Posts from the ‘आठवणींचे कप्पे’ Category

बिट्टी

बिट्टी -संपदा म्हाळगी-आडकर १०/११/१०
माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे.
लहानपणी काही विचार आणि मनोभावना ह्यांची सांगड, आपण आपल्याला पटेल त्या पद्धतीने घालतो. आणि तेच खरे/बरोबर मानून पुढे जात असतो, आपले भाव-विश्व त्याभोवती गुंफत असतो. “Back-of-the-mind” कुठेतरी माहितही असतं कि ‘हे सगळं खोटं आहे’. पण पटत नाही. ते सगळं हार्मलेस असतं, निरागस असतं. त्यातलीच हि एक बिट्टी!
बिट्टी, मधलं बोट (middle finger) चाफेकळी (index finger) वर आणून धरलेली बिट्टी! लहानपणी कितीवेळा धरली असेल बिट्टी.. सांगता येणं कठीण आहे. कोणकोणत्या कारणांनी धरली ह्याची यादी पण फार मोठी आहे…. कधी मित्र-मैत्रिणीने काहीतरी वाईट गोष्टीला (चुकून/उमजून) स्पर्श केला म्हणून,… कधी मैनेची जोडी दिसली म्हणून तर कधी मेलचा डब्बा दिसला म्हणून..
शाळेतून घरी जाताना, चुकून मैत्रिणीचा पाय घाणीत पडला तर “ईई… लीना आता तुझी बिट्टी!” हे वाक्य आपोआप तोंडावर यायचं! मग घरी जाईपर्यंत आमचं बोटावर बोट तसंच. ‘जिची बिट्टी धरलीय’ त्या मैत्रिणीने अधून-मधून बोटं तपासून पहायची, बिट्टी आहे कि नाही. समजा बोटं दुखायला लागलीच, तर मैत्रिणीला दाखवून दुसऱ्या हाताची बिट्टी आधी धरायची आणि मग आधीची सोडायची. एवढा आटापिटा कश्यासाठी? Hygiene बद्दल आम्हाला खूप ज्ञान होतं अश्यातली गत नाही.
मैनेची जोडी दिसणं.. आणि बिट्टी धरणं, हि एक फार मजेशीर गोष्ट आहे…त्याविषयी एक चारोळी हि आहे जी मला माझ्या कॉलेज जीवनात (ऑफ-कोर्स मैत्रिणींकडून) समजली….
One for sad,
Two for Joy,
Three for letter
Four for Boy!
म्हणजे तुम्हाला १ मैना दिसली म्हणजे काहीतरी वाईट होणार.. (तसा काही वाईट झाल्याचं स्मरणात नाही..), मैनेची जोडी दिसली तर आनंद होईल. ३ मैना एकत्र दिसल्या तर तुम्हाला (hopefully गुलाबी) पत्र येईल. हो! कारण पूर्वीच्या काळी रिझल्ट पोस्टाने यायचा. म्हणजे “निकाल” काय लागला ह्याचं प्रेमपत्र यायचं. आमच्या शाळेत नापास विद्यार्थिनींना पत्र यायची म्हणे. आणि शेवटी ४ मैना दिसल्या कि मुलगा (तो पण hopefully सपनोंका राजकुमार) भेटेल. असा ह्या कवितेचा अर्थ आहे. तर अशा ह्या मैना दिसल्या कि हाताची बिट्टी धरायची. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे एका ओळीची एक बिट्टी. म्हणजे मैनांचा थवा दिसला तर बिट्ट्याच बिट्ट्या!
तशीच गोष्ट मेलच्या डब्ब्याची, मेलचा डब्बा म्हणजे मेल/पोस्ट/पत्र नेणारी गाडी! भारतात ह्या गाड्या गडद लाल रंगाच्या असल्याने कुठूनही चटकन नजरेत भरतात. अशी हि गाडी दिसली कि नजरेबरोबर आमची बोटही वळायची! हा मेलचा डब्बा ‘गुडलक चार्म’ मनाला जायचा. एका डब्यासाठी एक बिट्टी! पोस्त ऑफीसाजवळून जाताना पंचाईत व्हायची. विश्रामबाग वाड्यापाशी, सिटीपोस्टापाशी किंवा कॅम्पात पोस्टऑफिसजवळ खूप मेलगाड्या दिसायच्या.. आता स्कुटी चालवताना बिट्ट्या कश्या धरायच्या? आहे कि नाही यक्ष प्रश्न!
मला आठवतंय, आम्ही एकदा कॅम्पातून पास होताना, जवळ जवळ २०-२५ मेलचे डब्बे पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले. मागे बसलेल्या मैत्रिणीला विचारलं, “अग पाहिलेस का केवढे मेलचे डब्बे आहेत?” तर ती म्हणाली, “हाताची बोटं संपली आता पायाच्या बोटांच्या बिट्ट्या धरल्या आहेत!”. :) तेंव्हाही आम्ही पोट धरून हसलो होतो.
आता बिट्ट्या तर धरल्या पण त्या सोडायच्या कश्या? तर त्या सोडायच्या ४ पायांचा प्राणी पाहून…. म्हणजे शाळेतून घरी जाताना काही कारणांनी बिट्टी धरली कि घरी जाईपर्यंत कुत्रा, मांजरासारखे प्राणी शोधात फिरायचा… कधी कधी तर “अग त्या रस्तावर कुत्रं नक्की असतं…” असं म्हणून वाट वाकडी करून, बिट्ट्या सोडायला जायचं. आणि अगदी नाहीच सुटली बिट्टी घरी जाईपर्यंत आणि बोटं दुखायला लागली कि कोणत्यातरी माणसाकडे पाहून बिट्टी सोडायची (म्हणजे त्या माणसाला चार पायाचा प्राणी मानून…)
बिट्टीचे असे निरागस खेळ चालायचे… तशीच गोष्ट जॉलीची! पण ती परत कुठल्याश्या पोस्टमध्ये!

दशम ग्रह

दशम ग्रह -संपदा म्हाळगी-आडकर ७/१०/१०
 
दशम ग्रह! नाही, नाही मी एरिसबद्दल बोलत नाहीये. मी बोलतेय दशम ग्रह अर्थात जावई! परवा माझ्या असं लक्षात आलं की, जावयाच्या जातीला स्थळ, काल, जन्म, भाषा, संस्कृती ह्या कोणत्याही गोष्टीने काही फरक पडत नाही. बर घडलंही तसंच! ऑफिसमधल्या कोणाची तरी सासू घरी राहायला येणार होती आणि थोडे-थोडके नाही २ महिने!
 
सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुनेला सासूबरोबर रहायची फार वेळ येत नाही. तश्यात जावयाने सासू बरोबर राहण्याचे प्रसंग तर विरळाच! म्हणजे ट्रीप वगैरे छोट्या दौऱ्यात जावयाने सासूच्या समवेत काढलेला वेळ ह्यात धरलेला नाही. (ट्रीप मध्ये ‘पडणारं तोंडावर तोंड’ हे रोज ‘पडणाऱ्या तोंडावर-तोंड’ पेक्षा वेगळं असतं.) त्यामुळे “घरी सासू राहायला येणार” ह्याचं टेन्शन जसं सुनेला येऊ शकतं तसं ते जावयालाही येऊ शकतं.
 
तसंच काहीसं माझ्या ऑफिसमधल्या एका महाशयांचा झालं होतं. बर आता हे महाशय आहेत चीनी, चाळीशीतले, उच्चशिक्षित पण ह्या सगळ्याचा, त्यांच्या जावई स्वभावाला काही फरक पडत नाही. त्यांचं, “आज सासू-सासरे चीनमधून येणार आहेत व आता २ महिने राहणार आहेत. मला घरी जाऊ नये असं वाटतंय”, हे सांगताना झालेलं वाकडं तोंड पाहून सगळ्यांना हसू आलं. तेही गमतीत अतिशयोक्ती करताहेत हे सगळ्यांना माहित होतं. सर्वांनी आपापले अनुभव कथन करायला सुरुवात केली. भौगोलिक अंतरामुळे, थोड्या थोड्या दिवसांसाठी येऊन राहणं कसं शक्य नाही आणि परवडत नाही असा सूर भारतीय आणि चीनी लोकांनी आळवायला सुरुवात केली. ‘मला माझ्या सासूबरोबर राहणे कसे अशक्य आहे’, ह्याचे किस्से गोरी पुरुष मंडळी रंगवून सांगायला लागली. (“माझे सासू सासरे २ महिने राहायला आले तर मी काय माझी बायकोही रडेल!”, अशीही टिप्पणी एका गोऱ्याने केली.)
एकूणच “बायकोला झेलतोय ते काही कमीय? त्यात अजून भर…”, असा सर्वांचा रोख होता हे आम्हा (सुज्ञ) बायकांच्या लक्षात आलं होतं तोपर्यंत!
माझी एक भारतीय सहकारी म्हणाली, घरच्या बागेत असलेल्या टूल-शेडकडे बोट दाखवून तिचा नवरा मुलाला “ये तुम्हारी नानीका घर है|” असं शिकवतो. (मुलाची नानी म्हणजे तिची आई, नवऱ्याची सासू) ‘आई आली आणि तिच्यापुढे नातवाने सगळं सोडून, बरोबर तेच सांगितलं तर काय होईल?’, असं तिला टेन्शन! मग सगळ्या बायकांनी मिळून त्यांना सासू (बायकोची आई) कशी चांगली असते आणि जावयाचे लाड करते. ती जावयाला कशी निरनिराळ्या डिशेस खायला घालते वगैरे.. सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या संभाषणावरून एक जाणवलं,
सासूचे किस्से किंवा गॉसिप मन लावून सांगण्याच्या बाबतीत, पुरुष बायकांचा हात नक्कीच धरू शकतील. 
मगाचच्या चीनी महाशयांना, त्यांची बॉस, “सासू-सासऱ्यांना एअरपोर्टवर आणायला जा” म्हणून सुचवत, चिडवत होती. ‘ज्युरी ड्युटी’ च्या नावाखाली, महाशयांनी एअरपोर्टवर न जाण्याची सवलत बायकोकडून मिळवली होती. पण ‘ज्युरी ड्युटी’ संपल्यावर एअरपोर्टवर न जाता, महाशय ऑफिसमध्ये हजर! त्यावरून सर्वांनी त्यांना परत चिडवले. कसेबसे बॉसने ४ वाजता त्यांना ऑफिसातून पिटाळले. बर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बॉयलर दुरुस्तीला माणूस यायचा होता म्हणून “(सासू सासरे घरी असताना) १/२ दिवस घरून काम करावे लागणार!” ह्या कल्पनेने ते दु:खी होते.  बॉसने जाताना “उद्या पूर्ण दिवस घरूनच काम करा, ऑफिसला येऊ नका” अशी सक्त ताकीद दिली. महाशयांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
 
घरी येऊन ही गम्मत मी नवऱ्याला सांगितली तर तो म्हणे, “हो साहजिक आहे! तुझी आई इकडे ३ महिने आली होती तेंव्हा सगळे माझ्या बरोबर sympathize करत होते”, “तुझ्या आईला सोडायला एअरपोर्टला चाललो होतो तेंव्हा मला मार्क म्हणाला, ‘Mother-in-law leaving… What a relief! after you drop her off, go to a bar and have 3-4 shots of taquila! Believe me it works!’ (सासू परत चाललीय काय सुख आहे! एअरपोर्टवर सोडून आलास की बार मध्ये जाऊन टकीलाचे ३-४ शोट्स लाव. विश्वास ठेव, मस्त लागू पडतं) (खरं सांगायचं तर, मार्कचं जरा चुकलंच! टकीला नवऱ्याने नाही बायकोने घ्यायला हवी कारण नवऱ्याची सासू विमानात बसलीय पण बायकोची सासू घरी होती ना! टकीला टाकीत पडली कि सगळी विमानं हलकी होतात…)
थोडक्यात काय जावई ह्या दशम ग्रहाचं स्थान प्रत्येक सासूच्या पत्रिकेत जरी निराळं असलं तरी ह्या ग्रहाची चाल मात्र कायम तिरकीच!
 

लिपस्टिक

लिपस्टिक -संपदा म्हाळगी-आडकर ५/२९/१०
 
मुली आणि नटणं-मुरडणं हे समानार्थी शब्द असल्याचं मान्य करण्यास कोणाची हरकत नसावी. माझ्या बाबतीतही ते खरं आहे. लहानपणी म्हणजे अगदी ४-५ वर्षाची असताना मला झगमग कपडे, उंच टाचेच्या चपला, मेक-अप, नटणं-मुरडणं ह्याचं विलक्षण आकर्षण होतं. माझ्या मामीला ह्या गोष्टींचं ज्ञान आणि आवड असल्याने ती माझी रोल-मॉडेल होती.
 
