केसर -संपदा म्हाळगी-आडकर १२/२१/२००९
 
राजस्थानातल्या एका चंदनपूर नावाच्या एका छोट्या खेड्यातली ही गोष्ट आहे. चंदनपूर २०-२५ घरांचं छोटं गाव. गावात सगळे एकमेकांना ओळखत. पुरुष रोज पोटापाण्यासाठी बाहेर पडत. पाण्याची वानवा असल्याने, गावाच्या बायका-पोरी रोज पाणी आणायला कोस-कोस दूर चालत जात. दिवसभर भरपूर कष्ट केल्यावर रात्री बायका ‘सांझा-चुल्हा’ साठी एकत्र भेटत. सुख दुःखाच्या गोष्टी करत लोकगीते गात घरच्या रोटी सेकत त्यांचा वेळ जात असे.  
 
गावात धनीराम आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. घरात चारजण, धनीराम, त्याची बायको सुखिया, मुलगी केसर आणि मुलगा बलराम. बलराम १२ वर्षाचा. केसर नुकतीच वयात आलेली, १५व्यातून १६ वर्षात जाणारी. दिसायला नाकी डोळी नीटस. आपल्या आनंदी आणि चंचल स्वभावामुळे चारचौघींमध्ये उठून दिसणारी. ती सातवीपर्यंत शिकली होती. सुखियाला पाणी आणायला, घर सारवायला, स्वयंपाकात ती मदत करायची. केसर गृहकर्तव्यदक्ष होईल ह्याकडे सुखिया विशेष लक्ष देत होती.
 
Rajasthani Beauty
 
केसरची चमकी नावाची जिवाभावाची मैत्रीण होती. चमकीसुद्धा गावातच रहायची. शाळेत दोघी बरोबर जायच्या. पण पुढे पाचवीत असताना चमकीच्या बापाने तिचं शिक्षण बंद केलं. ६ महिन्यात तिचं लग्न गावातल्या बिरजू बरोबर लावून दिलं. बिरजू सुतार होता. लाकूडकामाची कला त्याच्या रक्तात होती. लग्नानंतरही चमकी रोज शाळा सुटायच्या वेळेला केसरला भेटायला जात असे. गप्पा गोष्टी करत, वाटेत भैरूबाबाच्या देवळात जाऊन परत घरी येत.
पुढे सातवीनंतर धनीरामने केसरची शाळा बंद केली पण केसर आणि चमकीचं रोज भेटणं थांबलं नाही. रोज पाणी आणायच्या निमित्याने दोघी बाहेर पडायच्या. पाणी आणण्यासाठी कोस-कोस लांब चालावं लागे. चेष्टा मस्करी, पळापळी करत कोस कसा सरून जाई कळत नसे.
 
धनीरामने लहानपणीच म्हणजे अगदी पाळण्यात असतानाच केसरचा विवाह शेजारच्या गावाच्या मुखियाच्या मुलाशी संतोषशी ठरवला होता. संतोष केसरहून ३ वर्षे मोठा होता. मुखियाचा घरही पै-पैशाने मजबूत होतं. केसर धनसंपन्न घरात जाणार ह्याचा धनीराम आणि सुखियाला आनंद होता. लग्न ठरल्यापासून आज तागायत केसर आणि संतोष एकमेकांना भेटले नव्हते. कधी एकमेकांना पाहिलं ही नव्हतं त्यांनी. एकमेकांना पाहून लग्न करण्याची पद्धतच नव्हती  त्यांच्या समाजात.
जसजशी केसर वयात येऊ लागली, धनीरामने केसरच्या लग्नाची तयारी सुरु केली. चांगला दिवस पाहून केसरच्या भावी सासरी निरोप धाडला. चांगला मुहूर्त पाहून लग्नाचा शगुन उरकावा आणि लग्नाची तारीख पक्की करावी असं त्याच्या मनात होतं. २ एक दिवसांनी निरोपाचं उत्तर आलं. संतोष शहरामध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी रवाना झाला होता. लग्न अजून २ वर्षं लांबणीवर पडलं. धनीराम थोडासा उदास झाला पण जावई पुढे शिकत आहे म्हणाल्यावर त्याला थोडं निश्चिंत वाटलं. अजून दोन वर्षं आपल्याला आई-बाबांकडे राहता येईल या विचाराने केसरही आनंदून गेली. तिने ही बातमी चमकीला सांगितली. 
 
