टॅटू


Tatto -संपदा म्हाळगी-आडकर  १२/१९/०९ 
 
दुपारची १५ मिनिटांची डुलकी होते न होते तोच शेजारच्या वर्मा आंटीन्नी बेल वाजवली. दचकून प्रमिला उठून बसली. टी.व्ही. वर सांस भी कभी बहु थी चा रिपीट टेलेकास्ट बघता बघता तिला सोफ्यावरच झोप लागली होती.
“अग बाई आत्ता कोण आलं? साखर मागायला तर नाही आले कोणी? चहाची वेळ झाली इतक्यात?” असं म्हणून तिने घड्याळाकडे पाहिलं. तसे २ च वाजले होते. तसं अनिच्छेनीच तिने दार उघडलं. वर्मा आंटी प्रमिलाला पाहून एकदम खुष झाल्या. वर्मा आंटी न्ना आंटी म्हणल्याबद्दल काही प्रोब्लेम नव्हता. वयाने त्या प्रमिलापेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या असाव्यात. आज त्यांना गॉसिप साठी कोणीतरी वेगळं मिळाल होतं. त्यांच्या नेहमीच्या जोशी काकू आज बाहेर गेल्या होत्या त्यामुळे गॉसिप डाउनलोड साठी त्या नवीन गिर्हाईक शोधत होत्या.
 
वर्मा आंटी आल्या कि प्रमिलाची छान करमणूक होत असे. तशी सोसायटीत ४० कुटुंब. पण आंटीन्ना सगळे नावासकट माहित. त्यांना सगळ्या सोसायटीची खबर ठेवायची सवय होती. आणि त्यातूनही त्या खबरा तिखट मीठ लावून कोणाला सांगेपर्यंत त्यांना दम निघत नसे. आज सकाळी कसं कुणाचं कोणाशी वाजलं किंवा फर्नांडीसच्या मुलाचा रिझल्ट (त्यांच्या भाषेत निकाल) काय लागला यापासून शेट्टींचा रोहित, चोरडीयांच्या  शिल्पाकडे पाहून कसा शिट्ट्या मारतो इथपर्यंत त्यांना सर्व माहित असायचं. वर्मा आंटी बरोबर चहा आणि गप्पांमध्ये दीड-दोन तास कसे गेले हे प्रमिलाला कळलंच नाही. आज मुलांसाठी खायला काही तयार नव्हतं त्यामुळे त्या गेल्यावर प्रमिला तयारीला लागली.
 
गेल्या १८ वर्षांच्या संसारात प्रमिलेच्या राहणीमानात जसा फरक पडला, त्याच्या एक्स्पोनेन्शीअली तिच्या वेळापत्रकात पडला. नवऱ्याने नोकरी सोडून बिझिनेस चालू करण्याचा ठरवला तेंव्हा प्रमिला चांगलीच धास्तावली होती. पण हाताला यश आलं. चाळीच्या २ खोलीत निगुतीने संसार करणारी प्रमिला मजल-दरमजल करीत भंडारी कॉम्प्लेक्स च्या २ बेडरूम-हॉल-किचन च्या प्रशस्त flat मध्ये आली होती. नवरा, १७ वर्षांची शिवानी आणि १३ वर्षांचा निलेश बरोबर प्रमिला संसारात रमली होती.
 
घरात स्वयंपाक सोडला तर सगळ्या वरकामाला बायका होत्या. त्यांची वाट पाहणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, उरलेल्या वेळात सांस-बहुच्या टुकार सिरिअल्स बघणे ह्यात तिचा दिवस जात असे. 
चाळीत असताना रोज सकाळी लवकर उठून पाणी भरणारी प्रमिला आता Aquaguard चे filtered पाणी पीत होती. घराच्या अपग्रेडप्रमाणे प्रमिलेच्या नामोपाधींमध्ये अपग्रेड झाली होती. आईचा मम्मी अथवा मॉम, प्रमिलाचा पम्मी झालं होता. आईचं मम्मी झाला तेंव्हा प्रमिला थोडी चरकली होती कदाचित हळहळली पण.
 