शनिवार-रविवार आजोळी राहायला गेल्यावर, आजीच्या खाऊचं, मामाच्या पॉट आईस्क्रीमचं जेवढं कौतुक असायचं, त्याहीपेक्षा मामी आता स्वत:चं कशी आवरते हे पाहायला मिळायचं कौतुक जास्त! मामीकडून कर्लर्स लावून घेऊन सरळसोट केस कुरळे करून घेऊन मजा यायची. तिच्या उंच टाचेच्या sandals मी कितीवेळा घातल्या असतील देव जाणे. उंच टाचेच्या चपला त्याकाळात घ्यायला आणि घालायला आम्हाला सक्त मनाई होती. त्यामुळे शनिवार-रविवार मामाकडे भातुकली खेळताना मामीचे उंच टाचेचे sandals घालून, त्या घालून धडपडून आम्ही हौस भागविली.

लहानपणी लिपस्टिक ह्या गोष्टीने मला जबरदस्त भुरळ घातली होती. माझे लिपस्टिक विषयीचे किस्से, आमच्या घरात खूप फेमस आहेत. माझ्या वडिलांना एवढ्या लहान मुलींनी नटणे अजिबात मान्य नव्हते. लिपस्टिक लावण्यास त्यांचा जबरदस्त विरोध होता. आता पालकाच्या भूमिकेतून जाताना माझा stand फारसा वेगळा नाही.

आमच्या घराशेजारी असलेल्या मंदिरात उत्तर भारतीय पुजारी होते. त्यांच्या नवपरिणीत बायकोलासुद्धा नटण्याची फार हौस! त्यामुळे विकडेजमध्ये ती माझे शिक्षण घेत असे. ओठाला ती लावत असलेली एक शेंदरी पावडर, लिपस्टिकपेक्षा वेगळी पण लिपस्टिकचा इफेक्ट देणारी होती. न राहवून मी, एकदा तिच्याकडून ती लावून घेतली. घरी आल्यावर बाबांनी मला तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत बंद करून ठेवलं होतं. मला कोंडून बाबा स्वत: तेवढा वेळ खोलीच्या बाहेर बसले होते हे मला माहित होतं. माझ्या कृत्याचं मला काही वाईट वाटलं नाही पण त्यानंतर मी तसं कधी केलं नाही. आता ते सगळं आठवून हसू येतं.

असाच अजून एक किस्सा म्हणजे माझ्या मामीच्या लिपस्टिकचा! मामीला लिपस्टिकची फार हौस. रोज ऑफिसला जाताना ती लिपस्टिक लावायची. तिची एक आवडती, गडद रंगाची, भारीची लिपस्टिक मला खूप आवडायची पण ती कधीही लावायला मिळणार नाही हे मला माहित होतं. पण ती कशी लावतात हा फील घ्यायची हौस ना! मग काय, माझ्या ४ वर्षांच्या मेंदूला एक कल्पना सुचली. मी सरळ ती लिपस्टिक उचलून खिडकीच्या जाळीवर फासली. मामीची अर्धी-एक लिपस्टिक मी संपवली असावी त्या दिवशी. माझी आठवण म्हणून मामा मामीने ती जाळी कधीही न धुता, ती खूण तशीच ठेवली होती कित्येक वर्षे!
 
मोठे झाल्यावर, समजायला लागल्यावर, कमवायला लागल्यावर आपल्याला हवे ते घेणे शक्य आणि प्राप्त होते. पण आता काय करावे आणि करू नये ह्याची जराशी अक्कलही आली. बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर जास्त भर पडू लागला. लिपस्टिकला माझा विरोध अजूनही नाही पण कोणत्या वयात लावावी आणि कोणत्या वयात लावू नये ही मते आता ठाम आहेत.

हौसे, नवसे आणि गवसे

हौसे, नवसे आणि गवसे - संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१० 

माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत ३ प्रकारची माणसं असतात, हौसे, नवसे आणि गवसे!

हौसे म्हणजे जत्रेची हौस भागवण्यासाठी आलेली हौशी मंडळी. जत्रा “कोणत्या देवाची आहे” ह्याचं ह्या लोकांना फार देणं-घेणं नसतं. हे लोक जत्रेला फक्त एन्जॉय करायला येतात.हि मंडळी टोळक्या-टोळक्याने फिरताना दिसतात.जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी साधारण ४०-४५% हीच मंडळी असतात. (संत्या, गन्या, पक्या कॅटेगरी)
दुसरे नवसे म्हणजे नवस फेडायला आलेली भाविक मंडळी.हि मंडळी आपल्या सहकुटुंब सहपरिवार आलेली असतात. बोकडाचा बळी देणारी, पोराला पायावर घालणारी, पायऱ्यांवर लोळण घेणारी किंवा भंडाऱ्यात न्हाऊन निघणारी मंडळी हीच.
आणि तिसरा प्रकार गवसे म्हणजे ‘कुठे काही गावतंय का?’ ‘कुठे हात मारता येतोय का?’ असं पाहणारी भुरटी चोर मंडळी. जत्रेला आलेल्या पब्लिकपैकी १०% प्रमाण ह्याच लोकांचं.

मला ब्लॉग लिहून फार काळ झाला नाहीये. माझा ब्लॉग विशेष/ पंचतारांकित आहे अशातली गत नाही. ह्या क्षेत्रातल्या मातबर मंडळींच्या मानाने माझा ब्लॉग ‘कीस झाडकी पत्ती! पण असं असून, ब्लॉगिंग बाबतीत “हौसे, नवसे आणि गवसे” हा अनुभव प्रकर्षाने येऊ लागला आहे. ढोबळ ठोकताळा असा-

ब्लॉगला भेट देणारे हे जर जत्रेला येणारं पब्लिक धरलं, तर ह्यात

६० ते ७०% पब्लिक हे हौशी. त्यांना ‘कोणी’ ‘काय’ आणि ‘कसं’ लिहिलंय ह्याचं त्यांना सोयर-सुतक नसतं. ही मंडळी ब्लॉगर्सच्या कोणत्याश्या साईटवरून, सुरुवातीच्या ४ ओळी वाचून, तुमच्या ब्लॉगवर येतात. विषय, विचार आणि अभिव्यक्ती ह्यांच्याशी त्यांना काही घेणं नसावं. “ते सगळा ब्लॉग वाचतात तरी का?” हा मला न सुटलेला प्रश्न आहे. ही लोकं कधीही ब्लॉगला कॉमेंट द्यायच्या फंदात पडत नाहीत. त्यांना वेळच नसतो तेवढा. सगळं एन्जॉय करण्यात (थोडक्यात वाचण्यात आणि वाचनीय शोधण्यात) हे लोक इतिकर्तव्यता मानत असावेत.