म्हणता म्हणता २ वर्षं सरली. संतोष शहरातून परत आला होता. शहरात राहिल्याने संतोषचा चेहरा-मोहराच बदलून गेला होता. मुलगा येणार म्हणून मुखियाचा वाडा सजला होता. घरी रसोईयांना बोलवून खास पक्वान्नं केली जात होती. संतोषच्या येण्याने सगळे खूष होते. १०-१५ दिवसांनी मुखियाने मुलाकडे लग्नाचा विषय काढला. धनीरामकडे सांगावा धाडावा का असं विचारल्यावर संतोष म्हणाला-
“असं कसं मी कोणत्याही मुलीशी लग्न करू तुम्ही सांगता म्हणून? मला मुलगी आवडली तरच मी लग्न करीन” त्याचा बोलणं ऐकून मुखिया अवाक झाला. शहराचा वारं बोलतं आहे हे त्याला कळलं. मुखियाची बायको दारात उभी राहून सगळं ऐकत होती.
“मी धनीरामला शब्द दिला आहे. तुला त्याच मुलीशी लग्न करावं लागेल”
“बाबूजी काळ किती बदललाय आता. न भेटता, न बोलता मी कसा निर्णय घेऊ?”
“रिती-भाती काही नाहीत का? आम्ही नाही केलं लग्न न पाहता?”
“तुम्ही केलं, मी करायलाच पाहिजे का?”
“शहरात तर कोणी पाहून ठेवली नाहीस ना?” मुखियाच्या बायकोने घाबरून प्रश्न केला.
“नाही ग माई तसं काही नाही. पण आता वाटतंय पाहायला हवी होती. माझ्या पसंतीची तरी असती.” विषय नाजूक होता. पोराने काही उद्योग करायच्या आधी ह्याचा सोक्षमोक्ष लावायचे मुखियाने ठरवले. संतोष काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मुखियानेही  फार घाई केली नाही. रात्री बायकोला संतोषला थोडं समजवायला सांगितलं.

केसर आणि चमकी रोजसारख्या आजही पाणी आणायला चालल्या होत्या. आज रस्त्यात नेहमी पेक्षा जास्त वर्दळ होती. भैरूबाबाच्या मंदिरात कोणी साधू आले होते. आसपासच्या बऱ्याच गावाचे लोक त्यांच्या दर्शनासाठी गावात आले होते. केसर आणि चमकीने ही मंदिरात जायचे ठरवले. केसर चमकीला म्हणाली “तू काय मागणार? नन्हा-मुन्ना का मुन्नी?”

ते ऐकल्यावर चमकी लाजली. तीही केसरला म्हणाली “आणि तू? देवा, २ वर्षं झाली आता मुखियाकडून बारात येऊ देत” केसरही लाजली.
दोघीही हसत देवळाकडे चालू लागल्या. देवळाच्या वाटेवर आज बाजार भरला होता. फेरीवाले, चुडीवाले, खाऊवाले, खेळ करणारे ह्यांनी बाजार फुलाला होता. देवळातून आल्यावर विक्रेत्यांकडून काही गोष्टी घ्यायचे दोघींनी ठरवले. त्यासाठी आईकडून सकाळी थोडे पैसेही घेतले होते केसरने.
देऊळ एका छोट्याश्या टेकडीवर होतं. सूर्य डोक्यावर आल्याने पायऱ्या चढताना दोघींची दमछाक झाली. दर्शन घेऊन झाल्यावर आडोश्याला एका सावलीत बसल्या. २० फुटांवर असलेल्या हाराच्या दुकानाशी उभं राहून कोणीतरी रोखून बघत होतं. पाहिलं तर भगवी वस्त्रं परिधान केलेला कोणी साधूबाबा त्यांच्याकडे पाहत होता. साधूबाबा म्हणावं इतका तो वृद्ध नव्हता. उलटपक्षी खूपच उमदा होता. साधूबाबांसारखी त्याची दाढीही नव्हती. दोघींनी लांबूनच  त्याला वाकून नमस्कार केला. तो त्यांच्याकडे पाहून हसला.
आज त्यांना फार वेळ दवडता येणार नव्हता. इच्छित खरेदी झाल्यावर पाणी भरायलाही जायचं होतं. दोघी निघाल्या. त्यांनी चुडीवाल्याकडे बांगड्या घालून पहिल्या, रिबिनीवाल्याशी रिबिनीचा भावावरून हुज्जत घातली, टिकलीवाल्याला कशा टिकल्या हव्या आहेत हे सांगितलं आणि पुढच्या वेळेस घेऊन ये म्हणून दटावलं. मेहेंदीवालीशी भाव करताना, “माझं लग्न होणार आहे न मग मला शकुनाची मेहेंदी लावायला तुलाच बोलवीन” असं सांगितलं. हे सगळं करत असताना कोणीतरी आपल्याकडे बघतंय असं सारखं त्या दोघींना जाणवत होतं. 
 
