मज मनास क्षणभर वाटे -संपदा म्हाळगी-आडकर  १२/१५/०९  

मज मनास क्षणभर वाटे मी जल-निर्झर व्हावे 
कधी डोंगरात कधी हिरवळीत मी आनंदे खेळावे
घेऊन हवा तो रंग, रंगात रंगुनी जावे
तृषार्त नसावे कोणी, मी सर्वांसी हर्षावे 
 
मज मनास क्षणभर वाटे पक्षांचे पंख मिळावे
त्यांच्या संगती मीही स्वच्छंद नभ विहरावे
भेदून सर्व ह्या भिंती क्षितीजास मीही स्पर्शावे
गाऊन नित्य नव गाणे जग प्रेमभावे भरावे 
 
मज मनास क्षणभर वाटे का होऊ नये मी वारा?
सुसाट फिरावे मस्त न मिळो सुस्तीला थारा
तत्परी दूर मी न्यावा हा तमाम त्याज्य पसारा
दुष्काळ प्रदेशी नेईन सुखाच्या पाऊस धारा  
 
मज मनास क्षणभर वाटे जावे रविकिरणांच्या वंशा
उजळावे नभांगण सारे प्राशून माझ्या अंशा
सृष्टीत भरून जावे नव चैतन्य नवी आशा
कर्तव्ये होऊन हलके मी मुकाट विरून जावे
Advertisements