कबड्डी संपदा म्हाळगी-आडकर ०१/१९/२०१०
 
माझ्या माणूस म्हणून झालेल्या जडण घडणीत कबड्डी ह्या खेळाचा फार मोठा वाटा आहे. तसा कबड्डी हा मराठी मातीतला खेळ पण लोकमान्यता असूनही राजमान्यतेसाठी तडफडणारा. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला असला तरी घरच्यांनी दुर्लक्षिलेला. रांगडा असल्याने लोकांनी मुलींसाठी तसा निषिद्ध मानलेला.
 
कबड्डीकडे मी ओढली गेले तशी अनिच्छेनेच. माझी मोठी बहिण सहावीत असताना, मैत्रिणींच्या नादाने कबड्डी खेळायला जाऊ लागली. माझी धष्टपुष्ट शरीरयष्टी थोडी उतरवण्यासाठी माझ्या बाबांनी मलाही कबड्डीला घातलं. घरात खेळासाठी खूप पोषक वातावरण होतं. मी चौथीत होते. सगळ्यात लिंबू-टिंबू त्यामुळे माझे तिकडे फार लाड व्हायचे. हि एक जमेची बाजू असली तरी सकाळी लवकर उठून ६:३० च्या सरावाला जायचं जीवावर यायचं. पुढे पुढे त्याचं वेड लागलं. चौथीपासून बारावीपर्यंत, शालेय, महाविद्यालयीन, राज्यस्तरीय, राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या थरात मी कबड्डी खेळले. 
 
शालेय कबड्डीची मजा काही वेगळीच. शाळेत खेळामधल्या मुलींना एक वेगळाच मान असायचा. स्पोर्ट्स डेच्या दिवशी खेळाच्या विद्यार्थिनींचा गौरव व्हायचा. त्याची वेगळीच झिंग असते. शाळेत भैय्याजी रोलर फिरवून अधून मधून सगळं पटांगण एक समान करत. पण रोज कबड्डीच्या ग्राउंडवर झारीने पाणी मारायला, दोरीने चुन्याची फक्की मारायला मजा यायची.
 
शालेय कबड्डीमध्ये वयाप्रमाणे, वजनाचेही गट असत. प्रसंगी शाळेच्या टीममधून  खेळण्यासाठी वजन उतरवावे लागे. शाळेच्या टीममध्ये खेळून, स्पर्धा जिंकून परत शाळेत आल्यावर, ध्वनिक्षेपकावरून विजय जाहीर केला जायचा. तो जाहीर झाल्यावर शाळेच्या मध्यभागी असलेल्या पटांगणावर कबड्डीच्या मुली मोठ्याने शाळेची आरोळी देत. आरोळी देताना सगळी शाळा कठड्यापाशी येऊन उभी रहायची.  फार अभिमान वाटायचा. सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखा वाटायचं. शाळेसाठी खेळत असताना, शाळेसाठी समर्पणाची भावना जास्त असायची. शाळेला सर्व खेळांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्यावर आपला हि त्यात खारीचा वाटा असल्याचं समाधान असायचं.
 
शालेय सरावादरम्यान खेळाडूंना व्यावसाईक कबड्डीसाठीही ग्रूम केलं जायचं. हे महत्वाचं काम राणाप्रताप संघाच्या सदस्य ताया आणि सर करत. त्यामुळे शाळा चालू असतानाच आणि त्या नंतर मी ‘राणाप्रताप संघ’ संस्थेकडून व्यावसाईक कबड्डी खेळले. ‘राणाप्रताप संघ’ ही कबड्डीतली एक pioneer संस्था आहे. श्रीमती शकुंतला खटावकर, श्री फिदा कुरेशी ह्यांचे मौल्यवान मार्गदर्शन त्या काळात मला मिळाले. फिदाभाई सरांकडून खेळ कौशल्याबरोबरच संघभावनेचे ही धडे मिळाले.
 
कबड्डीच्या निमित्ताने आम्ही खूप फिरलो, खूप टूर्स केल्या. बाबांनीही मुली म्हणून “इतक्या लांब कसं पाठवू?” असं कधी म्हटलं नाही.
टूरला जायला मला फार आवडायचं. पण शाळा कॉलेज बुडायचं. तो अभ्यास नंतर भरून काढावा लागे. त्यात मैत्रिणींची खूप मदत व्हायची. टूरला जायचं म्हणजे घरी लगीनघाई असायची. माझी ताई आमच्या दोघींच्या bags भरायची. तो एक सोहळा असायचा. टूरला १२ जणींचा संघ १ व्यवस्थापक आणि १ कोच जात. १२ जणी एकत्र फार धमाल यायची. टूर साधारण २-५ दिवस चालायची. त्या दिवसात सर्व गोष्टी आपापल्या कराव्या लागत. टूरद्वारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंडणे झाले.
संघ हे एक कुटुंबच बनून गेलं. खूप मैत्रिणी मिळाल्या.
 
कबड्डी हा सांघिक खेळ. चढाओढ, इर्षा हे सांघिक खेळाचे एक भाग आहेत. पण राजकारण आणि दुखापतीही तितक्याच प्रमाणात असतात. त्यामुळे दुर्दैवाने खूप चांगल्या खेळाडूंनी कबड्डी सोडल्याचे पहिले आहे.  
 
झी मराठीवर “लक्ष्मणरेषा” ही मालिका बघताना, जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला म्हणून लिहायला घेतलं. मागे वळून पाहताना “अभ्यासाबरोबरच आपण कबड्डी ही खेळू शकलो” ह्याचं बरं वाटतं. कबड्डीमुळे मला मिळालेल्या Patience (धीर), Performance (सादरीकरण), excellence (गुणवत्ता) आणि perseverance (झपाटलेपणा) ह्या गोष्टी आयुष्यभर माझ्या बरोबर राहतील.
 
 
Advertisements