संथ वाहते कृष्णामाई- कऱ्हाडची सुट्टी -संपदा म्हाळगी-आडकर
 
छायाचित्र सौजन्य: गूगल अर्थ
 
मी पुण्याची, माझा मामा पुण्यातच राहतो. लहानपणी त्याच्याकडे शनिवार-रविवार राहायला जायचा मोह व्हायचाच. तसे आम्ही जायचोही पण खरं आकर्षण असायचं ते मे महिन्याच्या सुट्टीच. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही कऱ्हाड-कोल्हापूरला जात असू. तसं माझं आणि कऱ्हाडचं नातं खूप लांबचं पण तिथल्या लोकांमुळे ते फारच जवळचं, जिव्हाळ्याचं होऊन गेलंय. त्यामुळे कित्येक वर्ष मी हक्कानी मे महिन्यात कऱ्हाडला जात आले आहे. माझ्या आईचा आजोळ तिकडे आहे. माझ्या आईचे मामा, मामी, मामे भाऊ तिकडे राहतात. तेंव्हा कऱ्हाडला जाताना, “मामाच्या गावाला जाऊ या” हे आपल्याला उद्देशून लिहिलंय असं वाटायचं.
 

कऱ्हाड कृष्णा नदीच्या काठावर वसलं आहे. कऱ्हाडचं आमचं घर कृष्णाबाईच्या घाटावर आहे. हा अख्खा घाट काळ्या दगडांनी बांधून काढला आहे. तो कधी बांधला हे जरी मला ठाऊक नसलं तरी काळाची बरीच स्थित्यंतर त्याने पहिली असावीत. घाटावर पुढे छोटी-मोठी देवळे आहेत. घाटाच्या शेवटी कृष्णाबाईचे मंदिर आहे. हि कृष्णाबाई म्हणजे कृष्णा नदी. 

कऱ्हाडच्या घरी माणसांचा गोतावळा मोठा आहे, त्यात आमची भर. मला लहानपणी लाडाने नान्या म्हणत. “पुण्याहून नानासाहेब पेशवे आले आहेत” असं म्हणतच मामा स्वागत करत असे. लाड करायला पुष्कळ मामा असल्याने भाच्चे कंपनी खूष असायची. रोज नवीन भरगच्च कार्यक्रम आखलेला असे. पण तो तंतोतंत पाळला पाहिजे अशी सक्ती नसे.

 

आमचं घर प्रशस्त. मोठ्या चौसोपी वाड्यात दंगा करायला काय मजा येते!! अपार्टमेंट संस्कृतीत वाढणाऱ्या मुलांना हा आनंद कुठून मिळणार. घरातच राधा-कृष्णाचं देऊळ आहे. रोज सकाळ संध्याकाळी पूजा-आरती आणि नैवेद्य ह्या गोष्टींचं माझ्या बालमनाला अप्रूप वाटायचं. रोज देवाला कोणता ड्रेस घालणार ह्याविषयी लहान मुलांमध्ये मतदान व्हायचं. देऊळ असल्याने प्रसंगी देवळात लग्ने झाल्याचं पण मी पाहिलं आहे. घरात प्रवेश केल्या केल्या समोर देवळाचा प्रशस्त मंडप, उजव्या बाजूस होमकुंड, बोहलं आणि डाव्या बाजूस मोकळं अंगण आहे.

घाटावर घराला लागून एक शेत आहे. कल्लाप्पा आणि त्याचे कुटुंबीय मिळून हे शेत कसतात. ह्या शेतात मध्यभागी एक सुंदरसं शंकराचं हेमाडपंथी मंदिर आहे. ह्या मंदिराचा परिसर शांत, रम्य आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एक गंभीर उर्जा आहे. प्रसंगी ती भीतीदायक वाटते. त्या निरव ठिकाणी शंकराची पिंड एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे भासते. तसं दुर्लक्षित असलेलं हे मंदिर कल्लाप्पा सांभाळतो. बऱ्याच वेळा दुपारी ह्या शेतात आणि मंदिरात आम्ही खेळायला जात असू.
 