आता नवशांबद्दल बोलू. हे नवसे म्हणजे तुमच्या ब्लॉगला नियमित भेट देणारे, तुमच्या नव्या लेखनासाठी नोंद करणारे, कॉमेंट्स देणारे आणि भविष्यातील कॉमेंट्सला सबस्क्राइब करणारे. कधी कधी लिहिलेलं आवडल्यास/ न आवडल्यास तसं सांगणारे. हे लोक ब्लॉगिंगबाबतीत बरेच सिरिअस असतात (अथवा तसे भासवतात.). असे वाचक साधारण २५-३०%. (ब्लॉगला देवाचे स्थान देण्याचा हा प्रयत्न नाही.)

उरलेले गवसे, हे खऱ्या अर्थी “कुठे काही मिळतंय का?” ह्या शोधार्थ भटकणारे. म्हणजे “आपल्या ब्लॉगवर काहीतरी लिहिण्यासाठी, दुसऱ्याच्या ब्लॉगवर काही मिळतंय का?” ;) हे लोक म्हणजे, काही न मिळाल्यास वर्तमानपत्रातील बातम्या आपल्या भाषेत परत पोस्ट करणारे, स्वत:च्या ब्लॉगवर दुसऱ्याचे लेखन पोस्ट करून, उचित श्रेयही न देणारे अथवा “हे लिखाण माझे नाही” हे कधीही मान्य न करणारे महाभाग!  बर ह्या लोकांमध्ये काही संकेतस्थळ (वेबसाईट्स) पण आहेत. indiarss.net, Topsy.com सारख्या! अशा गवश्यांचे प्रमाण साधारण ५-७%. (दुसऱ्याच्या लिखाणाने स्वत:च्या ब्लॉगचा ज्यूस वाढवणारी ढापू कॅटेगरी)

तर शेवटी काय जत्रेत सगळ्या प्रकारचे लोक असणारच! आपण आपली ब्लॉगिंग जत्रा चालूच ठेवायची आणि ब्लॉग्जचा उरूसही! हेरंबच्या भाषेत जय ब्लॉगिंग!

मिसेस/मिस्ट्रेस

मिसेस/मिस्ट्रेस -संपदा म्हाळगी-आडकर ६/३०/१०  

नचिकेतने आज ‘मिस्टर काय करतात?’ म्हणून पोस्ट टाकली आणि डोक्यात शब्द आला तो ‘मिसेस’. मिस्टर आणि मिसेस हे शब्द बऱ्यापैकी जोडीने वापरले जातात. भारतात मिसेस हा शब्द सरळसोट बायको ह्याअर्थी वापरला जातो. चारचौघात बायकोला उद्देशून तिचं नाव घ्यायचा जमाना आत्ताचा. त्या आधीची पिढी बायकोला चारचौघात “माझी मिसेस” असंच उद्देशत असे. त्यात चूक काहीच नाही, कारण शब्दकोशात मिसेस (स्पेलिंग Mistress) ह्या शब्दाचा अर्थ married woman (लग्न झालेली बाई) हाच दिलेला आहे.

मी अमेरिकेत आले तेंव्हा घरी असताना TV ने माझी सोबत केली. माझ्या अतिरिक्त आणि बऱ्यापैकी अनावश्यक ज्ञानात भरही टाकली. अमेरिकन TV वर नात्यांवर भाष्य करणारे (भाष्य कसले.. त्यांची खिल्ली उडवणारे), नात्यांमधले दुरावे कमी करण्याचा प्रयत्न करणारे (तसा दिखावा करणारे) असे बरेच कार्यक्रम असतात. आणि दुर्दैवाने प्रसिद्धही असतात. तेंव्हा फावल्या वेळात आणि TV वर अजून पाहण्यासारखे काही नसल्यास तो पाचकळपणा मी पाहत असे. 

त्या कार्यक्रमांत, सहसा २ बाया आणि १ पुरुष किंवा २ पुरुष आणि १ बाई असे येतात आणि कचाकचा भांडतात. विषय काय असणार हे तुम्हाला कळलंच असेल, “विवाहबाह्य/नातेबाह्य संबंध”! हे लोक (म्हणजे कार्यक्रमात सहभागी झालेले)  नेहमी आपल्या बायकोला वाईफ म्हणत, which is OK. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण ‘त्या’ दुसऱ्या बाईला म्हणजे ‘पती पत्नी और वोह’ मधली ‘वोह’, थोडक्यात ‘ठेवलेल्या बाईला’ ते Mistress (मिस्ट्रेस) म्हणत. (आता खाल्ल्या का आमच्या इंग्रजी ज्ञानाने गटांगळ्या? तर्खडकर वगैरे तर लोटांगणे घालायचे ह्यांच्यापुढे!) मला बापुडीला प्रश्न पडायचा हा बायकोला मिसेस/मिस्ट्रेस का म्हणत नाहीये? बायकोला सोडून तिसरीलाच का मिस्ट्रेस म्हणतोय म्हणून मला स्ट्रेस यायचा. :) पुढे पुढे कळलं कि खरी गोची काय आहे. थोडक्यात काय आपल्याकडची ‘लग्नाची बायको’ इकडे ‘ठेवलेली बाई’ होते.

रद्दी

रद्दी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२७/१०
 

रद्दी हा अगदीच रद्दी विषय नाही. किमान काही जणांसाठी. लहानपणी रद्दी टाकण्याचा केवढा उत्साह असायचा. बाबा आमच्यासाठी ते काम राखून ठेवत. त्या निमित्ताने आम्ही काही उद्योग न करता, एकाजागी बसत असू.  रद्दी टाकण्यापूर्वी, सगळी वर्तमानपत्रं नीट लावायची हा बाबांचा दंडक होता. आता तुम्ही म्हणाल, अनायासे रद्दी घालायची मग कशाला नीट लावायला हवीत. तर त्याचा कारणं  अशी,
१. नीट लावल्याने एका पिशवीत व्यवस्थित आणि जास्त वर्तमानपत्रं बसतात, त्यामुळे ज्यादा पिशव्या कराव्या लागत नाहीत.
२. रद्दीवाल्याला पण रद्दी घेणे सोपे जायचे. (सहिष्णुतावाद)
  
रद्दी एकसारखी करताना मजा यायची. जुनी वर्तमानपत्रं चाळताना, त्यातल्या शिळ्या बातम्या, जुनी भविष्य वाचताना वेळ जात असे. राजकारण, त्यातली सत्तांतरे, मतांतरे, स्थित्यंतरे सगळं डोळ्याखालून घालायला मिळायचं. रंगीत, मऊसर पुरवण्या, कव्हर घालायच्या उद्देशाने बाजूला काढल्या जायच्या. वेगवेगळ्या सणांचे ‘विशेष’ अंक पहिले कि होऊन गेलेल्या सणांची आठवण यायची. रद्दीतल्या अंकांमधले चिंटू वाचायला गम्मत यायची. खेळाचं पान माझ्या आवडीचं असायचं. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूचं कोणतं छायाचित्र ‘miss’  तर नाही न झालं, हे पाहण्याची धडपड असायची. तीच गोष्ट “सुट्टीचं पान” आणि शब्दाकोड्यांची! ती पानं आधी शोधून काढून बाजूला ठेवायची. जमल्यास बाबांचा डोळा चुकवून एखादं कोडं सोडवून घ्यायचं. 