५ वाजले शिवानी कॉलेज मधून परत आली. आज तिचं practical होतं. कॉलेज मधून आली तशी कसल्याश्या विचारात होती. प्रमिला कामात गुंतली होती. आज वर्मा आंटी आल्याने तिला मुलांसाठी खायला करायला उशीर झाला होता. टी.व्ही. बघत बघत शिवानी खायला मिळण्याची वाट पाहत बसली. 
निलेश आला, त्याने आल्या आल्या भूक लागल्याचं जाहीर केलं. प्रमिला वेळेच्या मागे धावत होती. निलेशच्या अगोदर ४ वेळा बेल वाजली होती आणि नेहमीपणे शिवानीनी त्याला ignore मारला होता. दरवाजा आणि gas ह्यांचं गणित जुळत नव्हता.
 
“मम्मी, आज खायला काय केलंय?”
“पोहे”
“परत पोहे?”
 
शांतता…
आज संवाद ह्यापुढे सरकला नाही. नाहीतर इतरवेळी,
“सारखे काय ग पोहे? इतक्यात तर केले होतेस”
“इतक्यात कधी रे? 2 आठवड्यांपूर्वी? रोज रोज काय नवीन करू?”
“पिझ्झा कर बर्गर कर, आशूची मम्मी बघ तिला काय काय देते डब्यात”
“किती पौष्टिक आहेत न त्या गोष्टी?” ….. वगैरे वगैरे
 
प्रमिलेला आश्चर्य वाटला. पोह्यांचे बाउल्स भरून तिने मुलांच्या हातात दिले. शिवानी बरोबर सोफ्यावर बसून टी.व्ही. पहात बसली. निलेश पोहे मिळाल्या मिळाल्या त्याच्या खोलीत गायब झाला होता. प्ले स्टेशन मिळाल्या पासून कार्टून, डब्लू डब्लू एफ ह्याचा नाद जरा कमी झाला होता. पोहे संपल्यावर, शिवानीने शहाण्यासारखी डीश सिंकमध्ये नेऊन ठेवली पण प्रमिलेला ते लक्षात आलं नाही. येता येता म्हणाली..
“आई मला Tatto करायचाय..” मम्मी कडून काही हवं असल्यास मम्मी ला आई म्हणायचं हे कळण्याइतकी पोरं आता मोठी झाली होती.
  
प्रमिलेला आश्चर्य वाटलं. आज जवळ जवळ ८ एक वर्षांनी tatto हा शब्द घरात निघाला होता.
चाळीत राहत असताना, प्रमिला रोज निलेशला शाळेत सोडायला-आणायला जायची. येताना लेझ हवं असा त्याचा बालहट्ट असे. लेझ च्या वेफर्स पेक्षाही आत असलेल्या Tatto चं आकर्षण त्याला जास्त होता. तो Tatto हातावर ठेऊन दुसरया  बाजूने पाणी लावला कि तो रंगीबेरंगी Tatto अलगद हातावर उमटत असे. तो Tatto गेला कि परत आईच्या मागे लागून नवीन लेझ ची खरेदी असा निलेशला छंद जडला होता.
 
