आकाशातली शाळा -संपदा म्हाळगी-आडकर  १२/३०/०९
 
हल्ली झोपेत सुद्धा मी शाळेत जाऊन येतो
सुरज भैय्या न चुकता घंटा देऊन जातो
 
चंद्र गुरुजी भरवतात रोज रात्रशाळा
आभाळाचा निळा फळा होतो काळा काळा

इथे रोज बदलतं आमच्या शाळेचं टाईमटेबल
महिन्याच्या कॅलेंडर वर एकाच सुट्टीचे लेबल
 
गुरुजी आमचे शिस्तीचे सारखे डाएटवर असतात
कधी खाऊन टम्म गोल ,कधी उपासाने रोड दिसतात
 
राखी, कोजागिरी आणि ईद असतात गुरुजींसाठी खास
दर चतुर्थीला असतो त्यांचा कडक उपवास
 
आकाशातली आमची शाळा भरते दप्तराविना
वर्गात जाऊन बसायला ढगांचा जिना
 
प्रार्थना आमची शुभंकरोती, कारण असते सांजरात
मग परवचा, पाढे म्हणत होते तासाची सुरुवात
 
या वर्गात सगळ्या मुली तारका आणि चांदण्या
आकाशगंगांचे दस्त आणि धूमकेतूंच्या लेखण्या
 
मुलींचे ठरलेले ग्रुप राशी आणि नक्षत्र
मी एकटा इथे परग्रहाचा प्राणीमात्र
 
आमच्या शाळेत दोनच विषय शिकवले जातात सखोल
प्रेम विषय गुरुजींचा खास, बाकी राहिला खगोल

 
खगोलाच्या तासाला मला झोप येते फार
मग खावा लागतो चंद्र गुरुजींचा मार
 
गुरुजींचा मार म्हणजे छम छम छडी
झोपेमध्ये पडतो मी पलंगावरून खाली
 
त्यातून सावरताना येते सुरज भैय्याची घंटा
चंद्र गुरुजींच्या शाळेत नाही गृहपाठाची चिंता
Advertisements