 
वर्तमानपत्रांच्या रद्दी नंतर वेळ यायची सटरफटर रद्दीची. म्हणजे कॅलेंडर्स, डायऱ्या, मासिकं, पुस्तकं (अभ्यासाची नाही. ती आम्ही भावाबहिणींमध्ये पुढे “pass-on” करायचो.), हस्तलिखीतं, वगैरे… मग त्यात काहीतरी रोचक मिळायचं. कॅलेंडर्सच्या मागे सोडवलेली गणितं दिसायची. हस्तलिखीतातल्या स्वत:च्याच अक्षराचं कौतुक वाटायचं. मग त्यातल्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंचा गठ्ठा वेगळा. असं करत, वर्तमानपत्रांच्या रद्दीच्या मोठ्या गठ्ठ्याशेजारी आमचा एक छोटा गठ्ठा तयार व्हायचा! 
 
हि सगळी रद्दी पिशव्यांत भरून, आम्ही बाबांच्या स्कुटरवरून रद्दीवाल्याकडे घेऊन जात असू. रद्दीच्या दुकानात चंपक, चांदोबा, चाचा चौधरी, किशोरचे अंक दिसताहेत का ह्याकडे आमचं लक्ष अधिक. बाबांच्या मागे लागून रद्दीच्या पैशातून (आणि कधी कधी बाबांना भर घालायला लावून) आम्ही ती बाल-पुस्तके घरी घेऊन येत असू. काही दिवसांनी परत त्याची रद्दी करायला!
 
रद्दी आता ही जमते, पण भारतातल्या सारखी नाही. आता ती नेऊन द्यायला रद्दीवाला नाही. रद्दी केरात टाकावी लागते. पण कधी अशीच जुनी पाने चाळताना, जुन्या बातम्या नव्याने समोर येतात. जुने संदर्भ लागतात. आणि लिखाणाला नवे विषय मिळतात. आता केरात टाकायच्या आधी रद्दी अशीच घेऊन बसणार आहे. काहीतरी मिळेलच. काही नाही तर लहानपणीच्या आठवणींना उजाळा तरी नक्की मिळेल.

‘आठवी अ’ ची खिडकी

‘आठवी अ’ ची खिडकी -संपदा म्हाळगी-आडकर ४/२१/१०
 
हा लेख कुणाला थिल्लर वाटू शकतो. तसं वाटण्यास माझी काही हरकत नाही. हि गोष्ट जेंव्हा मी काही जणांना सांगितली तेंव्हा त्यांची प्रतिक्रियादेखील “शाळेत शिकायला जात होतात न मग… ?” अशी होती. वाचणाऱ्यांनी एकूणच फार लोड घेऊ नये, असा सल्ला!
 
आमची शाळा पुण्यात नावाजलेली! पुण्यात मध्यवर्ती आणि गजबजलेल्या पेठेत असल्याने काहीशी जागेच्या तुटवड्याने ग्रासलेली. शाळेच्या आजूबाजूला सगळ्या रहिवासी इमारती. शाळा सर्व बाजूने बंदिस्त असल्याने, शाळेत असताना आजूबाजूचं रहिवासी अस्तित्व कधी जाणवलं नाही.
नाही म्हणायला आमचा ‘आठवी अ’ चा वर्ग मात्र एका रहिवासी इमारतीच्या अगदी जवळ होता. म्हणजे शाळेच्या इमारतीत आणि त्या रहिवासी इमारतीत साधारण पाच फुट रुंदीचा बोळ होता. आमच्या वर्गाची मागची बाजू त्या इमारतीच्या मागच्या बाजूला होती. वर्गाच्या मागील बाजूच्या खिडक्या इमारतीच्या बाजूला उघडत. इमारतीची ती मागील बाजू असल्याने तिकडे घराच्या मोऱ्या (बाथरूम्स) येत. सुदैवाने किंवा दुर्दैवाने उंची जास्त असल्याने, आम्ही कायम “Back बेन्चेर्स”. त्यामुळे आमच्या बरोबर मागच्या खिडकीत इमारत. तर ह्या खिडकीमुळे आणि त्यातून ऐकू येणाऱ्या संवादांमुळे आमची चांगली करमणूक व्हायची.
 
मला आठवतंय, त्या खिडकीतून आम्हाला खूप वेळा बाथरूम सिंगिंग’ ऐकायला मिळालं आहे आणि तेही अगदी चुकीच्या वेळेला. म्हणजे कधी प्रार्थना चालू असताना, तर कधी तास चालू असताना.
आता कल्पना करा प्रार्थना चालू असताना कोणाचं ‘इतकं’ सुरेल बाथरूम सिंगिंग ऐकायला मिळालं तर काय होईल. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेची कसोटीच ती! त्यातून ते सूर ऐकून हसू फुटलंच तर “का हसलो?” ह्याचं शिक्षिकांना कारण तरी काय सांगणार? अश्या वेळी गैरवर्तन म्हणून ‘वर्तन-पत्रिके’वर सही ठरलेली. प्रसंगी ‘राहुल, पाणी चला जायेगा’ सारखे माय-लेकांचे डायलॉग, ऐकायला येत. मग वर्गातील मागच्या ओळींत एकच खसखस पिकत असे.
 
सगळ्यात मजा यायची ती शनिवारी. त्यादिवशी सकाळची शाळा असल्याने, घरातील बहुतेक सगळ्यांच्या अंघोळीन्ना आम्ही कान देत असू/ नव्हे त्या आपोआप कानावर पडत. त्यादिवशी तर बाथरूम सिंगिंगची मैफल असे. विचार करा, शनिवारी सकाळी आम्ही ‘भीमरूपी महारुद्रा…’ म्हणतोय आणि पाठीमागून ‘काटा लगा…’ ऐकू येतंय.