प्रमिलेला आता उमगलं कि शिवानी आल्यापासून कोणत्या विचारात होती. ती शिवानीला म्हणाली…
“तुझा pocket-money संपला का एवढ्यात? माझ्या पर्स मधून घे.. हल्ली लेझ कितीला मिळतं?”
“लेझ????”.. शिवानी
“अग शिवू, लेझ मध्ये नाही का मिळत Tatto.. निलेशला विचार त्याला माहित आहे” बाउल ठेवायला निलेशही तेंव्हाच किचनमध्ये शिरत होता.
“अग आई मला तसला Tatto नकोय काही. मला अंगावर permanant Tatto करून घ्यायचा आहे”
Permanant हा शब्द ऐकल्यावर प्रमिलेला धक्का बसला. पण त्याच्यावर फार विचार करायला शिवानीनी तिला वेळ दिला नाही.
“अग तुम्ही मराठीत त्याला गोंदण असं म्हणतात.”
“ए मॉम, दीदी Tatto करणार असेल तर मी पण बॉडी पिअरसिंग करणार हा”.
एकावेळी २ धक्के. त्यातून सावरताना प्रमिलेची गडबड होत होती. मुलीने अंगावर काही गोंदवण हे तिला फारसं पटलं नव्हत. आणि आता निलेशला काय टोचून हवं आहे हे तिला कळेना.
“ते Tatto का फित्तू काही नको आपल्याला. कायमचा डाग. आवडलं नाही तर काढता पण येत नाही. विकतचं दुखणं”
“मम्मी असं नाही ग, तू ते मायामी इंक, एल. ए. इंक बघ. काय सही Tatto करतात. कलरफुल.. ए मला पण करू देत न ग”
“आणि मम्मी मला पण पिअरसिंग करायचं, एक कान टोचून मला सलमान खान सारखा स्टड घालायचाय”
“निलू तू जरा थांब, तू लहान आहेस कॉलेज मध्ये गेलास कि सगळं” असं म्हणून तिने तात्पुरतं त्याला थोपवलं. एका वेळेला २ फ्रंटवर लढायला तिला जमत नसे स्पेशली मुलांबरोबर.
शिवानीची परत भुणभुण सुरु.. “आई तू बघ न ग ते एल. ए. इंक.. ती केट बघ काय सही दिसते, तिने सगळ्या अंगावर tatto केले आहेत”
“हे बघ शिवानी.. गोन्द्ताना दुखतं. करताना चुकलं तर दुरुस्त करता येत नाही. कायम तसच वावरावं लागतं. शिवाय बाबा परवानगी देणार नाहीत” प्रमिलाने मुलीचं मन पालटवण्याचा प्रयत्न केला.
“दुखतं तेवढ्यापुरता आणि चुकत वगैरे काही नाही… ती लोक प्रोफेशनल असतात. रिंकीने नाही का केला.. मला पण करायचय ग”
प्रमिलाला क्षणभर रिंकीचा राग आला. वरच्या वर्गात जाता जाता शिवानीला मैत्रिणी पण वरच्या क्लास मधल्या मिळत गेल्याचं प्रमिलेला अधून मधून जाणवत होतं.
“हे बघ तू मला रिंकीच सांगू नकोस. गोंदून वगैरे काही घ्यायचा नाहीये”
“मी करणार” असं ओरडून शिवानी धुसफुसत खोलीत गेली.
 
पुढचे ५-६ दिवस हीच धुसफूस चालू राहिली. घरात शीतयुद्ध चालू असल्यासारखं प्रमिलेला वाटत होतं. खरं पाहता ह्याची तिळमात्र कल्पना तिच्या नवऱ्याला आली नव्हती. घरात एकूणच त्याचा रोल अर्थार्जन आणि घरातले मोठे डिसिजन घेणे ह्यापुरता लिमिटेड झाला होता. बिझिनेस एक्सपांड करण्याचं काम चालू होतं. त्यात तो व्यस्त होता. म्हणावा तसा Tatto चा मुद्दा हाताबाहेरही गेला नसल्याने, इशू त्याच्यापर्यंत escalate झाला नव्हता. नाही म्हणावा तर निलेशला थोडा जाणवलं. पण आईने पिअरसिंग करायला अगदीच नाही म्हणलं नाहीये आणि आपण दिदीची साईड घेतली तर पिअरसिंग विसरावे लागेल ह्या विचाराने तो गप्प बसला.
 
प्रमिला गेले काही दिवस गोंदणे ह्याबद्दल खूप विचार करत होती. तिलापण लहानपणी गोंदवायचं होतं. तिच्या आजीच्या हातावर गोंदलेलं तिने पाहिलं होतं.  जत्रेमध्ये हरवू नये म्हणून तिच्या पणजीनी आजीच्या हातावर तिचं नाव गोंदवल होतं. पुढे आजीचं लग्न झाल्यावर, आजोबांचही नाव गोंदवल होतं. गोऱ्या आजीच्या सुरुकुतलेल्या त्वचेवरची गोंदणी तिला सुस्पष्ट आठवत होती. ते पाहिलं कि आपण पण आपलं नाव.. नाव नाहीतर एखादं फुल तरी गोंदवाव असं तिच्या मनात होतं. पण तिच्या आईने तिला कधी गोंदवून दिला नाही. त्याला कारणही तसंच होतं- प्रमिलाच्या मैत्रिणीला, विद्याला तिच्या मावशीने लहानपणी कपाळावर गोंदवून घेतलं आणि ते आयुष्यभर तिरकच राहिला. ती तिरकी गोंदणी लपविण्याकरिता विद्याला गंधाची कलाकुसर करावी लागे.
शिवानीला गोंदून द्यायचा नाही हे तिने जवळ जवळ पक्कं केलं. पण आत तिला कुठेतरी गिल्टी वाटत होतं.
शिवानीचा कोल्ड शोल्डर प्रमिलेला साहवेना. तिने शेवटी एल. ए. इंक पाहायचं ठरवलं. केटला पाहून तिचे डोळे दिपले.
गोन्दण्याची कला किती प्राचीन. भारतात कित्येक वर्षं चाललेली. पण घरकी रोटी दाल बराबर ह्यामुळे ही कला जपली गेली नाही ह्याचं वाईट वाटलं तिला. अमेरिकन लोकांनी ती पुढे नेऊन लोकप्रिय केल्याचं पाहून तिला हेवा वाटला. खरा सांगायचं तर तिला Tattoing आवडलं होतं.
 