काही अंतर गेल्यावर दोघींना लक्षात आलं कि कोणीतरी आपला पाठलाग करतंय. मागे वळून पाहिलं तर तेच साधूबाबा काही अंतरावर दिसले.
“आपल्या मागे का येत आहेत? काय हवंय त्यांना?”
“आपल्याला काही सांगायचं तर नसेल?”
“भविष्य?? म्हणून तर मागे येत नसतील न?” काही कळेना. काही अंतर चालत गेल्यावर गावातल्या इतर बायका-मुली भेटल्या. थोड्या वेळाने दोघींनी परत मागे वळून पाहिलं, साधूबाबा दिसले नाहीत. दोघींना फार चुटपूट लागून राहिली.
“कुठे गेले? आपण थांबलो नाही म्हणून परत गेले वाटतं?”
“उद्या परत देवळात जाऊ. बघू काही सांगतात का?”
 
दुसऱ्या दिवशी परत दोघी देवळात गेल्या. आजही देवळात खूप गर्दी होती. गर्दीतून वाट काढत दोघी दर्शन घेऊन बाहेर आल्या. चौफेर नजर टाकली तरी साधूबाबा काही दिसले नाहीत. खजील होऊन दोघी देवळाच्या पायऱ्या उतरू लागल्या, तेवढ्यात त्यांना “केसर” अशी हाक ऐकू आली. मागे वळून पाहिल्यावर एका बुरुजावर साधूबाबा बसलेले दिसले. आज त्यांचा पेहराव फारच वेगळा होता. आज भगवी वस्त्र नव्हती. डोक्याला भैरूबाबाच्या नावाचा पट्टा, कपाळाला अंगारा, स्वच्छ पांढरे कपडे आणि  गळ्यात रुद्राक्षाची माळ. दोघींना आश्चर्य वाटलं.
“मला तुमच्याशी बोलायचय” -साधूबाबांनी आवाज दिला.
“बघ मी तुला म्हणत होते ना बाबांना काहीतरी सांगायचं असेल”
“काल म्हणूनच ते आपल्या मागे येत होते बहुदा” 
“ए आता त्यांना विचारून घेऊ हं सगळं” दोघी आपापसात कुजबुजल्या.
जवळ जाताना साधूबाबा अजूनच तरुण भासले. दिसायलाही राजबिंडे आणि तेजस्वी होते. त्यांची प्रेमळ नजर केसरवर स्थिरावली. त्या नजरेने केसरला लाजल्यासारखं झालं. “एवढ्या तरुण माणसाने कशाला बैरागी व्हावं” असं तिच्या मनात आलं. “आपण हा कसला विचार करतोय आणि तोही एका साधुबद्दल? देव आपल्याला कधीही माफ करणार नाही” असं म्हणून मनातल्या मनात दोन्ही हाताने कान धरून तिने उठाबश्या काढल्या.
 
दोघींनी वाकून नमस्कार केला तसे साधूबाबा अवघडून चटकन उभे राहिले. केसरने आपला हात पुढे केला.
“बाबा कृपया माझं भविष्य सांगा” बाबा थोडे गोंधळल्यासारखे झाले.
“तुझं लग्न लवकरच होईल” असं म्हणून हसून निघून गेले. साधुबाबांनी काहीतरी चांगलं सांगितल्याने केसर खूष झाली. दोघी परतीच्या वाटेने निघाल्या. साधुबाबांनी आपलं भविष्य न सांगितल्यामुळे चमकीची मात्र रस्ताभर कटकट चालू होती पण केसरला त्याचं भान नव्हतं, तिला साधुबाबांची नजर अजून जाणवत होती तिच्या तनावर.. नाही तिच्या मनावर…
संतोष शहरातून परत आल्याचं धनीरामला समजलं यालाही साधारण २ महिने लोटले होते. आजही व्याह्याकडून बोलावणे का आले नाही ही चिंता त्याला गेले २ महिने सतावत होती. सरणारा एक एक दिवस त्याच्या चिंतेत भर टाकत होता. शेवटी मुखियाकडून सांगावा आला. धनीराम या दिवसाची गेले कित्येक दिवस वाट पाहत होता. धनीराम भेटून आला तसा आनंदात होता. व्याही येणार होते. खूप गोष्टी करायच्या होत्या. सुखियाने केसरवरून बोटे मोडली आणि “बारात येणार आहे” असं सांगितलं. केसरला धस्स झालं. ती चमकीची वाट पाहत होती.
 