कबड्डी

कबड्डी -संपदा म्हाळगी-आडकर ०१/१९/२०१०
 
माझ्या माणूस म्हणून झालेल्या जडण घडणीत कबड्डी ह्या खेळाचा फार मोठा वाटा आहे. तसा कबड्डी हा मराठी मातीतला खेळ पण लोकमान्यता असूनही राजमान्यतेसाठी तडफडणारा. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला असला तरी घरच्यांनी दुर्लक्षिलेला. रांगडा असल्याने लोकांनी मुलींसाठी तसा निषिद्ध मानलेला.
 
कबड्डीकडे मी ओढली गेले तशी अनिच्छेनेच. माझी मोठी बहिण सहावीत असताना, मैत्रिणींच्या नादाने कबड्डी खेळायला जाऊ लागली. माझी धष्टपुष्ट शरीरयष्टी थोडी उतरवण्यासाठी माझ्या बाबांनी मलाही कबड्डीला घातलं. घरात खेळासाठी खूप पोषक वातावरण होतं. मी चौथीत होते. सगळ्यात लिंबू-टिंबू त्यामुळे माझे तिकडे फार लाड व्हायचे. हि एक जमेची बाजू असली तरी सकाळी लवकर उठून ६:३० च्या सरावाला जायचं जीवावर यायचं. पुढे पुढे त्याचं वेड लागलं. चौथीपासून बारावीपर्यंत, शालेय, महाविद्यालयीन, राज्यस्तरीय, राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या थरात मी कबड्डी खेळले. 
 
शालेय कबड्डीची मजा काही वेगळीच. शाळेत खेळामधल्या मुलींना एक वेगळाच मान असायचा. स्पोर्ट्स डेच्या दिवशी खेळाच्या विद्यार्थिनींचा गौरव व्हायचा. त्याची वेगळीच झिंग असते. शाळेत भैय्याजी रोलर फिरवून अधून मधून सगळं पटांगण एक समान करत. पण रोज कबड्डीच्या ग्राउंडवर झारीने पाणी मारायला, दोरीने चुन्याची फक्की मारायला मजा यायची.
 
शालेय कबड्डीमध्ये वयाप्रमाणे, वजनाचेही गट असत. प्रसंगी शाळेच्या टीममधून  खेळण्यासाठी वजन उतरवावे लागे. शाळेच्या टीममध्ये खेळून, स्पर्धा जिंकून परत शाळेत आल्यावर, ध्वनिक्षेपकावरून विजय जाहीर केला जायचा. तो जाहीर झाल्यावर शाळेच्या मध्यभागी असलेल्या पटांगणावर कबड्डीच्या मुली मोठ्याने शाळेची आरोळी देत. आरोळी देताना सगळी शाळा कठड्यापाशी येऊन उभी रहायची.  फार अभिमान वाटायचा. सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखा वाटायचं. शाळेसाठी खेळत असताना, शाळेसाठी समर्पणाची भावना जास्त असायची. शाळेला सर्व खेळांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्यावर आपला हि त्यात खारीचा वाटा असल्याचं समाधान असायचं.
 
शालेय सरावादरम्यान खेळाडूंना व्यावसाईक कबड्डीसाठीही ग्रूम केलं जायचं. हे महत्वाचं काम राणाप्रताप संघाच्या सदस्य ताया आणि सर करत. त्यामुळे शाळा चालू असतानाच आणि त्या नंतर मी ‘राणाप्रताप संघ’ संस्थेकडून व्यावसाईक कबड्डी खेळले. ‘राणाप्रताप संघ’ ही कबड्डीतली एक pioneer संस्था आहे. श्रीमती शकुंतला खटावकर, श्री फिदा कुरेशी ह्यांचे मौल्यवान मार्गदर्शन त्या काळात मला मिळाले. फिदाभाई सरांकडून खेळ कौशल्याबरोबरच संघभावनेचे ही धडे मिळाले.
 
कबड्डीच्या निमित्ताने आम्ही खूप फिरलो, खूप टूर्स केल्या. बाबांनीही मुली म्हणून “इतक्या लांब कसं पाठवू?” असं कधी म्हटलं नाही.
टूरला जायला मला फार आवडायचं. पण शाळा कॉलेज बुडायचं. तो अभ्यास नंतर भरून काढावा लागे. त्यात मैत्रिणींची खूप मदत व्हायची. टूरला जायचं म्हणजे घरी लगीनघाई असायची. माझी ताई आमच्या दोघींच्या bags भरायची. तो एक सोहळा असायचा. टूरला १२ जणींचा संघ १ व्यवस्थापक आणि १ कोच जात. १२ जणी एकत्र फार धमाल यायची. टूर साधारण २-५ दिवस चालायची. त्या दिवसात सर्व गोष्टी आपापल्या कराव्या लागत. टूरद्वारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंडणे झाले.
संघ हे एक कुटुंबच बनून गेलं. खूप मैत्रिणी मिळाल्या.
 
कबड्डी हा सांघिक खेळ. चढाओढ, इर्षा हे सांघिक खेळाचे एक भाग आहेत. पण राजकारण आणि दुखापतीही तितक्याच प्रमाणात असतात. त्यामुळे दुर्दैवाने खूप चांगल्या खेळाडूंनी कबड्डी सोडल्याचे पहिले आहे.  
 
झी मराठीवर “लक्ष्मणरेषा” ही मालिका बघताना, जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला म्हणून लिहायला घेतलं. मागे वळून पाहताना “अभ्यासाबरोबरच आपण कबड्डी ही खेळू शकलो” ह्याचं बरं वाटतं. कबड्डीमुळे मला मिळालेल्या Patience (धीर), Performance (सादरीकरण), excellence (गुणवत्ता) आणि perseverance (झपाटलेपणा) ह्या गोष्टी आयुष्यभर माझ्या बरोबर राहतील.
 
 

मला भेटलेली स्वर-आशा

watchindia.tv मुळे US मध्ये बसून मराठी टी.व्ही. पाहणं सोपं झालं आहे. २ आठवड्यापूर्वी सारेगमप चा एक अप्रतिम भाग पाहताना, काही आठवणी जाग्या झाल्या. ह्या भागात विशेष अतिथी म्हणून श्री. आशा खाडिलकर आल्या होत्या. भाग खूपच छान झाला. बहारदार लावण्या आणि राहुलचे “दाटून कंठ येतो” वेड लावून गेलं. आशाताईच्या दिलखुलास गाण्याने आणि खुमासदार प्रतिक्रियांमुळे खरी रंगत आली. त्यांचा संगीताचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.  त्यांनी सादर केलेली लावणी, खास करून “चट दे चटक लागी रे”  सुंदरच!