त्या दिवशी रात्री तिने नवऱ्याशी बोलायचं ठरवलं. तो घरी आल्यापासून झोपेपर्यंत कुठेही त्याचा मूड जाणार नाही ह्याकडे ती लक्ष देत होती. बेडवर पडून झोपण्याच्या तयारीत असताना तिने त्याला सगळी हकीकत सांगितली. नवऱ्याला गोंदण हा प्रकार नवा नव्हता, पण ह्या काळात स्वतःच्या मुलीनी गोंदून घ्यायचं हे त्याला पटत नव्हतं. तसं Tattoing केलेली काही मंडळी त्याने परदेशात आणि मुंबईतही पहिली होती. पण आपली लेकच करायचं म्हणेल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याने नाही म्हणून सांगितलं.
“अहो टी.व्ही. वरची ती सीरिअल, एल. ए. इंक, ती बघाच तुम्ही. त्यातली कला पाहण्यासारखी आहे. काय काय सुंदर गोंदणी करतात ते लोक. आणि किती वेगवेगळ्या रंगात. जीवनातल्या प्रत्येक महत्वाच्या क्षणाची आठवण म्हणून शरीरावर गोंदवतात ते लोक. परत तुम्हाला हवं ते चित्र.  वाटतं आपणही करून घ्यावं एखादी गोंदणी”
आपणही करून घ्यावी असं ऐकल्यावर तो चमकला. आत्तापर्यंत फक्त मुलीलाच Tatto करायचा होता आता बायकोपण! प्रमिलेकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या मनात नाही हे तिने ओळखलं होतं. उद्या विषय काढू असा विचार करून ती झोपी गेली.
पुढचे २-३ दिवस प्रमिलाची भुणभुण ऐकून शेवटी नवऱ्याने Tatto करून घेण्याची परवानगी दिली. Tatto २ सेमि(cm) पेक्षा मोठा नसावा अशी अट घातली. हि खुशखबर प्रमिला शिवानीकडे घेऊन गेली.
 
“शिवानी कर ग तुला हवा तो Tatoo पण 2 cm चा बाबांनी permission दिली.”
“Tatto कशाला?” गेले काही दिवस नवऱ्याच मन वळवण्यामध्ये प्रमिला एवढी गुंतली कि शिवानीच वागणं पूर्ववत झालं आहे हे तिच्या लक्षात आला नाही.
“कशाला म्हणजे काय? तुला करायचा होता ना?”
“करायचा होता पण आता नाही. तुझा म्हणणं पटलं मला, आवडला नाहीतर जन्मभर कोण वागवणार. त्यापेक्षा आपला Henna tatto बरा”
“आता हे काय नवीन?”
“अग हेना… मेहेंदी!!! हवी तेंव्हा काढा. काही दुष्परिणाम नाहीत आणि आवडली नाही तर ४-५ दिवसात निघूनही जाईल.” शिवानीच बोलणं ऐकून प्रमिला थोडी खट्टू झाली.
“मी उगाच तुझ्या बाबांशी वाद घालत बसले……..”
 
 
खूप दिवस झाले हल्ली दुपारी प्रमिला काम आटपून सोफ्यावर बसते. टी.व्ही. लावते. सांस बहु सीरिअल नव्हे तर “मायामी इंक”, “एल. ए. इंक” बघण्यात गर्क होते. हा Tatto का तो Tatto? २ cm मधे कोणता Tatto बसेल असा विचार करते. नवऱ्याने permission तर दिली आहे मग शिवानी नाहीतर आपणच का करू नये असं स्वप्नरंजन करत झोपी जाते…

यावर आपले मत नोंदवा