गुपित  -संपदा म्हाळगी-आडकर १/११/१०
 
माझ्या मनीचे गुपित, नाही कुणा माहित
का मी हर्षभरित, काय दिसले स्वप्नात?
 
गर्द काळोखाची रात्र, होता सोसाट्याचा वारा
थापटून निजवितो चंद्र आकाशीच्या तारा
 
काळ्या असुरी मेघांनी गच्च दाटले आभाळ
चंद्रप्रभेच्या स्पर्शाने त्यांना चंदेरी किनार  
 
आज पुनव, समुद्र किती अशांत नि रौद्र
त्याचे रूप पाहताना मनी विचार अभद्र
 
परदेशीचे सुकाणू, दूर हेलकावे घेई
माझा साजण का आता त्यात परतून येई
 
तो गेला दूर देशी, त्यास लोटले दोन मास
चिंब भिजल्या देहाला, त्याच्या पावसाची आस
 
अंतरीच्या हुंदक्यांनी आली सागरा भरती
ओल्या वाळूत लाभली दोन शिंपल्यांची पेटी
 
तो आला परतुनी, मग उरले भांडीन
भांडून झाल्यावर सर्व कोड्यात सांगीन
 
उत्तरात दाखवीन माझी शिंपल्याची पेटी
गोड गुपित असेल माझ्या उदरीचा मोती.
 
Advertisements