बबल -संपदा म्हाळगी-आडकर ७/१७/१०
काल काही निमित्ताने सिटीमध्ये जाण्याचा योग आला. ट्रेन घेऊन एकटीच सिटीमध्ये जाऊन आले. माझा जॉब सिटीमध्ये नसल्याने, ट्रेनने एकटीने जाण्याची वेळ खूप कमी येते. मुळची पुण्याची असल्याने तसा ट्रेनशी संबंध कमीच! लोकलमध्ये चढण्याची सवय नसलेल्याला जसे नेहमीचे पासेन्जर्स, पाकीटमार जसे पटकन ओळखतात तसे काहीसे लोकांनी मलाही ओळखले असावे.
ट्रेनमध्ये बसल्यावरही “हा माझा ‘alone time’ आहे” हे मनाला पटत नव्हतं. त्यामुळे त्या सुरुवातीच्या ५-१० मिनिटांत नवऱ्याला, मुलीच्या पाळणाघरात फोन करून सूचना देऊन झाल्या. ट्रेन सुरु झाली. फलाटावरून ट्रेन निघाली, तशी बाहेर बघण्यात गुंग झाले. समांतर धावणारे रूळ आमच्या रूळांशी स्पर्धा करताहेत असं वाटलं. संरक्षक भिंती पलीकडचे रस्ते, घरं, गाड्या, माणसं सगळं मागे टाकत, आम्ही कुठेतरी दूर निघालो होतो. भिंतीपलीकडली वेअरहाउसेस, धूर ओकणाऱ्या फाक्टारीज, स्क्रापहाउसेस, जंकयार्ड्स, त्यातल्या पिचलेल्या, चेपलेल्या, गंजलेल्या गाड्या सगळं भकास दिसत होतं. रुळांकडेच्या संरक्षक भिंती, इमारतींवर ठिकठिकाणी केलेली/खोडलेली ग्राफिटी दिसत होती. खूपवेळ त्या ग्राफिटीमध्ये काहीतरी सुंदर शोधण्याचा प्रयत्न केला, पण एका ग्राफिटीचा अपवाद वगळता फार काही हाती लागलं नाही. वाटलं, ही सुबत्तेच्या आणि संधींच्या देशातली अवकळा! उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने निर्जन झालेल्या शाळा, जागा डोळ्यांना अधून-मधून खुपत होत्या.
मी ट्रेनमध्ये बसले ती ट्रेन जाण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून, त्यामुळे सगळ्या गोष्टी सोडून आपण दूर खेचले जातोय असं वाटत होतं. sci-fi सिनेमामध्ये जसं माणूस एखाद्या टाइम बबल मधून बाहेर ओढला जातो, तसं वाटू लागलं. “असंच जर खरंच खेचता आलं असतं माणसाला टाइम बबलबाहेर तर?”, असा विचार क्षणभर तरळून गेला. खिडकीबाहेरचं सगळं चल/अचल भौतिक नजरेसमोरून धावत होतं. धावत होतं पण फसवं! क्षणभर वाटलं, आपल्याकडे पाहून वेडावून हसतंय, कदाचित म्हणतंय, “ही वेडी ‘आपण दूर खेचले जातोय’ असं समजतेय!”
ट्रेन थांबली, सत्य माहित होतं, कळतही होतं पण मनात आलं, “आलो का बबलच्या बाहेर?” ट्रेनचा प्रवास संपवून, अंडरग्राउंड ट्रेनस्टेशन मधून बाहेर आले. इतकावेळ अडकलेला श्वास, मोकळ्या हवेत भरभरून घेतला. आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे उंच टोलेजंग इमारती होत्या. आजूबाजूचं भौतिक नवीन होतं पण भौतिक होतं, तसंच होतं. हा परत एक बबलच होता. एका बबल मधून फक्त मी दुसऱ्या बबलमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही बबल साबणाच्या बुडबुड्याप्रमाणे, पृष्ठभागावर मोहक रंग मिरवणारे आणि अंत:रंगात रिक्त!


4 responses to “बबल”
महेंद्र
जुलै 18th, 2010 at 21:45
स्वतःबरोबर रहाण्याची संधी – अगदी योग्य उपयोग करून घेतलाय. अशी वेळ फार कमी मिळते. इतर वेळी नेहमीच कोणी ना कोणीतरी असतंच सोबतं. स्वतः – स्वतः बरोबर रहाणं मला पण खूप आवडतं.. मस्त आहे पोस्ट!
शब्दांकित
जुलै 20th, 2010 at 08:06
खूप धन्यवाद महेंद्र! सुरुवातीला मला वाटलं मला जे वाटतंय ते पोहचवता येईल का? पण तुमच्यापर्यंत ते पोहोचलं म्हणजे ते मला पोहोचवता आलं ह्याचं समाधान आहे.
स्वतः बरोबर राहणं मलाही खूप आवडतं!
हेमंत आठल्ये
जुलै 19th, 2010 at 01:08
खूपच छान!!!
शब्दांकित
जुलै 20th, 2010 at 08:06
धन्यवाद हेमंत!