साधारण ८ ते १० महिन्यांपूर्वी PNG च्या US च्या दुकानात त्यांची भेट झाली होती. त्या तिथे सहकुटुंब आल्या होत्या. अतिशय साध्या वेषात होत्या. celebrity असल्याचा कोणताही भपका नव्हता त्यामुळेच त्या फार approachable वाटल्या. त्यांच्याशी २०-२५ मिनिटं बोललो. खूपच साध्या आणि सत्शील वाटल्या. नातीला खूप दिवसाने भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता. ऋषीकेश रानडेच्या गायकीपासून सांगली मधल्या सराफान्बद्दल चर्चा झाली. फारच मनमोकळ्या बोलत होत्या. वास्तविक पाहता आमच्या सारखे त्यांना कित्येक लोक भेटत असतील. पण एखाद्या मित्र-मैत्रिणीची आई भेटल्यावर कश्या गप्पा होतील तश्या छान गप्पा झाल्या. PNG च्या दुकानात काहीही खर्च न करता, काही सोनेरी क्षण पदरात पडले.

संथ वाहते कृष्णामाई- कऱ्हाडची सुट्टी

 
संथ वाहते कृष्णामाई- कऱ्हाडची सुट्टी -संपदा म्हाळगी-आडकर
 
छायाचित्र सौजन्य: गूगल अर्थ
 
मी पुण्याची, माझा मामा पुण्यातच राहतो. लहानपणी त्याच्याकडे शनिवार-रविवार राहायला जायचा मोह व्हायचाच. तसे आम्ही जायचोही पण खरं आकर्षण असायचं ते मे महिन्याच्या सुट्टीच. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही कऱ्हाड-कोल्हापूरला जात असू. तसं माझं आणि कऱ्हाडचं नातं खूप लांबचं पण तिथल्या लोकांमुळे ते फारच जवळचं, जिव्हाळ्याचं होऊन गेलंय. त्यामुळे कित्येक वर्ष मी हक्कानी मे महिन्यात कऱ्हाडला जात आले आहे. माझ्या आईचा आजोळ तिकडे आहे. माझ्या आईचे मामा, मामी, मामे भाऊ तिकडे राहतात. तेंव्हा कऱ्हाडला जाताना, “मामाच्या गावाला जाऊ या” हे आपल्याला उद्देशून लिहिलंय असं वाटायचं.
 

कऱ्हाड कृष्णा नदीच्या काठावर वसलं आहे. कऱ्हाडचं आमचं घर कृष्णाबाईच्या घाटावर आहे. हा अख्खा घाट काळ्या दगडांनी बांधून काढला आहे. तो कधी बांधला हे जरी मला ठाऊक नसलं तरी काळाची बरीच स्थित्यंतर त्याने पहिली असावीत. घाटावर पुढे छोटी-मोठी देवळे आहेत. घाटाच्या शेवटी कृष्णाबाईचे मंदिर आहे. हि कृष्णाबाई म्हणजे कृष्णा नदी. 

कऱ्हाडच्या घरी माणसांचा गोतावळा मोठा आहे, त्यात आमची भर. मला लहानपणी लाडाने नान्या म्हणत. “पुण्याहून नानासाहेब पेशवे आले आहेत” असं म्हणतच मामा स्वागत करत असे. लाड करायला पुष्कळ मामा असल्याने भाच्चे कंपनी खूष असायची. रोज नवीन भरगच्च कार्यक्रम आखलेला असे. पण तो तंतोतंत पाळला पाहिजे अशी सक्ती नसे.

 

आमचं घर प्रशस्त. मोठ्या चौसोपी वाड्यात दंगा करायला काय मजा येते!! अपार्टमेंट संस्कृतीत वाढणाऱ्या मुलांना हा आनंद कुठून मिळणार. घरातच राधा-कृष्णाचं देऊळ आहे. रोज सकाळ संध्याकाळी पूजा-आरती आणि नैवेद्य ह्या गोष्टींचं माझ्या बालमनाला अप्रूप वाटायचं. रोज देवाला कोणता ड्रेस घालणार ह्याविषयी लहान मुलांमध्ये मतदान व्हायचं. देऊळ असल्याने प्रसंगी देवळात लग्ने झाल्याचं पण मी पाहिलं आहे. घरात प्रवेश केल्या केल्या समोर देवळाचा प्रशस्त मंडप, उजव्या बाजूस होमकुंड, बोहलं आणि डाव्या बाजूस मोकळं अंगण आहे.

घाटावर घराला लागून एक शेत आहे. कल्लाप्पा आणि त्याचे कुटुंबीय मिळून हे शेत कसतात. ह्या शेतात मध्यभागी एक सुंदरसं शंकराचं हेमाडपंथी मंदिर आहे. ह्या मंदिराचा परिसर शांत, रम्य आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एक गंभीर उर्जा आहे. प्रसंगी ती भीतीदायक वाटते. त्या निरव ठिकाणी शंकराची पिंड एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे भासते. तसं दुर्लक्षित असलेलं हे मंदिर कल्लाप्पा सांभाळतो. बऱ्याच वेळा दुपारी ह्या शेतात आणि मंदिरात आम्ही खेळायला जात असू.
 

रोज सकाळी सडा-रांगोळी न चुकता होत असल्याने त्याच वासाने दिवसाची सुरुवात व्हायची. दिवसाच्या पहिल्या प्रहरी अरोमा थेरपी! उन्हाळ्यातही सारं किती आल्हाददायक वाटायचं. घरासमोर मोठं चिंचेचं झाड असल्याने पक्षांचे मधुर आवाज ऐकू येत. तेवढ्यात घरच्या देवळातून घंटीचे नाद कानावर पडत. की आमची स्वारी तिकडे. मग आजी आंघोळिस पिटाळायची. आंघोळ करूनच देवघरात जायचा शिरस्ता. मग धार काढायला जाण्यासाठी मामा हाक मारायचा. गाईच्या दुधाची धार मामा डायरेक्ट ग्लास मध्ये धरायचा. त्या गरम धारेमुळे ग्लासच्या तळाशी असलेली साखर विरघळत असे. धारोष्ण दुधाची चव काही औरचं!