रोज सकाळी सडा-रांगोळी न चुकता होत असल्याने त्याच वासाने दिवसाची सुरुवात व्हायची. दिवसाच्या पहिल्या प्रहरी अरोमा थेरपी! उन्हाळ्यातही सारं किती आल्हाददायक वाटायचं. घरासमोर मोठं चिंचेचं झाड असल्याने पक्षांचे मधुर आवाज ऐकू येत. तेवढ्यात घरच्या देवळातून घंटीचे नाद कानावर पडत. की आमची स्वारी तिकडे. मग आजी आंघोळिस पिटाळायची. आंघोळ करूनच देवघरात जायचा शिरस्ता. मग धार काढायला जाण्यासाठी मामा हाक मारायचा. गाईच्या दुधाची धार मामा डायरेक्ट ग्लास मध्ये धरायचा. त्या गरम धारेमुळे ग्लासच्या तळाशी असलेली साखर विरघळत असे. धारोष्ण दुधाची चव काही औरचं!

 

आंघोळी आटपून, देव दर्शन आणि प्रसाद घेऊन, न्याहारी घेऊन आम्ही घाटावर जायचो. घाटावरच्या प्रत्येक देवाला नमस्कार करून, स्वामीच्या बागेत, समाधीवर फुले वाहून संगमावर जात असु. कऱ्हाडला कोयना आणि कृष्णा नद्यांचा संगम होतो. मामा आणि त्याचे मित्र आम्हा पोरांना संगमावर पोहायला घेऊन जात. तास न तास पाण्यात डुंबायला फार मजा यायची.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे कऱ्हाडचे. त्यांची समाधी संगमाच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. तिच्या कडेने एक सुंदर बाग विकसित केली आहे. तिला स्वामीची बाग म्हणतात.

Preeti-sangam-garden 

स्वामीची बाग

YeshwantraoChavan Smurti 

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण समाधी

परत आल्यावर, सगळ्या वाड्यात सुग्रास जेवणाचा सुवास दरवळत असे. मामीआजी आणि माम्या सुगरण त्यामुळे जेवायला आज काय याचं नवल असायचं. पाय आपोआप स्वयंपाकघराकडे वळत. जेवायला बसण्यासाठी मंडपामध्ये पाट मांडले जात. ताट-वाटी भांडी मांडण्याची कामं आम्हा लहान मुलांना दिली जात. जसजशी समज वाढायला लागली तसं डावी बाजू वाढण्याचं कामही दिलं जायचं. सगळं क्रमाने वाढलं असेल तर शाबासकी मिळायची. मे महिन्याचे दिवस असल्याने, ताटात उन्हाळी पदार्थांची रेलचेल असे. आंब्याचा रस, साखरांबा, गुळांबा, कैरीची वेगवेगळी लोणची, चटण्या, पन्हे, काकडीचा कायरस…. आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळे पदार्थ आम्हाला चाखायला मिळत. जेवून तृप्त झालेले आत्मे आपसूक वामकुक्षीकडे वळत.
 

जेवण झाल्यावर पत्ते, कॅरम यांना उधाण यायचं… ladis, झब्बू, गड्ड्या झब्बू, मेंढीकोट… पासून भिकार-सावकारपर्यंत सगळंकाही. कधी मामाच्या प्रिंटींगप्रेसमध्ये, मामीआजीच्या शिवणवर्गामध्ये आम्ही जा-ये करायचो, शिवणयंत्रांशी खेळायचो. कधी कधी सांडगे, कुरडया घालताना लुडबुड करायचो. आमच्या एका दूरच्या नातेवाईकाचं कऱ्हाडला जवळच talkies आहे. तिकडे जाऊन नवीन पिक्चर पाहून यायचो. माझ्या एका मामाला पुस्तक जमवायचा छंद आहे. घरच्या घरी त्याने एक छोटेखानी पुस्तकालय सुरु केले होते. त्याच्या पुस्तकालयात आम्ही खूप रमायचो, खूप वाचायचो. वाचून कंटाळा आला तर घर-घर खेळायचो, कल्लाप्पाच्या शेतावर जायचो. कल्लाप्पाच्या शेतावरून फुलं, पानं, छोटे असोले नारळ असा संसार घेऊन परत यायचो. रोजची दुपार खूपच exciting असायची.
 

