संप होऊन १५-२० दिवस लोटले. एक दिवस कामगारांच्या रागाचं पर्यावसन जाळपोळ आणि दगडफेकीत झालं. मुनिमाच्या ऑफिसवरही दगडफेक झाली. त्यात किरकोळ नुकसान सोडलं तर फार काही झालं नाही. ऑफिसच्या दरवाजावरील पाटीला कामगारांनी काळ फासलं. विश्वनाथ ती पाटी रंगवण्यासाठी पेंटरकडे घेऊन गेला.
 
मिलचा कामगार नेता तरुण होता. सळसळतं रक्त होतं. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तो मागे हटणार नव्हता. विश्वनाथची त्याच्याशी चांगली दोस्ती होती. मुनिमाशी बोलून काहीही होणार नव्हतं. विश्वनाथने तडक मिल मालकाशी बोलायचं ठरवलं. कामगारांचा संप मोडून काढण्याची गरज होती. ती कामगारांची गरज होती आणि मिल मालकाचीही. विश्वनाथ विजेच्या गतीने काम करत होता.
 
४-५ दिवसांनी मुनिमाचा राहत्या घरात खून झाल्याची बातमी आली. कामगारांशी हातमिळवणी केल्याबद्दल मिल मालकाने त्याचा काटा काढल्याची चर्चा सगळीकडे पसरली होती. पण ह्या खुनाचं बालंट कामगारांवर येणार होतं. निम्मं काम झालं होतं.
 
मिल मालकाला बरोबर घेऊन विश्वनाथने कामगारांशी बोलणी केली. सुवर्णमध्य गाठला. संप संपला. विश्वनाथ आता मिलचा नवा मुनीम झाला होता. मुनिमाच्या ऑफिसच्या दारावरची पाटी आधीच रंगवायला गेली होती. काय नाव घालायचं हे विश्वनाथने आधीच सांगितलं होतं. “श्री. विश्वनाथ ए. वेसणे -मुनीम”. पेंटरच्या दुकानात पाटीवर नाव घातलं जात होतं. आधीचं “श्री. गंगाधर पुजारी -मुनीम” हे नाव कधीच पुसलं गेलं होतं. पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी होती. वडिलांसारखं कपाळाला गंध लावून विश्वनाथ वारीला जाणार होता.
Advertisements