बिट्टी

बिट्टी -संपदा म्हाळगी-आडकर १०/११/१०
माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे.
लहानपणी काही विचार आणि मनोभावना ह्यांची सांगड, आपण आपल्याला पटेल त्या पद्धतीने घालतो. आणि तेच खरे/बरोबर मानून पुढे जात असतो, आपले भाव-विश्व त्याभोवती गुंफत असतो. “Back-of-the-mind” कुठेतरी माहितही असतं कि ‘हे सगळं खोटं आहे’. पण पटत नाही. ते सगळं हार्मलेस असतं, निरागस असतं. त्यातलीच हि एक बिट्टी!
बिट्टी, मधलं बोट (middle finger) चाफेकळी (index finger) वर आणून धरलेली बिट्टी! लहानपणी कितीवेळा धरली असेल बिट्टी.. सांगता येणं कठीण आहे. कोणकोणत्या कारणांनी धरली ह्याची यादी पण फार मोठी आहे…. कधी मित्र-मैत्रिणीने काहीतरी वाईट गोष्टीला (चुकून/उमजून) स्पर्श केला म्हणून,… कधी मैनेची जोडी दिसली म्हणून तर कधी मेलचा डब्बा दिसला म्हणून..
शाळेतून घरी जाताना, चुकून मैत्रिणीचा पाय घाणीत पडला तर “ईई… लीना आता तुझी बिट्टी!” हे वाक्य आपोआप तोंडावर यायचं! मग घरी जाईपर्यंत आमचं बोटावर बोट तसंच. ‘जिची बिट्टी धरलीय’ त्या मैत्रिणीने अधून-मधून बोटं तपासून पहायची, बिट्टी आहे कि नाही. समजा बोटं दुखायला लागलीच, तर मैत्रिणीला दाखवून दुसऱ्या हाताची बिट्टी आधी धरायची आणि मग आधीची सोडायची. एवढा आटापिटा कश्यासाठी? Hygiene बद्दल आम्हाला खूप ज्ञान होतं अश्यातली गत नाही.
मैनेची जोडी दिसणं.. आणि बिट्टी धरणं, हि एक फार मजेशीर गोष्ट आहे…त्याविषयी एक चारोळी हि आहे जी मला माझ्या कॉलेज जीवनात (ऑफ-कोर्स मैत्रिणींकडून) समजली….
One for sad,
Two for Joy,
Three for letter
Four for Boy!
म्हणजे तुम्हाला १ मैना दिसली म्हणजे काहीतरी वाईट होणार.. (तसा काही वाईट झाल्याचं स्मरणात नाही..), मैनेची जोडी दिसली तर आनंद होईल. ३ मैना एकत्र दिसल्या तर तुम्हाला (hopefully गुलाबी) पत्र येईल. हो! कारण पूर्वीच्या काळी रिझल्ट पोस्टाने यायचा. म्हणजे “निकाल” काय लागला ह्याचं प्रेमपत्र यायचं. आमच्या शाळेत नापास विद्यार्थिनींना पत्र यायची म्हणे. आणि शेवटी ४ मैना दिसल्या कि मुलगा (तो पण hopefully सपनोंका राजकुमार) भेटेल. असा ह्या कवितेचा अर्थ आहे. तर अशा ह्या मैना दिसल्या कि हाताची बिट्टी धरायची. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे एका ओळीची एक बिट्टी. म्हणजे मैनांचा थवा दिसला तर बिट्ट्याच बिट्ट्या!
तशीच गोष्ट मेलच्या डब्ब्याची, मेलचा डब्बा म्हणजे मेल/पोस्ट/पत्र नेणारी गाडी! भारतात ह्या गाड्या गडद लाल रंगाच्या असल्याने कुठूनही चटकन नजरेत भरतात. अशी हि गाडी दिसली कि नजरेबरोबर आमची बोटही वळायची! हा मेलचा डब्बा ‘गुडलक चार्म’ मनाला जायचा. एका डब्यासाठी एक बिट्टी! पोस्त ऑफीसाजवळून जाताना पंचाईत व्हायची. विश्रामबाग वाड्यापाशी, सिटीपोस्टापाशी किंवा कॅम्पात पोस्टऑफिसजवळ खूप मेलगाड्या दिसायच्या.. आता स्कुटी चालवताना बिट्ट्या कश्या धरायच्या? आहे कि नाही यक्ष प्रश्न!
मला आठवतंय, आम्ही एकदा कॅम्पातून पास होताना, जवळ जवळ २०-२५ मेलचे डब्बे पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले. मागे बसलेल्या मैत्रिणीला विचारलं, “अग पाहिलेस का केवढे मेलचे डब्बे आहेत?” तर ती म्हणाली, “हाताची बोटं संपली आता पायाच्या बोटांच्या बिट्ट्या धरल्या आहेत!”. :) तेंव्हाही आम्ही पोट धरून हसलो होतो.
आता बिट्ट्या तर धरल्या पण त्या सोडायच्या कश्या? तर त्या सोडायच्या ४ पायांचा प्राणी पाहून…. म्हणजे शाळेतून घरी जाताना काही कारणांनी बिट्टी धरली कि घरी जाईपर्यंत कुत्रा, मांजरासारखे प्राणी शोधात फिरायचा… कधी कधी तर “अग त्या रस्तावर कुत्रं नक्की असतं…” असं म्हणून वाट वाकडी करून, बिट्ट्या सोडायला जायचं. आणि अगदी नाहीच सुटली बिट्टी घरी जाईपर्यंत आणि बोटं दुखायला लागली कि कोणत्यातरी माणसाकडे पाहून बिट्टी सोडायची (म्हणजे त्या माणसाला चार पायाचा प्राणी मानून…)
बिट्टीचे असे निरागस खेळ चालायचे… तशीच गोष्ट जॉलीची! पण ती परत कुठल्याश्या पोस्टमध्ये!

5 प्रतिक्रिया

Filed under आठवणींचे कप्पे

5 Responses to बिट्टी

  1. >> माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे.

    आज्याबात नाय.. कारण लहानपणी आम्हीही हे सगळं केलेलं आहे. ;)

    • अरे वा! मला माहित नव्हतं, असे खुल्याचे उद्योग मुलंही करतात ते! मला वाटायचं “त्यांना हाणामाऱ्या, ढकला-ढकली आणि रेस लावणं ह्याशिवाय खेळ नसतात कि काय?”
      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद नेहमीप्रमाणेच!

  2. आम्हीपण हे सगळं केलयं !! हे मुलं -मुली आणि आसेतुहिमाचल केलं जातं !! आमच्याभागात याला “टिवली” किंवा “टिल्ली” म्हणतात . आज एक नवा शब्द कळला !!! मस्त लिहलयं !!!

    • हेरंबला म्हणल्याप्रमाणे मुलंही बिट्टी धरतात हे माहित नव्हतं.
      ब्लॉगवर तुझा स्वागत संकेत! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  3. Priya

    pan amachya kade bitti sodanyachi padhhat ashi hoti ki kuni tari swathhun swathchya hatani ti bitti todali pahije….amhi lahanpani maitrinina khup tras dyayacho…sodayachoch nahi tyanchi bitti…ani mag bot dukhun radakundila alyasarkh watal ki mag sodawayacho bittii…kadhi kadhi khup bhandan pan vhayachi amachhi….pan ata watat hrudya todalyawr honarya sadhyachya bhandananpeksha bitti n todalyani honari bhandan khup madhur hoti…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s