दुपारची चहाची वेळ हि माझी फार आवडीची. घरात खूप माणसं असल्याने दोनदा चहा करावा लागे. कऱ्हाडच्या बैठ्या स्वयंपाकघरात मामाच्या बाजूला बसून चहा करायला मजा यायची. चहा मोठ्या प्रमाणात करायचा असल्याने प्रमाण चुकलेलं चालायचं नाही. त्यामुळे साखर आणि चहा आधी बाजूला मोजून ठेवत असू. ते मोजायला मला फार आवडायचं. चहा झाला कि घरातल्या एकेकाला शोधून चहा प्यायला बोलवायचं.

संध्याकाळी तयार होऊन आम्ही स्वामीच्या बागेत जायचो. कृष्णेच्या वाळवंटात चपला हातात घेऊन चालताना, निसर्गाशी कनेक्ट झाल्याचा फील यायचा. कृष्णेच्या पाण्यात पाय बुडवताना, हिची सर मुळा-मुठेला नाही अशी हळहळ वाटायची. मग स्वामीच्या बागेत हुंदडून झाल्यावर पाणीपूरी- दहीपूरी मेवाडचं आइस-क्रीम अशी पेटपूजा केल्यावरच घरी परत येत असू.

जेवणं झाल्यावर सगळे मंडपात जमत. मग भेंड्यांना ऊत यायचा. घरात लग्न-मुंज काही असेल तर घरी असलेल्या पाहुण्या-रावळ्यांना घेऊन खो-खो, संगीत खुर्ची सारखे खेळ व्हायचे. घरातल्या स्त्रिया एकत्र येऊन उखाणे घ्यायच्या. छान छान आणि सर्जनशील उखाणे घेण्याची चढाओढ असायची.
रात्री सगळे मंडपात झोपत असू. प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असायच्या. कोणत्या कोपऱ्यात झोपल्यावर कमी डास चावतात किंवा घोरणं ऐकू येत नाही हे बरोबर मावश्या सांगायच्या.
सुट्टी संपत आली कि माझ्या छोट्या जिवाची घालमेल होत असे. शाळा सुरु होऊन नवीन वह्या पुस्तकं मिळण्याचं आकर्षण तर असायचं, पण पुण्याला परत जाण्यासाठी पाय निघत नसे. सगळ्यांना नमस्कार करून निघताना, मागे काहीतरी राहिल्याचा भास होत असे.
 
लग्न झालं तसं भौगोलिक अंतर वाढलं. २-४ वर्षात कऱ्हाडला जाण झालं नाही. पण आता खूप बदललंय म्हणतात. घाट बदलला आहे, आमचं घर बदललं आहे. कृष्णेच पात्र बदललं आहे. दर वेळेला ती अजूनच संथ आणि कृश झाल्यासारखी वाटते. माणसं मात्र तशीच आहेत, पु. लंच्या भाषेत पिकून अजून गोड झालेली.
आजही सगळ्या आठवणी मनात रुंजी घालतात. दारामधल्या सड्याचा, मामीआजीच्या जेवणाचा, प्रेस मधल्या खळीचा, कल्लापाच्या शेताचा, गोठ्यातला शेणाचा, मामाआजोबांनी आणलेल्या गावठी आंब्यांचा, देवळातल्या धूप-उदबत्तीचा वास माझ्या स्मरणचित्रांमध्ये नवे रंग भरतो.
कृष्णेच्या वाळवंटात, वाळूचे किल्ले बनवताना, वितभर खणलं तरी ओलावा सापडायचा… मनातल्या वाळवंटाला मात्र अजूनही कृष्णेच्या ओलाव्याची ओढ आहे!
Advertisements