आज केसर खूप कमी बोलतेय, जेवढ्यास तेवढी उत्तरं देतेय हे चमकीला जाणवलं. तिने विचारलं तसं केसरचा बांध फुटला.
“बारात येणार आहे” केसरने रडत सांगितलं.
“ओ म्हणून तू रडतेस? अग ती येणार होतीच की. उलट तुला आनंद व्हायला हवा. वेडी कुठली. मला सांग तू कोणती ओढणी नेसणार आहेस?”
बारात येणार म्हणून केसर रडत नव्हतीच, खरं कारण वेगळंच होतं. चमकीला सांगितलं तर ती आईला सांगेल या भीतीने केसर गप्प बसली. रस्ताभर तिची रडरड मात्र चालू होती.
“मी माझी पिवळी ओढणी देऊ का? तुझ्या गोऱ्या रंगला किती छान दिसेल. ए मी येणार हं तुला आल्ता लावायला. मला पण बघायचाय मुखियाचा मुलगा. पण येणारे कधी बारात?”
“मंगळवारी”
“अरे वा मंगल को शुभमंगल!”
 
मंगळवार उजाडला. धनीरामचं घर सजलं होतं. दारात रांगोळी आणि दरवाजांना झेंडूच्या माळा लागल्या होत्या. कुडाच्या भिंती नव्याने सारवून त्यावर कावेनी आणि गोरुनी शुभचिन्हे काढली होती. ओट्यावर पाहुण्यांसाठी बैठक मांडली होती.
सुखियानी सगळ्यांसाठी ठेवणीतले कपडे काढले होते. आतल्या खोलीत चमकी केसरला तयार करत होती.
“मला नाही करायचं ह्याच्याशी लग्न” -केसर
“का?” चमकी थट्टा करत म्हणाली. तेवढ्यात  मुलाकडचे आल्याचा सुखियाने सांगितलं. चमकी तिला बैठकीच्या ठिकाणी घेऊन गेली.
 
बाहेर बरीच मंडळी होती. सर्व बायकांनी घुंगट केला होता. चमकीने हळूच घुंगटातून मुखियाच्या मुलाकडे पाहिलं. आणि “साधूबाबा???” म्हणून हळूच ओरडली. ते ऐकून केसरने ही चोरट वर पाहिलं. बैठकीत साधूबाबा उपस्थित होते. आज त्यांचं रूप वेगळंच होतं. खास राजस्थानी पद्धतीचा पेहराव होता. चमकीचे बोलणे ऐकून, मुखियाच्या मुलाला जोरात हसू आलं. बैठकीतल्या मंडळींना घडला प्रकार कळेना. मुखियाच्या मुलाने सर्व वृतांत कथन केला. शहरातली लेटेस्ट fashion म्हणून “ओम नमः शिवाय” लिहिलेला कुर्ता, bandana, रुद्राक्षाची माळ त्याने विकत घेतली होती. आणि केसरला इम्प्रेस करण्यासाठी घातली. मंदिरात दर्शन घेत असताना कोणीतरी अंगारा लावला. त्या अवतारामुळे मुलींची पुरती फसगत झाली. आपला त्यांना फसवायचा विचार नव्हता फक्त केसरशी एकदा बोलायचं, तिला पाहायचं होतं. आपण त्याच दिवशी केसरला होकार सांगितला. हे सर्व त्याने सांगितले. केसरला आठवलं बाबा “तुझं लग्न लवकर होईल” असं म्हणाले होते. सगळेजण पोट भरून हसले. केसरचे गुपित तिच्या मनातच राहिले पण आनंद गगनात मावेनासा झाला..
 
Advertisements