कीपिंग अप विथ रेड्डीज  -संपदा म्हाळगी-आडकर १/६/१०
 
विशेष सूचना:
हा लेख विडंबनात्मक लिहिला असून, नमूद केलेल्या व्यक्तींचा अथवा संस्थांचा ह्या लेखाशी काहीही संबंध नाही, अगदी बादरायण संबंधही नाही. कोणालाही दुखावण्याचा मनोदय नसून, आनंद वाचनाचा अनुभव घ्यावा.
 
माझ्या टि.व्ही. प्रेमामुळे उत्कृष्ठ ते निकृष्ठ जमातीतले सर्व टि.व्ही. शोज एकदा तरी मी पाहतेच. खरं म्हणजे पाहिल्याशिवाय कसं ठरवणार शो कसा आहे ते? अशाच एका टि.व्ही. शोबद्दल आणि “हा शो जर भारतीय टि.व्ही. वर केला तर???” ह्याबद्दल आज मी लिहित आहे. हा शो ‘E!’ नावाच्या वाहिनीवर येतो. त्यातला E हा एन्टरटेनमेंट (करमणूक) अर्थी असावा. माझ्या नवऱ्याच्या मते, ‘E!’ मधले उद्गारवाचक चिन्ह हे खरंतर प्रश्नार्थक चिन्ह असायला हवे. किंवा E हा एन्टरटेनमेंट साठी नसून Ediotic म्हणून आहे असा त्याचं साफ मत आहे.
 
तर ह्या टि.व्ही. शोचं नाव “कीपिंग अप विथ कार्डाशीअन्स “. कार्डाशीअन हे एक आर्मेनिअन आडनाव आहे. किम कार्डाशीअन हि एक प्रसिद्ध मॉडेल असून ती, तिच्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या २ बहिणी आणि त्यांचे एकत्र कुटुंब ह्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारित ही सीरिअल आहे. माझ्या नवऱ्याला जरी हा कार्यक्रम वेडेपणाची परिसीमा वाटत असला तरी माझा खूप टाइमपास होतो. ह्या कार्यक्रमाचा शोर्टफोर्म आपण KUK असा करू.
 
US मध्ये तुम्ही रातोरात स्टार होऊ शकता. स्टार होण्यासाठी पर्यायही खूप आहेत. तुम्हाला स्टार व्हायचं असेल तर कोणत्या न कोणत्या मार्गाने मग तो वाम असला तरी टि.व्हि. वर झळकता यायला हवं. मग तुम्ही राष्ट्रीय टि.व्हि. वर गाण्याच्या/नाचण्याच्या कार्यक्रमात चांगले येत नसल्यास, वाईट परफोर्म करा, वास्तववादी शोमध्ये भाग घ्या आणि तिथे प्रेक्षकांच्या डोक्याला वैताग आणा. जेवढा वैताग जास्त तेवढी प्रसिद्धी जास्त. किंवा कुठल्याश्या आंदोलनांमध्ये भाग घ्या, त्याबद्दल टि.व्हि. वर मुलाखत द्या. तुमच्या पाळीव प्राण्याला विचित्र सजवा किंवा तुम्ही स्वतःच काहीतरी विचित्र वेशभूषा करून वावरा. काही करून केंद्रबिंदू राहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात शेवटी ह्यावर एक पुस्तक लिहा.
 
सुदैवाने किंवा दुर्दैवाने कार्डाशीअन्सना ह्या पैकी फार काही करावं लागलं नाही. किम कार्डशीअन ही एक सुंदर आणि फेमस मॉडेल आहे. तिच्या कोर्टनी आणि क्लोई ह्या दोन बहिणी काहीश्या कमी सुंदर पण नीटस. त्यांना एक भाऊ आहे, त्याचं नाव मला आठवत नाही. एक कंट्रोल फ्रीक आई आहे. तिचा दुसरा नवरा आणि तीन बहिणींचे येऊन जाऊन असणारे ३ बॉयफ्रेंड्स असा हा परिवार आहे. ह्या ३ बहिणी आणि त्यांचा भाऊ ह्यांची प्रेम प्रकरणे, त्यांचे कपडे, त्यांचे हिंडणे फिरणे आणि जमल्यास काम करण्याचा केलेला प्रयत्न ह्यावर ही मालिका आधारित आहे.
 
भारतीय टि.व्ही. जगताची एकूण क्रिएटीविटी(??) बरीच वेस्टर्न टि.व्ही. वर अवलंबून आहे. KUK कार्यक्रम पाहत असताना, हा जर भारतीय टि.व्ही. ने नेहमीच्या सवयीप्रमाणे कॉपी करायचा ठरवलं तर काय होईल हा विचार सहज माझ्या मनाला चाटून गेला. ‘कीपिंग अप विथ कार्डाशीअन्स’ ऐवजी हा शो ‘कीपिंग अप विथ रेड्डीज’ नावाचा असेल. एक तर नाव ‘क’ वरून सुरु होत असल्याने, एकता कपूरला नावात बदल करण्याची गरज नाही उलटपक्षी क पासून सुरु होणारे नाव आयते मिळाले हा तिच्यासाठी शुभ संकेत आहे.  

 

रेड्डीच का? तर कार्डाशीअन्स बहिणींसारख्या सुषमा, मेघना आणि समीरा ह्या रेड्डी बहिणी वलयांकित आणि सर्वश्रुत आहेत. K’ बहीणी इतक्याचाच खरंतर त्यांच्यापेक्षाही सुंदर आहेत. सारख्या व्यवसायात आहेत. रेड्डींना मुळातच सर्व दाखवायला आवडतं, त्यामुळे सीरिअल इंटरेस्टिंग करायला दिग्दर्शकाला विशेष डोकं वापरावं लागणार नाही.
 