 

आंघोळी आटपून, देव दर्शन आणि प्रसाद घेऊन, न्याहारी घेऊन आम्ही घाटावर जायचो. घाटावरच्या प्रत्येक देवाला नमस्कार करून, स्वामीच्या बागेत, समाधीवर फुले वाहून संगमावर जात असु. कऱ्हाडला कोयना आणि कृष्णा नद्यांचा संगम होतो. मामा आणि त्याचे मित्र आम्हा पोरांना संगमावर पोहायला घेऊन जात. तास न तास पाण्यात डुंबायला फार मजा यायची.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे कऱ्हाडचे. त्यांची समाधी संगमाच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. तिच्या कडेने एक सुंदर बाग विकसित केली आहे. तिला स्वामीची बाग म्हणतात.

Preeti-sangam-garden 

स्वामीची बाग

YeshwantraoChavan Smurti 

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण समाधी

परत आल्यावर, सगळ्या वाड्यात सुग्रास जेवणाचा सुवास दरवळत असे. मामीआजी आणि माम्या सुगरण त्यामुळे जेवायला आज काय याचं नवल असायचं. पाय आपोआप स्वयंपाकघराकडे वळत. जेवायला बसण्यासाठी मंडपामध्ये पाट मांडले जात. ताट-वाटी भांडी मांडण्याची कामं आम्हा लहान मुलांना दिली जात. जसजशी समज वाढायला लागली तसं डावी बाजू वाढण्याचं कामही दिलं जायचं. सगळं क्रमाने वाढलं असेल तर शाबासकी मिळायची. मे महिन्याचे दिवस असल्याने, ताटात उन्हाळी पदार्थांची रेलचेल असे. आंब्याचा रस, साखरांबा, गुळांबा, कैरीची वेगवेगळी लोणची, चटण्या, पन्हे, काकडीचा कायरस…. आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळे पदार्थ आम्हाला चाखायला मिळत. जेवून तृप्त झालेले आत्मे आपसूक वामकुक्षीकडे वळत.
 

जेवण झाल्यावर पत्ते, कॅरम यांना उधाण यायचं… ladis, झब्बू, गड्ड्या झब्बू, मेंढीकोट… पासून भिकार-सावकारपर्यंत सगळंकाही. कधी मामाच्या प्रिंटींगप्रेसमध्ये, मामीआजीच्या शिवणवर्गामध्ये आम्ही जा-ये करायचो, शिवणयंत्रांशी खेळायचो. कधी कधी सांडगे, कुरडया घालताना लुडबुड करायचो. आमच्या एका दूरच्या नातेवाईकाचं कऱ्हाडला जवळच talkies आहे. तिकडे जाऊन नवीन पिक्चर पाहून यायचो. माझ्या एका मामाला पुस्तक जमवायचा छंद आहे. घरच्या घरी त्याने एक छोटेखानी पुस्तकालय सुरु केले होते. त्याच्या पुस्तकालयात आम्ही खूप रमायचो, खूप वाचायचो. वाचून कंटाळा आला तर घर-घर खेळायचो, कल्लाप्पाच्या शेतावर जायचो. कल्लाप्पाच्या शेतावरून फुलं, पानं, छोटे असोले नारळ असा संसार घेऊन परत यायचो. रोजची दुपार खूपच exciting असायची.
 

दुपारची चहाची वेळ हि माझी फार आवडीची. घरात खूप माणसं असल्याने दोनदा चहा करावा लागे. कऱ्हाडच्या बैठ्या स्वयंपाकघरात मामाच्या बाजूला बसून चहा करायला मजा यायची. चहा मोठ्या प्रमाणात करायचा असल्याने प्रमाण चुकलेलं चालायचं नाही. त्यामुळे साखर आणि चहा आधी बाजूला मोजून ठेवत असू. ते मोजायला मला फार आवडायचं. चहा झाला कि घरातल्या एकेकाला शोधून चहा प्यायला बोलवायचं.

संध्याकाळी तयार होऊन आम्ही स्वामीच्या बागेत जायचो. कृष्णेच्या वाळवंटात चपला हातात घेऊन चालताना, निसर्गाशी कनेक्ट झाल्याचा फील यायचा. कृष्णेच्या पाण्यात पाय बुडवताना, हिची सर मुळा-मुठेला नाही अशी हळहळ वाटायची. मग स्वामीच्या बागेत हुंदडून झाल्यावर पाणीपूरी- दहीपूरी मेवाडचं आइस-क्रीम अशी पेटपूजा केल्यावरच घरी परत येत असू.

जेवणं झाल्यावर सगळे मंडपात जमत. मग भेंड्यांना ऊत यायचा. घरात लग्न-मुंज काही असेल तर घरी असलेल्या पाहुण्या-रावळ्यांना घेऊन खो-खो, संगीत खुर्ची सारखे खेळ व्हायचे. घरातल्या स्त्रिया एकत्र येऊन उखाणे घ्यायच्या. छान छान आणि सर्जनशील उखाणे घेण्याची चढाओढ असायची.
रात्री सगळे मंडपात झोपत असू. प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असायच्या. कोणत्या कोपऱ्यात झोपल्यावर कमी डास चावतात किंवा घोरणं ऐकू येत नाही हे बरोबर मावश्या सांगायच्या.
सुट्टी संपत आली कि माझ्या छोट्या जिवाची घालमेल होत असे. शाळा सुरु होऊन नवीन वह्या पुस्तकं मिळण्याचं आकर्षण तर असायचं, पण पुण्याला परत जाण्यासाठी पाय निघत नसे. सगळ्यांना नमस्कार करून निघताना, मागे काहीतरी राहिल्याचा भास होत असे.
 
लग्न झालं तसं भौगोलिक अंतर वाढलं. २-४ वर्षात कऱ्हाडला जाण झालं नाही. पण आता खूप बदललंय म्हणतात. घाट बदलला आहे, आमचं घर बदललं आहे. कृष्णेच पात्र बदललं आहे. दर वेळेला ती अजूनच संथ आणि कृश झाल्यासारखी वाटते. माणसं मात्र तशीच आहेत, पु. लंच्या भाषेत पिकून अजून गोड झालेली.
आजही सगळ्या आठवणी मनात रुंजी घालतात. दारामधल्या सड्याचा, मामीआजीच्या जेवणाचा, प्रेस मधल्या खळीचा, कल्लापाच्या शेताचा, गोठ्यातला शेणाचा, मामाआजोबांनी आणलेल्या गावठी आंब्यांचा, देवळातल्या धूप-उदबत्तीचा वास माझ्या स्मरणचित्रांमध्ये नवे रंग भरतो.
कृष्णेच्या वाळवंटात, वाळूचे किल्ले बनवताना, वितभर खणलं तरी ओलावा सापडायचा… मनातल्या वाळवंटाला मात्र अजूनही कृष्णेच्या ओलाव्याची ओढ आहे!
Follow

Get every new post delivered to your Inbox.