|
अंतर्धान (भाग ३) -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०
|
|
|
कोपऱ्यातील खुर्चीत अभ्यासाचं पुस्तक वाचत बसलेला रोहित, उठून सुहासपाशी आला.
“मामा, तुला काही खायचंय का?”
“नाही, नको,….. तुला भूक लागलीय का?”
“हो, थोडी!”
“बर मग तू खाऊन येतोस का?”
“तू पण ये ना, मला एकट्याला खायची सवय नाही रे! म्हणजे एकट्याने खाल्लं तरी वाढायला माआजी असायची”, सुहाला आईचं नाव ऐकून कससंच झालं.
“बर चल! नर्सला सांगून जाऊयात.”
हॉस्पिटलच्या उपहारगृहात दोघं समोरासमोर बसली.
“रोहित, तू काय घेणार?”
“मी साधा डोसा”. वेटरला बोलावून सुहासने साधा डोश्याची ऑर्डर दिली.
“मामा आणि तुला काही?”
“नको”
“अरे घे! खूप वेळ काही खाल्लं नाही तर आम्लपित्त होतं असं माआजी म्हणते”, आईचं नाव ऐकून सुहासला परत अस्वस्थ वाटलं. पण त्याने वेटरला बोलावून स्वत:साठी खायला ऑर्डर केलं.
तुला माहितेय मामा, “माआजी तुझी खूप आठवण काढते. मला तर ती सुहाच म्हणायची. सुरवातीला मला कळायचं नाही. हळूहळू समजलं, आता मी ‘सुह्या’ म्हणलं तरी ओ देतो आणि ‘रोह्या’ म्हणलं तरी”, असं म्हणून रोहित प्रसन्न हसला. रोहितला सुहास फार ओळखत नव्हता. कर्तव्यापुरतं आईला भेटायला गेल्यावर, रोहितची अधूनमधून गाठ पडे. पण रोहितच्या हास्यातली ती प्रसन्नता सुहासच्या ओळखीची होती… ती आईसारखी होती.
“माझे सगळे लाड करते ती! आणि कसली जातीची सुगरण रे…. किती वेगवेगळे लाडू, चिवडे, अनारसे.. आणि तिच्या उकडीच्या मोदकांना काही तोडच नाही बघ. रोज मला धारोष्ण दुध तापवलं कि त्यावरची साय साखर घालून द्यायची. तुला पण आवडते ना रे खूप? मला सांगायची ती. म्हणायची, आमच्या सुहाला हे फार आवडतं, पण त्याला कसं देणार?”
“हं”
“माझ्यामध्ये ती तुलाच पहायची बहुतेक!” रोहितचं हे वाक्य ऐकून, इतका वेळ दूर कुठेतरी टक लावून पाहत असलेल्या सुहासने चटकन समोर पाहिलं. रोहित १७-१८ वर्षांचा पण ‘एवढं शहाणपण कुठून आलं ह्याच्यात? अंगभूत आहे? की परिस्थितीमुळे आलेलं कि आईच्या सहवासाने…’
“हो.. तुझा राहून गेलेला सहवास माआजी माझ्यामध्ये मिळवत होती बहुतेक. तू जेंव्हा मामापाशी होतास तेंव्हा वेडीपिशी झाल्यासारखी वागायची म्हणे. शेजारी म्हणायचे, ‘सुहाच्या राहून गेलेल्या सहवासात तिचा जगणंच राहून गेलंय!’”, रोहितचं बोलणं ऐकून सुहासचा बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडू लागला.
“मामा, रडू नकोस मामा, काही होणार नाही तिला! माआजी बरी होईल, लवकरच!”, रोहितही रडू लागला.
“मी कधी ओळखूच शकलो नाही रे तिला! आणि.. तू…” सुहासला पुढे काही बोलताच येईना… रोहित येऊन त्याच्या शेजारी बसला.
वेटरने पदार्थ आणून टेबलावर ठेवले. क्षणभर दोघांकडे बघून तो निघून गेला. हॉस्पिटलच्या उपहारगृहात असे प्रसंग त्याने अनेकदा पहिले होते.
सुहासने स्वत:ला सावरलं. त्याने रोहितला धीर दिला. “रोहितच्या रूपाने जवळचं कोणीतरी आहे” ह्याचा त्याला भास झाला. कधी न जाणवलेली ममतेची भावना त्याच्या मनात घर करून गेली.
–
नर्सने सुहासला बोलावून आई निवर्तल्याचं सांगितलं. सुहास येऊन, रोहित शेजारच्या खुर्चीत बसला. गेले २ दिवस आई कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. पण एक आशा होती, ती बरी होईल. आता ती आशा ही संपली होती. हळूहळू गवसायला लागलेलं, एका वादळासकट भर्रकन दूर उडून गेल्यासारखं वाटलं.
“मामा काय झालं?”
“गेली.. गेली ती.. माझी आई, तुझी माआजी गेली रोह्या!”, सुहास स्फुंदत होता.
“पण ती तर बरी होणार होती. डॉक्टर म्हणाले होते, ‘ती बरी होईल म्हणून’”
“नाही रे बाळा, ती नाही थांबली, आपल्याला एकट सोडून गेली ती!”, सुहास त्याला समजावत होता. रोहित अविश्वासाने रडू लागला. रडणाऱ्या रोहितला सुहासने आपल्या कुशीत घेतलं, क्षणभर विचार केला, ‘आपण एकटे कसे? दोघं आहोत की एकमेकांना.’ ती माउली अंतर्धान पावली होती… ममतेचं दान सुहासच्या पदरात टाकून!
(समाप्त)
Like this:
Be the first to like this post.
4 responses to “अंतर्धान (भाग ३)”
bhagyasharee
मे 31st, 2010 at 22:48
Mast lihili ahe katha!!! kharach aaichya mayela tod nahi…Ani prasangi tich aai khambir houn mulanwar sanskar karte!!
Atishay bhavuk lihile ahe tumhi!!avadle likhan!!
शब्दांकित
जून 1st, 2010 at 13:38
धन्यवाद भाग्यश्री!
Gaurav
जानेवारी 8th, 2011 at 09:38
apratim!
शब्दांकित
फेब्रुवारी 6th, 2011 at 10:14
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद गौरव!