मग काय असेल शोमध्ये –
सुषमा आणि मेघना मिलानमधून मुंबईमध्ये नव्या आयुष्याच्या शोधार्थ येतील. (जश्या कोर्टनी आणि क्लोई मिआमीमध्ये आल्या) त्यांची जीवाची मुंबई आणि मुंबईची मस्ती  सर्व टि.व्ही. वर दिसेल. अधून मधून घरची मंडळी, नवीन मित्र ही येऊन जाऊन दिसतील.
समीरा (किमप्रमाणे) आपल्या क्रिकेटर मित्र श्रीशांत बरोबर चेन्नई मध्ये राहतेय. क्रिकेटरच का?? अहो तो एकच खेळ भारतात सगळ्यात प्रसिद्ध आहे. (K’न्नी नाही का अमेरिकन फूटबॉल प्लेयर बॉयफ्रेंड वापरला.) क्रिकेटर असेल तर त्यालाही वलय असणार. म्हणजे शोची TRP वर नाही का जात?
 
सुषमा आणि मेघना आपले fashion इंडस्ट्रीतले संबंध वापरून आपलं ‘Ever Reddi’ नावाचा ब्रांड सुरु करतील. जसा K’बहिणींनी मायामीत ‘Dash’ सुरु केलं तसं R’बहिणी मुंबई मध्ये ‘Red’ नावाचं एक स्टोअर सुरु करतील. स्टोअरच्या उभारणीच्या वेळेला तिन्ही बहिणींमध्ये इगो टेन्शन आणि भांडणं होतील. ती भांडणं न चुकविता बघण्याकरिता रिमोटसाठी घराघरांमध्ये भांडणं होतील. भांडणं होऊनही समीरा आपल्या सिनेमाच्या बिझी(?) स्केजुलमधून वेळ काढून स्टोअरसाठी आणि बहिणींना सपोर्ट करायला मुंबईत येईल. (प्रेक्षकांचे गुडविल अर्निंग यु नो!) 
 
ज्या दिवशी स्टोअरचे उद्घाटन असेल त्यादिवशी त्यात विकल्या जाणाऱ्या उत्तेजक कपड्यांच्या विरोधात म.न.से आंदोलन करेल. स्टोअरवर मोर्चा निघेल. कार्यकर्ते स्टोअरची तोडफोड करतील. (ते त्यात तज्ञ आहेतच.) सुषमा आणि मेघनाला म.न.से.कडून साडी भेट मिळेल. राज ठाकरे कदाचित २ मुद्दे एका दगडात ठेचण्याचा प्रयत्न करतील (उत्तेजक कपडे आणि परप्रांतीयांचे अतिक्रमण). स्टोअरचे ओपनिंग पुढे ढकलले जाईल.
 
समीरा आपल्या उत्तर भारतीय दिग्दर्शक मित्राच्या (कोण? हे विद्वाना सांगणे न लगे) मदतीने, स्टोअरचे जंगी उद्घाटन करेल. स्टोअर ओपनिंग मिडिया हि सॉलिड कव्हर करेल. मध्यमवर्गीय प्रेक्षक टि.व्ही. वरच स्टोअरमधले कपडे पाहून घेतील, आपली धाव आणि मजल तितकी नाही हे जाणून. समीराचे स्टोअरसाठीचे काम पाहून बहिणी तिला माफ करतील आणि भांडणं विसरतील. 
 
सगळे सुरळीत चालू असताना, समीरा आणि तिच्या क्रिकेटर मित्राचे फिस्कटेल. त्यातून समीराला इतके डीप्रेशन येईल कि ती सिनेमाच्या शूटिंगला जाणार नाही. तिला शूटिंगचं महत्व सांगायला तिची आई येईल. आधीच तिला किती कमी मुव्हीज मिळतात हे तिने ओळखायला नको का?
 
मध्यंतरीच्या काळात मेघना, विजेंदरसिंगच्या प्रेमात पडेल. (क्लोई आणि लमार ची आठवण आली ना?) आता विजेंदर कोण? असं विचाराल. अहो इतक्या लवकर विसरू नका. तो भारताचा एकमेव बॉक्सर ज्याने ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवले. तो मुलींमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे TRP वाढणार. मेघना आणि विजेंदरचा विषय झटपट लग्नापर्यंत पोहोचेल. त्यांच्या लग्नाच्या तयाऱ्या जोरदार चालू असतील. समीरा मात्र अजूनही आपल्या प्रेमभंगाच्या दु:खात अडकली असेल. श्रीशांतची आठवण तिला स्वस्थ बसू देणार नाही. लग्न धूमधडाक्यात आणि गाजवाज्यात पार पडेल.
 
काही दिवस मेघनाचे नव-परिणीत आयुष्य पडद्यावर दिसेल. सुषमा आता एकटीच ‘Red’ चं काम बघत असेल. एका स्पोर्ट्स इवेन्टच्या निमित्ताने समीरा आणि श्रीशांत परत भेटतील. एकत्र येतील. त्यांचे परत येणे खाली चाललेल्या TRP ला नवचैतन्य देईल. आणि मालिकेच्या निर्मात्याला मालिका अजून १०० भागांपर्यंत बिनदिक्कत चालण्याची ग्वाही मिळेल.
 
तोपर्यंत K’ बहिणींच्या आगंतुक नवीन जनरेशनची नवीन सीरिअल US मध्ये निघाली असेल.. “कीपिंग विथ K जुनिअर्स”. ती कॉपी करण्याची संधी रेड्डी बहिणी आपल्याला कधी देतील ह्याची प्रतीक्षा निर्माते करू लागतील. 
 
Advertisements